गणपती आले आणि परेलची आठवण आली नाही असे कधीच होत नाही. लहान असताना माझ्या एका मावशीचा घरगुती दीड दिवसाचा गणपती गेला की वेध लागायचे ते परळ-लालबागकडच्या सार्वजनिक गणपतींचे. नशिबाने माझी दुसरी एक मावशी परेलला अगदी आंबेडकर रोडलगत राहायची. तिच्याकडे मग शक्यतो अनंत चतुर्दशीला लागुन जाणं व्हायचं. आम्ही सर्व मावसभावंडं घरातील एक-दोन मोठ्यांबरोबर मग चालत चालत प्रत्येक गल्लीतील सार्वजनिक गणपती पाहायला निघत असू.
माझ्या मावसभावांचे मित्र आसपास राहणारे असत त्यामुळे नरे पार्क आणि अशा काही गणपतीच्या ठिकाणी मोठ्या रांगात उभं राहायचे कष्ट वाचत. कुणीना कुणी त्या गल्लीत राहणारा असला की मावसभाऊ त्यांना बोलावुन आणत आणि मग त्यांची वट चालली की आम्ही पण फ़ुशारकी मारुन लवकर दर्शन करुन घेऊ. सगळीकडची चलतचित्र तर इतकी छान असत ना. आणि अनंत चतुर्दशीला तर काय खालुन जाणारे गणपती पाहताना तो दिवस कसा संपायचा कळायचही नाही.
२००२ च्या गणपती नंतर मात्र गणपती पाहायला २००८ म्हणजे मागचं वर्ष उजाडावं लागलं. आता मावशीकडेही कुणी तिथं राहात नाही. खरंतर चारेक महिन्यांच्या बाळाला घेऊन भारतात यायचं म्हणजे फ़िरणं असं होत नाही पण इतक्या वर्षांनी आले म्हणून फ़ार इच्छा होती परळचे गणपती पाहायची. आता इथे सगळीकडे एकटं फ़िरायची सवय झाली आहे पण म्हणून नाही कुणाला वेळ नव्हता म्हणून मग एका मधल्या दिवशी सकाळी जरा लवकर निघून एकटीने जमतील तितक्या गणपतींचे दर्शन घेतले.
इतकी वर्षे मुंबईचे गणपती पाहुनही जीएसबी मंडळाच्या वडाळ्याच्या गणपतीला कधी गेले नव्हते या वर्षी पत्ता शोधत तोही पाहिला.
खरं तर मुर्तीपेक्षा दागिन्यांनीच दबल्यासारखा मलातरी वाटला. असो. तिथुन मग गणेश- गल्लीत टॅक्सीने जायला बराच वेळ कुणी टॅक्सीवाला तयार होईना. विचार केला आता ट्रॅफ़िक पोलीसाला विचारुया. तितक्यात उलटया रस्त्याने एक टॅक्सीवाला स्वतःहुन आला. मला नंतर म्हणालाही की तुला एक-दोघांनी नाही सांगितलं ते मी पाहिलं पण तू त्या रस्त्यावर उभं नव्हतं राहायला हवं. मग काय थोड्यावेळ त्याच्याशी गप्पा मारल्या. मला रस्ते माहित नाही हे न जाणवु देता. पण भला माणूस होता.त्याने कुठला मधला रस्ता बंद होता म्हणून आधीच एका पतली गल्लीतून मला बरोबर आणून सोडलं. परत जाताना मी कसं गेलं पाहिजे हे पण मला समजावलं आणि मुख्य म्हणजे जे काही बिल झालं होतं त्यापेक्षा कमी पैसे घेतले, अगदी स्वतःहुन. चला भारतभेटीच्या पहिल्याच आठवड्यात एक सच्चा मुसलमान भेटल्यामुळे जरा बरं वाटलं.
गणेशगल्लीत आल्यावर आजुबाजुचे गणपती पाहायला काही जास्त वेळ लागला नाही. फ़क्त पावसाच्या रिपरिपमुळे गल्लीतुन पटापट चालता येत नव्हतं आणि अशा गणपती टू गणपती टॅक्सी मिळत नाहीत ना?? मध्येच आईचा फ़ोन आला आटपलं का?? मग सिमेंट चाळ आणी पोस्ट गल्ली तशीच सोडून एलफ़िस्टन स्टेशनला टॅक्सीने आले.
इतक्या वर्षांनी थोडा थोडा बदल झाला असला तरी वातावरण निर्मिती तीच होती. फ़क्त मला माझ्या लहानपणीची मजा मात्र कुठेतरी हरवल्यासारखी वाटली. असो. चालायचं.
आज लालबागच्या राजाचा या वर्षीचा फ़ोटो कुणीतरी पाठवला आणि मन डायरेक्ट फ़्लाईटने परळला जाऊन आल्यासारखं वाटलं. तेच ते लाऊडस्पीकर वरुन वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतीच्या गाण्यांचे मिश्र आवाज, लोकांची लगबग आणि लांबच्या लांब रांगा, मोठमोठ्या मुर्ती आणि ताज्या परिस्थितीवरची आरास. माझे़च मागच्या वर्षीचे फ़ोटो पाहुन समाधान करतेय...
छान दर्शन घडवलेस. गणपती बाप्पा मोरया!!!:)
ReplyDeleteखरच किती मिस करतो ना आपण ...आणि आपल्या मुलांचे काय हा प्रश्न पडतो बघ सारखा....त्यांनाही वाटेल का हिच गोडी?
ReplyDeleteगणपती बाप्पा मोरया.............
प्रतिक्रियांबद्द्ल खूप खूप धन्यवाद!!
ReplyDeleteखरंच मला स्वतःला मुल झाल्यापास्नं मी हा विचार करते की त्यांना ही गोडी लागेल का? आपण लावली तर नक्कीच लागेल पण आपल्यावेळी जसं आजुबाजुचं वातावरण होतं तेही जसच्या तसं देणं शक्य नाही ना? त्यामुळे तसं थोडं कठीण आहे. बदलत्या काळानुसार हा बदल तर होणारच.
@अपर्णा,
ReplyDeleteआपल्या ब्लॉगसाठी केलेलं इमेज विजेट या लिंक वर आहे
एकदम सही आहे....हा एकदम कलाकार भुंगा आहे बरं....खूप खूप धन्यवाद....
ReplyDelete