एक भांबावलेला पत्रकार घाबरत घाबरत एक मुलाखत घ्यायला जातो. त्याच्या समोर असतो चंबळच्या खोर्यातला एक डाकू, नव्हे त्याच्या शब्दात, "बागी". आपल्या वैशिष्ट्यपूर्ण बोलण्याच्या शैलीत इरफ़ान खानला या बागीच्या रूपात‘ पाहताना आता आपण काय पाहणार आहोत याची उत्कंठा लागून राहते आणि हळूहळू एक वेगळीच सत्यकथा पडद्यावर आकाराला येते.
ही घटना आहे भारतीय सैन्यातील एका भाबड्या सुभेदाराची. त्याच्या पायातलं विजेचं बळ ओळखून त्याला सैन्यातलं स्पोर्ट्स डिविजन दिलं जातं. त्याला खेळात जायचं असतं कारण तिथे त्याला अनलिमिटेड खायला मिळू शकणार असतं. पण खरं तर त्याच्याइतकं वेगवान धावणारं तिथेही कुणीच नसतं. तरीही सुरूवातीला त्याला तिथल्या गुरूच्या काही वैयक्तिक कारणांमुळे ५००० मीटरच्या स्पर्धेऐवजी ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घ्यायला लावलं जातं.
जे मिळालं त्याचंच सोनं करणारा हा शिपाई, राष्ट्रीय स्पर्धेत सतत सात वेळा ती शर्यत जिंकतो. धावण्यातले स्वतःचे वैयक्तिक रेकॉड्सही तो स्वतःच या दरम्यान मोडतो. मात्र १९५८ च्या टोकियोतील आशियाई खेळात त्याला आयत्यावेळी स्पाइकचे बूट दिले जातात आणि त्याची सवय नसल्याने तिथे मात्र त्याला पदक मिळू शकत नाही. पण निराश न होता तो आपला खेळाचा सराव सुरूच ठेवतो.
दरम्यानच्या काळात सीमेवरच्या प्रत्यक्ष लढाईमध्ये मात्र स्पोर्ट्समध्ये असल्याने त्याला कितीही इच्छा असली तरी सैन्याच्या नियमाप्रमाणे भाग घेऊ दिला जात नाही. त्यानंतर मात्र वय होत आलं तरी आंतरराष्ट्रीय मिलिटरी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून तो आपल्या अंगातल्या संतापाची आग विझवतो..देशाचं नाव अशा प्रकारे खेळाच्या लढाईत उंचावतो.
त्यानंतर थोडं लवकर निवृत्त होताना खरं तर त्याच्या हातात एकीकडे आर्मीमधलं कोचचं पद असतं पण यावेळी मात्र घरच्या जबाबदार्यांना तो महत्व देतो; आणि इथेच आपलं सैनिक असणं, देशासाठी जीवतोड धावणं, ते पदक हे सगळं व्यावहारिक जगात काहीच कामाचं नाही, याची हळूहळू प्रचिती यायला सुरूवात होते...सरळ मार्गाने वागून न्याय तर मिळत नाहीच, शिवाय गावगुंडांकडून म्हातार्या आईला मारलं जातं त्यामुळे मग चंबळमध्ये आणखी एक बागी तयार होतो आणि त्याची गॅंग. यापुढचं सगळं कथानक वेगळं सांगायला नको.
शेवट गोड वगैरे व्हायचं भाबडं बॉलिवूडी स्वप्न पाहायची गरज नाहीये कारण ही आहे एक सत्यकथा....आणि हे सगळं ज्याच्या वाट्याला आलं,एक सैनिक म्हणून इमानाने काम करताना, एक गुंड म्हणून मरणं ज्याच्या नशिबी आलं त्याचं नाव आहे "पान सिंग तोमार".
काही सत्यकथा पाहताना सारखं वाटत राहातं की यातला अन्याय असणार भाग तरी खोटा निघावा..पण ते तसं झालेल नसतं....अशावेळी आपण अंतर्मुख होतो, कुणाच्या आयुष्यात असंही होतं आपल्याला कळतं आणि नकळत आपली मान शरमेने खाली जाते, डोळ्यातून अश्रु ओघळतात...एका वेगवान धावपटूचं त्याच वेगाने एका गुंडात होणारं हे रूपांतर पाहताना असे किती पान सिंग असतील ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या खेळाने त्यांना त्या एका पदकाशिवाय काहीच दिलं नसेल असं सारखं वाटत राहातं....हे सगळं चित्रपटापुरतंच असतं तर किती बरं झालं असतं??
देशासाठी सुवर्ण पदक आणूनही ज्याच्या घरादाराचं रक्षण केलं जाऊ शकत नसल्याने एका भाबड्या सैनिकाचं एका गुंडात रुपांतर होताना हतबलतेनं पाहणं इतकंच प्रेक्षक म्हणून आपण करू शकतो.
वरील चित्र मायाजालावरून साभार
:(
ReplyDelete:(
Deleteइरफान फेवरेट आहे त्यामुळे हा आहे लिस्टवर आणि एकदम टॉपला. ह्या शनिवार नक्की पाहतोय.
ReplyDeleteनक्की पहा सिद्धार्थ...इरफ़ान तर फ़ेवरीट आहेच, सत्यघटनांवर आधारीत असल्यामुळेही आम्ही पाहिला....
Deleteदोन आठवड्यापुर्वी टीव्हीवर लागला होता तेंव्हा पाहिला बरं का. पानसिंग पाहून का कुणास ठाऊक पण 'प्रहार'मधला पीटर आठवला. देशाची सेवा करताना पाय गमावलेला एक शिपाई गल्लीतील गुंडाकडून मारला जातो पण त्याला न्याय मिळत नाही. विदारक असली तरी सत्य परिस्थिती आहे :-(
Deleteहो रे सिद्धार्थ...पानसिंगचं थोडंफ़ार पीटर सारखंच नाही का?? फ़क्त ही सत्यघटना असल्याने रूखरूख लागून राहते..अर्थात पीटरसाठीही तितकंच वाईट वाटतं..प्रहार तर एकदा पूर्ण पाहिल्यानंतर नेहमी मी अर्धाच पाहाते..ते अकादमीमधलं शिक्षण इ...पुढचं पाहायला डेअरिंग लागतं ते पुन्हा माझ्यात नाही आणि तेच "रंग दे बसंती"चं....
Deleteसत्य किंवा सत्यपरिस्थितीवर आधारीत गोष्टी पाहाणंच इतकं त्रासदायक होतं...जी लोकं त्या सत्याचा सामना करतात त्यांना खरंच सलाम......
खरंय... काही सत्यकथा बघताना त्यांचा अन्यायकारक भाग काढून टाकता आला असता तर. मी बघितला होता हा सिनेमा, फक्त इरफानसाठी नव्हे तर, खऱ्या पानसिंग तोमरसाठी
ReplyDeleteसुहास मला हा सिनेमा पाहिल्यामुळे खर्या पानसिंग तोमार बद्दल कळलं....नंतर मग विकी इ.वर जाऊन त्याची आणखी माहिती, फ़ोटो इ. पण पाहिले....
Deleteअरे इरफान ने मस्त्च काम केलयं, अगदी न्याय दिलाय भुमिकेला..
ReplyDeleteअसे किती तरी वीर अजुन इतिहासात जमा आहेत.
हा चित्रपट संपताना बघ, त्या सगळ्या खेळाडुंचे संदर्भ दिग्दर्शकाने दिलेत..
कहो हां !! :)
दीपक चित्रपट संपताना जे संदर्भ दिलेत त्यामुळे पण या चित्रपटाविषयी ब्लॉगवर आठवणीने लिहिलंय..
Deleteइरफ़ान त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांमधून आपला ठसा नेहमीच उठवतो नाही?? इथेही त्याचं सैनिकी आयुष्य जितक्या भाबडेपणाने तो जगलाय तितकंच शांतपणे तो बागी कोई अपनी मर्जी से बनता है क्या म्हणतो ते चटका लावून जातं आणि डोळ्यात पाणी आणतं ते त्याची शेवटची मरण्याआधीची धाव.....काळीज हलतं त्याला मरताना पाहून....एकंदरीत हा चित्रपट टीम वर्क इतकं छान आहे की आपण बराच वेळ अशा घटनेचा विचार करत बसतो.....:(
राहूनच गेला हा सिनेमा ! :( :(
ReplyDeleteअनघा जमल्यास नक्की बघ...
Deleteमलाही सगळेच चित्रपट पाहाणं होत नाही...बाहेर जाऊन तर नाहीच....आमचे सगळे राहून गेलेल सिनेमे वर्षभराने नेटफ़्लिक्सवर आले की आम्ही आमचा कोटा पूर्ण करतो..हा आताच नेटफ़्लिक्सला आला आहे....
सुंदर परिक्षण.नुकताच पाहिला होता हा सिनेमा. अप्रतिम आहे. इरफानचा खेळाडू ते डाकू प्रवास जबरदस्त. संवादही चांगले आहे. उदा. "बीहड़ मे तो बागी रहते है ,डकैत तो पार्लमेंट मे रहते है "
ReplyDeleteदीपक, मीही मागच्याच आठवड्यात पाहिला...
Deleteसंवाद खरंच अप्रतिम आहेत आणि इरफ़ानने ते त्याच्या थंड शब्दात म्हणून तर अक्षरश: सोनं केलंय या भूमिकेचं.....
माझ्या विशलिस्टवर आहे हा. बघू कधी योग येतो ते.
ReplyDeleteहेरंब, ही सत्यकथा आहे म्हणून नक्की बघ असं आवर्जून सांगेन....:)
Deleteअप्रतिम चित्रपट .. बघताना खरच अंतर्मुख व्हायला होत. सहानुभूती, चीड अशा सगळ्याच भावना एकत्र होतात.
ReplyDeleteआपल्या देशात खेळाडूंची थोडी बहुत अशीच दुरवस्था आहे. (क्रिकेट वगळता).
इरफान खान ... I m speechless ..
सगळ्यांनी नक्की बघावा असा चित्रपट
तुमच्याशी पूर्ण सहमत, @मी मराठी..
Deleteआवर्जून लिहिल्याबद्दल अनेक आभार....:)
ha picture baghaycha rahilay maza. baghen milwun ata.
ReplyDeleteनक्की बघ..मला वर म्हटल्याप्रमाणे नेट फ़्लिक्सवर मिळाला..त्यामुळे उशीरा का होईना पण मी पाहिला...
Delete