मेलिसा फ़्रान्सिस, ऐंशीच्या दशकातली एक बालअभिनेत्री. अगदी लहानपणापासून जाहिराती,इतर छोटी मोठी कामं करता करता, वयाच्या आठव्या वर्षी Little House on the Prairie या तेव्हा गाजलेल्या सोप ऑपरामध्ये तिला काम मिळतं आणि तिनं काम करणं हे एक प्रकारे तिच्या आईची मानसिक (आणि कदाचीत आर्थिक) गरज बनते हे एक प्रकारे अधोरेखित होतं. तिच्या आईचं तिने बालअभिनेत्री व्हायचं करियर सांभाळताना मेलिसाची झालेली कुतरओढ, जोडीला तिच्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याची परवड, हे सगळं हताशपणे पाहणारे तिचे बाबा, आणि अर्थात या सर्वांवर मेलोड्रामाटिक वागणूकीने अंश ठेवणारी तिची आई, हे सगळं मोजक्या प्रसंगात आपल्यासमोर उभं करणारं एक आत्मकथन म्हणजे Diary of A Stage Mothers Daughter.
हे पुस्तक सुरू होतं तिच्या आठवणीतल्या एका प्रसंगाने. तिच्या लहरी आईने तिला एका रस्त्यावर गाडीतून सोडून दिलं असतं आणि मग हट्टाने ती आई परत आलेल्या गाडीला दिसू नये अशी लपून बसते आणि अखेरीस चालत घरी जाते. मेलिसा, तिची मोठी बहिण टिफ़नी आणि तिचे आई-बाबा या लॉस एंजेलिसजवळच्या एका गावात राहणार्या या वरकरणी सगळं ठीक सुरू आहे असं दिसणार्या कुटुंबात लहरी स्वभावाची आई म्हणजे या कुटुंबालाच लागलेली एक कीड आहे असं या पुस्तकात आलेल्या बर्याच प्रसंगातून एकंदरित वाटतं.
मेलिसा निदान तिला एक मोठी सिरीज मिळाल्यामुळे बहुतेक आईच्या प्रेमाला थोडीफ़ार पात्र असते पण त्याचवेळी ऍक्टिंगमधून एक्झिट घेणारी तिची मोठी बहीण टिफ़नी मात्र आईसाठी अस्तित्वातच नसते.कुठल्यातरी डिप्रेशनमध्ये घरातल्या कुठल्याही कामात लक्ष न दिसणारी ही आई काहीवेळा आपल्या मुलींना शाळेतून परत आणायला जायला विसरते काय किंवा कारपुलसाठी स्वतःची वेळ असेल तेव्हा उशीराने पोहोचून इतर मुलांनाही उशीर करते, घरात बरेचदा नीट ग्रोसरी पण आणलेली नसते, घर साफ़ ठेवलेलं नसतं आणि ते साफ़ करून मैत्रीणीला घरी खेळायला बोलावणार्या मेलिसाला तू परस्पर असं कसं मैत्रीणींना बोलवू शकतेस असं सांगणारी आई, असे बरेच प्रसंग एकामागोमाग एक येतच जातात.
This was half of my life. When we were at home, my sister and I lived in a state of constant wariness, always reading my Mom's mood and bracing for impact when that mood turned ominous. We were treated to riding lessons, skating lessons, the best school my parents could afford. But her vigilance was also a leash, one she could pull tight enough to strangle.
हे एक टोक आणि मग दुसरं मेलिसाबरोबरचं तिच्या ऑडिशन्स, शुटिंगच्या वेळेसचं आईबरोबरचं तिचं टिमिंग याचे चांगल्या दृष्टीचेही उल्लेख आहेत. तिला लिटिल हाउसमध्ये काम मिळणं आणि एकंदरित तो काळ तिच्या आईच्याही भरभराटीचा. फ़क्त प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे कसं ठेवता येईल हे पाहताना ही नक्की यांची आईच आहे का हा प्रश्न पडावा. त्यातही चुकीच्या मार्गावर जाणार्या टिफ़नीला आई म्हणून कुठलाच आधार तिने देऊ नये हेही मोठं कोडंच.
साधारण कळत्या वयात म्हणजे हिशेब वगैरेचं कळायला लागल्यावर मेलिसा आपल्या आईला आपल्यासाठी ठेवलेल्या खात्यात किती पैसे असतील असं आईला विचारते. त्यावेळचा तिच्या आईचा त्रागा म्हणजे हद्द आहे. म्हणजे मुलांना महागड्या वस्तू, प्रायव्हेट शाळा हे सगळं पुरवायला त्यांनीच कमवायला लागणं आणि वर हे सगळं तुला मिळावं म्हणून मीच प्रयत्न करतेय. मी माझं करियर न करता फ़क्त तुला ऑडिशन्ससाठी फ़िरवतेय वगैरे वगैरे ऐकवणं म्हणजे पराकोटीची हद्द आहे. तोवर मेलिसाला कॉलेज करायचं असतं आणि त्याला पैसे लागणार हे माहित असतं त्यामुळे आईच्या नकळत ती कामं करून आलेले काही चेक्स एका वेगळ्या अकाउन्टला ठेवून तिला स्टॅनफ़र्डच्या समर प्रोगामसाठी ऍडमिशन मिळाल्याचं घरात सांगते आणि त्यावेळी आईचं पहिलं वाक्य असतं हे तू कसं काय ठरवलंस? आणि मुख्य स्टॅनफ़र्डसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. तुला तर अजून काम करायचंय. म्हणजे मुलीने काय करायचं, रुपेरी पडद्यावर राहायचं की नाही हे आई ठरवणार आणि तिने लहानपणापासून केलेल्या मेहनतीचं चीज तिला नाहीत.अर्थात मेलिसाला माहित असतं हे असंच होणार म्हणून ती देखील म्हणते माझ्याकडे तेवढे पैसे आहेत मग पुन्हा तमाशा, त्या बॅंकेला जाऊन धमकावणं की तुम्ही मुलांचे पालक नसताना असं अकाउंट कसं उघडू दिलं इ.इ.
well that account was closed and she did not even have a gun.
इथून पुढे मग मेलिसाला हार्वडला ऍडमिशन मिळणं, तिचं लग्न, त्यावेळी तिच्या सासरकडच्यांना (ते सदर्न आणि हे वेस्टर्न अमेरिकेतले म्हणून) आईने कसं वागवणं आणि तोवर पूर्ण वाया गेलेल्या टिफ़नीचं लग्नात दारू पिऊन बेताल वागणं सारंच वाचायचं म्हणजे हे पुस्तक एकदा घेतलं की खाली ठेवताच येणार नाही.
हे सगळं जसं घडलं असावं तसं कमीत कमी प्रसंगातून आपल्यासमोर उभं करायचं मेलिसाचं लेखनकौशल्य कमाल आहे. तिचं लहानपण, कलाकार म्हणून सेटवरचे अनुभव, कॉलेजमधले प्रसंग, तिच्या आयुष्यात आलेली मुलं आणि तिच्यापाठी उभा असलेला तिचा नवरा, त्या दोघांचं भेटणं हे सगळं तिच्याच शब्दात वाचायला हवं.
जाता जाता एक सांगितल्याशिवाय राहावत नाही. तिचं तिच्या बहिणीबद्दलचं प्रेम आणि आपण काही करू शकलो नाही याची तिची खंत जितकी जाणवते तितकीच जाणवते स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्याच कुटुंबाचं नुकसान करणारी तिचीच आई. स्वतःच्या आईबद्दलचे हे प्रसंग अशा प्रकारे लिहायलाही धैर्य लागतं. शेवटी शेवटी आईच्या थेरपीज आणि टिफ़नीच्या बाय पोलर डिसॉर्डरवर होणारा खर्च, शिवाय आईने घर सजवायला म्हणून घेतलेल्या महागड्या वस्तुंची बिलं हे सर्व खर्च करून जेरीला आलेले तिचे बाबा मेलिसाला घरातली सत्य परिस्थिती सांगतात (तेव्हा तिचं लग्न होऊन ती काही वर्षे सॅन फ़्रॅन्सिस्कोला आली असते). तिच्याबरोबर आपलंही डोकं सुन्न होतं. मग घर विकायचं ठरतं तशी तिची आई, बाबा आणि टिफ़नीला जणू वार्यावरच सोडते. नेमकं ज्यादिवशी मेलिसा आपल्या नवर्याच्या तिसाव्या वाढदिवसाची पार्टी ऍरेंज करत असते तेव्हाच त्या विकायला लागणार्या घराचं कागदपत्री कामं वगैरे आहेत असं सांगून बाबा येत नाहीत. पण ही आई मात्र येते आणि पुन्हा एकदा तिच्या सासरच्यांकडे दुर्लक्ष करून जाते. काही दिवसांनी तिला टिफ़नी आणि बाबा भेटतात तेव्हा तिला कळतं की त्या पार्टीला यायच्या आधी आई त्या विकलेल्या घरातून, इतरांची देणी-बिणी देऊन उरलेले सगळे पैसे परस्पर चेक वटवून आणि बाबांच्या धंद्याच्या अकांउन्टमधलेही सगळे पैसे काढून आलेली असते. थोडक्यात स्वतःकडे फ़क्त पैसा ठेऊन रक्ताची नाती तोडून ही इकडे पार्टीमध्ये मजेत वावरून गेलेली असते.
हे सांगताना टिफ़नी आणखी काहीतरी सांगते जे काळजाला घर पाडतं.
You know, I was lying in the hospital last time and in the middle of the night I was just in so much pain. And ...so scared. All I could think was, it would be so nice to have a mom.
त्यानंतर मात्र मेलिसाने आतापर्यंत स्वतःला सांभाळलेलं असतं ते सारं तुटतं आणि ती आईला फ़ोन करून आपला संबंध संपल्याचं कळवते. त्यानंतर काही दिवसांनी डॉट कॉमचा बबल फ़ुटल्यामुळे मेलिसाची नोकरी दोलायमान होते . ती आणि तिचा नवराही आपापल्या नोकर्या सांभाळायच्या की मेलिसाला न्यु-यॉर्कमध्ये न्युजलाइनमध्ये करियर करायचं असतं ते बरं पडेल या विचारात परत इस्ट कोस्टला जायचा निर्णय घेतात. त्याच दरम्यान आजाराने टिफ़नी जाते. मेलिसाला तिचं it would be so nice to have a mom हे वाक्य सारखं आठवत राहातं. आपल्या बहिणीसाठी आपण फ़ार काही करू शकलो नाही हेही तिच्या लिखाणात जाणवतं.
एका अतिमहत्वाकांक्षी आईने आपल्याच मुलांचं केलेलं नुकसान. मेलिसाने खरं तर स्वतःच स्वतःचं आयुष्य घडवलं. ती सीएनबीसीच्या power lunch, The Call, On the Money अशा कार्यक्रमाची निवेदक होती. तसंच सध्या ती फ़ॉक्स बिझनेस नेटवर्कवर Money with Melisa Francis हा बिझनेस शो करते. आपल्या दोन मुलांसह न्यु यॉर्कमध्ये राहणारी मेलिसा स्वतः आई झाल्यावर आपल्या आईकडून आईने कसं असू नये हा धडा शिकल्याचं आवर्जून लिहिते.
तळटीप
हातात धरल्यावर खाली ठेवता येणार नाही असं एखादं पुस्तक मी बर्याच दिवसांनी वाचलं आणि त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटलं.शेवटच्या काही घटनांचा उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पूर्ण होणार नाही असं वाटलं म्हणून ते लिहिलं. हा ब्लॉग वाचणार्या प्रत्येकाला लगेच हे पुस्तक वाचायला मिळेलच असं नाही म्हणून तो उल्लेख गैर नसावा असं वाटतं.
सध्या एकंदरित सगळीकडे आपल्या मुलांना रुपेरी पडद्यावर येनकेन प्रकरणे झळकावं असं वाटायची एक लाट आली आहे. त्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक बर्याच पालकांच्या डोळ्यात अंजन घालेल अशी अपेक्षा. आपल्या मुलांनी रुपेरी पडद्यावर यशस्वी व्हावं आणि तिथेच त्यांनी करियर करावं म्हणजे आपल्यालाही इतर पालकांपुढे शेखी मिरवता येईल, पण हे पालकांचं वेड मुलांना आणि पूर्ण कुटुंबाला रसातळाला नेऊ शकेल हे कुणी प्रत्यक्ष अनुभवलं असेल तर ते मेलिसा आणि अर्थात तिच्या बहिणीने. त्यातल्या मेलिसाने ग्लॅमरसोबत वाहावत न जाता स्टॅनफ़र्ड आणि हार्वर्डसारख्या ठिकाणी आपली पात्रता सिद्ध करून यशस्वी होऊन दाखवलं.त्यासाठी आणि हे सगळं या पुस्तकात इतक्या नेमक्या शब्दात ते सत्य मांडायचं धाडस करणार्या मेलिसाचं कौतुक करायलाच हवं.
अपर्णा, हे पुस्तक कुणाकुणाला वाचायला देऊ याची मोठ्ठी यादी आहे आत्ता माझ्या मनात. तुझ्या लेकीचे फोटो गोड येतात तिला टीव्हीवर / जाहिरातीत संधी मिळेल का बघ हे मला ऑलरेडी सुचवून झालंय!
ReplyDeleteगौरी अगदी अगदी. मिळालं तर नक्की वाच हे पुस्तक.
Deleteविलक्षण सुन्न करणारं पुस्तकं दिसतंय; वाचायला हवं.
ReplyDeleteओळख करून दिल्याबद्दल आभार.
सविता नक्की वाचा. एक वेगळंच जग पाहायला मिळालं ज्याची पडद्यावरची बाजू इतके दिवस नुसती दिसत होती.
Deleteलाटा आणि त्यावरची जहाजं... (की बोटी)...
ReplyDeleteअभिषेक हम्म्म्म्म्म्म...
Deleteआपल्या हिंदी सिनेमा क्षेत्रातही अशी अनेक उदाहरणे आहेत.
ReplyDeleteअगदी खरं अरूणाताई. आभार आणि ब्लॉगवर स्वागत. ही प्रतिक्रिया अमळ उशीरा पाहिली गेल्याबद्दल क्षमस्व.
ReplyDelete