"यंदाचं आपल्या स्कुल डिस्ट्रिकचं OBOB बहुतेक रद्द होईल" , जेनी माझ्या मुलाच्या मित्राची आई शाळांना सुट्ट्या लागताना भेटली तेव्हा सांगत होती. "तुला त्या वादग्रस्त पुस्तकाबद्दल माहित असेलच". "नाही अजून", मी पुटपुटले. हे एक मॉरमॉन कुटुंब असल्याने काय वादग्रस्त असू शकेल याचा मला साधारण अंदाज आलाच.
OBOB म्हणजे Oregon Battle of Books ही तिसरी नंतरच्या मुलांमध्ये पुस्तकवाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून घेतली जाणारी एक स्पर्धा. गेले दोन वर्षे माझा मुलगा त्यात भाग घेतोय. आमची गाडी अजून रिजनललादेखील गेली नाही; पण त्याला आवड म्हणून त्यातली एक दोन पुस्तकं वाचणे, थोडंफार volunteering करणे हे मीही करते.
यावर्षी मात्र शाळा सुरु व्हायच्या आधीच हा वर म्हटला तो नन्नाचा पाढा ऐकायला येऊ लागला आणि कुठलं पुस्तक काय वगैरे मनात यायला लागलं. तरीही प्रत्यक्ष पुस्तक हातात यायला सप्टेंबर उजाडलाच.
George पुस्तकाचं इतकं साधं कव्हर मी पाहिलं नाही. फोटोत दाखवल्याप्रमाणे पांढऱ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या रंगात रंगवलेलं प्रत्येक अक्षर आणि o मधून अर्धवट दिसणारा एक लहान चेहरा. नीट पाहिलं तर हे रंग LGBT सपोर्टवाला झेंडा असतो तेच रंग. मागच्या पानावर Be Who you Are च्या o मधेही तोच चेहरा. त्याखालचा अल्पपरिचय वाचला आणि त्याने चित्र बरचसं स्पष्ट झालं; शिवाय जेनीची प्रतिक्रियादेखील आठवली. पुस्तक वाचायला हवं हेही तितकंच पक्कही झालं. OBOB रद्द वगैरे न झाल्याने मुलाने आधीच पुस्तक वाचलंही होतं. त्याला ते खूप नॉर्मल वाटलं ही बाब मला फार महत्त्वाची वाटली.
सध्या शब्दात सांगायचं किंवा भांडाफोड करायची तर जॉर्ज नावाचा एक मुलगा जनसामन्यासाठी मुलगा असला तरी स्वतःला मुलगा न समजता मुलगी समजत असतो. किंबहुना आपण मुलगीच आहोत याची खात्री तिला असते. अशा मुलीचं आपल्या कुटुंबीयांना आपलं मत पटवून देतानाची ही कथा. सम्पूर्ण कथेत जॉर्जचा उल्लेख "ती (she)" म्हणूनच केला आहे हे उल्लेखनीय आहे.
जॉर्ज न्यू यॉर्क राज्यात आपली आई आणि मोठा भाऊ स्कॉट यांच्याबरोबर राहत असते. तिचा बाबा फियोना नावाच्या एका बाईबरोबर लग्न करून पेन्सिल्व्हेनियामध्ये राहत असतो. पुस्तकाच्या सुरुवातीला जॉर्ज मुलींची चित्र असणारी लपवलेली मासिकं पाहताना तिचा भाऊ स्कॉट दारावर टकटक करतो कारण त्याला जॉर्जच्या खोलीतलं बाथरूम वापरायचं असतं. तिला दार उघडायला वेळ लागतो कारण ती मासिकं पुन्हा लपवायची असतात पण रूम वापरून झाल्यावर स्कॉटला ती गंमत माहित झाल्याने तो "I won't tell Mom. I will let you get back to thinking about girls", म्हणून चिडवून जातो तेव्हा जॉर्जला खरं तर मी दुसरं कुणीतरी असायला हवं ही इच्छा होते. या मासिकातल्या मुली म्हणजे तिच्या मैत्रिणी होत्या. तिला प्रकर्षाने आपण त्यांच्यासारखं मुलगी असायला हवं असायचं. कधीतरी ही मासिकं फेकली पाहिजेत हेही तिला माहीत होतं पण ते तितकं सोपं नव्हतं.
नेहमीप्रमाणे शाळा सुरु असते आणि इ.बी.व्हाईट यांचं "शार्लट्स वेब" हे पुस्तक मिस उदेल चौथीच्या वर्गात वाचून घेतात. शेवटच्या भागात शार्लट ही कोळी जेव्हा मरते तेव्हा जॉर्जला अश्रू आवरत नाहीत. याबाद्दल त्याच्या वर्गात असणारे रिक आणि जेफ त्याची टिंगलपण करतात. नन्तर जर्नलमध्ये याबद्दल मुलांना लिहायला लावताना बाई जवळ येऊन जॉर्जची चौकशी करतात. शाळेची एक प्रथा म्हणजे दरवर्षी वसंत ऋतूमध्ये पहिली ते चौथीची मुलं एकच पुस्तक वाचतात आणि चौथीचे दोन्ही वर्ग मिळून त्या पुस्तकाचं नाटुकलं खालच्या वर्गांसाठी सादर करतात. यंदा तो मान "शार्लट्स वेब" या पुस्तकाला जातोय.
पुढच्या आठवड्यात नाटकाची पात्रनिवड होणार म्हणून विकांताला त्याची तयारी करण्यासाठी जॉर्ज आणि त्याची बेस्ट फ़्रेंड "केली" तिच्या घरी भेटतात. त्याआधी तो केलीला आपलं रहस्य सांगण्याआधी नाटकाच्या विषयामुळे विल्बर (Wilbur , the dirty pig) ही पुरुष भूमिका करण्यापेक्षा शार्लटची स्त्री भूमिका करायची इच्छा प्रकट करतो. केलीच वय पाहता तिला त्यात काही विशेष वाटत नाही. तू ये बिनधास्त, आपण तयारी करू आणि आपल्या बाई तुला तीच भूमिका देतील असा विश्वास ती जॉर्जवर दाखवते. प्रत्यक्षात जॉर्जला ती भुमिका मिळत नाहीच शिवाय बाईंचा विश्वासघात केल्याचा ओरडा, रिक आणि जेफचे टोमणे हे सर्व होतं. बाई जॉर्जला विल्बर किंवा दुसरी कुठलीही पुरुष भूमिका द्यायला तयार असतात पण जॉर्ज मागच्या पटात मदतनीस म्हणून राहतो. शार्लटची भूमिका केलीला जाते.
केलीला वाटतं जॉर्जला शार्लटची भूमिका मिळाली नाही म्हणून आता ती आपल्याशी बोलणार नाही पण त्याचवेळी मला मी मुलगी असल्यासारखं वाटतं हे आपलं गुपित जॉर्ज केलीला सांगतो. त्यावेळचा त्याचा केलीचा संवाद उल्लेखनीय आहे. या वयातली मुलं काय विचार करत असतील त्याचा लेखिकेने बरोबर विचार केला आहे.
त्याचवेळी जॉर्जच्या आईला जॉर्जची ती मासिकं मिळतात आणि ती जॉर्जला सज्जड दम देऊन आई घेऊन टाकते. आता तिच्या या आभासी मैत्रिणीही नाहीश्या होतात. जॉर्ज दु:खी होते पण आईला आपल्या मनातला गोंधळ सांगायची वेळ अजून आली नसते. मग ती जेव्हा एका प्रसंगावरून तो गोंधळ आईला सांगते तेव्हा तीही केलीप्रमाणे ते चटकन स्वीकारते का? जॉर्जला आईला समजावण्यासाठी किंवा स्वतःसाठी शार्लटच्या भूमिकेचा वापर कसा होतो. यात शाळेतल्या बाई किंवा मुख्याध्यापिका यांची काय मतं असतात या सर्व प्रश्नांची उत्तर शोधायची तर मुळातून "जॉर्ज" हे पुस्तक वाचायला हवं.
या पुस्तकाची लेखिका ऍलेक्स जिनो हिचं हे पहिलंच पुस्तक आणि तेही २०१७ साली प्रसिद्ध झालेलं आहे. याला लहान मुलांच्या पसंतीचे लेखकाच्या पदार्पणाचे पारितोषिक मिळाले आहे. (Winner of the Children's Choice Book Award for Debut Author of the Year) आणखीही काही पारितोषिके त्याला आहेत. इतर पुस्तकात न पाहिलेली एक गोष्ट म्हणजे पुस्तक संपल्यावर लेखिकेची छोटेखानी मुलाखतही आहे. ती स्वतः genderqueer आहे. म्हणजे मुलगाही नाही आणि मुलगीही नाही. तिला हा शब्दही वयाच्या एकोणिसाव्या वर्षी कळला. तिने हे पुस्तक लिहिलं जे तिला ती लहान असताना वाचायला आवडलं असतं. जॉर्जला "मेलिसा" जे तिचं आवडतं नाव आहे याने हाक मारा किंवा "ती" असा उल्लेख करा पण :तो" नाही याकडे तिचा आग्रह आहे. मेलिसा ही एक ट्रान्सजेंडर मुलगी आहे. ती मुलगी म्हणून मोठी होणार तेच तिला तिचं शरीर यात अडकलं आहे (body is trapped or stuck in) वगैरे म्हणू नका हे ती आवर्जून सांगते. आणखीही माहितीपूर्णप्रश्नांची उत्तर यात आहेत. हे पुस्तक ज्या जॉर्जबद्दल लिहिलेलं आहे ती या दशकातील असल्यामुळे तिला अशा शरीराविषयी आणि इतर माहिती आंतरजालावर खुली आहे हेही इथे लक्षात घेणं आवश्यक आहे.
एक आई म्हणून मी हे पुस्तक वाचलं कारण माझ्या मुलाच्या वयाच्या मुलामुलींनी जेंडर समजून घेताना समाजमनाचं भान ठेवायला हवं हे जे मला शब्दात शिकवता येणार नाही ते अशी पुस्तकं समजावू शकतील का? मुलांना आतापासून या विषयातील किती माहिती कळायला हवी म्हणजे त्यांचं बालपण न हरवता त्यांना ही माहितीही राहील हे मला हवं होतं. तिसरी ते पाचवीपर्यंतच्या मुलांनी वाचावं म्हणून OBOB च्या स्पर्धेसाठी हे पुस्तक लावलं आहे. मला वाचताना काही वावगं वाटलं नाही; उलट जॉर्जची मेलिसा होतानाची घालमेल कळली आणि तसंच तिच्या आईचीही. या स्पर्धेनिमित्ताने बरीच मुलं हा पुस्तकं वाचतील आणि आपली मतं बनवतील हे यशच आहे. वर उल्लेखलेली जेनी मात्र तिच्या धार्मिक भावनांच्या विरोधात असणारं हे पुस्तक तिच्या मुलाला वाचायला देणार नाही हेही जाताजाता.
हा लेख मिसळ पावच्या यंदाच्या दिवाळीत प्रकाशीत झाला आहे त्याचा दुवा.
#AparnA #FollowMe
No comments:
Post a Comment
मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.