Wednesday, December 8, 2010

एका (फ़ूड) ब्लॉगरची यशोगाथा....

ब्लॉगिंगच्या विश्वात आलं आणि कुठेही दुसरा ब्लॉगर दिसला की का कुणास ठाऊक ’माझिया जातीचा’ मिळाल्यासारखं होतं. ’फ़ूड नेटवर्क’च्या ’नेक्स्ट फ़ूड नेटवर्क स्टार’ मध्ये जेव्हा आरतीच्या नावाखाली फ़ूड ब्लॉगर असं लिहिलेलं दिसलं तेव्हा तिला मी पाठिंबा देणार हे लगेचच लक्षात आलं; म्हणजे एकतर ब्लॉगर आणि त्यातही भारतीय वंशाची म्हणजे दुधात साखर.

आता या विषयावर पुढे लिहिण्याच्या आधी मला थोडं फ़ूड नेटवर्कबद्द्ल लिहून जरासं (किंवा नेहमीप्रमाणे दोन-तीन घडे) नमनाचं तेल घालणं अत्यावश्यक आहे. खाणं हा आपला अगदी आवडता प्रांत आहे हे नक्की केव्हा लक्षात आलं माहित नाही. पण आठवतं तेव्हापासून आपल्या भारतीय दूरचित्रवाणीवर ’खाना खजाना’ पाहणं हा एक आवडता छंद होता. त्यातली खरं सांगायचं एकही प्रकार मी करुन पाहिला नाही; पण त्यातली नावं लक्षात ठेऊन तसलं काही कुठल्या रेस्टॉरन्टमध्ये दिसलं की मनसोक्त हादडणं हे बरीक केलं. त्यानंतरही दावत का काय नावानं एक खास हैद्राबादी खाण्याचा शो रविवारी असायचा तेही आवडीने पाहिलं. एकंदरित कुणाला खाणं करताना पाहणं हे आवडतं इतपत कळलं. आणि त्याचा फ़ायदा असा की नवं काही खाऊन पाहायचं असेल तर साधारण आपल्याला काय आवडेल हेही लक्षात आले.

त्यानंतर जेव्हा अमेरिकेत आले आणि सुरुवातीला इथलं सोशल सर्कल कमी आणि नोकरीही नव्हती त्याकाळी रिकाम्या डोक्याला काही काम म्हणून इथल्या टी.व्ही.ची चॅनल्स धुंडाळायला सुरुवात केली.सध्याच्या घडीला जरी मला इथल्या कार्यक्रमांचीही थोडी-फ़ार सवय झाली असती तरी तेव्हा काही म्हणता काही आवडायचं नाही. अशातच एकदा फ़ूड-नेटवर्क सुरु केलं. साधारण अर्धा तासाचा एक या क्रमाने सतत सुरु असलेल्या कार्यक्रमांमधली विविधता पाहता या चॅनलला मी कधी ’हुक’ झाले कळलंच नाही. फ़क्त ’कुकिंग शो’ इतपत कार्यक्रम असतील असं जर कुणाला वाटलं असेल तर ते सपशेल चुकीचं आहे. खाणं बनवणं हे अर्थातच अविभाज्य अंग आहे पण खाण्याशी संबंधीत इतर कितीतरी गोष्टी जसं एखाद्या गावची स्पेशालिटी असलेल्या खाण्याची माहिती असलेला कार्यक्रम, ४० डॉलरमध्ये एका शहरात एक दिवसाचं तिन्ही-त्रिकाळ खाणं, एखादी विशिष्ट पाककृती बनवण्यासाठी लागणार्‍या सामुग्रीपासून ते भांड्या-कुंड्यापर्यंतच्या गोष्टींची तांत्रिक माहिती पुरवताना ती पाककृती करणं, अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचं खाद्यवैशिष्ट्य जपणार एखादा उत्सव वा स्पर्धेची माहिती असे अनेकविध कार्यक्रमांनी भरलेलं हे चॅनल आहे.अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात खाण्याची विविधता, सणां-वारांनिमित्ते केले जाणारे खाद्यप्रकार हे सर्व पाहता हे असं चॅनल आपल्याकडेच सुरु करावं असं मला सारखं वाटायचं. (मला फ़क्त वाटणार पण संजीव कपुरने त्या दृष्टीने सुरुवात केली आहे असं ऐकतेय..’ढापली बघ माझी आयडिया’ इतकंच म्हणू शकते मी) तर असं हे माझं लाडकं फ़ूड नेटवर्क. मागे म्हटल्याप्रमाणे जसं मायदेशातल्या कार्यक्रमामधलं मी काही स्वतः नाही बनवलं तसंच इथंही फ़क्त बाहेर खाताना काय खावं (किंवा खूपदा काय खाऊ नये) यासाठी इथे पाहिलेले विदेशी खाद्यकृती उपयोगी पडतात शिवाय आपल्या देशी पाककृतींना जेव्हा सगळाच देशी माल मिळत नाही तेव्हा पाट्या टाकायलाही इथे पाहिलेल्या माहितीचा उपयोग होतो.

या पार्श्वभूमीवर जेव्हा ’नेक्स्ट फ़ूडनेटवर्क स्टार’ही स्पर्धा भरवण्यात आली तेव्हा सारखं वाटायचं की यांना कुणीतरी थोडं भारतीय खाणंही खिलवलं पाहिजे. मागच्या की त्याच्या मागच्या सिझनमध्ये एक भारतीय महिला होतीही. पण ती फ़ार काळ टिकू शकेल असं सुरुवातीलाच वाटलं नाही. यावेळी मात्र चुलबुल्या (किंवा अगदी नेटका शब्द बबली) आरतीला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातली चमक काही वेगळं सांगुन गेली. अगदी पहिल्या भागातच हीचं पाणी वेगळं आहे हे जाणवलं. आणखी भरीस भर म्हणजे तिची ओळख एक फ़ूड ब्लॉगर म्हणून करुन दिल्याने तर तिच्या या उडीचं कौतुकच वाटलं.त्यानंतर प्रत्येक भागात तिलाच सपोर्ट करत राहिलो.

या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जन्माच्या आणि दुबईत वाढलेल्या आरतीचा ब्लॉग पाहिला आणि ती आपल्यासारखीच एक सर्वसाधारण ब्लॉगर आहे हे लक्षात आलं. तिच्या ब्लॉगवर तिचे यु ट्युबवरचे आरती पार्टी नावाने तिने घरच्या स्वयंपाकघरात बनवलेल्या खाद्यपदार्थांचे व्हिडिओ आहेत आणि बर्‍याच लोकांना त्यामुळे भारतीय पदार्थांची माहिती आवडल्याचं कळतं...शिवाय तिच्या लिहिलेल्या पाककृत्यांनाही तिच्या आईकडच्या किंवा इतर काही छोट्या छोट्या कहाण्या आहेत ज्या ती अतिशय रसभरीत वर्णन करुन मांडते त्यामुळे तिचे पदार्थ, त्यांची नाव, कृती हे सगळं नेहमीसारखं साहित्य आणि कृतींमध्ये अडकलेल्या पाककृतींपेक्षा, वाचताना आणि पाहताना तिच्या जगात आपल्याला घेऊन जातात. माझ्यासारखे प्रेक्षक, सगळेच पदार्थ तयार करणारे नसले तरी अशा कृती लक्षात नक्कीच राहतात आणि कुठेतरी त्यातला काही भाग आपल्या एखाद्या पाककृतीला वेगळा टच द्यायला नक्कीच मदत होते. तिला पदार्थ करताना पाहाणं हाही एक वेगळा अनुभव असतो. तिचं हास्य आणि एकंदरित लाघवी बोलणं तिला पाहत राहायला नक्कीच भाग पाडतं...बाकी नेहमीच्या घरगुती गोष्टी म्हणजे तिच्या कलाकार नवर्‍याची चित्रफ़ीत किंवा एखाद्या ट्रीपचा उल्लेख असं नेहमीचं मॅटरही आहेच..एवढंच नाही तर ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर घरी केबल नसल्यामुळे सध्या we’ll be watching an episode with a different set of cable-having friends! हे तितक्याच साधेपणाने ती जूनमधल्या एका पोस्टमध्ये लिहून जाते. सध्या तिच्या मेलबॉक्समध्ये १३०० मेल आणि साधारण ५९० कॉमेन्ट्स आहेत आणि सगळ्याच लोकांकडून तिला तुफ़ान कौतुक मिळतंय ही एका ब्लॉगरसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.


दहा आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धकांकडून पाककृती बनवुन घेण्यात येतात.पदार्थांची चव हा मुख्य भाग असला तरी इतर अनेक बाबींवर त्यांचा कस लागतो. आयत्यावेळी देण्यात आलेले मुख्य पदार्थ, एखाद्या थीमप्रमाणे पदार्थ बनवणे म्हणजे जसं बाटलीबंद प्रकार बनवायचा झाल्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रॅंडसाठी काय बनवाल, मोठ्या पार्टीसाठी दोन स्पर्धकांनी एकत्र खाणं बनवणं किंवा एक दिवस दोघांनी मिळून फ़ूड ट्रक मॅनेज करणं, असं बरचसं काही यावेळी विविध भागात होतं. प्रत्येक भागात निदान एकतरी कॅमेर्‍यासमोर विशिष्ट वेळात एका पदार्थाचं सादरीकरण हेही फ़ार महत्वाचं.कारण शेवटी अंतिम फ़ेरीच्या विजेत्याला फ़ूड नेटवर्कवर स्वतःचा शो मिळणार, तेव्हा त्या व्यक्तीचा कॅमेरासेन्स कसा आहे हे कळणं फ़ार महत्वाचं. शेवटचा भाग म्हणजे अंतिम फ़ेरीला तर एका सेलेब्रिटी शेफ़च्या हाताखाली एक संपुर्ण भागच रेकॉर्ड करणं. हे वाचतानाच थोडं अवघड वाटतं तर प्रत्यक्षात ते सगळं दडपण आणि शेफ़ असणारे इतर स्पर्धक यांच्यावर मात करायची म्हणजे खरंच अंगात खाद्यवेडंच हवं.

आरतीला जेव्हा जेव्हा कॅमेर्‍यासमोर पाहिलं तेव्हा तेव्हा का कुणास ठाऊक हिच्यात हे उपजतच आहे असं नेहमी वाटलं. अपवाद फ़क्त एकाच भागाचा जेव्हा तिला एक मिनिटांत त्या पदार्थाबद्द्ल बोलताना खूप गोंधळायला झालं होतं. पण ती कसर तिने त्याच भागातल्या उरलेल्या पाककृती चविष्टपणे करुन मात केली. प्रत्येक भागात एक त्या भागासाठी विजेता असे आणि त्यातही ती बरेचदा सरस ठरली.

तरीही अंतिम भाग हा थोडा रिस्की असतो कारण त्यात आपली खरं तर स्वतःशीच स्पर्धा असते. कारण दुसरा काय करतो, कुठला मुख्य पदार्थ असल्या गोष्टींशी काही घेणं-देणं नसतं. त्यात तुम्ही कुठला पदार्थ निवडता आणि त्यामागची कथा सांगत तो कशा प्रकारे सादर करताना कॅमेर्‍याला कशा प्रकारे सामोरे जाता, वेळेत पदार्थ बनवता तसंच प्रेक्षक जो या पदार्थाची चव पाहणार नाही त्यालाही कशा प्रकारे उत्तेजित करता हे महत्वाचं. आरतीने यात चक्क पिझ्झा बनवला होता आणि तेही त्याला एक भारतीय टच देऊन. एकंदरितच तिच्या पाककृतींची नावं आणि त्यामागची पार्श्वभूमी यामुळे कार्यक्रमात इतकी रंगत येते की तिला ते बोलताना आणि पदार्थ करताना पाहाणं हा एक छान अनुभव असतो. तिच्या या हसतमुख, विनोदी आणि बोलबोलता एखादी जादा माहिती देण्याच्या पद्धतीमुळे शेवटी तीच वरचढ ठरली आणि एका फ़ूड ब्लॉगरने फ़क्त एक स्पर्धाच नाहीतर अमेरिकेच्या फ़ूड नेटवर्कवर आपल्या हक्काची एक जागाही मिळवली.


मला वाटतं ब्लॉगिंग करणार्‍या प्रत्येकानेच कौतुक करावं अशीच ही घटना आहे. ही पोस्ट लिहितानाच आरतीचा ’आरती पार्टी’चा पहिला भाग सुरु आहे आणि प्रथमच फ़ूड नेटवर्कवर आपला अस्सल देशी स्वयंपाकघरी मस्ट असलेला स्टीलचा हळद-मसाल्याचा डब्बा दिसतोय...हे पाहताना मी वाट पाहातेय आपल्या एखाद्या मराठी फ़ूड ब्लॉगरला अशाच प्रकारे स्वतःचा शोची तयारी करताना पाहण्याची.

ता.क. ही पोस्ट दीपज्योतीच्या २०१० अंकासाठी लिहिली होती. ब्लॉगवर पुन्हा प्रकाशीत करतेय.

11 comments:

 1. सहीच! सार्‍या फितीही पाहतेय.

  तूही अगदी रसभरीत लिहीले आहेस. आवड्या. :)

  ReplyDelete
 2. 'फूड नेटवर्क' बद्दलचं माझं 'प्रेम' तुला माहितच आहे. बर्‍याच पोस्ट्समध्ये ते उतू गेलेलं आहेच ;)

  तुझा लेख आवडला. सहीये ही आरती. मस्तच..

  ReplyDelete
 3. धन्यु श्रीताई....आप इस मामले मे गुरु है...आम्ही फ़क्त रसभरीत वर्णन आणि खादाडीच्या कामाचे.....मला वाटलं कदाचित तू हा कार्यक्रम पाहिला असशील....

  ReplyDelete
 4. हेरंब, फ़ूड नेटवर्कचं मी जे वर्णन केलंय त्याने तरी मत बदल आता...सांगते तुला...मला तर घरी कंपनी आहे पहायला...अर्थात काही बाबतीत आमचं जोडी तुझी-माझी असं आहे...(टचवूड)
  असो..फ़ूड नेटवर्क जाऊदे फ़ूड बद्दलचं प्रेम काय आपण सोडू शकत न्हाय बघ...आणि या बाबतीत तुच काय बरेच जण सहमत होतील....:)

  ReplyDelete
 5. आधी पण आवडला होता आणि आतापण..सगळे वीडियो परत बघून चूलबुली शेफ आरतीची तारीफ करायला शब्द पण कमी पडतील...
  अप्रतिम माहिती आणि मांडणी :)

  ReplyDelete
 6. सुंदर आहे,मस्त वाटला,अप्रतिम माहिती दिली,

  ReplyDelete
 7. हाबार्स सुहास आणि महेशकाका...

  ReplyDelete
 8. मस्त माहिती दिलीस! :)

  ReplyDelete
 9. सही... काल तुमची भेट झाली असती तर आरती एखादी चमचमीत डिश बनवते आहे आणि तू मस्त चवीचवीने हादडते आहेस असा नवा व्हिडिओ आणि अर्थातच एक नवी पोस्ट आम्हाला पाहायला/वाचायला मिळाली असती.

  रच्याक : मागे शुध्द शाकाहारी चीज पोस्ट टाकली असल्यामुळे तशीही कॉंप्लिमेंट्री नॉन-व्हेज पोस्ट तो बनती है रे...

  ReplyDelete
  Replies
  1. अरे हो बघ न. त्यादिवशी ती एअरपोर्टला समोरून चालत येत असताना बराच वेळ मी विचार करत राहिले की कुठे बरं पाहिलाय हा चेहरा...आणि ती वळल्यावर लक्षात आलं की "अरेच्च्या, ही तर आरती"...असो थोडक्यात चुकामुक...आणि मी फ़्लाइटसाठी पण उशीरानेच पोचत होते त्यामुळे जास्त काही करता नसतं आलं...:)
   आता कॉम्प्लिंमेंटरी नॉन वेज पोस्ट टाकायला (मुलांनी सहकार्य दिलं) तर एखादं नवं ठिकाण शोधावं लागेल..पण आता तुझ्या कमेंटमुळे हे वर आरतीचा उल्लेख झालाय त्याचवेळी एक योगायोगाने खादाडी झालीय (गोडाची) त्याबद्दल लिहेन म्हणते.....
   स्टे ट्युन्ड...:)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.