माझी मावशी परळला राहायची. तिला जाऊन आताशा महिना झाला. मी यंदा काही अचानक आलेल्या घरगुती कामामुळे मुंबईला गेले तेव्हा ती मुलाकडे पुण्याला होती त्यामुळे आमची भेट फक्त फोनवर झाली. अगं पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्याकडे राहायला घेऊन येईन या माझ्या शब्दांना आता काहीच अर्थ नाही. या मावशीकडे मी असंख्य वेळा गेले आहे. रुपारेलला असताना तर तशी संधीही होती. त्यावेळेस आम्ही वेस्टर्नवाले सोप्पं पडतं म्हणून दादरला गाडी बदलून एल्फिनस्टनच्या या पुलावरून असंख्य वेळा गेलो आहोत. तेव्हाही तो चिंचोळा रस्ता तसा का असावा असा प्रश्न पडायचा. आई बाबा आणि आम्ही मुलं एका ओळीत चालायचो. मग पूल संपला की हुश्श बाबांचा हात पकडता यायचा.मागच्या महिन्यात ताईला मी म्हटलं देखील आता आपलं परळ खऱ्या अर्थाने संपलं.
यावेळी मैत्रिणीच्या घरी जायच्या निमित्ताने परळला जाणं झालं. तिने मला बांद्रयाला भेटून पुढे टॅक्सीने मी पाहिला नाही म्हणून वरळी सीफेसच्या मोठ्या पुलावरून टॅक्सी नेली. मग गप्पा मारून झाल्या तशी तिच्या गाडीने मला परळच्या पुलापाशी सोडलं आणि गाडी मध्ये उभी करायला जागा नसते म्हणून दुसऱ्या टोकाशी सोडून फारा दिवसांनी मी त्या पुलावरून चालले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तो रविवारचा दिवस होता त्यामुळे फार जास्त लोकंही नव्हते.
काल जेव्हा पेपरमध्ये ती चेंगराचेंगरीची बातमी वाचली तेव्हा काळीज हललं. काय झालं असेल या विचारानेच कसंतरी वाटलं. या ठिकाणी कधी काळी आपणही होतो या विचाराने आणखी हैराण व्हायला होतं. अशा घटनांच्या जबाबदारी कुणीतरी स्वीकारतं का? आणि समजा स्वीकारली तरी गेलेले लोकं परत येणार आहेत का? गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं. आपल्याला मुळात एक बेसिक पेशन्स लागतो तो आपल्यात आहे का हेही या ठिकाणी तपासून पाहायला हवं. मला माहीत नाही नक्की किती लोकं एकावेळी होते पण शांतपणे एक एक जण फक्त पुढे पुढे जात राहिला असता तर झालेली घटना टळू शकली असती का असा मी आपल्या बाजूने विचार करतेय. इथे कुठेही सरकारने गेली कित्येक वर्षे इथे बदल केले नाहीत वगैरे गोष्टी तूर्तास बाजूला ठेवल्या आहेत.
मी एका ठिकाणी कामावर जायचे तो फक्त १७ मैलाचा रस्ता तुडवायला काहीवेळा मी तासभरही घालवला आहे कारण इथेही असा एक लोकल हायवे आहे जिथे ऑफिसच्या वेळात पार्किंग लॉट म्हणावा तशी गाड्यांची गर्दी असते पण या गाड्यांच्या जमावाला सरळ जायची शिस्त असते आणि मुंगीच्या पावलाने आम्ही पुढे सरकत राहतो. तीच गत एखादा खेळ किंवा नाटक वगैरे पाहून झालं की बाहेर पडताना आता माझा नम्बर कसा पहिला लागेल वगैरे न पाहता आहे ती रांग न मोडता शांतपणे लोकं सरळ पुढे जातात.
मुंबईचा वेग ज्या शहरात मी आहे त्याला नसेल असं मान्य केलं तरी शिकता यायचं असेल तर हा एक गुण मी नक्की माझ्या जवळच्यांना शिकवायचा प्रयत्न करेन. आताच बाईक चालवायला शिकणारी मुलं डावीकडून पटापट बाईक काढतात त्यांचं कौतुक करायच्या ऐवजी त्यांना कान धरून बाजूला करणारं कुणीतरी आपल्याकडे हवं असं मला नेहमी वाटतं. या चेंगराचेंगरीच्या बातमी वाचून आलेली अस्वस्थता ही आहे की मला माझ्या मुक्कामी पोहोचायचं आहे मग मध्ये मार्गात काही अडथळा आला तर माझी स्वतःची जबाबदारी काय आहे हे आपल्याला कुठे शिकवलं जाणार हे आपल्याला माहीत आहे का? या प्रश्नाचं उत्तर ज्याने त्याने शोधावं इतकंच उटांवरून शेळ्या हाकणारे माझ्यासारखे लोक म्हणू शकतात.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या आत्म्यांना श्रद्धांजली वाहताना अशा घटना घडू नये म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून इथून पुढे आपण जास्त जबाबदारीने वागावं लागेल हे मात्र जरूर म्हणावसं वाटतं.
😥
ReplyDelete