Thursday, January 21, 2010

पानगी

पालघरमधल्या एका छोट्या गावात माझं आजोळ आहे. लहानपणीच्या दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत तिथे पडीक असतानाच्या कित्येक दुपारी आजीच्या सायीसारख्या मऊ मऊ हातांनी बनवलेली त्याहूनही मऊ अशी पानगीने तृप्त होऊन जात. आजीची पानगी आणि मामीने केलेला चहा असं आम्ही सगळी मावसभावंडं आणि मामेबहिणी वाड्यातल्या चिंचेच्या झाडाखाली ठेवलेल्या खाटांवर बसून गप्पा मारत घेत असू तेव्हाचा आजीचा चेहरा अजूनही डोळ्यापुढे येतो. एकेकाळी घरच्या म्हशीच्या दुधा-तुपाचे हंडे भरलेल्या गोकुळात आता आपल्या नातवंडांना चहा द्यावा लागतो याचा सल तिला असावा असं मला आता तिचा चेहरा आठवताना उगीच वाटतं.
दुपारी आई, मावशा त्यांच्या चुलत-मामे अशा कुठल्या कुठल्या नातेवाईकांकडे गप्पा मारायला गेल्या की "आजी, भूक लागली"ची भूणभूण एकापाठी एक सगळी नातवंडं करत आणि मग आजी "थांबा जरा" म्हणून चुलीपाशी बसे. आणि मग घरी पिकलेल्या तांदळाचं आधी जात्यावर आणि नंतर नंतर गिरणीत दळलेलं पीठ परातीत येई.

त्यावर थोडंसं मीठ, भरपुर तूप, गुळाचा खडा टाकुन थपथप असा आवाज येईल अशा प्रकारचं एकदम मऊ पीठ मळलं जाई. केळीचं नसलं तर सुकलेलं पळसाचं पान धुवून त्यावर पीठाचा गोळा थापला जाई आणि त्यावर दुसरं पान लावून हा सर्व जामानिमा चुलीवर तापलेल्या तव्यात जाऊन बसे. नंतर मग ती भाकरी दोन्ही बाजुने पानांचा वास होईस्तोवर भाजली जाई. आजी पानगी करतेय ही वर्दी द्यायला सगळ्या घरात दरवळेला तो खरपूस वासच बास असे.

आताही नुसतं त्या वासाच्या आठवणीनेच भूक खवळेल...ही भाकरी पूर्ण भाकरी भाजुन होईपर्यंत आजीला कधी चुलीपुढून उठलेलं मी पाहिलंच नाही.अगदी निगुतीने त्यावर लक्ष ठेऊन उलट फ़िरवायचं टाइम मॅनेजमेन्ट करत असे. तव्यावरुन उतरुन मग वरचं अर्धवट जळकं पान काढलं की थोडासा जाड आणि तांबुस रंगाचा तो पापुद्रा दिसला की समजायचं पानगी तयार. खालचं पान न काढता उलाथणीने त्याचे हवे तितके तुकडे करताना आम्ही आपापले चहाचे कप घेऊन पहात असू आणि मग तो पानगीचा तुकडा त्याबरोबर जरा जास्त दूध घातलेला चहा म्हणजे दि अल्टिमेट कॉंबिनेशन. महिन्याभराच्या सुट्टीत प्रत्येक आठवड्यात निदान तीन-चारदा तरी पानगी आणि चहा हा आमचा आफ़्टरनुन स्नॅक असे.
यथावकाश सुट्ट्या संपत आणि परतायचा तो वैट दिवसही येई. मुंबईला परत जायला दुपारची एस.टी.पकडायची असे त्याची वेळ असेल त्याप्रमाणे पुन्हा एकदा केळीची पानं परातीतला तांदळाच्या पीठात गूळातुपाने न्हाऊ-माखू घालुन मस्त मऊ मऊ हातानी त्याला पानावर थापून वरती थोडंसं ओलसर दुसरं पान लावून मग चुलीवरच्या गरम तव्यावर पडत आणि त्यावेळी मात्र ती पानगी पिशवीमध्ये भरताना आईचे हात जड झालेले असत.घरी परत पोहोचल्यावर पानगी खाताना आजीच्या आठवणीने गलबलून येई.

आमच्याकडे जेव्हा राहायला आजी येई तेव्हाही ती अशीच पानगी करुन खाऊ घाली फ़क्त ती चुलीवर जास्त चांगली होते असं तिला वाटे. आजी गेली त्याला जवळजवळ दहा वर्षे होतील. त्यानंतर मग आई घरीच पानगी करत असे. माझ्या बाळंतपणात अमेरिकेतही ही भाकरी आली. इथे नशिबाने एका सुपरमार्केट मध्ये फ़्रोजन सेक्शन मध्ये केळीची पानं मिळाली. आणि मग खास बाळंतीणीचा नाश्ता म्हणून चारेक वाजता दुधाबरोबर मला पानगी मिळत होती. अरे इथेही करता येईल की या विचाराने मग मीही मायदेशी जाणं झालं तेव्हा मामाकडून आठवणीने पळसाची सुकी पानं माझ्याबरोबर आणली. अर्थात तूप इतक्या सढळ हाताने घालणं मला जमत नाही म्हणा किंवा पोळी आणि तिची सारी सख्खी, चुलत, मावस, सावत्र भावंडं यांनी वैरीण व्हायचा चंगच बांधल्यामुळे म्हणा माझी काही ती तशी होत नाही.

हे सगळं इतकं खास आठवण्याचं कारण आज बर्याच दिवसांनी घरात भाजक्या पानांचा खरपूस वास दरवळतोय. दोनच दिवसांनी आई परत मायदेशी जायला निघेल पण जाता जाता आठवणीने लेकीला आणि नातवाला पानगी खाऊ घालतेय. ती खाताना फ़ार दाटून आलंय आणि हे लिहिताना तर सारंच धूसर होतंय....

41 comments:

 1. Sarvpratham nehamesarkhich post apratim jamaliye...!
  Baraka tumchy sarvanchy prtikriya vachun manala khup chann vaTala mhaNunch mhanato tumhich majhe sage soyare mhaNuna navina navane nava bolg suru kelay.. I Hope u'll Appriciate this time as well.. and seriously I cant stop Writtin.. as I cant stop breathing...!

  ReplyDelete
 2. वैभव/अजय, अरे एकच मिनिट झालंय पोस्ट टाकून...अजुन सावरतेय स्वतःला इतक्यात तुझी कॉमेन्ट. खरं सांगु का एखादी गोष्ट मनाच्या खूप जवळ असते नं ती मांडताना तो वर बसला आहे ना बरोबर सगळं लिहून घेतो. बघ, म्हटलं नं तुला लिहिल्याशिवाय राहू नकोस..पण हे नाव का बदललंस कळलं नाही..मग आतापासून तुला वैभव म्हणायचं का??
  आणि हो तसा माझा मूड उदास होता पण तुझी झटकन कॉमेन्ट आली आणि पटकन तो बदलला...आभार..

  ReplyDelete
 3. हा "धुसर" प्रकार खूप ओळखीचा आहे आणि खुपदा होतोच. २ महिन्यांपूर्वीच आमचं पण असंच झालं होतं आई-बाबा (दोघांचे ही) परत गेल्यावर. कमीकमी महिनाभर तर आम्ही हेच म्हणत होतो की बास झालं जाऊया आता परत. :-(

  ReplyDelete
 4. हो रे हेरंब खरंच आहे ते..मागच्यावेळी ते टाळण्यासाठी म्हणून आईबरोबर मीच गेले होते. अर्थात नेहमी ते शक्य नाही म्हणा..पण वाटतं की बास आता.....पण त्रिशंकु अवस्था आहे काही दिवस लटकायचं आणि मग परतायचं..पाहुया...

  ReplyDelete
 5. वा पानगी...आय एम लविन इट...
  आमच्या इथेही बनवली जाते पानगी कधितरी..खरतर चुलीवर पानगी केल्यावर त्याला एक वेगळीच मस्त चव येते,गॅसवर तेवढी मजा येत नाही.असो बरयाच दिवसात खाली नाही तुमची पोस्ट वाचुन पानगीचा तो खरपुस वास माझ्या नाकात दरवळायला लागला आहे...बाकी जवळच अस कोणी परत निघतांना जवळपास सर्वांची मनस्थिती अशीच असते...

  ReplyDelete
 6. हम्म्म खरंय देवेंद्र. चुलीवरची प्रत्येक गोष्ट जास्त छान चव घेऊन जन्माला येते असं वाटतंय...म्हणजे अगदी चुलीवर तापलेलं आंघोळीचं कढत पाणी, चुलीत भाजलेली कोंबडी, बटाटा, चुलीवरची भाकरी, मटणाचा रस्सा...सगळी नावं घेतली तर इथे निषेध करायला भलेभले एका मिनिटात येतील..मग आता लवकरच पानगीचा मुहूर्त सुटो....

  ReplyDelete
 7. वा... अपर्णा.. ही तुझ्या आठवणीची पोस्ट आहे की माझ्या खादाडी पोस्टला निषेध म्हणून टाकली आहेस. हेहे..

  सकाळी-सकाळी नाश्त्याला पानगी म्हणजे माझा आवडता पदार्थ... फोटो मस्त आहेत. आणि देवेन्द्र सुद्धा आपल्याच गावाकड्चा तेंव्हा हां आपल्या सर्वांचाच फेवरेट पदार्थ .. नाही का... :D

  "चुलीत भाजलेली कोंबडी, बटाटा, चुलीवरची भाकरी, मटणाचा रस्सा...सगळी नावं घेतली तर इथे निषेध करायला भलेभले एका मिनिटात येतील" - निषेधाचे खलीते सांडणीस्वारासोबत पाठवले आहेत ... हेहे.. :P

  ReplyDelete
 8. रोहन अरे नाही ही माझी आत्ताच खालेल्या पानगीला स्मरून लिहिलेलीच पोस्ट आहे. अरे आई परवा निघतेय भारतात जायला म्हणून तिने केली होती...
  म्हणजे खादाडीबद्द्ल लिहायला मला नक्कीच आवडेल कारण निषेध तर करायलाच हवा तुमच्या सगळ्या खादाड पोस्टांचा पण ही त्यामुळे आलेली पोस्ट नाहीये...तू शेवटपर्यंत वाचलंस तर समजेलच म्हणा तुला...
  आणि हो उद्याच्या नाश्त्याला पण उरवली आहे...पाठव आता तुझ्या सांडणीस्वारांना....:)

  ReplyDelete
 9. ...छानचं आठवण !!!

  ReplyDelete
 10. पोस्ट मस्त आहे.

  "चुलीत भाजलेली कोंबडी, बटाटा, चुलीवरची भाकरी, मटणाचा रस्सा..."
  निषेध निषेध... जाहीर निषेध!!!

  ReplyDelete
 11. अपर्णा, माझाही निषेध. पानगी अप्रतिमच लागते त्यात आजीच्या हातची म्हणजे खरेच अल्टिमेटच. पोस्ट एकदम हळवी झालीये ग. आईची भारतात परतायची वेळ जवळ येतेय तशी तू अजून अजून...
  बाकी " चुलीवरची भाकरी, भाजीचा तिखटजाळ रस्सा, आणि जाळात फेकलेले बटाटे, कांदे... अहाहाsss...." पण मी काय म्हणतेय, ती उरवलेली पानगी आपण वाटून खाल्ली तर अजूनच गोड लागेल आणि आजीही खूश होईल ना...मग येऊ का?

  ReplyDelete
 12. ह्म्म. पानगं हा प्रकार मी कधीच खाल्ला/पाहिला नाही,कदाचीत हा कोकणातला असावा. पण एकंदरच ज्या प्रकारे तू इथे हे सगळं लिहिलयस ते वाचून मात्र मी आईला सांगणार आहे की मला हे पानग करून हवंय. पण हे कशाबरोबर खातात ते माहित नाही.

  ReplyDelete
 13. अपर्णा.. अगा गंमत करतोय .. आई परत जाणार आहे ते तू मला बोलली होतीस ... :) मी पाठवलेले सांडणीस्वार तन्वी आणि भाग्यश्री ताईकडून सुद्धा खलीते घेउन तुझ्याकडे पोचतील ... हेहे

  अजय ... त्याला 'पानग' नाही म्हणत 'पानगी' असेच म्हण ... :) हा प्रकार उत्तर कोकणात खुप प्रसिद्द आहे.

  ReplyDelete
 14. योगेश स्वागत आणि आभार....

  ReplyDelete
 15. पंकज तू काय निषेध...तू तर जंगलात जिकडे तिकडे तीन दगडांची चूल मांडून हादडत असशील ना चुलीवरचं काय काय.....

  ReplyDelete
 16. अगं भाग्यश्रीताई ये नं तुझ्यासाठी खास उरवली आहे भाकरी...आता सक्काळी आरुषला दाखवत होत तर तो चक्क त्याला "पावो"(त्याच्या भाषेतला पाव) म्हणाला...ही मुल पण ना?? ABCD कुठले......आणि मला सांग रेसिपी कशी वाटली?? फ़ोटोसहित?? करून पाहा...पोटोबासाठी हवी आहे का? हे हे....मजा करतेय एक्सपर्ट लोकांची....

  ReplyDelete
 17. अरे अजय तांदळाचं पीठ आणि केळीचं पान कुठे मिळतं सांग मला??...कोकणातलंच आहे आणि रोहनने म्हटल्याप्रमाणे उत्तर (रोहन तुला मी या ब्लॉगवरचं दिशादर्शकाचं काम देणार आहे...आता तू मला वातकुक्कुटमधला कोंबड्यासारखा दिसायला लागलाय...हा हा हा...आणि कोंबडे भाजुन खातात....हा हा हा.......)
  असो..अजय आईला माझी पोस्ट दाखवलीस तर बघ नक्की जमेल नाहीतर तुला एकदा आमच्यापैकी कुणाला भेटून खिलवावी लागेल..बघ माझ्या हातची खायची तयारी आहे का??? (तयारी की डेअरिंग??)
  तळकोकणात पानगी करत नसावेत तिथे आंबोळ्या जास्त फ़ेमस....

  ReplyDelete
 18. रोहन तू "दिशादर्शक आगलावे" आहेस..और ऐसे लोगोलं को हम सिर्फ़ सजा-ए-बोर्डी फ़रमाते है...

  ReplyDelete
 19. हादडतो की... पण इथे नको त्या वेळी उल्लेख आला. माझी भटकंती पुढचे दोन-अडीच महिने तरी बंदच आहे.

  ReplyDelete
 20. ओ हो...म्हणजे मूळ कारण तुझी भटकंती बंद आहे हे दिसतंय....करशील रे परत ....एकदा सगळ्यांनी भेटून जरा कोंबड्या भाजण्याचा जंगी कार्यक्रम केला पाहिजे... (आणि काही शाकाहारी लोकांसाठी बटाटे, रताळे इ.इ....:)

  ReplyDelete
 21. सुंदर लेख व सहज शैली आवडली. असेच लिहा. हार्दिक शुभेच्छा!

  -- अरुंधती

  --
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  ReplyDelete
 22. जळावा आणखीन जळावा. त्यात उपाशी पोटी पानगीबद्द्ल वाचतोय.

  आता कधीतरी सर्व ब्लॉगर्सना हे सारे खायला घाला.

  ReplyDelete
 23. स्वागत अरुंधती आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल आभार....

  ReplyDelete
 24. काय हरेकृष्णाजी नेहमी ते काम आम्ही तुमच्या ब्लॉगवर येऊन करतो...

  ReplyDelete
 25. आलीस ना की 'सजा-ऐ-बोर्डी'लाच हा कार्यक्रम करून टाकू.. जंगल रिसोर्टला. तिकडे सर्व सोय आहेच.. मग काय कोंबडया, बटाटे भाजायचे ते भाजू. हेहे..

  ReplyDelete
 26. अब आया ना उंट पहाड के नीचे....वाट पाहाते मी पण आता तो बोर्डी योग कधी येतो...

  ReplyDelete
 27. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 28. छान आहे हा पोस्ट. आत्तापर्यंत पानगी फकत ऐकली होती आता रेसीपी पण कळली, आणि सुगंध पण आल्यासारखा वाटतोय.. टाकतोच फर्माईश आईकडे आता.

  ReplyDelete
 29. २ - ३ दिवसापासून हि पोस्ट वाचायची ठरवली होती पण वेळ मिळत नव्हता .. आत्ताच वाचली
  मस्त लिहिले आहेस
  जुण्या आठवणी उजळल्या कि थोडस 'धुसर' हे होणारच ना ?

  ReplyDelete
 30. धन्यवाद प्रितम..रेसिपी तर दिलीय आता बघ तू खाल्यावर चवही कळव...चहा आणि पानगी एक अप्रतिम कॉंबिनेशन आहे....

  ReplyDelete
 31. विक्रम आवर्जुन लिहिल्याबद्दल आभार..आठवणींमुळे तर आहेच पण आई परत घरी जातेय म्हणून जास्त धूसर.....

  ReplyDelete
 32. पानगी, सांदण, खांडवी असे पदार्थ शेवटचे खाल्ल्याला युगं उलटून गेली. आता तर त्यांची चवही आठवत नाही. या शेरातल्या जीवनापेक्षा गावचंच आयुक्ष बरं, न्हाई का?

  ReplyDelete
 33. खरय संकेत, ही पोस्ट माझ्या फार जवळची आहे...आज पुन्हा वाचताना माझी आजी, आई आणि त्या साऱ्या आठवणीनी थोड भरून आल्यासारखं होतंय.

  ReplyDelete
 34. तुम्ही पालघरच्या जवळ आजोळ आहे असं लिहलंय, म्हणजे नक्की कुठे? माझं शालेय शिक्षण पालघरला झालं म्हणून उत्सुकता.

  ReplyDelete
  Replies
  1. मोहना आभार आणि मला एकेरी हाकही धावेल..मी बहुतेक वयानेही लहान असणार आहे तुमच्यापेक्षा.
   बरं पालघरमध्ये सूर्या नदीच्या काठावरचं "मासवण" हे माझं आजोळ. तुम्हाला माहित असेलच.. :)

   Delete
 35. हं...नाही माहीत मला. सातपाटी, केळवा अशी नावं येतायत डोळ्यासमोर. मी वयाने मोठी आहे की नाही तुझ्यापेक्षा ते माहित नाही :-) तुला कसं कळलं?, पण अपर्णा म्हणेन. मलाही एकेरी हाकच आवडेल. पालघर म्हटल्यावर पुढे खरं सांगायचं तर वाचलं नाही आधी पत्र पाठवलं. आता वाचते सावकाश. फेसबुकमुळे परत पालघरची खूप जणं भेटली आहेत आता.

  ReplyDelete
  Replies
  1. अगं छोटंसं गाव आहे...माझ्या आजीचं माहेर आणि सासर एकच असल्याने त्या गावातले सगळेच माझे इथुन-तिथुन नातेवाईकच लागतात इतकं छोटं...:)
   असो...वयाचं म्हणशील तर बहुतेक तुझ्या "मोसम"मधल्या कुठल्यातरी पोस्टमध्ये मागे वाचल्याचं आठवतं (कदाचित तुझ्या मुलांचे शाळा/ग्रॅज्युएशनचे उल्लेख असावेत) पण असं वाटलं....मला तसंही समोरच्याला एकेरी चालत असेल तर माझ्यापेक्षा कितीही मोठ्या व्यक्तीला मी एकेरी करू शकते...सो वयाबद्दल वरी नॉट.....:) भेटूच पुन्हा इतर पोस्टवर....
   पानगी करून पाहणार आहेस का? मी माझ्या अमेरीकेतल्या घरात सुकलेली पळसाची पानं ठेवते. कधी मूड आला की पानगी करायला बरी पडतात.

   Delete
  2. हं, आता आलं लक्षात. तू कदाचित ओऽऽड्युड/ स्पेलिंग बी मधील शाळांचे उल्लेख वाचले असशील. मला वाटतं, परदेशात आलं की हे अगं तुगं सहज जमतं आणि तेच भावतं. नाही का?
   पानगी वाचलं मी, शेवट छान केला आहेस. पानगी करते मी, इंडियन स्टोअरमधून आणलेली केळीची पानं वापरते. पण बहुतेक त्याला वेगळं नाव आहे कोकणात. मला आत्ता काही केल्या नाव आठवत नाहीये, पदार्थांची वही केरीत आहे, आम्ही नुकतेच शारलटला शिफ्ट झालो आहोत.
   पालघर मात्र काही केल्या मनातून जात नाहीये आज. माझे वडिल जिल्हा परिषदमध्ये होते, त्यांच्या फिरतीमुळे आम्हाला जीपमधून जायला मिळायचं कुठेकुठे. आम्ही सगळी उडाणटप्पू क्वार्टसमधली (एकंदर तेरा) मुलं केळवा, सातपाटीच्या समुद्रावर धुमाकूळ घालायचो.

   Delete
  3. मला खरं म्हणजे कॉलेज संपल्यावर मुंबईत नोकरी करायला लागल्यापासून बहुतेक एकेरीची सवय लागली. कॉर्पोरेट वर्ल्ड आणि काय :)
   तू तळकोकणातली असशील तर माहित नाही मला तिथे पानगीला काय म्हणतात ते, पण तिथे एक "पातोळे" नावाचा एक वेगळा पदार्थ असा पानात लावून केला जातो कदाचित तुला तो आठवला असेल.
   तुम्हाला तेरा मुलांना उडाणटप्पुपणा करायला काय धमाल येत असेल नाही?
   आज तू बहुतेक पालघरमय झाली असावीस. :)
   काळजी घे.बोलुया...:)

   Delete
  4. बरोऽऽऽब्बर ओळखलंस, पातोळेच म्हणायचं होतं मला. मी रत्नागिरीची आहे.

   Delete
  5. यु हु....आज ब्येस्ट गेस करायचा मान मला मिळणार बहुतेक..माझे दोन ग्येसेस परफ़ेक्ट आलेत....
   मजा म्हणजे माझं कुकिंग स्किल हे असंच कुठे, काय, किती छान मिळतं इथवरच...बाकी करावं लागतं म्हणून करतो टाइपची आहे मी..खादाडी मात्र प्रचंड आवडते....तुला या ब्लॉगवरच्या खादाडी पोस्ट्स आवडतील बघ... :)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.