Monday, October 1, 2012

खोल खोल


लहान असताना "गुहेत जाणारी पावले" अशी एक बालकथा वाचली आहे. ती फ़ार वेगळ्या कारणाने माझ्या लक्षात आहे कारण मला मुळात गुहा या प्रकाराचीच भीती वाटते. त्या गोष्टीत तो म्हातारा झालेला सिंह गुहेत आलेल्या प्राण्याला खातो म्हणून हुशार कोल्हा फ़क्त आत जाणारी पावले पाहून स्वतःचा जीव वाचवतो. मी या गोष्टीत असते तर गुहेत असंही गेलेच नसते कारण मला वाकून आत काळोखात खोल खोल जायला भीतीच वाटते. अशा ठिकाणी मी गुदमरून जाईन असं आधीपासूनच वाटायला लागतं आणि मग तिथे जायची सुरूवातच शक्यतो मी करत नाही. 

कुठल्याही किल्ल्यात वगैरे एखादं भूयार असलं की तिथे "बघुया बरं" करण्यार्‍य़ात मी कधीच नव्हते. तसंच ते सितागुंफ़ा, जीवदानीच्या देवीला गेलं की डावीकडे असणारं एक गुहेसारखं वाकून आत दर्शनाला जायचं ठिकाण या आणि छोट्या गुहांसारखं काहीही दिसलं तर तिथे जायला मी नाखूशच असते. जमेल तेव्हा अशी ठिकाणं मी खरं म्हणजे टाळलीच आहेत. अशावेळी लांबुनच पाहून "हां हां", "हो हो", "वा वा" असं काहीतरी बोलून वेळ मारून नेलेली बरं असं मी नकळत ठरवलं आहे.

पण काही गुहा अशा असतात जिथे वरचं कुठचंच वाक्य मला बोलता येणार नसतं. सहा-सात वर्षांपूर्वी अशा गुहेत जायला मी जितकी घाबरले होते तितकीच यावेळीही मी घाबरले. दुखणं परवडलं पण गुहा नको असं आधीपासून विचार केला नव्हता तरी त्या गुहेचं तोंड पाहिलं आणि मला झालं.

खरं मी एका अद्ययावत हॉस्पिटलच्या त्या विभागात चेक इन केल्यानंतर माझं काम करणारा त्या दिवशीचा अनालिस्ट मला मजेत म्हणाला 

"They did not tell you that they forget to schedule you here. Did they?"
"What do you mean?"
"Well lets go out from the back door. Oh I am not taking you to a parking lot or something. We just have this trailer and I have one machine set inside. Just cause we have so many patients these days we keep one handy."

कामाच्या दृष्टीने सोयीचं पडेल म्हणून रात्रीची वेळ घेतली होती. त्यात हा ट्रेलरपर्यंतचा रस्ता. त्याचं एका चालत्याफ़िरत्या एम आर आय युनिटमध्ये केलेलं रुपांतर. बाहेर त्याचा कॉम्प्युटर आणि एक काचेचं दार आत उघडून आतल्या एसीत माझी वाट पाहणारी ती गुहा. किती नाही ठरवलं होतं तरी पुन्हा ती सुरूवातीलाच म्हटलेली भीती अगदी अंग अंग शहारून गेली. ह्रदयाचे ठोके आणखी जलद झाले आणि मन सुन्न. परतीची वाट बंदच असते अशा ठिकाणी.

उगाच आत गेल्यावर गोंधळ नको म्हणून एक दिर्घ श्वास घेऊन त्या अनालिस्टला म्हटलं आपण दोन मिनिटं थांबुया का? आता तो थोडा संशयाने माझ्याकडे पाहू लागला. एकतर मी कदाचीत त्या रात्रीपाळीतली शेवटची पेशंट असेन आणि मीच उशीर केला तर झाल बोंबलली आजची ड्युटी असं किंवा हिच्यासाठी वेगळा डॉक्टर बोलवायला लागणार का म्हणूनही असेल.

"Alright. Let's wait. But you said you had it before."
"Yes and it was a while ago. I think I had the same problem before."
"OK. hmm..I am not going anywhere until you relax. Don't worry. And hold this knob. Press it if you panic. I am just outside at the computer and I will talk to you. You need 5 scans and first one is just one minute. Rest of them are like between 3 to 4 minutes. I will talk to you in between."

किती वेळ वाट पाहणार न? मी मनाचा हिय्या करून म्हटलं, "Let's go." 

मधल्या कालावधीत फ़क्त आत जाताना डोळे बंद करायचे इतकंच ठरवलं होतं. जाईपर्यंत माझ्या पायाला पकडून त्याने मला धीर दिला. मग त्याचा आवाज माझ्या कानांन ऐकू आला. एका जागी स्थिर झोपायचं असतं. हललं तर मग स्कॅन नीट होत नाही. यंत्राची धडधड कानांना लावायला दिलेल्या हेडसेटमधून बर्‍यापैकी ऐकू येत होती. मध्येच चिपळ्या वाजवल्यासारखा पण एक आवाज सतत येत असतो. मला वाटतं ते त्यांचं आपल्याला बरं वाटावं म्हणूनचं संगीत असावं. अर्थात यंत्राच्या फ़्रिक्वेन्सीला अडथळा येऊ नये म्हणून बहुतेक गाणी वगैरे ऐकवत नसावेत. 

"you did good. The second one is coming up."

माझा एक छोटा सुस्कारा. तिसर्‍या स्कॅनपर्यंत डोळे मिटून का होईना मला बहुतेक सवय होते. म्हणून चौथ्याला डोळे उघडायचा एक क्षीण प्रयत्न आणि पुन्हा ती सुरूवातीला म्हटली होती ती खोल खोल जायची भिती. चौथं स्कॅन चार मिनिटं. तोवर नीट विचार करून पाचव्याला चार पैकी तीनेक मिनिटं तरी डोळे उघडे ठेवायचे एक यशस्वी प्रयत्न. 

बाहेर आल्यावर अनालिस्टचं वाक्य थोडफ़ार अपेक्षितच.
"I was thinking you would just not do it. You were so tensed in the beginning."

खरं तर ते त्याच्यापेक्षा जास्त मलाच वाटलं होतं. पण त्या खोल खोल जायच्या भीतीतून निदान एकदा तरून जायच्या विचाराने कदाचित आधीचं दडपण मी विसरू शकेन असं वाटतं. यासाठीच तो प्रयत्न केला गेला असावा बहुतेक. नाहीतर आजारांचं निमित्त. माझ्यापेक्षा जास्ती आजारातून माझ्या आसपासचे जाताहेत हे माझिया मनाला नक्कीच माहित आहे. त्या दडपणातून तरून जायचे त्यांचेही काही वेगळे मार्ग असतील Smiley

24 comments:

  1. काय झालं होतं? मला खोल विहीरीची भिती वाटायची.. खाली डॊकाऊन पाहिलं की थरकाप उडायचा.

    ReplyDelete
    Replies
    1. काका स्पायनल चेक अप होता. एक जुनं दुखणं पुन्हा त्रास देतंय.
      खोल विहिरीत कधी उडी मारायचा प्रश्न आला नाही पण माझ्या मावसभावंडांना तसं करताना आणि पोहायला शिकताना पाहिलंय. तुमची कमेंट वाचून ते दिवस आठवले :)

      Delete
  2. काय झालं? आता सगळं व्यवस्थित असेल अशी आशा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सविता, मला थोडा स्पाइनचा त्रास आहे आणि बहुतेक मुलं झाल्यानंतर थोडं बिघडलंय. आता काही बंधनं बाकी काही बदल होणार नाही. चालायचंच, माझी आई म्हणते तसं आमची पिढी प्रचंड स्ट्रेसमुळे फ़ार लवकर आपल्या तब्येती बिघडवून ठेवल्यात. काय करणार?
      आभार.

      Delete
  3. अपर्णा, हा प्रकार बाहेरून, पण जवळून बघितलाय. म्हणजे पेशंटच्या सोबत म्हणून मी गेले होते आणि दवाखान्याचीच भीती वाटणारा पेशंट होता. त्याला आत काय वाटत असेल याची कल्पना करत होते सगळा वेळ. त्यामुळे थोडा अंदाज करता येतोय तुला काय वाटत असेल याचा. पोस्ट एकदम ‘डर के आगे जीत है’ झालीय हा! :)

    ReplyDelete
    Replies
    1. गौरी "डर के आगे जीत" हे आवडलं :) खरं मला वाटलंच नव्हतं मी एक मिनिटही डोळे उघडे ठेवू शकेन. या गुहेचं दार थोडं मोठं आणि आकाश थोडं वर न्यायला काय झालं होतं हे मला अजुनही वाटतं ;)

      Delete
  4. मला सगळ्यात जास्ती भीती Engineering Mathematics/Mechanics ची. भीतीदायक स्वप्न म्हणजे हाफिसातून सुट्टी काढून Mathematics/Mechanicsची परीक्षा द्यायला गेलोय आणि माझा बिलकुल अभ्यास झालेला नाही किंवा कुठले तरी वेगळ्याच विषयाची तयारी करून गेलो आहे :D

    ReplyDelete
    Replies
    1. सिद्ध्या, आता कसल्या परिक्षांची भिती वाटते रे तुला? मला तर शुक्रवारची सकाळी लवकरची स्टेटस मिटिंग असते त्याला मी उठणारच नाही असं वाटतं आणि एक दोनदा अक्षरश: मिटिंगला दोन मिन्ट असताना वगैरे जाग आली आहे...अर्थात ही माझ्या वेळेच्या फ़ारच पहाटे असते म्हणा पण तरी माझी कामातली ही करंट भिती आहे ;)

      Delete
    2. परीक्षांच्या भीतीमागे मुंबै विद्यापीठाचा हात आहे :D बाकी तुला शुक्रवारी पहाटे जे टेंशन असते तसेच टेंशन मला सुट्टीच्या दिवशी किंवा दर रविवारी संध्याकाळपासून येते... "उद्या आऊटलुकमध्ये काय वाढून ठेवले असेल?" याचे :O

      Delete
    3. एकंदरित मुंबई विद्यापीठ आणि आय टी हे दोन्ही कॉमन असल्यामुळे आपल्याकडे काही कॉमन भित्या आहेत तर ;)

      Delete
  5. जय जय रघुवीर समर्थ|

    ReplyDelete
    Replies
    1. :)
      अभिषेक स्वागत आणि आभार.

      Delete
  6. hope you are doing well now...

    ReplyDelete
    Replies
    1. योगिनी मी ठीक आहे. वर सवितांना म्हटलं तसं थोडी बंधनं पण एकुणात बरं चाललंय. आभार गं :)

      Delete
  7. तुमची पुढील वाटचाल आरोग्यमय असो.... :)

    ReplyDelete
  8. मला बोगद्यात जायची भीती नाही वाटत. पण 'त्या' बोगद्यात मी पण जाऊन आलो आहे. त्याचं वर्णन इथे आहे.. http://chimanya.blogspot.co.uk/2012/01/blog-post.html

    ReplyDelete
    Replies
    1. गुरुदत्त आभार.
      सध्या एकंदरीतच ब्लॉगिंग कमी झालंय. तुझी लिंक सवडीने नक्की वाचेन.

      आणि बोगद्याची भीती वाटत नाही हे बरंय नाहीतर माझ्यासारखी आधीचीच बोंब. :)

      Delete
  9. मलापण प्रचंड claustrophobia आहे. एकदा माझीही अशीच एलीवेटरने पंचाईत केली होती. शेवटी नऊ मजले चढून जावं लागलं आणि त्यात मित्र सोबत असल्याने मित्राची बोलणीही खावी लागली.(त्याचं म्हणे दोनेक किलो वजन कमी झालं असेल वगैरे...)

    ReplyDelete
    Replies
    1. Claustrophobia -> is the fear of having no escape and being closed in small spaces or rooms. हे आत्ता विकीवर वाचलं..चला या निमित्ताने भीतीला नाव मिळालं.. त्यातल्या त्यात मला एलेव्हेटर्सची भीती वाटत नाही हे नशीबच. नाहीतर मी मुंबईत जेव्हा आर बी आयला काम केलं तेव्हा पंचवीस माळे चढावे लागले असते. म्हणजे हा ब्लॉग लिहायला मी असते की नाही देव जाणे ;)

      आभार पुष्कर आणि ब्लॉगवर स्वागत :)

      Delete
    2. मला तर वाचूनही भीती वाटतेय.. आमचे सर्दी, खोकला वगैरे गरीबाचे रोगच बरे आहेत ;)

      Delete
    3. हेरंब, खरं तर आजार हा प्रकारच वाईट पण आता जे काही होणार ते टाळता आलं असतं तर किती बरं हे कुठल्याही आजारात वाटतं.

      Delete
  10. ह्म्म्म.... हे एकंदरीतच दडपण आणणारं प्रकरण आहेच. काळजी घे गं!

    ReplyDelete
    Replies
    1. हो गं. इथे आपण तसेही एकटेच असतो म्हणूनही जास्त दडपण. जमेल तितकी काळजी घेतेय.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.