Monday, January 25, 2010

त्या सार्‍या सव्विस....

आता हाकेच्या अंतरावर आहे सव्विस.तसं सव्विस म्हटलं की सव्विस जानेवारीच आठवायची. अगदी पार शाळेपासून ते नंतर कामावर जायला लागेपर्यंतची. पण आजकाल नुस्तं सव्विस म्हटलं तरी बरंच काही आठवतं...
शाळेत असताना खरं सांगु का एक पंधरा ऑगस्ट झाल्यावर पुन्हा सव्विस जानेवारी का? हा प्रश्न नेहमीचाच होता. प्रजासत्ताक झालो म्हणजे काय झालो हे आताही कळतंय असं नाही.पण जाऊदे ती चर्चा नको. प्राथमिकला असताना सव्विस जानेवारीला फ़क्त झेंडावंदन, भाषणं आणि अर्थातच नंतर मिळणारा खाऊ हे जास्त आठवतं. पण माध्यमिकला आधीपास्नंच कवायतीची तयारी करून घेतली जायची आणि ती माझी फ़ार आवडीची गोष्ट असे.
मुख्य म्हणजे हक्काच्या पी.टी.च्या तासावर कुठलेही नावडते शिक्षक त्यांचे आम्हाला नावडते विषय घेऊन अत्याचार करू शकत नसत आणि दुसरं म्हणजे पी.टी. च्या सरांना पण कम्पलसरी आमच्याबरोबर असावं लागे. नाहीतर बरेचदा ते आम्हाला बेवारशासारखे मैदानावर सोडत आणि मग कुणी नीट न खेळता हवा तो उद्योग करत. तर सव्वीस जानेवारीच्या संचलनासाठी आमच्या शाळेत वर्गाप्रमाणे साधनं वाटलेली असत म्हणजे सहावीला डंबेल्स, सातवीला बाटल्या (हे दोन्ही लाकडाचे बरं का) आणि आठवीला लेझिम. बाकी इयत्तांना मला वाटतं कवायतीचे इतर संचलनाचे प्रकार. तर सहावी ते आठवीचे हे आयुधं घेऊन करायचं संचलन मला फ़ारच आवडत असे. त्याच्यासमोर एक-दोन भाषणं आणि इतर कार्यक्रम चालवायची तयारी होती.
काही काही वेळा सव्विस जानेवारीच्या निमित्ताने आंतरशालेय समुहगान स्पर्धाही असत. मग नोव्हेंबर-डिसेंबर पासून त्याची तयारी करायला मिळायची म्हणजे पुन्हा तेच संगिताच्या हक्काच्या तासावर येणारी गदा यायची शक्यता नसे आणि एकत्र गाताना कितीही वरच्या पट्टीत कसंही रेकलं तरी सर ओरडायचे नाहीत. खरं तर ते स्वतःच इतके तल्लीन होऊन आणि हातवारे करत गात असत की त्यांना या सगळ्याचा पत्ताच नसे. समुहगीत आणि त्यातल्या त्यात ती तेव्हा शिकवलेली "आता उठवु सारे रान", "हिंद देश के निवासी" सारखी गाणी त्या दिवसांना एकदम भारावून टाकत. सव्विस जानेवारीच्या आधी डिसेंबरमध्ये शाळेत होणारे सामनेही संपलेले असत; त्यांची बक्षिसे मिळवलेली मुले सव्विस तारखेला प्रशस्तिप्रत्रक मिरवत आणि नंतर मात्र परिक्षांचाच मोसम असल्यासारखे सगळे शिक्षक पी.टी. आणि संगीताचे तास आपल्या तावडीत मिळवायच्या मागे लागत. सव्विस जानेवारी संपता संपता ही एक शालेय जीवनातली खिन्नता मागे ठेऊन जाई.
त्यानंतर नोकरीला लागल्यावर सव्विस जानेवारी म्हणजे हक्काची सुट्टी असं समीकरण असलं तरी इमारतीच्या झेंडावंदनाला जाणं व्हायचं. तिथे भाषणं नसत पण त्यावर्षी सोसायटीत एखादा दहावी-बारावीला चांगले गुण मिळवणार्या विद्यार्थ्याचं कौतुक किंवा तत्सम काही असायचं. या काळात दूरदर्शनवरचं दिल्लीतलं झेंडावंदन आणि संचलन, झॉंकिया हेही अगदी मन लावून पाहायचे. त्यानंतर परदेशगमनामुळे झेंडावंदन नाही पण सव्विस जानेवारीच्या आठवणी, ऑनलाइन संचालनाच्या चित्रफ़िती असं पाहाणंही आहेच...
अमेरिकेत आलो आणि इथे सण म्हणजे अति शांतता हे नवं समीकरण कळलं. म्हणजे त्यांचे थॅंक्सगिव्हिंग, ख्रिसमस इव्ह किंवा प्रत्यक्ष ख्रिसमस असे दिवस आले की रस्ते ओस आणि घराच्या भागात रस्त्याच्या एका कोपर्‍यावरच्या गाडीचं दार उघडलं तरी दुसर्‍या कोपर्‍यावरच्या घरात ऐकायला जाईल इतकी शांतता..आम्ही पडलो पक्के मुंबईकर. थोडं विचित्रच वाटे. अर्थात घरातल्या घरात सण साजरे करायची इथल्या लोकांची पद्धत. अशावेळी आमच्यासारख्यांना तर खिन्नच वाटे. त्यामुळे २००४ च्या ख्रिसमसच्या दिवशी दुकानं बंद, सगळं सामसुम असह्य झाल्याने जवळच्या एका मित्राकडे सहज गप्पा, जेवण असं करून रात्री बाराच्या नंतर वगैरे परतत होतो म्हणजे २६ डिसेंबर उजाडताना. थंडीतल्या निरभ्र रात्रीचं आभाळ पाहाताना एक तुटलेला तारा दिसला आणि शाळेतली "लिटिल मॅचगर्ल" आठवली. आम्ही घरी पोहोचेपर्यंत आशियातली सकाळ सरली असेल आणि हिंदी महासागरात झालेल्या भुकंपामुळे आलेल्या सुनामीने कित्येक घरं उद्ध्वस्त केली होती. त्या रात्री पाहिलेला तो तुटला तारा आपल्याबरोबर किती जणांना घेऊन गेला हे आठवणीत कायमची ठेवणारी ही एक आणखी एक २६.
त्यानंतर २००५ मध्ये भारतात गेले तेव्हा २७ जुलैचं परतीचं तिकीट होतं. आदल्या दिवसापर्यंत उंडारायचं नाही असं आईने बजावलं असलं तरी माझी एक मैत्रीण नेमकी बंगलोरहुन मुंबईत २६ ला येणार असल्याने तिला भेटण्यासाठी म्हणून बाहेर पडले आणि २६ जुलैच्या त्या प्रलयंकारी पावसात कांदिवलीमध्ये एका ठिकाणी आम्ही अडकलो. घरचे हैराण, आता काय काय ऐकायला लागतंय आणि परत कसं जायचं एक ना दोन हजार चिंता. त्यादिवशी माझ्या अगदी जुन्या-पुराण्या डिजिटल डायरीने हात दिला. माझा कॉलेजमधला एक मित्र कांदिवलीत राहायचा त्याचा माझ्या नशिबाने वर्षानुवर्षे तोच राहिलेला नंबर त्या डायरीत होता आणि त्याच्या आईला तसंही मी चांगलं ओळखत होते. त्या रात्री त्यांच्या घरचे कुणीच घरी येऊ न शकल्याने त्या काकी एकट्या होत्या आणि मी कुठे अडकले आहे हे न कळता त्यांना फ़ोन केल्यावर त्यांनी ताबडतोब त्यांच्याकडे यायचा जसा काही आदेशच मला दिला. ज्या भल्या व्यक्तीने आम्हाला फ़ोन वापरायला दिला तो तिथलाच एक दुकानदार होता आणि त्याच्यामार्फ़त आम्ही पत्ता शोधुन ती रात्र त्यांच्याकडे काढली. आम्ही काकींबरोबर राहिल्याने माझ्या मित्राच्या घरच्यांना बरं वाटत होतं कारण नाहीतर घरचं कुणी येऊ न शकल्याने त्या एकट्या पडल्या असत्या..त्या तितक्या गोंधळातही आम्हा तिघींना त्यांनी मुगाची खिचडी मऊ करण्याची पद्धतही सांगितली होती आणि हक्काने आम्ही ती रात्र त्यांच्याबरोबर बराच वेळ गप्पा मारत काढली. दुसर्‍या दिवशी मग रिक्षा चालु झाल्यावर बोरीवलीला गेले. ही सव्विसही अशीच कायमसाठी लक्षात राहिलेली. त्यानंतर विमानव्यवस्थेचा गोंधळ बरेच दिवस होता त्यामुळे माझं जाणंही आठवड्याने वगैरे वाढलं. वेड्या पावसाचा अनुभव कधीही विसरु न शकणारी ही एक सव्विस.
२००५ नंतर लगेच भारतात जाणं झालं नाही.पण त्याचं उट्ट भरुन काढण्यासाठी साडे-तीन महिन्यांच्या लेकाला घेऊन जरा दिवाळीपर्यंत राहायला गेले आणि परतीचं तिकीट होतं २९ नोव्हेंबर २००८ चं. भारतात कितीही दिवस राहायला गेलं तरी नेहमीप्रमाणे शेवटच्या दिवसापर्यंत कुणी ना कुणीतरी राहिलेलं असतं. तसंच माझ्या एका मावसबहिणीकडे तिचं नवं घर पाहायला म्हणून ठाण्याला गेलो होतो. तिचा नवरा रात्री जेवणानंतर आम्हाला भांडुपला गाडीनेच सोडणार म्हणून जरा निवांतपणे निघालो. ती रात्र होती २६ नोव्हेंबर २००८ ची. आम्ही गाडीत बसलो आणि सवय़ीने त्यानी एफ़ एमवरचं कुठचं तरी चॅनेल चालु केलं. पाचेक मिनिटात त्या रेडिओ जॉकीने सांगायला सुरूवात केली ’अगर आप अभी साउथ मुंबैकी तरफ़ जा रहे हो तो वहॉं ताज हॉटेल के नजदिक और सी.एस.टी. के यहॉं फ़ायरिंग हो रही है’...एक क्षण मला हा त्याच्या त्या रेडिओ जॉकी स्टाइलमध्ये काहीतरी बरळतोय असंच वाटत होतं पण नाक्यानाक्यावर पोलिसांच्या गाड्या दिसायला लागल्या आणि आम्ही सगळेजण गप्प झालो. माझ्या बहिणीचा नवरा गाडी वळवायच्या तयारीला लागला. पण परत जाऊन पुन्हा त्यांच्याकडे अडकणार म्हणून मग आम्ही त्याला दहाएक मिनिटांचा आमचा प्रवास राहिला होता तोच करायला सांगितले.
उरल्या दोन रात्रींची बेचैनी अजुनही जाणवते आणि विमानतळावर परत जाताना तर कमालीची खिन्नता. तिथे टि.व्ही.वर त्याच त्याच बातम्या, फ़ुटेज दाखवलं जात होतं आणि इथे मनातल्या मनात स्वतःचा स्वतःशी संवाद, काय होतंय हे सर्व आणि हे सगळं समोर असताना आपण सरळ निघतोय?? ब्रुसेल्स एअरपोर्टला पोचेपर्यंत एका मावसभावाने बंगलोरहून इ-मेल केली होती ताज पुन्हा आपलं झालंय.....कधीही विसरू न शकणारी ही सव्वीस.....मुंबईत आलेल्या आपत्ती मी तिथेच राहून अनुभवल्यात. अशावेळी बाहेर असते तर चिंता आणखी वाढते पण हे सर्व अनुभव जेव्हा स्वतः अनुभवतो तेव्हा मन जास्त विचारात पडतं. आपल्याकडच्या त्रुटींवर, प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याच्या वृत्तीचा जास्त राग येतो आणि एक सर्वसामान्य म्हणून आपण काही करू शकत नाही याची बेचैनी....
या सगळ्या सव्विसच्या आठवणी आज सव्विस जानेवारीच्या दिवशी खूप जास्त बेचैनी करतात. देशाबाहेर असल्यामुळेच ती आहे असंही नाही. देशात असले असते तर काय वेगळं करू शकते किंवा काहीच करू शकले नसते याची व्यथा आहे.....
इथे न्यु-यॉर्कला ग्राउंड झिरोला गेले होते तेव्हा बाजुच्या एका बिल्डिंगवर एका झेंड्यावर लिहिलं होतं "वी विल नेव्हर फ़र्गेट" तसंच आहे "वी शूड नेव्हर फ़र्गेट २६ नोव्हेंबर". आजच्या सव्वीस जानेवारीच्या मानवंदनेत २६ नोव्हेंबरच्या सगळ्या शहीदांना पुन्हा एकदा मानवंदना. व्यर्थ न होवो हे बलिदान असं आपण प्रत्येक नागरिकाने आपल्या परिने ठरवायला हवं.जयहिंद!!!!

33 comments:

  1. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिवस ... !

    तसाच 'भुज'ला झालेला भूकंप सुद्धा २६ जानेवारी २००३चा. २६ जुलै जसा मुंबई विसरु शकत नाही तसा २६ जुलै हां 'कारगिल विजय दिवस' सुद्धा नाही विसरु शकत आपण. आणि २६ नोव्हेंबर '०८ नक्कीच कधीच विसरता येणार नाही. अनेक आठवणी आणि अनेक भावना ज्या आपण कधीच विसरणार नाही...

    प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... !!!

    उठा राष्ट्र्वीर हो
    सज्ज व्हा, उठा चला, सशस्त्र व्हा, उठा चला॥धृ॥

    युध्द आज पेटले जवान चालले पुढे
    मिळूनि सर्व शत्रुला क्षणांत चारु या खडे
    एकसंघ होउनि लढू चला लढू चला
    उठा उठा, चला चला ॥१॥

    लाख संकटे जरी उभी समोर ठाकली
    मान ताठ आमुची कुणापुढे न वाकली
    थोर वंश आपुला महान मार्ग आपुला
    उठा उठा, चला चला॥२॥

    वायुपुत्र होउनी धरु मुठीत भास्करा
    होउनी अगस्तिही पिऊनि टाकु सागरा
    मन्युबाळ होउनी रणात जिंकू मृत्युला
    उठा उठा, चला चला ॥३॥

    चंद्रगुप्त वीर तो फिरुनि आज आठवू
    शूरता शिवाजिची नसानसात साठवू
    दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
    उठा उठा, चला चला ॥४॥

    यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
    दुष्ट शत्रू मारुनी तयास देउ आहुती
    देवभूमि ही अजिंक्य दाखवू जगा चला
    उठा उठा, चला चला ॥५॥

    ReplyDelete
  2. रोहन खूप छान लिहिलंस तू...बरोबर आहे कारगिल विजय दिवसही लक्षात ठेवायला हवा आणि "उठा राष्ट्र्वीर हो" हे आपल्यापैकी प्रत्येकासाठीच आहे सध्या...एकएक ओळ खरी आहे.....संपुर्ण समरगीताबद्द्ल खूप खूप आभार....

    ReplyDelete
  3. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !! सगळ्याच भयानक घटना २६ तारखेलाच घडलेल्या आहेत :-( ...

    (my anniversary is one of them ;))

    ReplyDelete
  4. हा हा हा हेरंब...तुझं लग्न त्यापैकी कुठल्या दिवशी झालं नाही आहे नं?? मग काळजी नको...मला असं वाटतं आपल्या देशाच्या बाबतीत सव्वीसचा काहीतरी योग दिसतोय....

    ReplyDelete
  5. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! अपर्णा, पोस्ट मस्तच झाली आहे.:)
    रोहनशी १००% सहमत. खरेच ग, अनेक घटना या २६ तारखेशी निगडीत आहेत. आमचा साखरपुडाही.:) बाकी त्या भयावह पावसाचे फार खोल घाव आहेत ग काळजावर आणि ताजचेही. देव करो आणि असे दिवस पुन्हा कधीही न येवोत.

    ReplyDelete
  6. हम्म्म्म..खरंय...अजून काही अशा आठवणींची भर न पडो हीच प्रार्थना...

    ReplyDelete
  7. होय सर्व खतरनाक गोष्टी २६ ला होतात.. आज आपल्या पंकजचा वाढ दिवस सुद्धा आहे ... हेहेहे

    ReplyDelete
  8. हा हा हा....मग काय खरं नाही..पंकजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते थांब....

    ReplyDelete
  9. Sakalpasun R&D Karatoy, atta jamale comment takane.
    bhagyashree ne bagh kay lihilay..
    " अनेक घटना या २६ तारखेशी निगडीत आहेत.आमचा साखरपुडाही.:) बाकी त्या भयावह पावसाचे फार खोल घाव आहेत ग काळजावर आणि ताजचेही. देव करो आणि असे दिवस पुन्हा कधीही न येवोत"
    ekdam funny karun takale sagaLya goshtila..

    joke apart, the post is really very good .. 26 taarikhkonich visaru shakanar nahi...

    ReplyDelete
  10. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    माझी जन्म तारीख २६ डिसेंबर आहे राव प्रत्येक २६ ला भयानक नका समजू :0

    ReplyDelete
  11. अभिनंदन महेन्द्रकाका(for R n D & engagement)...तुमची आधीची कॉमेन्ट माझ्या मेलमध्ये आहे तीही देते....
    आणि खरंच देव करो.....

    "आजचा लेख खुपच मस्त झालाय.. राधिकाचा डान्सचा कार्यक्रम होता . आम्ही तिच्या शाळेत गेलो होतो, एकदम हादरा जाणवला.. २० सेकंद असेल, तो भुकंप आहे हे समजायलाच खुप वेळ लागला. नंतर घरी गेल्यावर भुज चं समजलं..."

    ReplyDelete
  12. विक्रान्त वादळी दिवस समजायचा का आम्ही तुमच्या सव्विसला?? हे हे....आपल्यालाही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...

    ReplyDelete
  13. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा !! २६ तारखेच गौडबंगाल काही कळत नाही.

    ReplyDelete
  14. धन्यवाद रविंद्रजी...आणि आपल्यालाही शुभेच्छा...

    ReplyDelete
  15. अपर्णा
    त्यामुळेच मी
    'विक्रम- एक शांत वादळ' म्हणतो ;)

    ReplyDelete
  16. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा...............उशीर होतोय पण तरिही कमेंट टाकतेय कारण तुला माहितीये.....
    असो पोस्ट छानच झालय ग....माझ्या नव्हता आला लक्षात हा योगायोग...
    रोहन तुला सलाम...तुम्हा सगळ्य़ांच्या डेडीकेशनला पाहून आम्हीही तुमच्याबरोबर आहोत हे सांगावेसे वाटतेय...........
    जयहिंद!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  17. धन्यवाद तन्वी...

    ReplyDelete
  18. दोन आणि सहा जरा सव्वीस कडे पहा..
    कुणी आणला भूकंप, कुणी केला उजेडाचा संप.. (म्हणजे पावूस पडत होता )
    कुणी केला हल्ला धरणीवर..कंप जाणवला भारतभर..
    आणि सुनामी हि बहुदा तेव्हाच होती आली..
    जेव्हा जमीन कंपली आणि डोंगर एवढी लाट आली..
    जरी झाल्या अशा गोष्टी तरी एक घटना तयार झाली..
    देश चालवण्या कायदे झाले...हि सर्वात सुंदर गोष्ट २६ ला झाली..
    स्मरण करू चांगल्याचे. आणि दुखावर हसण्याने मात करू..
    नवीन वर्षात या चांगल्या गोष्टींचीच बरसात करू...

    ReplyDelete
  19. आम्ही भुतलावर २६लाच आगमन केले होते, शुभ/अशुभ? घरच्यांना विचारावे लागेल... :-)

    ReplyDelete
  20. अखिल ब्लॉगवर स्वागत आणि कसं काय सुचतं तुम्हा लोकांना अशा पटापट आणि छान छान कविता करायला?? :)
    या वर्षी चांगल्याची बरसात होऊ दे हे अगदी आवडलं....:)

    ReplyDelete
  21. कमॉन आनंद, जन्मदिवस तर घरच्यांसाठी शुभघटनाच असते..माझ्यापण जन्मदिवसाची एक छोटीशी स्टोरी आहे सांगेन कधीतरी....आणि तीही मजेशीर...(अजुनही आठवते हा हा हा....)

    ReplyDelete
  22. aparna,

    tujhya jandiwasachi story lavkar sang, aata amhala aikyachich aahe :-)


    -ajay

    ReplyDelete
  23. अरे अजय इतकी पण ढासू नाहीये पण कुणीतरी म्हटलंय की वाढदिवसाबद्द्लच्या गोष्टी वाढदिवशीच कराव्यात (नाही पटत?? पंकजला विचार...) तर मग तेव्हासाठीच ठेवुया ना???

    ReplyDelete
  24. छान पोस्ट आहे! २६ जानेवारीच्या विविध आठवणी ताज्या केल्यात तुम्ही! धन्यवाद व पुढील लिखाणासाठी शुभेच्छा! :-)

    आ. न.
    अरुंधती
    --
    Sing, Dance, Meditate, Celebrate!
    http://iravatik.blogspot.com/

    ReplyDelete
  25. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद अरूंधती....

    ReplyDelete
  26. मस्त लिहितेस तू मैत्रिणी...
    बरेच वाचले तुझे लिखाण मी....

    ReplyDelete
  27. धन्यवाद मिलिंद आणि ब्लॉगवर स्वागत....आपली कमेन्ट माझ्यासाठी खरंच महत्त्वाची आहे....Keep visiting...

    ReplyDelete
  28. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  29. राज आपणासही शुभेच्छा आणि ब्लॉगवर स्वागत....

    ReplyDelete
  30. अपर्णा,
    फार छान पोस्ट...सगळे २६ एकदम डोळ्यासमोर आले.. :)

    ReplyDelete
  31. आभारी बाबा....आता एक चांगला सव्वीस यावा अस वाटतंय.....

    ReplyDelete
  32. चांगला सव्वीस येतोय. सहा महिन्यांनी.

    ReplyDelete
    Replies
    1. हम्म्म पंकज..त्याचा उल्लेख वरच्या कमेंटमध्ये २०१० सालीच झालाय ...;)

      हाबार्स...

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.