Friday, January 31, 2020

तुझं आहे तुजपाशी - दि अल्केमीस्ट

"दि अल्केमीस्ट" हे पुस्तकाचं नाव मागचे दशकभर तरी ऐकलं असेल आणि नावालाच भिऊन कधी हे पुस्तक वाचायचा काय, वाचनालयात शोधायचाही प्रयत्न केला नव्हता.  कारण एकच केमिस्ट्रीची नावड. उगाच यात आणखी फॉर्मुले वगैरे भरमाड असेल असं वाटून त्याच्या वाटेला  कधी गेले नाही. २०१६-१७ च्या आसपास वाचायचा चष्मा लागला आणि अचानक वाचन (म्हणजे अवांतर वाचन) जवळजवळ बंदच झालं. खरं तर २०१६ च्या भारतवारीत एक बॅग भरून आवडीच्या लेखकांची पुस्तकं आणली होती तरीही प्रेरणा मिळेना. मग जसा ब्लॉगर्स रॉक तसा हा "वाचन रॉक" आला आहे म्हणून फार विचार करायचा नाही असं ठरवलं. 

शेवटी वाचनदेवतेलाच माझी दया आली असावी आणि एक दिवस मुलांच्या निमित्ताने वाचनालयात वेळ काढत असताना "लकी डे" म्हणजे ताजी पुस्तकं फक्त चौदा दिवसांच्या बोलीवर न्यायच्या फळीवर जॉन ग्रीशमचं एक २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेलं पुस्तक दिसलं. येऊ घातलेल्या हिवाळी सुट्ट्यांच्या निमित्त्ताने सहज म्हणून ते पुस्तक घेतलं आणि चक्क चौदा दिवस पूर्ण होण्याच्या आत वाचलं देखील. त्यावेळी लक्षात आलं की फिक्शन म्हणजे काल्पनीक कथा वगैरे वाचनाने सुरु केलं तर आपलं वाचन पूर्वीप्रमाणे मार्गावर येऊ शकेल. तरीही दि अल्केमीस्टचा काही विचार केला नव्हता. नम्रपणे सांगायचं तर हे पुस्तकंच माझ्याकडे चालून आलं. मुलासाठी कुठली इ-बुक्स वाचनालयाच्या ऍपवर मागवावी, याचा विचार करताना "एक्सप्लोर मोर" मध्ये याचं इ-बुक आहे हे समोर आलं आणि मग नोंदणी केली. दोन-तीन आठवड्यात पुस्तक आमच्या झोळीत आलं. 

तर हे पुस्तक किंवा याचं सार लिहायचं तर हा एका मेंढपाळाचा त्याच्या स्वप्नात आलेल्या खजिन्याचा शोध घ्यायची कथा. फक्त ही कथा लेखकाने जा साधेपणाने सादर केली आहे आणि वाचकाला रंगवून ठेवले आहे त्यासाठी ती वाचावी. मग त्यात हा एक अल्केमीस्ट येतो. अल्केमीस्ट म्हणजे असा माणूस ज्याला कुठल्याही धातूला सोन्यात रूपांतर करायची कला (किंवा केमीस्ट्री) गवसली आहे आणि त्याच्याकडे ही कला अवगत करताना असं एक रामबाण औषध मिळालंय ज्याने सर्व आजार तर बरे होऊ शकतीलच पण खुद्द अल्केमीस्ट म्हातारा होणार नाही. 

ज्यांना गोष्टी ऐकायला/वाचायला आवडतात त्यांच्यासाठी हे पुस्तक रंजक आहेच, पण ज्यांना बोधकथा/जीवनाचे धडे, त्यासंबंधीची मार्गदर्शक वाक्ये वाचण्यात रस आहे त्यांनाही हे आवडेल यात शंका नाही. 

सुरुवातीची महत्वाची गोष्ट म्हणजे सान्तियागो नावाचा हा मेंढपाळ आपल्या मर्जीने झालेला मेंढपाळ असतो. नेहमीचं शालेय शिक्षण वगैरे झाल्यावर त्याला जग फिरण्याचा अनुभव घ्यायचा असतो आणि त्यासाठी त्याला हे पेशा योग्य वाटतो. त्याच्या आई-वडिलांना खरं तर त्याने धर्मगुरू व्हावं असं वाटत होतं पण ते मुलाला जाऊ देतात. बापाच्या डोळ्यात मुलाला त्याचं स्वप्न दिसतं. 

त्याला एकदा इजिप्तच्या पिरॅमिडच्या भागात असलेल्या एका खजिन्याच्या स्वप्नाने या मुलाला आपल्या आयुष्याचं ईप्सित गवसतं. आधी तो एका जिप्सी बाईला या स्वप्नाचा अर्थ विचारायचा प्रयत्न करतो पण तू तुझा खजिना घ्यायला पिरॅमिडकडे जा आणि मग त्यातल्या एक दशांश हिस्सा मला दे यापलीकडे त्याच्या पदरात काही पडत नाही. मग त्याला एक म्हातारा माणूस भेटतो जो त्याला "माणसाच्या आयुष्याचं ईप्सित" ही संकल्पना सांगतो. 

त्याच्या मते जीवनातलं मोठं असत्य हे की "At certain point in our lives, we lost control of what's happening to us, and our lives become controlled by fate". थोडक्यात कुठच्यातरी नशिबावर आपलं आयुष्य अवलंबून असल्यामुळे आपला स्वतःचा आपल्या जीवनावरच ताबा जातो. आता या मुलाने मेंढपाळ व्हायचा निर्णय स्वतः घेतलेला असतो त्यामुळे आपण असा ताबा जाऊन दिला नाही हे त्याला जाणवतं. मग तो या म्हाताऱ्याच्या गप्पांमध्ये जरा रस घेतो. 

हा म्हातारा खरं तर एक राजा असतो. तो एक दशांश मेंढ्यांच्या मोबदल्यात मुलाला त्याचा खजिना कसा मिळवायचा ते सांगायचं म्हणतो. मुलाला वाटतं आपण मेंढयांऐवजी त्याला खजिन्याचा काही भाग दयावा पण इथे राजा त्याला स्पष्ट सांगतो. तुझ्याजवळ नसलेल्या गोष्टी तू द्यायची भाषा केलीस की ते मिळवण्याची तुझी इच्छाशक्ती कमी होईल. तो त्याला त्याचं पृथ्वीवरचं मिशन म्हणजेच त्याचं हे स्वप्न आहे हे पटवून देतो आणि मग हा मुलगा पुढच्या प्रवासाला लागतो. राजाने प्रवासातले शकुन जाणून घेण्यासाठी "उरिम" आणि "थुम्मीम" नावाचे दोन दगड त्याला दिलेले असतात. त्या निमित्ताने राजा त्याला एक बोधकथाही सांगतो. 

अर्थात अरब देश आणि फारसी भाषा हे दोन्ही नवीन असलेला त्याचा प्रवास रोचक तर असणारच. सुरुवातीला तर पिरॅमिडकडे नेतो सांगणाराच त्याचे सगळे पैसे घेऊन पळून गेला असतो. मग दीडेक वर्षे तो आपलं जीवनाचं ध्येय वगैरे विसरून एका व्यापाऱ्याकडे काम करत पैसे गोळा करत बसतो आणि परतीचा विचार करतो हा भाग थोडा विस्तारीत आहे. त्यातही शिक्षण आहे. 

जेव्हा तो परत आपल्या मेंढ्या विकत घेणेसाठीचा परतीच्या प्रवासाची तयारी करायला सुरवात करतो  तेव्हा ते दोन दगड त्याच्या जॅकेटच्या खिशातून पडतात आणि त्याला आपलं राजाबरोबरच बोलणं वगैरे सर्व आठवतं. आपल्या हिंदी चित्रपटात काहीवेळा आला हा एक डायलॉग आहे तो म्हणजे "किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है". राजाने देखील असंच काहीसं त्याला सांगितलं असतं 
When you want something, all the universe conspires to help you achieve it. हिंदीवाल्यांनी अल्केमीस्ट तर वाचलं नसेल न? असो. 

त्यानंतर मग पिरॅमिडकडे जायच्या प्रवासाच्या सुरुवातीला त्याला एक इंग्लिश माणूस भेटतो. याने अल्केमीचा अभ्यास केलेला असतो आणि त्याला ते दोन दगड, "उरिम" आणि "थुम्मीम", याबाबदलदेखील माहित असतं. मग हे दोघे मिळून अल-फायॉमच्या वाटेवर जाणाऱ्या काफिल्यामध्ये सामील होतात. 

पुढच्या प्रवासात काय होतं? संपूर्ण वाळवंटातून होणार त्यांचा प्रवास, तिथलं ओऍसिस, आणि अर्थात मुलाला भेटलेला अल्केमीस्ट आणि पिरॅमिडपर्यंतची सफर, त्यातले चढउतार, आणखी काही शकुन, नव्या बोधकथा हे सर्व रोमहर्षकपणे आपल्यापुढे सादर होतं. आपणही मंत्रमुग्ध होऊन तो प्रवास जगतो. एका क्षणी मुलगा आपलं खजिना शोधायचं ध्येय सोडून अल्केमीस्ट बनू पाहतोय असंही वाटतं. आपण आणखी उत्कंठेने वाचत राहतो. 

प्रत्येक धडे आपण आपल्या आयुष्याचे धडे म्हणून वाचलं पाहिजे असं काही नाही; पण "आपली स्वप्न जगायचं स्वप्न" आपल्याला पुन्हा पाडायचं असेल तर अधून मधून अशी पुस्तकं वाचली पाहिजेत.  "Never stop dreaming" the old king has said. "Follow the omens."

रेणू गावस्करांची एक मुलाखत ऐकली होती. त्यात त्यांनी स्टोरीटेलिंगवर भर दिला होता. अल्केमीस्ट वाचताना मला त्यांची फार आठवण आली. म्हटलं तर एकच कथा, म्हटलं तर त्यातल्या अनेक बोधकथा. आपण आपला बोध घ्यावा किंवा डोक्याला फार ताण न देता एकच कथा एंजॉय करावी इतकं सोपं. शेवटाशी आल्यावर उगाच वाटतं, हा प्रवास त्या मुलाला नक्कीच आयुष्याचे धडे देऊन गेला पण त्याच्या खजिन्याबाबतीत बोलायचं तर "तुझं आहे तुजपाशीच". 


आता हे लिहिताना आठवलं की २०२० च्या सुरुवाटलॆ हे पुस्तक वाचल्यावर पुन्हा काही इतर फिक्शन वगैरे वाचून मी जवळजवळ पाचवं पुस्तक सुरु केलंय "लाईफ ऑफ पाय" पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. तूर्तास "दि अल्केमिस्ट"मुळे माझ्या डोक्यातला वाचनाचा बोळा निघाला. मी पुन्हा एकदा वाचती झाले :)

#Aparna #FollowMe

2 comments:

  1. तुम्ही या पुस्तकाच जस वर्णन केलय ते वाचून ते पुस्तकही वाचायची ईच्छा झालीये.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मृणाली. वाचा नक्की. आणि ब्लॉगवर स्वागत. 

      मला वाटतं ब्लॉगरचा काही गोंधळ होता त्यामुळे २०१७ पासूनच्या प्रतिक्रिया आता दिसताहेत त्यामुळे उशिराने उत्तर देत आहे त्याबद्दल दिलगिरी.   

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.