शाळेतल्या आपल्या वर्गात एक नेहमी पहिला येणारा मुलगा किंवा मुलगी असते जिच्यापुढे कुणीच जाऊ शकणार नाही हे एकामागोमाग इयत्ता त्याच शाळेत काढल्या की माहित होतं. मग आपण त्या व्यक्तीचा नाद सोडतो पण त्याचबरोबर दुसरी निदान एक व्यक्ती अशी असते की जी या स्पर्धेत कुठंच नसते. ती आपलं नेमून दिलेलं काम चोख करत असते आणि त्यात वैविध्य आणता आणता मग शाळा जेव्हा संपायला येते तेव्हा "आदर्श विद्यार्थ्यांचा" पुरस्कार मिळवून जाते. जसजसं आपण एकेक इयत्ता ओलांडत असतो, आपल्याला या व्यक्तीच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे पैलू कळत जातात. नकळत, आपण त्या व्यक्तीला मनात मानाचं स्थान देतो. तिच्याशी स्पर्धा करावी असं आपल्याला वाटतही नाही. काय म्हणतात ते we look forward to this person and fall in love with this personality and its different aspects. मग जेव्हा निरोप समारंभाची वेळ येते तेव्हा आपलं मन कावरं-बावरं होतं. खरं तर ही व्यक्ती आपली कुणी जवळची मित्र-मैत्रीणही नसते पण आता आपले मार्ग वेगळे होणार या विचाराने आपण हळवे होतो.
आज सकाळी उठल्या उठल्याच इरफानच्या बातमीने मन फार हळवं झालं. तसं पाहायला मी चित्रपट जरा लक्ष देऊन पाहायलाच उशिराने सुरुवात केली. त्यात सिनेमे लक्षात राहायची बोंब आहेच. त्यामुळे आताही मी इरफानचा पहिला चित्रपट कुठला पहिला हे मला ताण दिला तरी आठवणार नाही. पण त्याने फरक पडत नाही. मला वाटतं कदाचीत पानसिंग तोमार असेल कारण चित्रपट जसे प्रदर्शीत झालेत त्याच क्रमाने मी पहिले नाहीत. चंबळाच्या खोऱ्यातल्या या बागीने इतकं रडवलं की मी पाहिल्यापाहिल्या ब्लॉगवर लिहिलं. मग पुन्हा "लाईफ ऑफ पाय" मध्ये त्याच्या आवाजाची, निवेदनाची जादू माझ्यासारख्या सिनेमे विसरणारीला लक्षात राहील अशी कळली. मी या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा "लाईफ ऑफ पाय"चं पुस्तक वाचलं तेव्हा माझ्याही नकळत "पाय पटेल" म्हणजे इरफान आणि त्याचा आवाज हे आपोआप मनात येत होतं.
"पिकु" हा चित्रपट मी असंख्यवेळा पाहिला. खरं हा चित्रपट बाप-मुलगी यांचं नातं उलगडणारा आणि त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगणारा आहे. आता ही "स्टे होम ऑर्डर" आली त्या काळातही पाहिला. नेहमी हा चित्रपट पाहताना ते बाप-मुलीचं नातं जास्त लक्षात यायचं पण मागचे काही वर्षे इरफानच्या आजारपणाच्या बातम्यांमुळेअसेल यावेळी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं. लक्षात आलं की इरफान इथं आपल्या व्यक्तिरेखेला कुठेही कमी पडू देत नाही. आखाती देशातली नोकरी गमावलेला आणि आता टॅक्सीचा धंदा पुढे नेणारा "राणा", पिकुवर वैतागणारा आणि तरीही तिच्या वडिलांकडे तिची बाजू मांडताना स्पष्ट सुनावणारा "राणा" आपल्याला त्या आदर्श विद्यार्थ्यांची आठवण करून देतो. "तुम्हारे साथ शादी करनी है तो तुम्हारे नब्बे साल के बेटे को अडॅप्ट करना पडेगा" हे म्हणताना आपल्याला हसवणारा राणा. त्याच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि इतर भूमिकांच्या वरताण काहीतरी करून भावही तो खात नाही.
त्याच्या भूमिकांमधून तो आपल्याला आपल्यातलाच कुणीतरी वाटावा इतकं आपलेपण त्याच्या अभिनयात जाणवतं. लिहायचं तर त्याच्या तीस वर्षाच्या कारकिर्दीचा प्रत्येक चित्रपट आणावा लागेल इतका विविध भूमिकांमधून तो आपल्या मनातलं ते सुरुवातीला म्हटलेलं मानाचं स्थान पटकावत राहिला.
फार कमी अशी व्यक्तिमत्व, त्यातल्या त्यात बॉलिवूड मध्ये आहेत ज्यांच्याबद्दल इतका जिव्हाळा वाटू शकतो. मला त्याच्या "लन्चबॉक्स" चित्रपटाबद्दल रेकमेंडेशन देणारी "ज्युली" माझ्या एका अपॉइन्टमेन्टला त्याचं खास कौतुक करत होती. लाईफ ऑफ पाय च्या वेळी do you know this guy? great actor असं साशा म्हणाली होती. या दोघींबरोबर माझं थिएटर करणारे नट कसे वेगळे असतात याविषयी बोलणंही झालं होतं. माझ्या पुढच्या भेटीत मी त्याचा विषय काढेन तेव्हा त्याही दुःखी होतील.
इरफानच्या सर्वच चाहत्यांना तो गेल्याचं दुःख झालं त्याचं मूळ यात आहे की तो सर्वानाच जवळचा, आपल्यातल्याच एक वाटायचा. त्याच्या पिकु चित्रपटातल्या गाण्याच्या भाषेत सांगायचं तर
इस जीने में कही हम भी थे
थे ज्यादा या जरा कम ही थे
रुकके भी चल पडे मगर
रस्ते सब बेजुबान
लॉकडाऊन मधल्या काळातल्या बेजुबान रस्त्यावरून त्याच्या शेवटच्या प्रवासासाठी जाणारा आपला हा "आदर्श विद्यार्थी" कुणालाही त्याच्यासाठी त्रास न देता लांबच्या प्रवासाला निघून गेला. त्याची तयारी त्याने आधीच केली होती जेव्हा अगदी आता आता आलेल्या "अंग्रेजी मिडीयमच्या प्रोमोचा ऑडिओ त्याने पाठवला होता.
मागे त्याच्या आजाराबद्दलही त्याने लिहून जणू काही आपल्यासारख्यांची तयारी केली होती. पण खरंच अशी तयारी होते का? मागचा विकेंड मला "अंग्रेजी मिडीयम" पाहायचा होता म्हणून एक हॉटस्टार सोडून सगळीकडे शोधलं. मग शेवटी काल आठवलं; तसा रात्री थोडा पाहू आणि नन्तर थोडा म्हणून त्याला प्रिन्सिपलचा फोन येतो तिथवर पहिला आणि झोपले. मला वाटत, साधारण त्याचवेळी तिकडे मुंबईमध्ये त्याच्यासाठीचे दूत त्याच्या दाराशी उभे होते. हा चित्रपट डोळ्यात पाणी न आणता पाहायचं सामर्थ्य आता तरी माझ्याकडे नाही.
आज सकाळी जेव्हा पटापट सगळीकडून इरफान खानची बातमी आली तेव्हा मला वर सांगितलेला निरोप समारंभाच्या वेळचा मनात मानाचं स्थान असलेला विद्यार्थी आठवला. त्या इंडस्ट्रीमध्ये वर्गात पहिले येणारे विद्यार्थी गेली तीन दशकं बदलत राहिले; त्यात आपला हा आदर्श विद्यार्थी त्याचं काम चोखपणे करत राहिला आणि आज सकाळी त्याचा निरोप समारंभ झाला. फक्त फरक इतका की आता हा निरोप समारंभ म्हणजे पुन्हा केव्हाही न परत येण्यासाठीचा अलविदा. त्याचे कुटुंबीय आणि जवळचे या सर्वाना या प्रसंगातून सावरण्याचे बळ मिळो.
आज हम सचमुच हो गए बेजुबान. Irrfan, we will miss you always. This is just not fair.
वरचं इरफानला श्रद्धांजली म्हणून काढलेलं चित्र माझी भाची अदिती हिचं आहे. तिच्या इन्स्टा अकाउंटवर ते आहे.
#AparnA #FollowMe
दुःख झालं त्याचं मूळ यात आहे की तो सर्वानाच जवळचा, आपल्यातल्याच एक वाटायचा.... So True
ReplyDeleteखरंय श्याम. ब्लॉगवर स्वागत. :)
Delete