Thursday, September 13, 2012

खाद्ययोगायोग


मला जायचं होतं कुठे? मिडवेस्टात..
मी राहाते कुठे? नॉर्थ वेस्टात....
आणि मधल्या मध्ये हे नॉर्थ इस्टात, डेट्रॉइटला एक तीन तासाचा हॉल्ट मिळतो काय...मला माझ्या भाच्याला फ़ोन करायचं सुचतं काय? आणि मामीच्या इतक्या आयत्या वेळेच्या नोटीसीवर पण ते गूणी बाळ पाउणेक तास उशीराने का होईना पण येतंय काय आणि मग मला आग्रह करून "शटिला"ला नेतो काय....’दाने दाने पे लिखा है’ चा अनुभव आला की याच म्हणीची सार्थकता पटते तसंच काहीसं...
हम्म....काय बोलतेय मी?? मी काहीच बोलणार नाहीये...फ़क्त फ़ोटोच बोलणार आहेत......ते वर म्हटल्याप्रमाणे त्याने आग्रहाने "तुला हे आवडेल" म्हणून नेलेलं एक नवीन ठिकाण..पुन्हा जायचा योग येणं म्हटलं तर कठीण म्हणून संधीचा फ़ायदा घेऊन एक छोटं सेलेब्रेशन त्याच्याबरोबर तिथे आणि घरच्यासाठी पण एक पेस्ट्री...बॅगेत जागा नसल्याचं मोठ्ठं दुःख मला तिथे गेल्यावर झालं....हाय राम....या पोस्टच्या निमित्ताने समस्त फ़्रेंच बेकर्सचा विजय असो...आणि ते विकणार्‍या अरब कन्यकांचाही....आणखी काय....
चला आहात नं तयार....एका योगायोगाने घडलेल्या खाद्ययोगाच्या छोट्या सफ़रीला...म्हणून वर खाद्ययोगायोग लिहिलंय :) 

डेट्रॉइट विमानतळापासून साधारण अर्धा एक तास ड्राइव्हवर असणार्‍या डिअरबोर्न नावाच्या गावातल्या एका रस्त्यावर बरीच मिडल इस्टर्न/अरेबिक पद्धतीची दुकानं आहेत. त्यातली एक प्रसिद्ध बेकरी म्हणजे "शटिला". इथे गेल्या गेल्या एक नंबर घ्यायचा आणि आपल्याला काय हवं (खरं तर मला सगळंच हवं होतं) याची मनातल्या मनात नोंदणी करायला सुरूवात करायची.

गेल्या गेल्या दिसतात त्या आपल्याकडे परळला गौरीशंकरकडे वगैरे जसे काचेच्या आत मिठाया आणि वर जिलेबीचे डोंगर आणि आणखी काही निवडक मिठाया तसंच दृश्य. एक एक कप्पा विशेष प्रकारच्या गोडांसाठी. जसं वरचे सगळे मूसचे वेगवेगळे प्रकार. मूस हे साधारण थोडे कमी गोड आणि अत्यंत मुलायम म्हणून मला प्रचंड आवडणारं डेझर्ट.



इथल्या केकच्या सजावटी मनमोहक तर आहेतच शिवाय काही प्रकार छोट्या सिंगल सर्व्हिंगमध्येही ठेवलेले दिसताहेत. बच्चे कंपनीसाठी एकदम यम्म ओ..



हे टु गो बॉक्सेस आणि त्यातली अरेबिक मिठाई खरं तर मला फ़ार घ्यावीशी वाटत होती पण मला लॅपटॉप उचलून पाठदुखी वाढवायची नसल्याने बॅगमध्ये जागाच नव्हती. मग नाहीतरी मुलाला काही नट्सची अ‍ॅलर्जी आहे असं एक आंबट कारण मनात येऊन फ़ोटोवर समाधान मानलं ;)





केकच्या आणखी काही सजावटी पाहत बसता आमचा नंबर आल्याने भाच्याने मला भानावर आणलं. आता आम्हाला जे काही हवं होतं ते काचेपल्याडच्या मुलीला सांगून मग ती आमची ऑर्डर स्वतः चेक आउटकडे आणणार होती.



इतक्या कमी वेळात या दुकानाला न्याय देणं तसं कठीण पण नेहमी न खाल्ला गेलेल्या पिस्ता मूसला संधी द्यायचं मी ठरवलं. शिवाय त्याच्याभोवतीचं चॉकलेटचं कुंपणही फ़ार मोहक दिसत होतं की हीच पेस्ट्री पाहिजे असं त्या ललनेला मी सांगितलं.



माझ्या भाच्याने पायनापल खाणार म्हणून आधीच सांगितलं. मी त्याची चव अर्थातच घेतलीच.

खरं तर पाय निघत नव्हता पण आधीच त्याने यायला उशीर केल्यामुळे लगेच न निघाल्यास विमान चुकायची दाट शक्यता होती. म्हणून मुलांसाठी चॉकोलेट रोल्स घेऊन पटकन निघालो. 

तुमचं जर या भागात (माझ्यासारखंच चुकून का होईना) जाणं झालं तर हे दुकान अजीबात विसरू नका. खरं तर निव्वळ या दुकानासाठी पुढच्या एखाद्या ट्रिपसाठी व्हाया डेट्रॉइट जावं का असा विचारही मी करतेय. 

एंजॉय :) 


तळटीप: ही पोस्ट खरं तर कधीपासून लिहायची होती पण फ़ोटो धुवायला टाकायचा मुहुर्त शोधता शोधता आज आणखी एका चांगल्या योगायोगाचं निमित्त.आज ब्लॉगने एक लाख वाचकसंख्या ओलांडली.जेव्हा हा ब्लॉग सुरू केला तेव्हापासून आपण काय लिहिणार किंवा लिहिणार तरी का याचाही नीट अंदाज नव्हता आणि त्यापुढे जाऊन इतक्या वेळा तो वाचला जाईल वगैरे गोष्टी तर मनातही आणल्या नव्हत्या. त्यामुळे या निमित्ताने मी जास्त नियमीत न लिहिताही माझ्या जुन्या पोस्ट वाचून आणि नव्याला प्रोत्साहन देऊन या यशात सामील झाल्याबद्दल सर्वच वाचकांने मन:पूर्वक आभार. केक/पेस्ट्रीज आवडल्या असतील अशी आशा :)

22 comments:

  1. खाद्यणीशेढ !!!

    खाद्यललनेचाही एखादा फोटू टाकायचास ना..

    *(इथे खाद्यलालानेचा अर्थ 'खाणारी ललना' (म्हणजे माझियामनावाली) असा नसून खायला देणारी (काचेपलीकडची) असा गृहीत धरावा !)

    ReplyDelete
    Replies
    1. हेरंब अरे कंस न घालताही कळलं असतंच की मला...
      ह्म्म..या संपूर्ण पोस्टमध्ये या ललनांबद्दल जास्त न लिहिताही तू ही कमेंट टाकलीस म्हणजे "तू इथे आधी जाऊन आलायस का रे भावा?" असं विचारावसं वाटतंय मलाही..फ़क्त त्या दुकानात इतकी गर्दी होती की उगा मी पोरींचा फ़ोटो काढून गैरसमज वाढवायला नको (किंवा बदल्यात माझ्या भाच्याला मार पडायला नको म्हणून) माझं लक्ष खाद्ययोगायोगाकडेच एकाग्र ठेवलं...:)

      खाद्यआभार्स रे... :)

      Delete
  2. wow aparna hya khaddya padarthanchi pic pahun ani mahiti wachun ase watat ahe me ithe kay karat ahe...ha moha kasa awaru khanyacha...mala pan asach mulansathi khanyache padartha ananyachi saway ahe ani me pan lahan mulansarahki khanyachi majja enjoy karate mulansobat...:)nice blog dear

    ReplyDelete
    Replies
    1. सुरेखा ब्लॉगवर स्वागत आणि डिटेल्ड कमेंटबद्दल आभार्स...:)
      मला मी एकटी खात असले की घरच्यांसाठी न्यायची सवय जुनीच आहे. आधी पण आई-बाबांसाठी किंवा भाचेकंपनीसाठी न्यायचे. मग नवर्‍यासाठी (एकदा शिकागोहून बिर्याणी नेली होती..नशीब अख्या विमानाला वास नाही आला ते) आणि आता अर्थात मुलांसाठी..आणि हे अर्थात स्वतः खाऊन झाल्यावर ;)
      आशा आहे तुला ब्लॉग आणि इतर पोस्टही आवडल्या असतील. भेटूया पुन्हा :)

      Delete
  3. तिथे तुझ्या बॅगेत जागा नव्हती आणि आमच्या पोटात केवढा मोठा खड्डा पडलाय.

    बादवे, खाद्यललना ! कल्लोळ.

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा पंकज. बॅगेत जागा नसल्याचं परमदुःख झालं होतं मला. पण फ़ूल न फ़ुलाची पाकळी नेलीच.. ;)
      तुमच्यासाठी हे दुकान एकंदरीतच पर्वणी (तू आणि हेरंब आय मीन ;) )

      Delete
  4. ___$?$?$?$?______$?$?$?$?$
    _$?________$?__?$.___I_____?$
    ?$___________$?$.____________$?
    $?________________LOVE_____?$
    ?$__________________________$?
    _$?________________YOUR__?$
    ___?$___________________$?
    ______$?______BLOG____?$
    ________?$_________$?
    ___________$?___?$
    _____________?$?

    From India

    ReplyDelete
    Replies
    1. Unlucky strike again.....

      Thank for the comments and like mentioned before we like to see people with no adv. :)

      Delete
  5. रे देवा म्हाराजा, ह्यो सगळो खादडीचो नेवेद्य ग्वाड ग्वाड म्हणजेच आवट ऑफ शिल्याबस असलो तरी १ लाखाच्या मानकर्‍याचो मान म्हणून ग्वाड मानून घे रे म्हाराजा...

    हेंच्या ब्लॉगवर दिवसाक एक पोस्ट आणि शंभर कमेंटी पडू दे. यंदाच २ लाखाचो आणि पुढच्या वर्षात पाच लाखाचो मान मिळू दे रे म्हाराजा...

    रच्याक - कोंबडी बोकडाचो नवस बोलणार आसाशील तर १० लाखाचा पण गार्‍हाणा घालतंय. काय बोलते बाय?

    ReplyDelete
    Replies
    1. रे म्हाराजा तू आउट ऑफ़ शिल्याबस असा? काय सांगता. तसा माजा पण होता कदीच्या काळी. पण घोवाने सगळ शिल्याबसमधे घेऊन सवयच लावून ठेवली...:)
      अरे लाखाची गार्‍हाणी नाय रे नुस्ता लिहूक जाला तरी खूप हाय असा कायतरी गार्‍हाणा घालुक होवा...बाकी कोंबडी बोकडाचो मान तुजो रे...तुमच्याकडे त्येचा चषक होवा ना... :) आमी आपले माशे मिळाले तर नाचूक होवा.. :)

      Delete
  6. एक लाखाच्या मनसबदारी बद्दल अभिनंदन :)
    सेलिब्रेशन पोस्ट एकदम भारी....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद गं इंद्रधनू. खादाडीला आणखी एक निमित्त.

      Delete
  7. Replies
    1. खादाडीलिशयस...आवडेश...

      आभार्स गं पल्लवी.

      Delete
  8. गौरीशंकर छितराममलकडे रबडी छान मिळते ऐकलंय. माझं ऑफिस तिकडून जवळ आहे. ट्राय करूक होवा भंगला कामासून टाईम मिळूक नाय ना. बाकी सुंदर, पुढच्या वेळी जाशील तेव्हा बेकरीतल्या सगळ्यात गोड आयटमचा (?!!!) आधी फोटो काढ :), केक्स इतके मोहक असतील तर इतक्या गोड वातावरणातली खाद्यललना कित्ती गोड असेल? हाहाहा जाऊ दे बिचारीचा उचक्या लागून लागून जीव जायचा :)

    ReplyDelete
    Replies
    1. गौरीशंकरची रबडी नाही खाल्ली मी कधी. खरं सांगायचं तर एक दोन गोडाचे पदार्थ सोडता मी फ़ार गोड खाणारी नव्हते असं म्हणायला हवं पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला की होतं तसं लग्नानंतर माझं झालंय...;)
      आणि तुम्हाला मी जास्त न लिहिता "गोड आयटम"बद्दल बरंच कौतुक दिसतंय. सध्या त्यांचे फ़ोटो काढण्यासाठी तिथे जाण्यापेक्षा इकडे मिळेल ती बेकरी गाठणं जास्त परवडेल..;)

      Delete
  9. लाखाचा टप्पा .....अभिनंदन!!!
    पुढील लिखाणासाठी मन:पूर्वक शुभेच्छा अपर्णा!
    आणि काय मस्त मेजवानी दिलीस अगदी आपणच या पेस्ट्री शॉप मध्ये जावून आल्यासारखे .........सही
    अगदी "एकला नयनाला विषय तो झाला" असे वाटले!
    (अरे रे , मी गोड खाणं का सोडलंय सध्या? :( )

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा आभार्स..
      खरंच गोड खाणं सोडलंस की कंसमात्रे ;) थोडंसं खाते मी...त्यांची ती एक पेस्ट्रीच बघ नं? ट्रीट म्हणून काही हरकत नाही कधीतरी खायला.. :)

      Delete
  10. मस्तच! असा योग यावा आणि त्याचा पुरेपूर वापर व्हावा! Lucky u!!... मस्त पोस्ट....फोटो पण एकदम छान!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार श्रिया..खरंय लकच म्हणायचं...पण असे योग आले की आम्ही संधी सोडत नाही...सुदैवाने माझ्याबरोबर असेच खवैये असल्याने अशा जागाही बरोबर हेरल्या जातात... :)

      Delete
  11. अपर्णा, लाखाच्या टप्प्याबद्दल अभिनंदन! आणि तो तू माझ्या जुन्या राज्यातील इतक्या सुप्रसिध्द बेकरीत जाऊन साजरा केलास म्हणून अजूनच मस्त! अगं कसली भन्नाट आहेत नं तिथली खादाडी... :):) नुसते पाहूनच डोळे आणि पोटात कालवाकालव आणि काट्यावर... :D:D

    ReplyDelete
    Replies
    1. अगं हो. तिथे स्टॉप ओव्हर आहे म्हटल्यावर मला तुझीच आठवण आलेली पण तेव्हा तू अमेरीकेत पण नसशील....
      बरेच दिवसांनी किंवा खरं तर महिन्यांनी ब्लॉगवर पाहून खूप छान वाटतेय सो ही ट्रीट त्यासाठी पुन्हा एकदा एंजॉय करूया :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.