Friday, August 14, 2009

निसटलेले क्षण

सलिल-संदिपची जोडी त्यांच्या पाचशेव्या प्रयोगाला "दमलेल्या बापाची कहाणी" ही कविता प्रथमच सादर करताहेत. टी.व्ही.वर आम्ही पाहातोय. खरं मी ते आधी एकदा पाहिलंय (म्हणजे हे रेकॉर्डिंग ऐकायच्या आधी) आणि माहित नाही का ते, त्या वेळच्या वातावरणामुळे असेल कदाचित मला ते त्यांच्या "दूर देशी गेला बाबा" सारखं परिणामकारक वाटलं नव्हतं. आज पुन्हा हे पाहताना मी आईला म्हणतेय ही लोकं रडताना दाखवताहेत ना? मला या गाण्याला अजिबात रडु-बिडु आलं नव्हतं. गाणं सुरु होतं नेहमीप्रमाणे आणि सुनिल बर्वेबरोबरच्या संभाषणानंतर संदिप शेवटचं कडवं पुन्हा सुरु करतो. इथे लिहुच दे ते मला.

(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्‍त,जवळ पहायचंच राहिलं


(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....

हे ऐकता ऐकता न कळत कधी डोळे पाझरायला लागले कळलंच नाही. मला मुलगी नाही. पण एक गोड भाची आहे. आता ती अकराच वर्षांची आहे. पण हे कडवं मला भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीकडे एकदम घेऊन गेलं समजलंच नाही.
आमच्या घरचं हे पहिलं नातवंडं आणि त्यात मुलगी. त्यामुळे लहान असताना माझ्या खास तिला भेटायला खूप फ़ेर्या असत. मला तिच्याबरोबर खूप आवडे आणि तिला मी. ही अगदी छोटी होती पाचेक वर्षांची आणि मी लग्नानंतर अमेरिकेला आले. तेव्हा आपल्याकडे घरोघरी इंटरनेट नव्हतं. फ़ोनवर सर्व काही आपल्या लाडक्या ’अपु’ला सांगण्याची तिची धडपड आठवली. तिचा मुख्य प्रश्न असे माझ्यासाठी तिथे जेवण कोण करतं याचा. आणि एक दिवस मला आपल्या आताच शिकु लागल्या छोट्या हाताने आलेलं तिचं पत्र (त्यात मागच्या बाजुला "अपू हे पतर मी लिलं आईने नाही." असं लिहिलंही आहे) . तिचं बालपण माझ्यासाठी निसटतयं याची अचानक जाणीव झाली. पण जाणं नाही जमलं. नंतर इंटरनेटवर जसं एकमेकांना पाहायला लागलो तसं तेवढ्या वेळात मला जमेल तेवढं सगळं अगदी नवे कपडे, काढलेली चित्र असं सर्व दाखवणं पुन्हा एकदा या "झोपेतच पहातो दुरुन" ऐकुन आठवलं.
नंतर मात्र एकदाची गेले आणि तेही तिच्याच वाढदिवसाच्या बरोबर एक दिवस आधी. आता दोन वर्षांनी मोठी झाली असली तरी लहानच. जमेल तेवढे क्षण पुन्हा एकत्र काढले. मी तिला शाळेत दुपारी एकदा घ्यायला गेले तर इतकी खूश की बसं. तिच्यासाठी मी जेवण बनवलं त्याची तारीफ़. आता तो जुना प्रश्न मिटला असेल. माझ्या परतीच्या वेळी खूप आधीपास्नं तिचे भरलेले डोळे आणि २६ जुलैच्या पावसामुळे माझं विमान रद्द झाल्यामुळे तिला झालेला आनंद सगळं सगळं माझ्यासाठी तेवढंच स्वच्छ आहे. अपु तू जाऊ नकोस ना या तिच्या हाकेला माझ्याकडे कधीच उत्तर नव्हतं आणि मला नक्की काय वाटतय हे सांगुन समजायचं तिचं वय...
आता यावेळी मात्र समंजसपणा वाढलेला आहे. मी इथेच राहावं हे म्हणणं नेहमीच आहे पण मी परत जाणार हेही आता बहुतेक स्विकारलय. आणि आता अजुन मोठी झाली ना? तिला तिचं व्यस्त शालेय जीवन आलं आणि त्यात आता खरं सांगायच तर माझ्यासाठी वेळ नसणार. हा क्लास, ती परिक्षा. इतकं व्यस्त की यावेळी चक्क तिने आता मला ती सातवीत जाईपर्यंत जर मी मध्येच आले तर ती किती बिझी असेल याचा पाढा वाचला. म्हणजे मी येऊ नको असं नाही पण तरी तिला इच्छा असली तरी वेळ नाही. म्हणजे पुन्हा "बालपण गेले तुझे-तुझे निसटून, उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून, जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे" असंच काहीसं....
आताही मी निघताना डोळ्यात पाणी आहे. अजुन आम्ही सर्व इंटरेनटवर शेअर करतो. आम्ही काही वर्षांनी जरी भारतात परत गेलो तरी तिचं कॉलेज मधलं वेगळं जग असेल आणि त्यात मी हरवली असेन का गं?? सगळं या संदिपने लिहिलेल्या कडव्यासारखं. आणि आता कल्पना करणं खरं फ़ार चुकीचं आहे पण जेव्हा ही सासरी जाईल त्या काळातल्याही मुलींच्या डोळ्यात पाणी येत असेल तरी ते माझ्यासाठीही येईल का?? सगळे निसटलेले क्षण डोळ्यापुढून जाताहेत आणि आता भरल्या डोळ्यांनी काहीही लिहिणं अशक्य आहे.

16 comments:

  1. मुलं खुप लवकर मोठीहोतात. हातातल्या वाळूसारखे दिवस कसे निसटुन जातात तेच समजत नाही.

    ReplyDelete
  2. :-(

    khupp chhan lihila ahes!

    paN chalayachach... it's part of life. aahet te diwas 'alert' rahun manasokt enjoy karun ghyayache, ekmekanna khup veL dyayacha, ha ekach upaay.

    ReplyDelete
  3. खूप भावला मॅडम हा लेख...मी हे गाणं एक मुलगी आणि मुलीची आई या दोन्ही भुमीकेतून ऐकले....डोळे वहात होते आणि तेव्हढ्यातच गौरी म्हणाली अरे मम्मा रडतीयेस काय मी आहे ना, कुठे लागलय का तुला.......काय सांगणार तिला.....लगेच बाबांचाही फोन आला त्यांनाही कल्पना होती की मी ईकडे रडुन गोंधळ घातला असणार....तुझ्या लेखातून पुन्हा ते क्षण आठवले बघ!!!

    ReplyDelete
  4. @तन्वी, तुझं खरंय. अगं म्हणजे मुली असणारे आई-बाप हे तर या गाण्यासाठी हमखास डोळ्यातुन पाणी काढणारे गिर्हाइक होते पण बघ ना माझ्यासारख्यांनाही चटका लावुन गेलं. म्हणून मी लिहिलं. कदाचित मला वाटतं आई बाजुला असताना मला त्याही गोष्टीचा गहिवर आला असेल पण मन मात्र माझ्या भाचीसाठी झुरत होतं हेही खरं.

    @सर्किट, तुमचं म्हणणं पटतय. काही काही क्षण असेच निसटुन जातात. आपली इच्छा किती असली तरी आपण तो वेळ देऊ शकत नाही हीच खंत. माझ्यासारखीच दुर देशात राहणार्या कदाचित इतर काहींचाही हा प्रश्न असेल.

    @महेन्द्रकाका, तुम्हाला तर दोन दोन लेकी. कळतय फ़ुलपाखरांसारख्या त्यांनाही पंख फ़ुटताहेत ते...

    ReplyDelete
  5. sahi lihites tu suddhaa.. !! mala ajun tya "baapachya" kavita evadhya appeal hot nahit.. far jaast centi vagaire vatatat.. pan mhanun Sandeep chi pratibha kami aahe ase navhe.

    By the way मिस नाजुक आता माझ्या जवळ नाही .. हरवुन बसलोय् तिला मी.. :,(

    ReplyDelete
  6. जय, तू बापवाल्या कवितावाला नाही तरी आवर्जुन लिहिलंस त्याबद्दल खरंच धन्यवाद. अरे तू सध्या त्या "इतकी नाजुक" वाल्याच ऐक. आणि हे बघ माझा नवरा बाप झाला म्हणून सेंटी-बिंटि झाला नाही बरं. तो एखादी सेंटि कविता अशी अडखळत वाचेल की त्याची पण विनोदी कविता होऊन जाईल.
    ’मिस नाजुक’ बद्द्ल जरा वाइट वाटतय पण लवकरच तू दुसरं काही अपडेट करशील. :)

    ReplyDelete
  7. chan lihile aahes parat ekda tu pani aanlas dolyat mazi mulagi 10mths chi aahe ajun vel aahe tiche lagna busy life hya sathi tari hi me radale :) to program ekdam sahi ch hota

    ReplyDelete
  8. धन्यवाद "अनामिके" :) पण मला मुलीच जास्त आवडतात आणि स्वतःचं मुलगी असणं...

    ReplyDelete
  9. ohhh radlo mi :( evdhee changlee kavita aani uprse tuze touchy likhaan! aawdle khoooooop

    malahi muleech awdtaat! ( ka mahit naahi pan mala mulgeech havye :) ) we have to find alternative to all this! may be we can change the edu. sys. so that this much time will not be wasted in creating so called proffessionals! mala vaaty ki jyla je have tyal te shikaaychee sandhee milne phaar garjech aani upyogee padnaar aahe!

    pnha ekda bhrktooy mahitye mala sorry. thaambvto :)

    ReplyDelete
  10. धन्यवाद दिपक. आपलं म्हणणं खरयं पण तरी सगळीकडे फ़ास्ट फ़ॉर्वडचं बटण नाही चालत ना??? आणि हो मला वाटतं मुली आवडण्याचा हा आपल्या काळातला ट्रेन्ड आहे आणि ते बरही आहे....आता एकदा मुलगा झाला हो म्हणुन काहीतरी लिहायचं म्हणते....:)

    ReplyDelete
  11. hmmm mulga mhnje ghrcha diwa vagaire sanklpana evdhyaaa ghtttt aahet na ki ajun he lokana mulga havaach as vaatte! kaay sone laaglel nast mulaana!!

    BTW adraarthee uleekh nako please! mi tuzya/ tumchyahun lahanch aahe/asen. :D

    फ़ास्ट फ़ॉर्वडचं बटण नाही >> ho = aahe pan apn aaplya garja badlu shkto ki!

    मुलगा झाला हो म्हणुन>> mhnje kaalpnik ki khara khura? :) btw tula ki tumhala mhnaaych? gmail id kaay?

    ReplyDelete
  12. दिपक तू म्हटलंस तरी चालेल...मुलगा तसा खराच झालाय वर्षापुर्वी बघ ना इथे तिथे उल्लेख आहेत त्याचेही ब्लॉगवर...

    ReplyDelete
  13. बाप्रे! माझी बहिणही मोठी झाली की ग आता
    आजपर्यंत जाणवलंच नव्हतं.. दोनेक वर्षात मी घरातून बाहेर पडेन
    उगाच भिती वाटायला लागलिये आता.
    मीही अशीच हरवले तिच्या दुनियेतून तर? :(

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिया खास वाचल्याबद्दल आभार..:)

      अगं बहिणींच्या बाबतीत असं होत नाही. पण मी बघ नं तिला इतकं लहान असताना सोडून आले की तिच्या जगात मी असायला हवं होत नं? असं खूप वेळा वाटतं...अर्थात चूक माझीच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा ही पोस्ट वाचते तेव्हा मी खरंच खूप सेंटी होते..

      तू चिंता करू नकोस...खरं तर आता तुझी बहीण कॉलेजला वगैरे जाईल नं तेव्हा ताई म्हणून तू समुपदेशकाची योग्य भूमिका मांडलीस तर तुमची मैत्री आणखी घट्ट होईल बघ....:)

      Delete
    2. बहिणींचं अस होतं नाही म्हणतेस पण आमच्यात अंतर जास्त आहे त्यामुळे सांगता येत नाही
      मी घरात आहे तोपर्यंत ती टिनेजर असणारेय. म्हणजे यू नो "दिवस असे की कोणी माझा नाही" टाईप मनःस्थिती तिची. आणि तिला समज येईपर्यंत मी नसेनच तिच्यासोबत. जगात सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे न ग ती मला म्हणुन ती दुरावली तर हा विचारचं सहन होतं नाहिये.
      होप तू म्हणतेस तसच होईल
      बाकी मगाशी भावनेच्या भरात सांगायचं राहिलं....खुप मस्त लिहिलयेस :)
      असच लिहित रहा!

      Delete
    3. प्रिया, अगं तू वाचून प्रतिक्रिया दिलीस तेव्हा आवडलं असेल असं मीच गृहित धरलं होतं..:) आणि काही आवडलं नाही तर विनासंकोच सांग गं..हा ब्लॉग म्हणजे प्रकट व्हायचं निव्वळ एक साधन आहे..त्यात कुठेतरी कमी होऊ शकतं...असो..

      आणि अगं कित्ती गोड वाटतंय ते तुझ्या बहिणीबद्दल की जगात सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हटलंय ते...लकी आहे गं ती....:)
      काही नाही गं फ़रक असला तरी एकदा कॉलेजला गेल्या की समवयस्क होऊन जायचं...मग तो फ़रक उरत नाही..बघ मी ज्या प्रकारे तुला उत्तरं देतेय किंवा तुझ्या ब्लॉगवर आपण बोलतो तेव्हा आपल्या वयातला फ़रक कुठे आपल्याला त्रास देतो? आणि ऑन पेपर मी निदान दशकभर मोठी असेन तुझ्यापेक्षा पण सध्या ते गुलदस्त्यातच राहु दे.....:)
      बहिणीबरोबर असणं (किंवा असू शकणं) हेच तू करू शकते....राहील ते...आहे तसंच राहील गं.....कशाला उगाच वैरी चिंता.....:)
      आभार्स...:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.