Tuesday, January 12, 2010

फ़ुलोरा...मी नाही अभ्यास केला

सध्या मुलांच्या पाठीवरचं अभ्यासाचं ओझं, मनावरचा ताण हे सर्व पाहिलं की खरंच वाटत नाही की अभ्यास न केल्याबद्दलचं एक बडबडगीत कधी काळी त्यांच्यासाठी लहानपणी म्हटलं जायचं..आमच्याकडे आई सध्या आरूषला जवळजवळ रोजच हे गाणं म्हणते. प्रत्येकवेळी थोडं थोडं वेगळं असतं. त्याने केलेली एखादी प्रगती, नाहीतर एखादा नवा शब्द, आवडता खाऊ, नातीगोती असं काही घालून रोजच वेगळं पण हवहवसं वाटणारं गाणं खास या महिन्यासाठीच्या फ़ुलोरा मध्ये लिहीलंय. मोठेपणी कदाचित मी अभ्यास केला नाही असं छान गुणगुणत सांगता येईल किंवा नाही येणार. सध्या मात्र तो या गाण्याची खूप मजा घेतोय. मोठं झाल्यावर पण काही वेळा अभ्यासाच्या ओझ्याने दबून गेलेल्या मुलांसाठी पण हे गाणं म्हटलं गेलं पाहिजे. मूळ गाणं, आणि त्याचे कवी माहित नाही पण हे खाली दिलं ते आमचं सध्याचं त्यातल्या त्यात जास्त वेळा म्हटलं जाणारं व्हर्जन आहे. गोड मानून घ्या.

घडाळ्यात वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले दोन
बाबांचा आला फ़ोन
फ़ोन ऐकण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले तीन
शर्टाची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले चार
दादाने केला हार
हार करण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले पाच
दीदीने केला नाच
नाच बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले सहा
मामा आला पहा
त्याला पाहण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले आठ
काकीने फ़ोडला माठ
माठ बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडाळ्यात वाजले नऊ
दारात आली चिऊ
चीची ऐकण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला

घडाळ्यात वाजले दहा
खिचडी केली पहा
खिचडी खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडल्यात वाजले अकरा, ची ची मारतेय चकरा
चकरा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

घडल्यात वाजले बारा, पसारा झाला सारा
पसारा आवरण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

19 comments:

  1. वा.. किती तरी दिवसांनी - महिन्यांनी - वर्षांनी हे गाने आठवले. खरच धन्यवाद... :) जुने दिवस आठवले एकदम ... :)

    ReplyDelete
  2. अरे खूपच छान
    गाणे म्हणता म्हणता हळूच कधी लहान होऊन गेलो लक्षातच नाही आल :)

    ReplyDelete
  3. घडल्यात वाजले अकरा, ची ची मारतेय चकरा
    चकरा मारण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

    घडल्यात वाजले बारा, पसारा झाला सारा
    पसारा आवरण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला.

    हे आपलं आमचं एक्स्टेन्शन तुमच्या मूळ वर्जनला.. ;)

    ReplyDelete
  4. वाचुन मजा आली, हेरंबचं एक्स्टेंशन सुद्धा मस्त!

    ReplyDelete
  5. रोहन तुला इतक्यात बडबडगीतं लागणार नाहीत..अर्थात लवकरच लागणार असतील तर मला माहित नाही :) प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..

    ReplyDelete
  6. मुलांबरोबर गाणी, गोष्टी, खेळ हे सर्व करताना आपण कधी लहान होतो कळतंच नाही, विक्रम.

    ReplyDelete
  7. हेरंब तुझं एक्स्टेंशन झकास आहे...आमची गाडी सध्या दहापर्यंतच अडवली आहे पण पुढे जाताना मात्र हेच एक्स्टेंशन लावु....धन्यवाद

    ReplyDelete
  8. छान बड्बड्गीत आहे...आवडल...
    मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.
    तीळ गुळ घ्या गोड़ गोड़ बोला

    ReplyDelete
  9. धन्यवाद, देवेंद्र.

    मकर संक्रातीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  10. अपर्णा हे गाणे अगदी रोजच मी शोमू लहान असताना म्हणत असे. नुकताच तो परत कॊलेजला गेलाय अन तशात तुझी ही पोस्ट....वाचता वाचता सगळे धुसर झालेय बघ.... पुन्हा एकदा अनुभवले मी सारे. खूप खूप आभार गं.

    ReplyDelete
  11. ह्म्म्म...भाग्यश्रीताई कळतंय...पण काय करणार?? आमचेही हे फ़ुलपंखी दिवस संपायचेच माहितेय... म्हणून आता सगळं नीट अनुभवतेय...:)

    ReplyDelete
  12. स्वागत राहुल आणि धन्यवाद....

    ReplyDelete
  13. मस्त.

    हे गाणं म्हणून आम्ही नाच करत असू. किती वर्षांनी पुन्हा वाचताना मस्त मजा आली. सानुलाही म्हणून दाखवलं तर तिनं खदखदा हसून आई तू पण किड असताना सेम माझ्यासारखीच होतीस की म्हणून मस्त चिडवून घेतलं.

    ReplyDelete
  14. मुलींना फ़ार हौस असते ना आपलं सेम काय असेल त्याबद्द्ल?? माझी भाचीपण असं काही मिळालं तिला की मला चिडवून घेते...

    ReplyDelete
  15. हेरंब तुझं छान छान कंप्लिशन कॉपायला बरेच दिवस लागलेत पण आज आठवणीने पेस्टलंय...:)

    ReplyDelete
  16. कितीतरी वर्षांनी ऐकलं हे गाणं. मला काही पूर्ण यायचं नाही. पाच वाजेपर्यंतचंच यायचं. मजा आली परत वाचताना.

    एक निरीक्षण:
    गाण्यात दहा वाजेपर्यंत ‘घडाळ्यात’ (वास्तविक हा ‘घड्याळात’ असा हवा) असा शब्द आहे आणि त्यापुढे ‘घडल्यात’ असा शब्द आहे. Ctrl + c, Ctrl + v effect... :-)

    ReplyDelete
  17. संकेत, Ctrl V चा महिमा आहे तो....:) नंतर दुरुस्त करते....अरे हे गाणं मी ट ला ट लावून कसंही म्हणते काहीवेळा मुलासाठी...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.