Thursday, September 6, 2012

४५ - ३५ - २५


तीन आकडे पाहिले की कोणाचं काय आणि कोणाचं काय सुरू होतं. तसं म्हटलं तर आमचा हेतू चांगला स्पष्ट, चांगला इ.इ. होता पण नेमका या तीन आकड्यांनी आणि मुख्य त्यांच्या क्रमाने केलेल्या घोळाने आम्ही नशीबाने हे आकडा प्रकरण महागात पडता पडता वाचलो. 

त्याचं झालं असं, म्हणजे घरातलं दूध जवळजवळ संपतंय आणि घरात दोन मुलं आहेत तर वेळकाळ न पाहता दूध आणायला जायचं  होतं. आता हे एक वेळ समजलं आणि त्यात अनायासे गाडीची चक्कर होतेय तर मूलं झोपतील हा सुप्त हेतू होताच पण त्यातही सगळी काम करून संपली तरी दोन्ही मुलं जागी. अशावेळी आम्ही डोकं कुठे चालवावं?

तर आता इतक्या रात्री पार्किंग लॉटमधून गाडी काढता काढता नेमकं आइसक्रीम खायची इच्छा व्हावी याला अक्षरशः काही म्हणजे काही इलाजच नाही. बरं घरी बारा महिने कुठलं नं कुठलं आईस्क्रीम फ़्रीजमध्ये असतं, ज्या दुकानात दूध घेतलं तिथेच आईस्क्रीमही घेता आलं असतं. म्हणजे घरच्यापेक्षा काही वेगळा फ़्लेवर वगैरे...पण नाही? "खाईन तर तुपाशी"वाली लोकं असतात त्यांना रात्रीचे सव्वा दहा वाजले तरी फ़क्त आणि फ़क्त "डेअरी क्वीन"चंच आइस्र्किम आणि तेही फ़क्त आणि फ़क्त "हवायन ब्लिझर्डच" हवं असतं. मग काय माणसानेच निर्मिलेल्या स्मार्ट फ़ोनच्या अ‍ॅपने अशावेळी पंधरा मिनिटांनी दुकान बंद होतंयची वॉर्निंग दिली तरी आणि त्यात आम्हाला तिकडून साधारण सारख्याच अंतरावर असलेल्या दोन दुकानांपैकी कधीही न गेलेल्या दुकानाचीच आम्ही निवड करावी हे निव्वळ संकेत.बरं मला काय घरी जाऊन झोपायचं खेरीज काही काम नसणार होतं. निदान तिथे पोहोचेपर्यंत मुलं झोपतील म्हणजे जरा निवांतपणे जुने दिवस आठवत आइस्र्कीम खाता येईल असा एक साधा सरळ (आणि स्वार्थी) विचार करून मी पण नव्या जागी पंधरा मिन्टात पोचायचं आव्हान स्विकारायला काही कटकट केली नाही (हो म्हणजे इतरवेळी कटकट करणे हा समोरच्या पार्टीचा लग्नसिद्ध हक्क असतोच नाही का?) 

रात्रीच्या पारी गावांमध्ये दिवाबत्तीची सोय कुणी करावी या भारतात कुठच्या तरी विषयात (इतिहास असणार बहुतेक) शिकलेलं "ग्रामपंचायत किंवा मुन्सिपाल्टीने" हे उत्तर उल्ट्या अमेरीकेत "कुणीच नाही" या धर्तीवरचे काळोखे रस्ते कापत गाडीवान आणि मिनिटांकडे पाहात मी घालमेल न दाखवता वेळ घालवत होते...म्हणजे एकीकडे जिपिएसची रिमेनिंग मिनिट्र्स आणि दुसरीकडे गाडीतलंच घड्याळ यांच्यात वजाबाकीचा खेळ खेळणारी मी आणि मनातल्या मनात नव्या जागचं दुकान शोधताना दहा एकतीस झाले की झालं सगळं मुसळ केरात अशा विचारात. 

खाली पाहता पाहता अचानक वळणावर गाडी वळणं आणि वेग यांच्यात "अर्धगोल-अर्धगोल" आणि "जास्त-कमी-साट्कन कमी" असा खेळ खेळल्याचा भास झाल्याचं वाटून एका प्रचंड काळोख्या वळणावर आता हा ठोकणार असं वाटून ती वजाबाकी सोडून वर पाहिलं आणि एक कावळा, आपलं ते मामा, आपलं ते पोलिस बाजुच्या रस्त्याला जवळजवळ चिकटून आणि प्रचंड काळोखात असलेल्या स्ट्रिप मॉलमधून त्याच्या गाडीत चढताना दिसला. त्याला गाडी लागू नये इतक्या लिलया वळणावर गाडी चालवणार्‍या नवर्‍याचं "कसा दिसला रे तुला तो गाडीत चढताना" असं म्हणून कौतुक करणार तोच अंधारात आमच्या एकमेव चालणार्‍या गाडीवर मागून आलेल्या पांढर्‍या-निळ्या-लाल प्रकाशझोताने माझी ट्युब एकदम पेटली. कौतुकाची जागा लगेच थोडा त्रागा आणि काउन्सिलिंगने घेतली. "सांग त्याला. दोन मूलं आहेत मागे. ती त्रास देत होती." मजा म्हणजे मोठा अजून जागाच होता फ़क्त लहान्याचा निद्रादेवीने ताबा घेतला होता. तेवढ्यातल्या तेवढ्यात मी "आरुष पाहिलंस? तू लवकर झोपत नाहीस म्हणून आला बघ पोलिस" हेही म्हणून घेतलं. 

आमच्यामागे दिवे आणि गाडीत आधी मागून मग पुढपर्यंत टॉर्च मारत मामासाहेब अवतरले.बाकी काही विचारायच्या आधीच त्याने पंचवीसच्या स्पीड लिमिटला तुम्ही पस्तीसवर होता हे पाहिलंत का म्हणून आमची हवा काढून टाकली. आता कागदपत्रांचा पण थोडा झोल होता म्हणजे आमचं कार इंशुरन्सचं लेटेस्ट कागद आम्ही इंश्युरन्सच्या साइटवरुन प्रिंट करून ठेवलं नव्हतं. अंधारात चमकणार्‍या गोर्‍या मामासाहेबाने आधीच "मी हे सगळं रेकॉर्ड करतोय सांगून" माझ्या जागं असणार्‍या मुलाला झोपवायचं काम पण करून ठेवलं होतं. 

मग आधी गाडीचे कागदपत्र, लायसन्स क्रमांक हे जवळच्या वॉकी टॉकीवरुन त्याच्या गाडीतल्या सहकार्‍याला सांगून आमच्या आइस्क्रिमच्या बिलाची तयारी सुरू केली असं मी  मनातल्या मनात विचार करत होते आणि कधी नव्हे ते नवर्‍याने त्याच्याकडे थोडी बाजू मांडायचा प्रयत्न केला. त्याने गाडी चालवताना पाहिलं होतं की त्या रस्त्यावर बराच वेळ असलेलं ४५ चं लिमिट ३५ आणि २५ असं पटापट उतरत होतं आणि नवा रस्ता असल्याने ते झटक्यात पंचवीसवर आणायचा आमचा प्रामाणिक प्रयत्न फ़सला होता. हे तसं पटण्यासारखं होतं आणि बालबच्चेवाले म्हणून असेल नशीबाने त्याने विचारलं इथे इतक्या रात्री काय करताय त्यावेळी आम्ही डेअरी क्विनचा दाखला दिला आणि वर ते आता बंद झालं हेही सांगितलं. 

आइस्क्रीमचं नाव ऐकुन बहुदा त्याचं डोकं थंड झाल्याने आमचं लॉजिक पटलं असावं पण कर्तव्य म्हणून आम्हाला वॉर्निंग देऊन सोडलं. आणि ती वॉर्निंग अशी होती की रस्त्याचं लिमिट जरी झटाझट खाली येतंय तरी तुम्ही मुळातच नव्या रस्त्यावर गाडी चालवत असाल तर वेगाला सांभाळून चालवा. आता आइस्क्रीम पण नाही तर या विषयावर आणखी काही बोलून नवी फ़ोडणी पडण्यापेक्षा आम्ही आपलं "व्हय महाराजा" म्हटलं आणि दुकानाचं अपेक्षीत बंद दार उगा आमच्यासाठी उघडतंय का?चा क्षीण प्रयत्न करून घरी आलो. 

परत जाताना मी व्यवस्थित पाहिलं २५ - ३५ - ४५ हे उलट्या दिशेचे वेगाचे बोर्ड आणि अर्थातचं दिवाबत्तीची सोय नसलेला वळणांचा रस्ता. गाडीमध्ये होती एक प्रवासाने आणि एक आपल्याला झोपत नाही म्हणून पोलिस पाहायला आला या विचाराने झोपलेलं, अशी माझी दोन छोटी बाळं त्यानंतर अर्थातच आताच वॉर्निंगने सुधारलेला अगदी पोटातलं पाणी न हलता वळण घेणारा सारथी आणि वजाबाकीचा खेळ संपूनही हातात आइस्र्किमचं ब्लिझर्ड न आल्याने काय करावं हे लक्षात न आल्याने ते आकडे पाहून झाल्या प्रसंगाची उजळणी करत खिदळणारी मी. 

13 comments:

 1. मग शेवटी काय? घरी जाऊन शिरा बनवला का? महेंद्र

  ReplyDelete
  Replies
  1. हा हा काका..पोहोचेपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते मग कुठे शिरा. मुकाट्याने घरात होतं ते आईस्क्रीम खाल्लं..:)

   Delete
 2. आइस्क्रीम मिळाले नाही तरी आइस्क्रीमच्या नावाने मामा गार झाला हे ही नसे थोडके ;-)

  ReplyDelete
  Replies
  1. हो नशीब मामा गार झाला नाहीतर (न मिळालेलं) आईस्क्रीम महागात पडलं असतं रे सिद्धार्थ :)

   Delete
 3. आपला ब्लॉग GinkgoBlogs वर जोडण्यात आलेला आहे. तुम्ही या http://www.ginkgoblogs.com/FAQs.aspx#registration पत्त्यावर जाऊन आपला ब्लॉग claim कसा करायचा ते पाहू शकता. जर आपल्याला हा ब्लॉग GinkgoBlogs वरून काडून टाकायचा असेल तर आम्हाला पुढील पत्यावर ईमेल करू शकता GinkGoTeam@ginkgoblogs.com

  ReplyDelete
 4. आपली मुले कटकट न करता एव्हड्या लौकर आणि शांतपणे झोपली ह्यातच आनंद माना.
  आमच्या घरी रात्री १ वाजला तरी मुलगा झोपत नाही अन आम्ही दोघे पेंगत पेंगत त्याच्यावर लक्ष ठेवत बसतो.

  ReplyDelete
  Replies
  1. खरंय रे अनिकेत. पण आमच्याकडे काहीवेळा लवकर झोपून रात्री खेळायचा एक वेगळा कार्यक्रमही असतो बरं का ;) सारे घडीचे प्रवासी :)

   Delete
 5. या रस्त्यावर आत्ता नक्की स्पीडलिमिट किती आहे हा प्रश्न मला नेहमीच भेडसावतो. मग मी अंदाजपंचे गाडी चालवतो. पण नशीबाने अजून कुणी पकडलेलं नाही त्यासाठी!

  ReplyDelete
  Replies
  1. काही वेळा असा प्रश्न पडतो. आमच्या नवीन जीपीएस मध्ये रस्त्याचं लिमिट कळतं आणि आपण त्यापेक्षा जास्त वेगाने जात असू तर जीपीएस मध्ये आपला स्पीड लाल होतो....इथे जरा तिरपागडं प्रकरण होतं. पण वाचलो..

   आभार गुरुदत्त :)

   Delete
 6. Replies
  1. आभार रोहिणीताई. :)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.