Sunday, September 27, 2009

आठवणी दसर्‍याच्या ...

दसरा म्हटलं की फ़क्त प्राथमिक शाळेच्या आठवणी सर्वप्रथम डोळ्यापुढे येतात. उपनगरातील एका छोट्या गावातली ही एक जि.प.ची शाळा असल्यामुळे तिथे पाटीपुजन असायचं. चौथीपर्यंत मी या शाळेत होते. दसर्‍याच्या  आदल्या रात्रीच बाबा काळ्या पाटीला स्वच्छ धुऊन पुसुन खडुने १ आकडा वापरुन सरस्वतीचं चित्र काढुन देत आणि मग नेहमीपेक्षा लवकर सकाळी शाळेत ही पाटी, बरोबर झेंडुची फ़ुलं आणि नारळ असं घेऊन शाळेत जाऊ. त्या दिवशी अभ्यास (मुख्य म्हणजे चौथीतला गणिताचा तास) नसे ह्याचं मुख्य आकर्षण असे. खरंच शाळेत असताना खूपदा दसरा,स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन यादिवसांच्या महत्वापेक्षाही त्यादिवशी शाळेत जाऊनही शिक्षक आपल्यावर साहेबगिरी करु शकत नाहीत याचा आसुरी आनंद जास्त असे. तरी काही शिक्षक सवयीप्रमाणे निदान रांगेत सरळ न उभं राहाणे किंवा इतर व्यक्तींची भाषणे चालु असताना गप्पा मारणे इ. फ़ुटकळ कारणांसाठी ओरडुन त्यांचा जन्मसिद्ध हक्क सिद्ध करुन जात. असो.

तर पहिली ते चौथी दसर्‍याला पाटीपुजन करताना छान वाटायचे. बाईंनी आणलेली सरस्वतीची तसबीर टेबलावर ठेवलेली असे आणि आपण नेलेली पाटीवरची सरस्वती आपल्यासमोर. स्वतःची आणि मैत्रीणींनी आणलेली फ़ुलं, थोडी बाईंनी दिलेली अशी, आणि थोडं हळद-कुंकु असं ल्यालेली पाटीवरची सरस्वती अगदी दागिन्यांनी नटलेली वाटे. पुजा झाल्यावर आरती आणि मग आम्हीच आणलेल्या नारळाचा, साखर घालुन केलेला प्रसाद खाऊन हात चिक्कट होतं. माध्यमिकची शाळा मात्र ख्रिस्ती मिशनर्यांनी चालवलेली (पण मराठी माध्यमातीलच) असल्याने तिथे हे सण साजरे होत नसे. मला त्यावेळी माझ्या आधीच्या शाळेची खूप आठवण येई. दसर्याला म्हटलेली "हे सरस्वती नमन तुझ्या पदकमली" आता पुर्ण येत नाही पण आठवते.
आई-बाबा दोघेही शिक्षक असल्याने तेही पाटीपुजनाला गेलेले असत. साधारण नऊ-दहा वाजता शाळा सुटे आणि मग दुपारपर्यंत आई-बाबा पण घरी येत. त्यांचा शाळेतला प्रसादही ते आमच्यासाठी घेऊन येत. मग जेवणं होईपर्यंत गुळ किंवा साखर-खोबरं खायला मला फ़ार फ़ार आवडे. इथे फ़्रोजन नारळ्याच्या ओल्या किसात साखर घातली तर उगाच गोडुस चोथा खाल्यासारखं वाटतं. शिवाय कोलेस्टेरॉलचं भुत मानगुटीवर असतं ते वेगळंच. खरंच अशावेळी बालपणीचा काळ सुखाचा हे पुन्हा पुन्हा पटतं नाही??
दसर्‍याला जेवणं काहीतरी गोडाचं असे बहुतेक वेळा नव्या तांदळाची खीर नाहीतर पुरणपोळी. मला गोड तेव्हातरी विशेष आवडत नसे. पण सगळीजणं दुपारच्या जेवणाला एकत्र असली की मला नेहमीच आवडे. या दुपारी आई-बाबा घरी असत, जरा सुस्तावलेली दुपार अजुनही आठवते. मग संध्याकाळी आई नेहमी सिमोल्लंघनाची आठवण करी, शेजारी-पाजारी सोनं वाटायला जात असू. आमचे शेजारचे एक काका मला नेहमी हे घे सोनं आणि तुला बांगडी कर असं म्हणतं. दरवर्षी दागिने बदलले असत. त्या तशा दागिन्याने आतापर्यंत मला वाटतं मी नखशिखान्त नटले असते. पण मजा यायची ते सोनं द्यायला. मागच्या वर्षी माझ्या भाचीला तसलंच काही सांगताना मला फ़ार मजा आली.
कॉलेजला वगैरे मात्र दसरा सुट्टी असणे याखेरीज जास्त काही आठवत नाही. मात्र घरी पुस्तकांची पुजा आवर्जुन करायचो. घरचे संस्कार. अजुनही लॅपटॉप, पुस्तकांचं कपाट याची पुजा करते. इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षी एका छोट्या कंपनीत माझं शेवटचं प्रोजेक्ट होतं, तिथलं टिपिकल मराठमोळं वातावरण. त्यावर्षी मात्र दसर्याच्या पुजेला कंपनीत मलाही आमंत्रण होतं. पुन्हा एकदा शाळेची आठवण आली. दसरा थोड्या वेगळ्या पद्धतीने का होईना पण साजरा झाला. दिवाळीचं गिफ़्ट दसर्‍याला वाटायची त्यांची पद्धत होती म्हणजे दिवाळीला ते उपयोगी पडेल असं काहीसं. मग त्यावर्षी मलाही एक मिठाईचा पुडा मिळाला होता. माझ्या कॉलेजमधल्या एक-दोन मित्रांनी "तुझे काय बाबा जाशील तिथे लाड" अशी प्रतिक्रियाही दिलेली आठवते.
आमच्या भागात अगदी जवळपास कुठे रावण वगैरे जाळत नसत. त्यामुळे प्रत्येक दसर्याच्या की त्यानंतरच्या दिवसाच्या नक्की आठवत नाही पण बातम्यांमध्ये गिरगाव चौपाटीवरचा रावण जाळताना दाखवत तो मात्र आठवणीने पाही. तेव्हा नेहमी मला एकदा तरी गिरगावला तेव्हा गेलं पाहिजे असं फ़ार वाटे पण बारावीत असताना मी चर्नीरोडला राहिले तेव्हा त्या दसर्याला मी काय करत होते ते मात्र अजिबात आठवत नाही. कदाचित सुटीसाठी घरीच गेले असेन. असो. दसरा गेला की दिवाळी अशी हाकेवर आल्यासारखं वाटे. त्यामुळे कधी एकदा सहामाही परिक्षा उरकते आणि शाळेला दिवाळीची सुट्टी पडते असं होई. नशीब माझी शाळेतली प्रगती चांगली होती नाहीतर या मानसिकतेने फ़क्त सुट्या आणि शाळेचे न शिकणार्या दिवसातच रमुन आतापर्यंत पुढचा सगळा बट्ट्याबोळ झाला असता.
आजच्या दसर्‍याला हे सर्व आठवुन विद्यादेवीची पुन्हा एकदा उपासना करायचं ठरवतेय. सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा.

11 comments:

 1. अपर्णा
  लहानपण आठवलं.. माझी अपेक्षा होती हेच पोस्ट तुमच्या आणि तन्वीच्या ब्लॉग वर वाचायची.. इंट्युशन .. !!! आणि तुमच्या ब्लॉग वर नेमकं हेच पोस्ट वाचायला मिळालं..k

  ReplyDelete
 2. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.......
  पोष्ट लय भारी लिवताय ताई....म्या बी लिहलय बघा पण त्यो सरस्वतीचा उल्लेख राहिला बघा...असो....ब्लॉग लिन्कड हायेत तेव्हा समद कम्प्लीट झालं बघा!!!!

  ReplyDelete
 3. दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. प्रतिक्रियांबद्द्ल सर्वांचेच धन्यवाद.
  महेन्द्रकाका, खरं तर असं काही ठरवलं नव्हतं. पण माझ्या मागच्या पोस्टला अनुजाने फ़र्माईश केली होती त्या निमित्ताने आठवणीतल्या एकदम मागच्या पानावर गेले. I hope Anuja is reading the post.... आणि मला तर आजकाल नेहमीच प्रश्न पडतो काय लिहायचे. इथे तर वाचकांपैकी एकीनेच सुचवलय म्हटल चला लिहुच या. मग पोस्ट करताना खरं मला तुमच्या दोघांची आठवण आली की बहुधा तुम्ही लिहाल आणि अर्थात मला वाचायला आवडेल.
  तन्वीबाय तुमी पन..तिथं ती दोन पोरं आनी मोटं तुमचं डोस्कं खात असलं तरीबी तुमी लितासा त्याच बक्कळ हाय बगा....

  ReplyDelete
 5. अपर्णा, खूप छान वाटलं ग वाचून. शाळेच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या. मस्त.
  विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!!!:)

  ReplyDelete
 6. धन्यवाद भाग्यश्री. तुमच्यासाठी अश्विनीचा निरोप माझ्या या आधीच्या पोस्टवर आहे. पाहिलात का??? :)

  ReplyDelete
 7. अपर्णा,
  तुझी पोस्ट कालच वाचली, मुद्दामहून उत्तर लगेच दिले नाही,तुला पुन्हा पूर्वपदावर आणण्याकरिता, तू पुन्हा जोमाने लिहीवावेस म्हणून,आम्हा सर्वाची वाट पहावीस म्हणून,हा मानस उपचार एक मैत्रीण, एक शिक्षिका,एक वाचक म्हणून केला,तुला दुखावण्याचा विचार कदापीही नाही.
  so keep it up.............
  anujaअपर्णा,
  तुझी पोस्ट कालच वाचली, मुद्दामहून उत्तर लगेच दिले नाही,तुला पुन्हा पूर्वपदावर आणण्याकरिता, तू पुन्हा जोमाने लिहीवावेस म्हणून,आम्हा सर्वाची वाट पहावीस म्हणून,हा मानस उपचार एक मैत्रीण, एक शिक्षिका,एक वाचक म्हणून केला,तुला दुखावण्याचा विचार कदापीही नाही.
  so keep it up.............
  anuja

  ReplyDelete
 8. दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा! sahi lihily :)

  pls jara hi spee test kadhnaar ka?

  ReplyDelete
 9. ग्रेट जॉब अनुजा ताई....अहो काही काही गोष्टी ज्या ब्लॉगवर मांडणं अशक्य आहे अशा गोष्टी आपल्या प्रत्येकाकडे चालुच असतात. पण ब्लॉगिंगच्या भावविश्वात जाताना एक बरं असतं तात्पुरत्या त्या विसरता येतात...आपल्यासारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया हेच इथलं येण्याचं मुख्य कारण ठरत कधीकधी नाहीतर विचार करा आपण लिहितोय कुणाला काय वाटत काहीच कळत नाही मग काय मजा आहे??

  ReplyDelete
 10. khoop chan lihale aahe...
  Vachun parat eakda shatel janya chi eccha hot aahe :)

  ReplyDelete
 11. अगदी खरंय गणेश..तुमच्यासारखंच मलाही शाळेत जावंसं वाटत होतं.....धन्यवाद!!!

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.