Monday, January 18, 2010

नव्याने लागलेले जुने शोध...

मागच्या आठवड्यातली गोष्ट. एका सकाळी साडेसहाच्या सुमारास एकदम रेडिओ चालु झाला असा आवाज झाला. अर्धवट झोपेत मला वाटलं नवरा चक्क वेळेवर उठला आणि बाथरुममध्ये गेला.आमच्याकडे रेडिओ ऐकण्याची आमची आवडती जागा म्हणजे बाथरुम. त्यासाठी खास अगदी नव्या पद्धतीचा एक रेडिओ दोनेक वर्षांपुर्वी आम्ही घेतला. छोटी साइज, डिजिटल ट्युनिंग आणि मुख्य म्हणजे mp3 साठी खास सोय त्यामुळे आय-पॉड लावुन मस्त मराठी-हिंदी गाणी ऐकायची आणि निवांत आंघोळ...आयला हे पोस्ट आमचा बाथरुमचा रेडिओवर होणार की काय?? जाउदे...पण सांगते सकाळची सुरूवात अशीही करायला काय हरकत आहे? असो...
कुठे होते बरं??? हम्म...तर रेडिओ एकदम साडेसहाला चालु आणि त्यावर एन.पी.आर.म्हणजे नॅशनल पब्लिक रेडिओ, इथे बातमी-माहिती इ.साठीचं, देशभर लोकांच्या देणग्या इ.वर चालवलेल्या चॅनेलचा परिचीत आवाज म्हणजे नवरा चक्क वेळेवर उठलाय असाच माझा समज. त्याच्या भाषेत पहाटेची मिटिंग (साडेसातला किंवा आठला मिटिंग म्हणजे त्याच्यासाठी पहाटेची मिटिंग अशी व्याख्या समजायची) कुणी लावली की तो असा साखरझोपेत उठतो आणि मग बातम्या ऐकत आन्हिकं आटपतो, तसंच असेल असा विचार करुन बाजुला पाहिलं तर हा इथेच...बापरे बाथरुममध्ये भूत आलं की काय आणि ते पण सक्काळ सक्काळी??? काय आजकाल कॉलसेंटर सारखं भुतांना पण अवेळी काम देतात की काय??
मी घाबरुन नवर्याला गदागदा हलवलं "काय रे बाथरुममध्ये कसला आवाज येतो??" तो झोपेत होता पण माझ्यापेक्षा त्याची अर्धवट झोप शहाणी असावी..त्याला लगेच लक्षात आलं की रेडिओचा गजर चालु झालाय. "म्हणजे, या रेडिओला गजर पण आहे??" माझी अर्धवट झोपेतली त्याहून अर्धवट शंका?? "काय इंजिनियर??" ही शिवी (हो आता ती शिवीच आहे माझ्यासाठी) मारायचा चान्स हा कधीही सोडणार नाही आणि आता तो गजर बंद करायला उठायला लागल्यामुळे तोही व्यवस्थित जागा आहे अशावेळी तर नाहीच नाही..."अरे मग तुला मिटिंग आहे तर साधा सेलफ़ोनमधला एकट्याला ऐकु येईल असा गजर लावायचा ना?? हे एकदम परेलच्या गल्लीत चालु असलेल्या भजनांसारखं काय सगळ्यांना उठवायचं??" त्याच्या शिवीवर माझा प्रतिहल्ला.."अगं, पण मी नाही लावला. मी पंधरा मिनिटं झोपणार आहे आता" अरे बापरे म्हणजे हे गजर लावणारं कोण?? मी आपली विचारात आणि तो पुन्हा गाढ झोपेत..
आणि आता पुन्हा एकदा परवाचीच गोष्ट. यावेळी फ़क्त वेळ थोडी बरी म्हणजे सकाळचे सात-सव्वा सात. पुन्हा बाथरूममधुन आवाज पण यावेळी एन.पी.आर. नाही तर चक्क जंगलात शीळ घालत असलेल्या पक्षीविश्वाच्या किलबिलीचा आवाज आणि पाठी ओढ्याचं संगीत. आता मात्र मी दिवास्वप्न पाहातेय असंच मला वाटत होतं कारण सक्काळी उठून जंगल भटकंतीचे ते दिवस पुन्हा यावेत हे माझं ते सुटलं तेव्हापास्नंचं स्वप्न आहे..(अधिक माहितीसाठी पहा माझी भटकंती...तेवढीच स्वतःचीच पाठ थोपटुन घेतेय) थोडावेळ मस्त आस्वाद घेतेय पण घड्याळाचा काटा पुढे सरकतोय तसं नवरोबाच्या सकाळच्या झोपेचं खोबरं करणं भाग होतं (अरे का म्हणजे सध्या त्याने तरी काम केलं पाहिजे नं नाहीतर या ब्लॉगवर लिहायला मी इंटरनेट कुठुन आणणार??) त्याला म्हटलं," एकदम नॅशनल पार्कमध्ये गेल्यासारखं वाटतंय नं?? कुठून आवाज येतोय रे??" "बाथरूम" एक क्षणही न दवडता तो म्हणाला, "मलाही माहित नव्हतं गं या रेडिओला गजराचा हा पण पर्याय आहे म्हणून..." सकाळी सकाळी खरं बोलावं तसं एका भाबड्या क्षणी तो बोलुन गेला आणि त्यालाही एखादा टोमणा कम शिवीसाठी तोंड उघडणार पण कसं माहित नाही मला मागचा आणि हा गजर याचं कोडं उलगडून गेलं.
काही दिवसांपुर्वी एक छोटं स्टेप स्टुल मुलासाठी बाथरुममध्ये हात धुवायला सोपं पडावं म्हणून घेतलं आणि त्याचा वापर करुन हे जुनेच पण आमच्यासाठी नवे शोध त्याच्या फ़ावल्या वेळात लावलेलं कार्टं आमच्यासाठी गजर लावुन स्वतः शांतपणे झोपेत दुसरे कुठले शोध लावायची स्वप्न पाहातोय....
लहान मुलं मोठ्यांना बरंच काही शिकवुन जातात असं जे म्हणतात ना त्याला सपोर्ट म्हणून आमचाही हा एक छोटासा नव्याने लागलेला जुनाच शोध...

24 comments:

  1. सहीये लेकाचा शोध. चँप आहे आरुष एकदम :) ..

    शप्पत कॉपी करत नाहीये पण माझं पुढचं पोस्ट पण बाथरूम वरचंच आहे. निव्वळ आळसटपणामुळे टाकायचं राहतंय..

    ReplyDelete
  2. हा हा हा हेरंब एक मिनिट मी फ़क्त बाथरुमवर लिहेन की काय असंच मलाही वाटलं होतं पण जरा आवरतं घेतलं....तुझी पोस्ट वाचेन नंतर आणि आपलं झालंय ना आधी पण like minds think alike...:)

    ReplyDelete
  3. आरुष पण ना.....हा हा... तुम्हा दोघांच्या झोपेची वाट लावून वर तुमच्यात पहाटे पहाटे तू तू मैं मैं घडवून स्वत: घुर्रर्रर्र फुस्सस्सस्स... करत होता ना...मस्तच. आरूष उद्या पहाटे कुठली धून सेट करतो आहेस???:)

    ReplyDelete
  4. तसे काहीही नाहिये आरूषने ओळखलेय की आई, मावशी या बाया आळशी आहेत म्हणून तो गजर लावतोय..:)

    सहीये मॅडम अजुन तर सुरूवात आहे...पुढे पुढे बोलायला लागला की तुझ्या पोस्ट वाढतील बघ....

    ReplyDelete
  5. हा हा हा...अगं तू तू मैं मैं को तो बहाना चाहिये...फ़िर मनाने में मजा आता है....ही ही...त्याला विचारून सांगते कुठची चिवचिव सेट करतो ते.....मजा असते गं छोट्या छोट्या गमती अनुभवायला....

    ReplyDelete
  6. तन्वी मावशी कुठे गायब असतेस आजकाल??...तूही आम्हाला शाळेतले धडे गिरवायला शिकव ना??
    अगं छोट्या छोट्या गमती पण काळाच्या ओघात विसरेन म्हणून आठवणीत ठेवते...बघुया आता काय काय दिवे लावतो ते...दिव्यांवरून जाता जाता सध्या उंची फ़क्त दिवे बंद करता येईल एवढीच आहे. अमेरिकेत तसंही दिवे खाली म्हणजे बंद असं उलट आहे ना... त्यामुळे रोज दिवे बंद करुन मग आई-बाबांना अंधारात ठेवण्याचा कार्यक्रम सुरू असतो....

    ReplyDelete
  7. हेहेहे .... वाचता वाचता मला 'गजरने किया है इशारा...' हे त्रिदेव मधले गाणे आठवले ... :D

    ReplyDelete
  8. तो एकटाच सकाळी उठून बसतो आणि तेव्हा तुम्ही दोघे ढाराढुर झोपलेल असता मग त्याने काय करायचा ना बिचारयाने, म्हणून लावला असेन त्याने. आरुष बेटा, उद्यापासुन थोडा अलीकडचा लावता जा म्हणजे तरी तुझ्या वेळेला उठतील तुझे आई बाबा :-)

    -अजय

    ReplyDelete
  9. रोहन जसा काही लोकांना चांगला ड्रेस सेन्स असतो तसा तुझा गाण्याचा सेन्स मला जाम आवडला आणि त्यासाठी तुला वरच्याचा वरचा सा...ही ही...बाकी आम्ही काय रे त्याच्या इतरही काही गजरांच्या तालावर नाचतोय झालं....:)

    ReplyDelete
  10. अजय, कस्सं कळलं रे तुला आमच्या ढाराढुर बद्दल..चांगल्या टिपा देतोय....हे हे...

    ReplyDelete
  11. वा .. वा .. ह्या अपर्णासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत... :D हेहेहे

    ReplyDelete
  12. मजा आहे.. :) मस्त वाटलं सकाळी वाचुन..

    ReplyDelete
  13. धन्यवाद महेन्द्रकाका. आजकाल अशाच मजा मजा अनुभवतोय...

    ReplyDelete
  14. मस्तच गं अपर्णा..

    आईबाबांना कस सतवायचं हे पोरांना विषेश म्हणजे शिकवावं लागत नाही.


    बाय दी वे सानू दोन वर्षांची होती तेव्हा तिनेही एक असाच उद्योग करून ठेवला होता त्याची आठवण झाली. माझी पुढ्ची पोस्ट आता त्यावरच टाकते. नक्की वाच. वचून धमाल आली हे काही येगळं सांगाया नकोच.

    ReplyDelete
  15. शिनू तुझ्या लेकीच्या गमती वाचायला पण धमालच येते...त्यामुळे तिने काय केलं असावं याची वाट पाहते...

    ReplyDelete
  16. धमाल शोध आणी अप्लीकेशन पण भारी... [:)]

    ReplyDelete
  17. स्वागत देवेन्र्द....अगदी बरोबर म्हटलंत तुम्ही ऍप्लिकेशन सही केलं त्याने....:)

    ReplyDelete
  18. आम्हाला अजून घड्याळाचा गजर लावता येत नाही, वाजला की "झोप गप" म्हणून घड्याळाला टपलीत द्यायची, दोनतीनदा टपलीत दिली की बटण सापडतं आणि बंद होतो एकदाचा, आरुष सारखा कोणी असेल तर सरळ होईन मी, वेळेत उठेन व्यायाम करेन, रिक्षाचे पैसे वाचतील, सवडीने चहा पितापिता वर्तमानपत्र चाळता येईल,

    कसलं काय ब्रश तोंडात एक पाय बाथरुममध्ये दुसरा सॉक्समध्ये धमाल नुसती :)

    ReplyDelete
  19. प्रसाद म्हणजे कामाची धावपळ आहे तर...थांब आता आरुषलाच तुझ्याकडे पाठवते....बरोबर दोन्ही पाय सॉक्समध्ये वेळेवर जातील.....

    ReplyDelete
  20. अगं मुलं पण जाम मजा करतात आपली. आर्यन त्याच्या आजीकडे असतो दिवसभर, तिचा मोबाईल घेतो खेळायला कधि कधि, असाच एकदा आईचा पहाटे पाचला गजर वाजला मोबाईलमधुन, ती विचार करत्ये मी तर लावला नाही आपोआप कसा वाजला गजर. नंतर लक्षात आले नातवाचा पराक्रम :)

    ReplyDelete
  21. आर्यन आणि एकंदरित ही पिढी जरा एक कदम आगेच आहे गं.....आर्यन मोबाईल घेऊन कसा मग्न होत असेल ते आठवत होते...ही ही...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.