Monday, September 9, 2013

मी आणि सण, थोडे सैरभैर विचार


आज गणेश चतुर्थी, मला लहानपणापासून आवडणारा सण.त्यावेळी न कळत्या वयात तो आजूबाजूला साजरा केला जाई तसाच आठवतोय. मग मोठं झाल्यावर आपण नक्की आस्तिक की नास्तिक या प्रश्नातही  गणेश चतुर्थी आली की एक वेगळाच उत्साह येतोच. 

आजचीच गोष्ट. करूया, नको, वेळ मिळेल का? असा सगळा विचार करतानाही सोमवारचे दोन तास निवांतपणे हाताशी आले. मागच्या आठवड्यात नारळ किसून फ्रीज करायचं काम करून ठेवलं  होतं म्हणजे बेटर हाफने कामातला आपला हिस्सा आपल्या सवडीने करून ठेवला होता. तसही सण  साजरा करायचा म्हणजे  हे अमकं तमकं अगदी अस्सच झालं पाहिजे इतका अट्टाहास नाही. त्यामुळे असा आधी खवलेला नारळ हाताशी असेल तर आम्हाला चालतं. 

एका बाजूला नारळ परतताना मन लावून गूळ चिरला आणि नारळ गुळाची गट्टी झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण एकीकडे निवत ठेवलं. या जानेवारीत निघता निघता आईने आठवणी दिलेलं मोदकाचं घरचं पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलं आणि उकड काढायची आईची टीप आठवत बसले. हम्म! दुप्पट पाणी की  अर्ध की समान? जामच गोंधळ उडाला तेव्हा अर्ध्याहून थोडं जास्त अस मधलं प्रमाण मोजून तुक्का मारायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं की  हे आता जास्त रसमय होतंय आय मीन इंटरेस्टिंग. म्हणजे बघा मागच्या वीसेक मिनिटात मी माझी आई मोदक कसे करायची हा एक विचार सोडला तर आणखी कशाचाच विचार करत नाहीये. 

तर ती उकड काढताना उकळत्या पाण्यात थोडं  मीठ आणि तूप घालून मोदकाचं पीठ घातलं की  एक वाफ आणायची. आता हे थोडं हाताशी यायला अवकाश आहे तोवर आधीच सुरु केलेला वरण भाताचा कुकर बंद करून दुसरीकडे फ्लॉवरची भाजी निवडून फोडणी-बीडणी करून मंद आचेवर शिजत ठेवायची. 

आता पुन्हा आपलं  सगळं लक्ष मोदक उर्फ स्टार ऑफ द जेवण कडे. अर्थात अंदाजे घेतलेल्या उकडीचं तंत्र चुकल्यामुळे थोडं कोमट पाणी घालून पुन्हा मळून  घ्यायचं आणि मग पारीबाईंच्या मागे लागायचं. आज पारी करताना उकडीच्या भाकऱ्या करणारी मामी आठवली आणि पहिलीच पारी करताना ती तो उंडा हातावर गोल गोल करून मोठा करायची तसं केलं  आणि जी सुरेख पारी झाली की माझी मीच सुखावले, अर्थात तरी कळ्या जमणे ही पुढची एक अवघड पायरी होतीच. अगदी लक्ष देऊन केले त्या त्या मोदकांच्या पाऱ्या अगदी सुबक आल्या आणि काही रुसलेल्या. आमच्याकडे बाई हिचं लक्षच नाही असं म्हणणाऱ्या. 
नेहमी एकावेळी पाचपेक्षा जास्त मोदक केले नव्हते पण आज करायचा सूर चांगला लागल्याने बहुतेक गाडी चक्क अकरावर गेली. आणि मग ते शिजवताना पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून माझं बेकिंगचं अर्धवट ज्ञान वापरून भांड्याला आधी थोडं तेल लावून घेतलं. मोदक शिजताना नाममात्र फुलके करून घेतले त्यांनी मात्र काही फुलण्याचा चांगुलपणा दाखवला नाही. पण आज लक्ष अर्थात "स्टार ऑफ द" कडे असल्यामुळे ते नेहमीचं फ्रस्टेशन आलं नाही. 

मला अगदी पूर्वीपासून म्हणजे स्वयंपाकात खाण्याखेरीज गती नव्हती तेव्हापासून वाढायला फार आवडतं. आज नैवेद्याचं ताट वाढताना घड्याळाकडे लक्ष गेलं  आणि मग एकदम लक्षात आलं की गेले दीड तास आपण बाप्पाचा नैवेद्य, उकडीचे मोदक आणि एकंदरीत ताट पूर्ण असणे याखेरीज कुठलाही विचार केला नाही. 

मग मला जाणवलं की आज या निमित्ताने माझं खूप दिवस फक्त एकटीने थोडा वेळ मनन करणे (ध्यान करणे वगैरे माझ्या बाबतीत फारच उच्च वाटतं मला म्हणून मनन) राहिलं होतं, बहुतेक तसंच काही तरी झालं. हा एक छोटा दोन तासाचा सोहळा म्हणूया हवं तर मला माझ्याकडे थोड्यावेळासाठी का होईना घेऊन आला. 

आज बऱ्याच दिवसांनी एक पक्वान्न घरी मी मन लावून बनवलं आणि शेवटी देवाच्या नावाने ते आम्हीच खाणार. पण तो बनवायची कृती मला माझ्या पाककौशल्याकडे नव्याने पाहायला शिकवून गेली. हे सगळं आई कसं करते ते आठवून करताना मला मज आली आणि तिच्यातलं मल्टीटास्किंग माझ्यातही न कळत कसं मुरलंय हे मला कळून सुखावून गेली. 

मला वाटतं माझ्यासारखे अनेक जण असतील जे या निमिताने थोडी सजावट, एखादं  नवीन पक्वान्न करतील त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा विचार असणार नाही आणि ती कृती पूर्ण झाल्यावरही मन प्रसन्न असेल. नेहमीच बाहेर जायचे छंद जोपासून मनाला ताजंतवानं करतात, आज घरातच थोडी आराधना आपल्या पद्धतीने करून तसचं ताजतवानं व्हावं. मग त्यासाठी मी आस्तिक आहे की  नास्तिक असा आर या पार प्रश्न पडण्यापेक्षा या अवस्थेला कुठलं नाव न देता आहे त्या स्थितीशी एकरूप व्हावंआणि तिची मजा लुटावी.  

आमच्या घरचं प्रसादाचं ताट कसं दिसतंय ते नक्की कळवा. 

गणपती बाप्पा मोरया.     

8 comments:

 1. एवढे मनापासून मोदक केल्यावर बाप्पा खूष होणारच! :)

  ReplyDelete
  Replies
  1. आभार गं गौरी. तू केलेस का मोदक :)

   Delete
 2. गणपती बाप्पा मोरया!!!
  मंगल मूर्ती मोरया!!!

  एक नंबर!!! मोदक करणे म्हणजे पाक कौशल्याची परिसीमा आहे मॅडम. आप ने कर दिखाया!!!

  ReplyDelete
  Replies
  1. धन्स अ टन्स सिद्धार्थ. तू मोदक बनवायची मेहनत मनापासून पाहिलेली दिसतेय ;)
   आभार्स.

   Delete
 3. खाऊ द्या, मला खाउद्या!

  ReplyDelete
  Replies
  1. अभिषेक संपले रे. मी उशिरा उत्तर देतेय म्हणून नाही तर ही पोस्ट टाकायच्या आधीच संपले नशीब फोटो काढून ठेवला होता :)

   Delete
 4. अरे वा! काय सही दिसत आहे सगळेच. :)

  मी क्रूज वर असल्याने हे वाचायचे राहूनच गेले होते.

  ReplyDelete
  Replies
  1. अगं या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचेच विसरले बघ. असो. तुला आवडले म्हणजे झालं की या ब्लॉगच पोट भरलं :)
   पण सध्या तुमच्याकडच पोटोबाच दुकान बंद आहे का?

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.