लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तस्मात त्याचं पहिल्या आठवड्यातलं एबीसी विटामिनचं औषध पितानाचं तोंड त्यांनी आई बाबांचा छळवाद करण्यासाठी विधात्याने निर्माण केलेल्या पुढे येऊ घातलेल्या काही वर्षात, औषध नामे बाटल्यांचा खप किती आणि कशा प्रकारे होऊ शकतो याचा संकेत देण्याचं एक निमित्त आहे असं आमच्या थोरल्या चिरंजीवाच्या गेल्या पाच वर्षातल्या अनुभवावरून मी ठाम सांगू शकते. (बिलीव मी हे वाक्य या ब्लॉगवर लिहिलं गेलेलं सर्वात मोठं (आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर) वाक्य असलं तरी इतर कुठल्याही वाक्यांपेक्षा जास्त खरं (आणि पारखलेलं) वाक्य आहे…)
नाही कळलं? शक्यता आहे. नाही! वाक्याचा दोष नाही, त्यात एकवटलेल्या अर्थाने गोची केलीय. तर थोडं सुसंगत सांगायचं तर मूल हॉस्पिटलमधून घरी आलं की तिथून निघताना अत्यावश्यक लिस्टमध्ये एक एबीसी (की एबीसीडी) नामक एक विटामिनचा रोज एकदा दिला जाणारा डोस द्यायला डॉक्टर आवर्जून सांगतात. आईच्या दुधातून मिळू न शकणारी विटामिन्स त्यात असतात. आरुषच्या वेळी पहिल्यांदी पालक असल्यामुळे (दुसऱ्या वेळी पालक ए के ए दुसऱ्या मुलाचं पालकत्व हा एक वेगळा विषय आहे पण दुसऱ्या मुलाला वाढवताना जी आपसूक सहजता येते ते पाहता तो विषय पुढची पाच वर्षे तरी ब्लॉगवर येईल असं वाटत नाही.)
हा तर ते पहिल्यांदी पालक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी आम्ही जातीने पाहत असू तेव्हा हे औषध कसं लागत असेल ते माझ्या नवर्याने (किंवा आमच्या बाबाने सोयीसाठी आपण त्याला बाबाच म्हणुया) हा तर आमच्या बाबाने चाखून पाहिलं आणि त्याच्या चेहरा (आणि कसनुसं होणारं अंग देखील) पाहण्यासारखा झाला आणि त्याला आरुषची दया आली.
"अगं खुपच याक्क लागतंय. डॉक्टरला दुसरा brand आहे का विचारूया का की प्रिस्क्रिप्शन घेयुया? तुला सांगतो हि लोकं जेनेरिक मार्केट करतात पण…"
"अरे पण तो तर चांगला मिटक्या मारत खातोय की आणि वर गायीसारखा रवंथ पण करतोय" मी बाळाचं बोळकं बघत माझ्या मताची पिंक टाकली.
"अरे हो की." आमच्या बाबाची बरेचदा लेट पेटते मुख्यत: फ्यामिली म्याटर असलं की जर जास्तच.
असो आम्ही काही जास्त जीवाला लावून घेतलं नाही पण खर तर हे याक्क औषध रवंथ करून पिताना "मला औचद आवलतं" हे तो आम्हाला सांगू पाहतोय हे कळायला मला बरीच वर्षे लागली.
पहिलं वर्ष ते वर म्हटलेलं एबीसी द्यावंच लागतं आणि मग त्याचा नाद सुटतो. तर आरुषच्या वर्षाच्या वाढदिवशी त्याची आत्या भारतातून आमच्याकडे आली होती आणि सगळ्यांना आवडते म्हणून काजू कतलीचा भला मोठा बॉक्स तिने आणला होता. आम्ही बाळाला कौतुकाने काजू कतली भरवली आणि त्याचं थोंड हा हा म्हणता माकडासारखं लाल झालं त्याला अजून काही होतंय का हे कळायला मार्ग नव्हता म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने आम्हाला याला नट्स अलर्जी आहे तुम्ही हवं तर वेगळी अलर्जी टेस्ट करू शकता किंवा तो दोन वर्षाचा झाल्यावर आपसूक जाते का ते बघा नाही तर बेनाड्रील किंवा तत्सम कुठलही ओवर द काउंटर औषध हाताशी ठेवा. त्या दिवशी बेनाड्रील पितानाचा त्याचा आनंदी चेहरा माझ्या लक्षात यायला हवा होता, पण तेच ते म्हटलं न पहिल्यांदी पालक वगैरे वगैरे त्यामुळे या अलर्जी बाईंच्या आगमनाने मी जर खट्टू होते. दुसऱ्या वर्षी ती अलर्जी काही गेली बिली नाही तर आता तर चुकून असं काही खाल्लं तर त्याचा घसा सुजतो सुद्धा त्यामुळे अलर्जीचं औषध सावलीसारख ठेवावं की त्याला शर्टवर लेबल लावावं असा विचार माझ्या डोक्यात घोळायला लागला. तोस्तर त्याला येणाऱ्या दोन तीन शब्दात तो मला नेहमी ते औषध दाखवून उगाच द्यायला भाग पाडायचा प्रयत्न करे पण मी ते लपवून ठेवलं.
त्यानंतर आम्ही त्याच्या दुसऱ्या वाढदिवशी भारतात गेलो तेव्हा ताईने त्याला सहज जीरागोळी दिली ती त्याने इतक्या आनंदाने खाल्ली की त्या वारीवरून परतताना माझ्या सामानात पावेक किलोतरी जीरागोळी होती. त्यावेळी मला रोज विटामीनची गोळी घेताना आरुष पाही आणि मग स्वतःच्याच मनाने त्याने माझी गोळी म्हणून त्या जीरागोळीचा वापर सुरु केला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की साहेबांना एकंदरीत औषधाचे गोळी किंवा प्यायचे प्रकार आवडतात.
त्याला आवडतात म्हणून की माहित नाही पण त्यानंतरच्या वर्षात नॉर्थवेस्ट मध्ये असलेल्या सदाहरित वनांच्या काही झाडांच्या अलर्जीने त्याच्या शरीराचा ताबा घेतला आणि महिनाकाठी एकदा असं सतत तीनेक महिने तो त्याने हैराण होता म्हणजे त्याचं शरीर आणि आमची मनं हैराण. पण त्यासाठी दिल्या जाणाऱ्या antibiotic प्यायला मिळतं म्हणून तो खूष आणि पुन्हा पुढच्या महिन्यात डॉक्टरकडे जायला आनंदाने तयार. शेवटी त्याच्या कानावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला एक प्रोसिजर पण करावी लागली. तेव्हा घरी परत आल्यावर डॉक्टरने औचद दिलंय याची खात्री करायला तो विसरला नाही.
तिसऱ्या वर्षापासून दाताच्या डॉक्टरची पण एक वारी झाली आणि तो खुशच झाला कारण आमच्या नळाच्या पाण्यात फ्लोराईड नाही म्हणून रोज रात्री दात घासले की प्यायचे फ्लोराईड drops दिले. त्यामुळे रात्री दात घासायचा आम्ही कधीच कंटाळा केला नाही हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय तोवर ती नॉर्थवेस्ट वी अलर्जी पण थोडी तीव्र झाल्याने सकाळचा रतीब होताच. पाचव्या वर्षी फ्लोराईडचा डोस दुप्पट होतो त्यामुळे साहेब दुप्पट खुश. ही खुशी आपल्याला लहान भावापेक्षा जास्त औषध प्यायला मिळतं यासाठी तर होतीच पण त्या dropper ला मोजणीची रेषा आधीच्या डोसइतकीच होती त्यामुळे दोन वेळा "आ" करायला लागतो याचा आनंद जास्त असावा. आता नवीन काही नको रे देव असं आम्ही म्हणायला काही अर्थ नव्हताच देव लहान मुलाचं आपल्या आधी ऐकतो हे मी पुराव्याने शाबित करू शकते.
खर तर पहिल्या पाच वर्षात मूल आजारी पडणे हे स्वाभाविक आहे त्यामुळे आता पाच वर्षाचा झाला तेव्हा हुश करायचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे या वर्षाचे गेले सगळे महिने तसे बरे गेलेही. त्या दिवशी शाळेतून अवेळी फोन आला आणि पुन्हा माझा ठोका चुकला. सगळी धावपळ करून नवऱ्याला पुढे पाठवून छोट्या ऋषांकला घेऊन मी हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा रडव्या तोंडाने मंकीबारवरून पडून हात मोडून पडलेलं माझं पोरगं औषध घेऊन येणाऱ्या नर्सला पाहून "आर यु रेडी टू टेक सम मेडिसीन?" असं विचारल्यावर रडं विसरून मोठा आ करून राहिला. त्याचं ते आनंदाने औषध घेणारं रूप पाहून मागच्या पाच वर्षाच्या आवडीने औषधं आणि तेही आम्ही विसरलो तर आम्हाला आठवण करून मागून मागून औषध घेणारे त्याच्याबरोबरचे प्रसंग मला नकळत आठवले आणि माझ्या डोळ्यातलं पाणीही एक क्षण वाहायचं थांबलं.
दु:खात तेवढेच सुखं! :) :)
ReplyDeleteते पण खरचं गं बाई :)
Delete