Friday, February 8, 2013

एका तपस्विनीसोबतचे दोन तास - गप्पा "रेणू गावस्करां"सोबत

यावेळच्या मायदेश दौर्‍यातला योगायोग म्हणजे माझं तिथे पोहोचण्याच्या आठवड्यात सुरू झालेला "शब्दगप्पां"चा भरगच्च कार्यक्रम. शिवाय माझं स्वतःचं बोरिवलीतलं घर त्यांच्या पेंडॉलपासून चालत पाच मिनिटांवर. त्यामुळे नक्की जायचं असा विचार करून मी यावेळी जेटलॅगदेवाची रोज संध्याकाळी प्रार्थना करत होते. यातला मी पोहोचले त्यानंतरचा पहिला कार्यक्रम होता रेणू गावस्करांशी गप्पांचा. तोवर मी हे नाव फ़क्त वृत्तपत्रांत वाचलं होतं आणि अगदी प्रांजळपणे सांगायचं तर मला त्यांच्याबद्दल काहीच माहित नव्हतं.सुदैवाने मुले गाढ झोपली होती आणि मी जागी राहू शकत होते. शिवाय तिथेच शब्दचं पुस्तकप्रदर्शन सुरू होतं तेव्हा मी अगदी वेळेवर तिथे जाऊन पोहोचले.
मला पुस्तक पाहायची होती म्हणून मी जिथे मुलाखत सुरू होती तिथे अगदी आयत्यावेळी जाऊया असं ठरवून रेंगाळत होते, तोवर एका अतिशय गोड आवाजाने एका अतिशय गंभीर घटनेबद्दल बोलायला सुरूवात केली. त्यादिवशी "निर्भया" गेल्याची बातमी आली होती आणि दिवसभर जीवाला लागलेली हुरहुर त्यांनी मांडलेल्या श्रद्धांजलीने लागलेल्या धारा हळूच टिपताना शेवटच्या रांगांवर मी जाऊन बसले. त्यानंतरचे दोन तास त्यांनी  "संज्योत" (अनिल अवचटांची कन्या) हिच्याबरोबर मारलेल्या गप्पा म्हणजे माझ्यासाठी एका तपस्विनीच्या उलगडेलल्या कार्याचा निव्वळ परिचय नव्हता तर दुसर्‍यासाठी जीवन वेचताना आपण इतकं मोठं कार्य करतोय याची समोरच्याला जाणीव होऊ न देण्याची त्यांची सहजता, त्यांना आलेले  अनुभव श्रोत्यांपुढे मांडतानाची त्यांनी ओघवती शैली, त्या कधी मनात जाऊन बसल्या कळलंच नाही.
माटुंग्याच्या डेव्हिड ससून या लहान मुलांच्या रिमांडहोममधल्या मुलांच्या खिडकीतून मारलेल्या हाकांना उत्तर देऊन अशा मुलांच्या मानसिक/शैक्षणिक जडणघडणीसाठी त्यांनी कार्य सुरू केलं. ते पुढं नेत असताना वेश्याव्यवसायातल्या स्त्रिया आणि त्यांची मुलं यांच्यासाठीही त्या कार्य करत आहेत. आधी मुंबईत सुरू केलेलं हे कार्य सध्या त्या पुण्यातून करतात. पुण्याला त्यांनी रस्त्यावर भीक मागणार्‍या किंवा छोट्यामोठ्या वस्तू विकणार्‍या मुलांचा शिक्षणाचा हक्क हिरावला जाऊ नये म्हणून एक शाळाही सुरू केली आहे, जिथे अशा मुलांना रस्त्यावरुन शाळेत आणले जाते आणि त्यांनी पुढे जाऊन आपल्या पायावर उभं राहावं यादृष्टीने प्रयत्न केले जातात. त्यांच्या "no kids on street" योजनेअंतर्गत त्यांनी पाच मुलांपासून सुरू केलेल्या या शाळेची सध्याची पटसंख्या ऐंशीच्या आसपास आहे.
या दोन तासाच्या मुलाखतीत रेणूताईंनी अगदी सुरूवातीपासून ते त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला.त्यांची मैत्रीण तसंच त्यांच्याबरोबर कामाशी संबंधीत असणार्‍या संज्योत यांचा त्यांना बोलकं करण्यातला सहभागही तितकाच महत्वाचा. मला स्वतःला जाणवलं ते म्हणजे एक समाज म्हणून ही मुलं किंवा वर उल्लेखलेल्या स्त्रिया आणि त्यांची मुलं यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं ही मोठी गरज आहे. फ़क्त त्यांच्यासारख्या समाजसेविकांवर किंवा संस्थांवर त्याची जबाबदारी देऊन हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. 

दुसरं त्यांनी सांगितलेलं म्हणजे सध्या त्यांच्या पुण्याच्या संस्थेत वॉलंटियर म्हणून कॉलेजमधले विद्यार्थी येतात ही जमेची बाजू असली तरी या येण्यात सातत्य किंवा कमिटमेंट नाही. तिथे असणार्‍या मुलांना कुठेतरी आपल्याला भेटायला येणार्‍या व्यक्तिने नियमित असावं असं वाटणं साहजिक आहे नाहीतर येणारी निराशा आणि आधीच माणसांचे वाईट अनुभव आले असतील त्यात ही भर. त्यामुळे अशा वॉलंटियर्सनी किमान एक वर्षासाठीतरी वेळ काढावा असं एक प्रांजळ आवाहन त्यांनी केलं होतं.
कार्यक्रमानंतर त्यांच्या पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेताना त्यांच्या गोड आवाजात त्यांचं संस्थेला भेट द्यायची असेल तर नक्की या. आपण तिथे सविस्तर बोलू अशा संवादानंतर माझ्या पुणा भेटीत मी हे ठिकाण नक्की जायचं ठेवलं होतं पण काही वैयक्तिक कारणामुळे मला नंतर मुंबई सोडून कुठेच जाता आलं नाही ती खंत ही एक पोस्ट लिहून मी व्यक्त करतेय असं समजलं तरी चालेल.
आता वर उल्लेखलेली ही मुलं कोण असतील, त्यांना रेणूताईंनी कुठल्या गोष्टी सांगितल्या असतील आणि रेणूताईंच्या संपर्कात आलेल्या स्त्रिया आणि त्यांचे अनुभव याविषयी या मुलाखतीत ऐकलेलं आणि न ऐकलेलं असं सगळं तीन पुस्तकांच्या संग्रहात रेणूताईंच्याच गोष्टीवेल्हाळ भाषेत मांडलं आहे. त्यांच्या आठवणींचा ठेवा आपल्या मनातही सेवेचं बीज नक्की पेरून जातो."शब्द" प्रकाशननेच ही पुस्तकं प्रकाशीत करून आणि अशा प्रकारच्या गप्पांच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला जवळून भेटण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तितके कमीच.
ही तीन पुस्तकं आहेत "आमचा काय गुन्हा", "झुंज" आणि "गोष्टी जन्मांतरीच्या". नक्की वाचा.
 

प्रेक्षकांनी विचारल्या प्रश्नांत त्यांना कार्य करत असताना येणार्‍या अपयशाविषयी विचारलं.ही व्यक्ती स्वतः मुंबईत अशाच एका संस्थेसाठी कार्य करत होती.त्यांचा अनुभव होता की बर्‍याच स्त्रीया पुन्हा स्वतःच या मार्गाला जातात. त्याला त्यांचं उत्तर होतं "असे बदल होण्यासाठी काळ जावा लागतो. या काळाची व्याख्या प्रत्येक घटनेसाठी वेगळी असू शकेल." आपण आपलं कुठे चुकलं ते शोधून निरंतर काम करायच्या त्यांच्या या वृत्तीला माझा मनापासून सलाम.

8 comments:

  1. अशा महान लोकांना भेटलं की आपलं आयुष्य कसं खुजं वाटायला लागतं नाही त्यांच्यापुढे?

    ReplyDelete
    Replies
    1. हेरंब, आपलं खुजेपण अशा लोकांचं कार्य वाचलं तरी जाणवतं. पण अशा लोकांना प्रत्यक्ष ऐकायला, भेटायला गेले की एक होतं अशा कार्याचं बीज पेरलं जातं.जर प्रत्यक्षात थोडं-फ़ार करता आलं तर खरंच बरं वाटेल. :)

      Delete
  2. ’गोष्टी जन्मांतरीच्या’ अवचितपणे मिळालं होत.. खरं सांगायच तर वाचनालयात त्या दिवशी दुसरं काहीच न मिळाल्यामुळे हे पुस्तक उचललं गेलं.. वाचताना, वाचून झाल्यावर खूप छान वाटल.. पुढे तिघा जणांना हेच गिफ्ट म्हणूनही दिल! रेणू गावस्कर चांगल्या लेखिका, कथाकथनकार आहेत. तुला त्यांना भेटता आल; हे छान झाल..:)

    ReplyDelete
    Replies
    1. मीनल, जमल्यास "झुंज" आणि "आमचा काय गुन्हा" पण वाच. डोळ्यात पाणी येतं..रेणूताई खरंच खूप छान कथाकार आहेत आणि तू म्हटलंस तसं त्यांना भेटता आलं हे खरंच माझ्यासाठी खूप छान झालं. तो योग त्या रात्री जुळून आला...:)
      आभार गं.

      Delete
  3. खरेच! अश्या तपस्वींना भेटल्यावर फारच भारलेपण येतं. तुला हा योग साधता आला हे फारच छान झालं. तू वर उल्लेखलेली दोन्ही पुस्तके आता गेले नं की पाहते.

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय गं श्रीताई. तू त्यांची पुस्तकं नक्की मिळव नाही तर माझ्याकडे मी आणली आहेतच.

      Delete
  4. Hello !!
    Tumacha blog me nehami vachate.
    Khup chhan lihita tumhi.
    Tumhi bharatat, borivalit rahata ka ?
    Me pan :)
    Me Borivali (West) la. and If I am not wrong, tumhi tech shabd navach pustakancha dukan mhanata asal tar te vaziryala ahe. Ho na ?

    Mau P
    Mumbai

    ReplyDelete
    Replies
    1. @Mau P, आभार आणि ब्लॉगवर स्वागत.
      हो माझं भारतातलं घर बोरीवलीला आहे, पण सध्या मी देशाबाहेर असते. त्या शब्दगप्पांच्या आठवड्यात आणि आसपास एक मायदेश दौरा केला तेव्हाचा हा अनुभव आहे. आणि हो तेच वजिर्‍याचं "शब्द" दुकान आहे.. :)
      आशा आहे की आपण नियमितपणे वाचाल आणि आपली आवड/नावड प्रत्यक्ष शब्दात कळवल्यास अधीक आनंद होईल हे सांगणे नलगे.

      पुन्हा एकदा आभार.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.