Thursday, June 8, 2017

दोन लक्ष आभार

लिहायचं असतं पण नेमक्या वेळी हातात लेखणी (अर्थात इलेक्ट्रॉनिक) नसते आणि मग तो विषय मनातच राहून जातो. मी स्वतः माझे जुने पोस्ट्स आठवण येते तेव्हा वाचत असते. त्यावेळी वाचकही जुने लेख वाचतानाची नोंद दिसते. अशावेळी काही तरी नवीन लिहायला पाहिजे असं नक्की वाटतं पण अर्थात त्यावेळी काहीच सुचत नाही.

माझी जशी आजकाल मी कितपत सतत लिहू शकेन याची अपेक्षा नाही तसंच इथे सारखं कुणी वाचत राहील ही देखील नाही. आज एक जुनी पोस्ट वाचताना लक्ष गेलं आणि वाचकांचा काटा दोन लाखांच्या पुढे गेलाय हे चटकन ध्यानी आलं.

खरं सांगायचं तर जेव्हा या ब्लॉगरुपी गप्पा मी मारायला घेतल्या तेव्हा खरंच कुणी वाचेल आणि त्याउपर कौतुक करेल हे मला वाटलं नव्हतं. मी माझ्यासाठी लिहीत राहिले आणि जे काही थांबे घेतले तेही माझ्याचसाठी. तरीही वाचकांचा इथला सहभाग अमुल्य आहे. त्यांच्या प्रतिक्रियांनी माझा लिहायचा हुरूप वाढला आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे गेले जवळजवळ नऊ वर्षे या ब्लॉगवर जमेल तसे लिहत गेले आणि आपण वाचत गेलात. आपली दोन लक्ष पावले इथे उमटली त्याबद्दल जाहीर आभार मानण्यासाठी ही पोस्ट. आशा आहे की मी अजून इथे लिहीत राहीन आणि आपण वाचत राहाल.
                                                      दोन लक्ष धन्यवाद.

2 comments:

 1. अभिनंदन !
  हा खरंच खूप मोठा टप्पा आहे.
  मनात काही इतरांशी शेअर करण्यासाठी आणि करण्याजोगे असणे, आणि त्यानुसार व्यक्त होता येणे हीच किती मोठी गोष्ट आहे.
  जगण्याची क्षितिजे बदलत असतात अगदी दररोज. त्यानुसार हे व्यक्त होणे, न लिहिणे बदलत राहणार. पण मी व्यक्ती म्हणून तरल आणि समृद्ध असणे महत्त्वाचे.
  संवेदना टिकून राहणे अधिक गरजेचे. जे काही कमी का होईना लिहितेस, त्यातून ती खात्री पटते आणि म्हणूनच ते कायम राहण्यासाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
  Replies
  1. अनघा फार मनापासून लिहिलं आहेस, त्याबद्दल खूप खूप आभार. आता लिहायला हवं असं तुझी प्रतिक्रिया वाचून मला वाटलं :)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.