Saturday, September 5, 2009

शिक्षकांची मुलं....

लहानपणापासुन असं एकही वर्ष गेलं नाही की शिक्षकदिनाच्या चर्चा घरात झाल्या नाहीत. मुख्य कारण आई-बाबा दोघंही शिक्षक. आणि हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाहिये तर दोन मावशा, एक काका, दोन मावसबहिणी, तीन चुलतभाऊ, चार मामेबहिणी, एक मामेभाऊ, दोन आतेभाऊ....ई.ई....मोssssठठी यादीही शिक्षकच....खर तर आमच्या आई आणि बाबा दोन्हीकडे शिक्षक नसलेल्यांची यादी केली तर मग उरलेले शिक्षक असं सांगितलं तर जास्त सोप्प आणि थोडक्यात होईल.

तर हे सगळे शिक्षक पण जर ही यादी नीट पाहिली तर माझ्या एक लक्षात एक गम्मत आली ती म्हणजे जे स्वतः शिक्षक आहेत त्यांची पुढची पिढी शिक्षकी पेशामध्ये नाहीये. आणि या उलट म्हणजे जी पुढची पिढी शिक्षणक्षेत्रात आहे त्यांचे पालक शिक्षक नाहीत. म्हणजे पाहा माझ्या घरी दोघं शिक्षक आणि आम्ही एकही भावंड शिक्षणाशी संबंधीत क्षेत्रात नाही. अगदी कॉलेजजीवनात मी शिकवण्या केल्या पण त्यातही थोडे इंजिनियरिंगची पुस्तकं इ. विकत घ्यायला मिळावं इतकाच भाव. त्यापलिकडे काही नाही. माझ्या ज्या दोन मावशा शिक्षिका आहेत त्यांच्या मुलांचंही तसंच. मात्र ज्या दोन मावसबहिणी शिक्षिका आहेत ती माझी मावशी मात्र गाण्याची आवड असणारी सुगृहिणी. एक काका देशसेवेचे व्रत घेतलेला मात्र त्याचा मुलगा प्राध्यापक. तसच आत्या आणि मामांकडेही.

सहज विचार करताना वाटतं का असं झालं असावं? म्हणजे डॉक्टरचा मुलगा जसा डॉक्टर असं आपण जास्त अभिमानाने सांगतो तसं कधीच शिक्षकाचा मुलगा शिक्षक अशी जोडी जुळवतो का?? आमच्या घराबद्द्ल फ़क्त बोलायचं तर ज्यावेळी माझे आई-बाबा शिक्षक होते त्या काळातला त्यांचा (प्राथमिक शाळेच्या शिक्षकांचा) पगार पाहिला आणि त्याची तुलना माझ्या वर्गातल्या कुठल्याही मुलांच्या पालकांच्या मिळकतीपेक्षा केली तर ती कमीच असणार हे सांगायला नको. मी माझ्या शाळेतल्या सहलींना जायच्या ऐवजी खूपदा आई किंवा बाबांच्या शाळेच्या सहलींनाच जाई कारण ते स्वस्त पण असे. आणि उगाच मारुन मुटकुन स्वतःच्या शाळेतल्या सहलींना गेलं तरी बाकी मुलं बाहेर खर्च करु शकतात आपल्याला माहित असतं आपल्याला काय परवडणार ते...स्वतःलाच तो वायफ़ळ वाटतो आणि मग समुहापासुन वेगळं पडणं इ.इ. पासूनही सुटका...असो.

हे सगळं लिहिण्यामागे कुठेही पैशाला महत्व देणं असं काही नाही पण त्यावेळी खरच खूपदा वाटायचं की आपले बाबा जर एखाद्या महिंन्र्दा नाहीतर एल ऍन्ड टी मध्ये असते तर कसा छान दिवाळी बोनस मिळाला असता किंवा आई एखाद वेळेस मंत्रालय नाहीतर इन्कमटॅक्स मध्ये असती तर वा वगैरे...त्याचा परिणाम असेल कदाचित आम्ही भावंडांनी साधारण ठरवलं होतं की काहीही होवो पण शिक्षक अजिबात व्हायचं नाही. आमच्या आई-वडिलांनाही त्यांना जास्त शिक्षण घ्यायला मिळालं नाही म्हणूनही असेल पण आम्ही जास्तीत जास्त कसं शिकु हेच पाहिलं. त्यात आम्ही प्राध्यापक वगैरे तरी व्हावं किंवा नाही असा कधी विषय नव्हता. शेवटी कुठेतरी आमच्या घरात तरी शिक्षकी परंपरा अशी सरळ पुढच्या पिढीत आली नाही. पण तरी घरातल्या घरात बरेच शिक्षक आहेत हेही खरयं.

असो. आता परिस्थिती बरीच बदलली आहे. आमची जी मावस,चुलत भावंडं शिक्षक आहेत त्यांचं आर्थिक दृष्ट्याही छान आहे शिवाय त्यांना तो मोठमोठ्या सुट्या (दिवाळी, मे ई.) मिळण्याचा फ़ायदा आहे. काळ बदलला आहे. पण जेव्हा जेव्हा शिक्षकदिन येतो; मी माझे आई-वडिल, मावशा सगळयांना शुभेच्छा देते तेव्हा नकळत आम्ही कुणी त्या पेशात गेलो नाही हा विचार मनात रेंगाळतो आणि मग मन आठवणींच्या पापण्या फ़डकावत राहातं.

11 comments:

  1. बहुतांशी शिक्षकांची मुले या शिक्षक होतच नाहीत ग. माझी आईही शिक्षकच. नाशिक-भगूर मध्ये एकदम प्रसिध्द होती. मी लहान असताना मला वाटे आपणही आईसारखेच व्हावे पण पुढे कधीनुक कॊमर्स लाईन घेतली ते कळलेच नाही.
    बाकी तन्वीच्या तंबीने लिहिलेस हे छानच केलेस.:)
    आवडले.

    ReplyDelete
  2. छान झालाय ग लेख....आणि मोठे ब्लॉगर वगैरे काय!!!!तुमच्या अमेरिकेत हरबऱ्याचे पीक जास्त येते का?का राखलाय माझ्यासाठी तु खास!!! महेंद्रजींसाठी ठीक आहे ते विशेषण....बाकी शिक्षकांची मुलं शिक्षक खरच नाही होतं,आमचे बापू आजोबा( आईचे बाबा) म्हणत ’मागता येईना भीक तर मास्तरकी शीक’..........

    ReplyDelete
  3. नमस्कार अपर्णा,
    मी आज प्रथमच माझे मत लिहित आहे मी स्वतः सुद्धा
    शिक्षक होण्याचे बरेच दिवस आईला नकार देऊन टाळत होते.माझा लग्न आधी स्वताचा व्यवसाय होता.आई शिक्षिका,निदान B .ed तरी कर म्हणून आग्रह करीत असे.नाही म्हणताना मी शिकले,काही कारणां साठी व्यवसाय सोडला.व घर सांभाळून शिक्षिका झाले.शाळेत इतकी रमले कि कधीही मनास रिकामेपणा वाटला नाही,मनाच्या सर्व कप्यान मध्ये शाळा आहे,माझ्या पिल्लू ला माझी आई माझ्या शाळेत आहे ह्याचा आनंद आहे,मी मुंबई सोडून मस्कत ला आले,शाळेतले प्रतेयक पिल्लू रडत जाऊ नका म्हणत होते.आजही पहिली धाव शाळेत घेते,भरून पावले,एक्कही साधा ओरडा सुद्धा द्यावा लागला नाही २० वर्षात ना एकही गिफ्ट माझ्या कडे आहे.
    लेख खूपच छान नेहमी वाचत राहीन
    अनुजा

    ReplyDelete
  4. भानस, तन्वी आणि अनुजा प्रतिक्रियांबद्द्ल खूप खूप धन्यवाद....
    खरं सांगायचं तर हा विषय माझ्यासाठी एक दुखरी नस आहे. माझे आई-बाबा स्वतः शिक्षक असल्याबद्द्ल अजुनही समाधानीच आहे. त्यांनी शिकवलेली मुलं त्यांना एखाद्या बॅंकेत, विमानतळावर आणि कुठे कुठे भेटतात तेव्हा त्यांना जो आनंद होतो तो मीही पाहिला आहे. अगदी त्यांची मुलं म्हणून जो भाव आम्हाला मिळाला आहे तसं आम्ही इंजिनियरिंग इ. करुनही नाही मिळणार. पण तरी वास्तव तन्वीच्या आजोबांनी सांगितलं. आणि अर्थात आता परिस्थिती खूप बदलली आहे.
    अनुजा तुझं ऑफ़िशियली स्वागत. तुला असं वाटतं का की आपल्या पालकांच्या शिक्षक असण्याचा फ़ायदा जर आपण शिक्षक झालो तर नक्की होतो?? कारण कुठेतरी लहानपणापासुन ते सर्व संस्कार झालेले असतात. असो...ह्या ब्लॉगच्या निमित्ताने नवनवीन लोकंही भेटतात हेही काही कमी नाही....

    ReplyDelete
  5. mast lihile aahe :) aai aahe ka ajun
    bye -Ashwini

    ReplyDelete
  6. ||हरिॐ|| अपर्णा,
    मला मैत्रीं करिता स्वीकारलेस म्हणुन धन्यवाद.आई हि शिक्षिकाच असते.मुलांशी सुस्वांद अधिक चांगला होतो जर शिक्षक म्हणुन कार्र्यरत असेल तर,अशी संधि मिळाली तर काही काला साठी तरी जरुर घ्यावी.तुज्याशी अनेक विषयांवर गप्पा करणे,मला निश्चित आवडेल.
    अनुजा

    ReplyDelete
  7. अश्विनी यावेळी निनावी न आल्याबद्द्ल धन्यवाद...:) अगं आई आहे. आरूषला तिची खूप सवय झाली आहे. आणि ती असल्यामुळे काही कठीण गोष्टीपण सहज सोप्या होताहेत....
    अनुजा आपण नक्की गप्पा मारु. हे मात्र खरे आहे की आई ही शिक्षिकाच असते.

    ReplyDelete
  8. अरे हे मोठे ब्लॉगर्स वगैरे काय आहे.. शेवटी शिक्षकांचीच मुलं ना आपण, त्यामुळे लिहायला आवडतं झालं.. मनात येतं ते लिहितो, तरिही थोडी खंत आहेच की मराठी भाषा व्यवस्थित लिहिता येत नाही म्हणुन.
    माझ्या वडीलांची खुप इच्छा होती की मी प्राध्यापक व्हावं म्हणुन, पण मला अजिबात इंट्रेस्ट नव्हता. पण माझ्या मोठ्या मुलिला एम टॆक करुन लेक्चरर व्हावंसं वाटतंय.. म्हणजे बहुतेक, तिसऱ्या पिढित पुन्हा तो इंट्रेस्ट डेव्हलप होत असावा. असे मला वाटते.

    ReplyDelete
  9. अरे हो हे मी विसरलेच की कदाचित आपण शिक्षकांची मुलं आहोत त्यामुळे बाकी काही नाही तर निदान लिहितोय तरी...मोठ्या मुलीच्या आवडी नंतर कदाचित बदलतील पण तिला आवड असेल तर बरय निदान आपण नाही तर आपली मुलं शिक्षकी पेशात गेल्याचा आनंद काय??

    ReplyDelete
  10. boss u have to have passion, hunger for teaching!! aani paisa mhTla tar hyaat hi khooooooooop aahe (chatench bgh na! pan to dhanda kelaay tyaanee hi goshT veglee. aani jyaanch swthaach shikshn naahi tyaanee shikshan sanstha kaadhlyaat!)

    agdee khare saangu ka? mala jyaaaaaam aawdle ast shikvaayla! ajun hi jar ka kadhee jamle na tar maazya insti jaun shikvnaar aahe mi :) pan shaalet naahi! coz shaaletele vishy avghd :P sahi zaaly he kaay saangaayla nakoch :D :D

    ReplyDelete
  11. दिपक आज हरबर्याचं झाड घेऊन आलास का?? प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद. अरे मी पुर्वीच्या अनुभवाबद्दल लिहिलंय रे. आता पैसा काय सगळीकडेच आला आहे म्हणा.तुझ्या लेक्चरला आम्ही नक्की येऊ....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.