Thursday, May 30, 2013

मराठी मलाथी

मुलं बोलायला लागली की भाषेला एक अभूतपूर्व महत्त्व प्राप्त होतं. त्यात तुम्ही परदेशात असलात तर मातृभाषेला थोडं काकणभर अधीक जपावं लागतं. नाहीतर मुलांनी एकदा इंग्रजी सुरू केल्यावर त्यांना वेळीच थांबवलं नाही की आपण स्वतःच किती इंग्रजी वापरतो ते आपल्याच लक्षात येणार नाही. तर भाषेवरून सांगायचं तर हिंदी ही आम्हा दोघांची सांकेतिक भाषा आहे. मुलांना काही कळू नये असं बोलायचं असलं की आम्ही आमच्या बंबैया हिंदीला साकडं घालतो पण मुलांनी मात्र घरात कटाक्षाने मराठी बोलावं यासाठीचे प्रयत्न सुरू असतात. आणि त्यामुळे काही मजेदार प्रसंग घडतात.

म्हणजे आम्ही जसं मुलांना त्यांनी इंग्रजी सुरू केलं की "मराठी मराठी" असं आठवण करून देतो तसंच आमचं हिंदी सुरू झालं की त्यांचंही "मलाथी मलाथी" सुरू होतं. दोघा भावंडांनी आपसात मराठी बोलावं म्हणून मी नेहमी जमेल तसं मराठीचं मार्केटिंग करत असते. त्यात मग ही तुमची "सिक्रेट लॅंग्वेज" असेल, कुणालाही कळणार नाही आपण चौघे काय बोलतोय ते, हे एक नेहमीचं (सध्या) यशस्वी असणारं एक गमक आहे. त्यातून घडलेला हा एक छोटा प्रसंग. अगदी ताजा. मी दुसरं काहीतरी काम करत असतानाचा बाबा आणि मुलामधला संवाद.



मु - बाबा मला इंडियामध्ये लग्न करायचं आहे.

बाबा - छान. पण का रे आरुष?

मु - म्हणजे मला तीन तीन लोकांना माझी सिक्रेट लॅंग्वेज शिकवायला नको.

बाबा - तीन??

मु - हो दोन बेबीज आणि एक आई



मी तर उलटी पालटी होणारच होते तेवढ्यात आणखी एक निरागस स्टेटमेंट

"बाबा, मुंबईला हॉस्पिटल असतात नं?"


बाबा आणि आई दोघंही आपलं फ़क्कन येणारं हसू दाबून गप्प. मी माझ्याच डोक्यात टपली मारून घेणार आहे. कुणी सांगितलं होतं सांगायला की तुला आणि तुझ्या भावाला हॉस्पिटलमधून आणलं होतं? बरं आम्ही एक सांगितलं पण ते या दाराने बाहेर पडेल हे मात्र आम्हाला कसं कळणार :)

इथून पुढे मुलाला कुठली माहिती दिल्यावर ती कशाप्रकारे प्रोसेस होऊन बाहेर पडेल मी काहीच सांगू शकत नाही. पण हा प्रसंग मात्र नोंद केल्याशिवाय राहवत नाही.

14 comments:

  1. पुढच्या वर्षी हेच होणार बरं आमच्याकडे! :)

    ReplyDelete
    Replies
    1. वो तो है गौरी. आम्हाला पण कळव बरं. :)

      Delete
  2. Replies
    1. आभार रामचंद्र आणि ब्लॉगवर स्वागत.

      Delete
  3. khupach chan
    mulanche niragas pana sacche prasna sodavana kharach khup kathin ahe.
    Avadale god bless ur family..

    ReplyDelete
    Replies
    1. आभार सोनाली आणि ब्लॉगवर स्वागत.

      Delete
  4. हाहाहा.. शब्द शब्द जपून वापरायला लागतो पोरांसमोर :)

    ReplyDelete
    Replies
    1. हेरंब तुझ्या कमेंटवरून "शब्द शब्द जपून ठेव" असा नवा टॅग सुरु करावा का विचार करतेय ;)

      Delete
  5. मला अजून ऐकवते माझी लेक काहीबाही ! त्यामुळे मुलं मोठी झाली की ह्यातून सुटका होईल असंबिसं काही नाही ! :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा, आम्ही सुटकेचा विचार सोडतोय मग :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.