Thursday, January 14, 2010

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला....

हुश्श! आली बाबा एकदाची.. केव्हापासून वाट पाहात होते...कोण काय?? आपली मकरसंक्रांत हो...भारतात कधी इतकी वाट पाहिली नाही तितकी अमेरिकेत वाट पाहात असते मी तिची...तिळगुळासाठी नाही कारण एकतर इथे काही ऑफ़िसमध्ये खास प्रत्येकाच्या घरचे वेगवेगळ्या चवीचे तिळगूळ, (मला येत नाहीत हे आता पोळीपुराणासारखं वेगळं सांगायची गरज नाहीये म्हणा) क्वचित गूळपोळी मिळणार नसते; ना आपण आठवणीने घातलेल्या काळ्या कपड्यांना नावाजणारं कुणी...
ह्म्म्म..एक मात्र आहे की मकर राशीत सूर्यदेवाने प्रवेश केल्याने एक मोठाच फ़रक जाणवतो तो म्हणजे साडेचार-पाचलाच अंधारणारे दिवस हळूहळू मोठे होतात आणि मुख्य ते संक्रातीपासून जास्त जाणवतात...तसं ऑफ़िशियली २१ डिसेंबरची सगळ्यात मोठी रात्र सरली की खरं तर दिवस मोठा व्हायला लागलेला असतो पण माझा स्वतःचा अनुभव संक्रांतीनंतरच तो खराखुरा जाणवतो.
आता ते लवकर मालवणारे दिवस संपताहेत याचा उत्साह आपोआपच शरीरात संचारतो...तशी जिथे असते तिथे कडाक्याची थंडी असणारच आहे, पण निदान दिवसाची लांबी तर वाढतेय...माझ्यासारखे लवकर मालवणा~या दिवसांना कंटाळणारे लोक या बाबतीत नक्कीच सहमत होतील. खरंच भारतात ज्याची किंमत नसते अशा खूप सा~या गोष्टी मायदेश सोडल्या की कशा महत्वाच्या होतात ते जेव्हा त्यातून आपण जातो तेव्हा आपसूक लक्षात येतं.


तरीही मकरसंक्रांत म्हटली की आठवतं ते सुगडीत भरलेलं बोरं, उसाचं छोटं कांड, हरभरे, गाजराचा छोटा तुकडा, तीळगूळ आणि हलवा. किती साधं रूप आहे आपल्या शेजारणीला वाण म्हणून द्यायला? आता काळपरत्वे त्यात कितीही बदल झाला तरी मला ते आमच्या शेजारच्या काकी आईला सुगडीत असं काही काही भरून द्यायच्या ते फ़ार आवडायचं. आई ते आम्हालाच द्यायची. त्याच्याबरोबर तेव्हाही दुसरं काही असायचं म्हणजे छोटा कंगवा नाहीतर एखादी ताटलीबिटली पण सुगडीवर फ़ार जीव जडला होता. त्यानंतर मी कॉलेजला जाईपर्यंत आईला सुगड मिळणं कधी बंद झालं कळलंच नाही. मागे एका वर्षी माझ्या भाचीने मला रंगवलेली सुगड पाठवली होती तेव्हा जुन्या संक्रातीची आठवण झाली. इथे जो फ़ोटो लावलाय तो त्याच सुगडीचा आहे.
संक्रातीच्या दिवशी तिळगूळ खायची पण मजा असायची. वेगवेगळ्या घरचे वेगवेगळे रंग आणि चवीचे आणि मुख्य म्हणजे दाताने तोडायला वेगवेगळा भार लागणारे तिळगूळ खाणं म्हणजे मजाच असायची. कॉलेजमध्येही मित्र-मैत्रीणी तिळगूळ घेऊन यायच्या आणि मग कुणाला कुणाच्या आईच्या हातचा तिळगूळ जास्त आवडला त्याची चर्चाही तितकीच गोड असायची. चार वर्षे एकत्र असण्याचा परिणाम म्हणजे एखाद्या वर्षी मैत्रीणीच्या घरची चव बदलली तरी कळायचं. मग तीही आवर्जुन सांगायची अगं यावेळी आईला गूळ चांगला मिळाला नाही किंवा यंदा तीळ वेगळे मिळाले...एक तीळ सातजणांनी वाटून खाल्ला असं इतर दिवशी खाताना काही कमी जास्त असलं की आई सांगते पण संक्रांतीच्या दिवशी मात्र साताठ पेक्षा जास्तच ठिकाणचे तीळगूळ खाल्ले जात आणि त्याचा परिणामही दुसर्या दिवशी दिसे....:) असो..


पतंगांचं आधी इतकं माहित नव्हतं पण एक वर्षी गिरगावात होते संक्रांतीला आणि पतंगांनी भरलेलं आकाश पाहून फ़ारच गम्मत आली होती...जिथे पाहावं तिथे पतंगच पतंग....काटाकाटी तरी नक्की कुठच्या हिशेबाने करत असतील काय माहित असंही मनात आलं....पण एक मात्र खरं या दिवशी सगळीकडे एकदम उत्साहाचं वातावरण असायचं..
देश बदलला तशी संक्रात साजरं करायचं रूपही बदललं...तिळगूळ करायचं धाडस केलंच नाही....तसंही स्वयंपाकघर हा प्रांत माझा नाहीच...आता इथं खायचं तर केलं पाहिजे यासाठीच मुख्य करून जाते (आणि मनातल्या मनात माझ्या नवर्याच्या अंधेरीच्या घरी मऊसूत पोळ्या करणार्या विमलच्या आठवणी (दोघंही बापरे कंसात कंस......) काढतो) )नशीबाने तिळगूळ मात्र आईकडून नेहमी यायचा. आणि मग एखाद्या मराठी मंडळात गेलो की तिथेच काय ते विकेन्डला संक्रातीचा सोहळा अगदी गूळपोळीसकट. मागच्या वर्षी तर चक्क बोरन्हाण केलं होतं आणि त्यामुळे आरूषचा पण नंबर लागला. आता यावेळी आईबरोबर असल्याने इथल्या गुळाला तो चिकटपणा नाही म्हणून गूळपोळी काही होत नाही हेही कळलं पण घरगुती तिळगूळ झाला.



या ब्लॉगच्या सगळ्या वाचकांना सूर्याचं मकर राशीतलं हे संक्रमण काही ना काही चांगले बदल घेऊन येवो आणि आपला स्नेह या वर्षी अजून वाढो ही सदिच्छा...तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला....

25 comments:

  1. > तसं ऑफ़िशियली २१ डिसेंबरची सगळ्यात मोठी रात्र सरली की खरं तर दिवस मोठा व्हायला लागलेला असतो पण माझा स्वतःचा अनुभव संक्रांतीनंतरच तो खराखुरा जाणवतो.
    > ----

    २१-२२ डिसेंबरचा दिवस सगळ्यात लहान असला तरी (निदान अमेरिकेत) सूर्यास्त हा ६-७ डिसेंबरपासूनच आदल्या दिवसापेक्षा उशीरा होऊ लागतो. पुढल्या २५ दिवसांत संध्याकाळचा उजेड फक्त ८-१० मिनिटांनी लांबतो म्हणून ज़ाणवत नाही. तसंच २०-२२ जूननंतर दिवस लहान होऊ लागला तरी ५ जुलैपर्यंत सूर्यास्त उशीराच होतो. वर्षाचे सहा महिते सूर्यास्त (आदल्या दिवसापेक्षा) उशीरा होईल आणि सहा महिने लवकर, अशी कोणीही अपेक्षा ठेवेल. ते प्रमाण ७ महिने उशीरा आणि पाच महिने लवकर असं का, याची कल्पना नाही. सूर्योदय मात्र ७ महिने लवकर होतो आणि पाच महिने उशीरा. त्यामुळे सकाळी बाहेर पडणार्‍यांना हा जास्त उजेडाचा फायदा ५-१० फ़ेब्रुवारीपर्यंत ज़ाणवत नाही.

    (सूर्यास्ताची वेळ वेड लागल्यासारखी महिनोंमहिने पाहिली (ट्रॅक केली) की अशी फालतू माहिती पदरात ज़मा होते.)

    ReplyDelete
  2. नानिवडेकर, आपल्या अमुल्य माहितीबद्द्ल फ़ार फ़ार धन्यवाद. या पोस्टमध्ये मला ज्या काही चार-पाच संक्रांती मी इथं काढल्यात आणि त्यावरुन जसं वाटलं ते तसं लिहिलं गेलंय..त्याला तसा शास्त्रीय आधार कुठं असायलाच हवा असंही नाही...त्यामुळे जी खडा न खडा माहिती गोळा करणारी लोकं असतात त्यांच्यासाठी ही फ़ालतूच म्हणावी...असो....
    काय आहे शेवटी मनाचं सांगणं प्रत्येकासाठी वेगळं उमगतं...बाकी अशा माहिती देणार्या वेबसाईट्स, वृत्तपत्रं आणि ब्लॉग्ज पण वेगळे आहेत त्यासाठी कुणी चुकूनही या ब्लॉगवर तरी इथं येणार नाही...इथे बर्याचदा माझ्या मनाचं राज्य चालतं आणि त्यामुळे इथली दुनिया या वेगळ्या चष्म्यातूनच पाहिली की मग ती उपयोगी की फ़ालतू?? असा प्रश्नच पडत नाही....

    ReplyDelete
  3. > नानिवडेकर, आपल्या अमुल्य माहितीबद्द्ल फ़ार फ़ार धन्यवाद.
    >----

    चला, तुम्हाला तरी ही माहिती मातीमोलाची वाटली नाही. मला हा सात महिने विरुद्‌ध ५ महिने शोध लागला, तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. तो मी मित्राला सांगितला तर तो म्हणाला, 'तू असली फालतू माहितीच गोळा करत बस.' आता या माहितीचा तसा काहीच उपयोग नाही, म्हणून ती फालतू असल्याचा आरोप मला मान्य आहे.

    ReplyDelete
  4. अपर्णा सुगडाची, हळदीकुंकू व वाण लुटणे, सुंदर सुंदर चंद्रकळा, खडीच्या साड्या व नंतर नंतर चामुंडा सिल्क, नारायण पेठ व पैठण्याही... मस्तच गं. किती छोट्या छोट्या गोष्टींचे अप्रूप वाटायचे लहानपणी. काळा चांदण्या असलेला माझा फ्रीलफ्रीलवाला फ्रॊक होता. तो घातला की मला अगदी राजकन्या झाल्यासारखे वाटायचे.हेहे.... दहा वेळा आईला आठवण दिली जायची अग हळदीकुंकू आहे ना अमूक अमूक कडे.:) बाकी दिवसाच्या लांबीचे गणित कागदोपत्री कुठलेही असू देत आमच्याकडे अगदी फेब्रूवारी संपला तरिही उगवण्या व मावळण्यात फारसा काही फरक पडत नाही.सूर्यच नसतो तर प्रकाश कुठून असणार... बाकी माहिती कसलीही कधीही फालतू मात्र असत नाही हे नक्की.

    ReplyDelete
  5. अगदी मस्त पोस्ट झालंय.. नेहमीसारखं.. आणि हे उगाच म्हणत नाहीये. आज मी सगळे हो सगळे पोस्ट्स वाचले तुझे.. पहिल्यापासून.. सुपर्ब लिहिलं आहेस ग.
    गिरगावातलं तू बरोबर लिहिलं आहेस :) माझं बालपण गिरगावातलं.. अगदी त्याची आठवण झाली. संक्रांतीच्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  6. उसाचं कांडं आणि बोरासाठी मी आईच्या अगोदरच मागं लागायचो, संक्रातीच्या अशा कित्येक आठवणी तुझ्या या पोस्टमुळे ताज्या झाल्या बरं का.
    तिळगूळ घ्या आणि गोड बोला ( तिळाची वडी देउन :-) )

    -अजय

    ReplyDelete
  7. अगं भाग्यश्रीताई, काळी चंद्रकळा राहिलीच...बरं झालं आठवण केली ते...:)
    आणि तू नाममात्र अमेरिकेत आहेस..जरा ढकललीस की कॅनडात जाशील...त्यामुळे तू काय सांगतेस दिवसांचं??...त्यातल्या त्यात फ़ेब्रुवारी लहान महिना असतो माहित आहे ना? कळ काढ जरा मग मार्चमध्ये आहेच ना वेळेचा बदल...नाहीतर इथे यायचं आमंत्रण तर तुला केव्हाचं दिलय....(किचन तर वाट पाहातच आहे::)

    ReplyDelete
  8. हेरंब खरंच की हरभर्याचं झाड बरोबर घेऊन आलास???...पडेन मी उगाच....अरे वा गिरगावातलं बालपण म्हणजे मजा आहे....मी एक वर्ष चर्नीरोडला राहिलेय आणि मुंबईतली माझी सगळ्यात लाडकी जागा दादरखालोखाल तीच आहे...काय तसंही दादर परवडणार नाही...चर्नीरोड म्हणजे तर जाऊदे....भरकटत नाही...तसंही तू दादरबद्दल लिहीलंय तेही वाचलं असशील म्हणा त्यामुळे थांबते......

    ReplyDelete
  9. अजय अरे बोरं तर मी आता कधी खाल्लीत ते आठवावं लागेल...काही काही गोष्टी इथं मिळतंच नाहीत त्यामुळे त्या अशा आठवणीत लगेच येतात..त्यातल्या त्यात उसाचं कांड मिळतं कधीतरी...
    आणि तुझी खास पुण्यातली :) तिळवडी मिळाली छानच आहे.....(अनिकेतने काही काही पुणेरी गोष्टी जरा जास्तच फ़ेमस करायला घेतल्यात....)

    ReplyDelete
  10. संक्रांतीच्या शुभेच्छा.. तुम्हाला पण..

    ReplyDelete
  11. धन्यवाद महेन्द्रकाका...बर्याच दिवसांनी दिसलात....

    ReplyDelete
  12. Manach sangan pratyekasathi vegal umagat!
    totaly agreed.
    I didnt get ur email ID, will u pls mail me at meenal.blog@gmail.com?

    ReplyDelete
  13. संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा!

    ReplyDelete
  14. धन्यवाद मिनल..तुला उत्तर पाठवलंय...

    ReplyDelete
  15. गेले दोन दिवस संक्रांतीच्या सणाबद्दल खूप काही वाचायला मिळाले. रत्नागिरीच्या संक्रांतीच्या आठवणी म्हणजे सुगडाची पूजा, वेगवेगळ्या रंगाचे तीळगुळ आणि तिळाचे लाडू. बाकी पतंग संस्कृती तितकी नाही.

    उशिरा झालाय तरी पण संक्रांतीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  16. धन्यवाद सिद्धार्थ. रथसप्तमीपर्यंत संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या तरी चालतं रे...मला वाटतं मुंबईत गुजराथी लोकांनी हे पतंग प्रकरण आणलं असावं..पण पक्कं माहित नाही म्हणून उगाच तसं लिहिलं नाही.....(कशाला फ़ालतुची माहिती...???) :)

    ReplyDelete
  17. Chaan aahe post.....khoop god.
    Tumhala sudhha makar sankrantichya hardik shubhechha.......

    ReplyDelete
  18. मैथिली स्वागत आणि धन्यवाद...अशीच भेट देत रहा....(तू म्हटलंस तरी चालेल....धावेल)

    ReplyDelete
  19. फारच छान लेख लिहला आहे .तुझा ब्लोग सुद्दा आवडला,खुप सुंदर सजावला आहे.

    ReplyDelete
  20. स्वागत कल्पना आणि इतकं आवर्जुन लिहिल्याबद्द्ल आभारी....या ब्लॉगला अशीच भेट देत रहा...

    ReplyDelete
  21. छान कविता आहे हि ...... अप्रतिम...
    ब्लोग हि छान आहे...

    ReplyDelete
  22. धन्यवाद आणि स्वागत अखिल ......

    ReplyDelete
  23. तुलादेखील मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा गं! तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. तुझ्या पोस्टमुळे कित्ती जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सुगडांची गंमतच वेगळी. मीदेखील सुगड जपून ठेवत असे. आई दरवर्षी हळदी-कुंकू कार्यक्रमाला जायची. नंतर नंतर ते केव्हा बंद झालं, ते आठवतदेखील नाही. पण त्या छोट्या छोट्या वाण म्हणून मिळणार्‍या वस्तू, सुगडातलीच बोरं, उसाचं कांड खाण्यातली गंमत खूप मिस करते मीसुद्धा.

    ReplyDelete
  24. आभार ग कांचन...खरचं आपण लहान असताना अशा छोट्या छोट्या सण इ. मुळे आपलं बालपण खूप छान गेलं असं मलाही वाटत...भेटत राहा...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.