Friday, December 3, 2010

बाहुली गं तू.........

बाहुली आणि मुलगी यांचं एक वेगळं भावविश्व, नातं असतं..दोघी वयाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका जगतात...मर्जी अर्थातच मुलीची.पण आपलं सारं ऐकणारी,कधी खेळातली बबडी, मग थोडं मोठं झाली की विद्यार्थी, मैत्रीण असं वयानुसार बदलत जाणार हे एक वेगळं जग. मला बाहुल्या आवडतात हे मला मी बरीच मोठी झाल्यावर कळलं का असं मला काहीवेळा वाटतं. म्हणजे लहानपणी मला हवीतशी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली मिळणार नाही हे माहित होतं त्यामुळे मी नक्कीच खट्टू झाले नाही. तसंच मावशीकडे तिच्या मुलीला कुणीतरी परदेशातल्या मित्राने दिलेली, भुर्‍या केसांची आणि नुस्तं डोळे उघडमीट करणारी नाही तर चक्क तोंडातलं पॅसिफ़ायर काढल्यावर रडणारी बाहुली पाहिली की तिचा हेवा वाटला तरी ते तेवढ्यापुरतंच होतं. त्यानंतर जेव्हा माझ्या भाचीला सुंदर बाहुलीबरोबर पाहिलं होतं आणि खरं तर तोवर मी नोकरीला वगैरे लागले होते तरी त्यावेळी पुन्हा एकदा बाहुली या प्रकरणाच्या प्रेमात मी पडले होते..एखाद्या खर्‍या व्यक्तीबरोबर बोलावं, वागावं तसे बाहुलीबरोबरचे तिचे संवाद ऐकणं हाही एक मस्त अनुभव होता.त्यानंतर मी जेव्हा बंगळुरुला गेले होते तेव्हा "कावेरी"मध्ये सात-आठ लाकडी छोट्या बाहुल्यांचा एक सेट घेऊन ऑफ़िसमधल्या मैत्रीणींना द्यायलाही सुचलं होतं.


अमेरिकन गर्ल दुकान

हे सगळं खरं तर वैवाहीक आयुष्यात आल्यावर सुरुवातीला तरी विसरायला हरकत नव्हती. पण २००४ मध्ये एक दोनदा नव्हे तर बरेचदा न्यु-यॉर्कला वकिलातीच्या कामासाठी जावं लागलं; त्यावेळी एकटीने भटकताना एक दुकान गवसल्यामुळे पुन्हा एकदा बाहुली प्रकरण माझ्यामागं लागलंच..

काही कामानिमित्त नवर्‍याला युरोप वकिलातीत जवळजवळ संपुर्ण दिवस बसायला लागलं आणि मला तो दिवस एकटीने न्यु-यॉर्क शहर भटकायची संधी मिळाली..खरं तर ही एकदाच नाही बर्‍याचदा मिळाली आणि प्रत्येकवेळी मी वेगवेगळा भाग पालथा घालुन त्या संधीचं सोनं केलंय.पण यावेळी जरा बाहुलीयोग नशीबात होता असं दिसतंय.

मिळून सार्‍याजणी
न्यु यॉर्क हे एकतर माझं लाडकं शहर, माझ्या लाडक्या मुंबईची आठवण (तुलना नाही) करुन देणारं. जिथे अमेरिकेत इतरत्र न दिसणारी माणसांची वर्दळ, रस्त्यावर खाऊच्या आणि छोट्या-मोठ्या खरेदीच्या घासाघीस करायची संधी देणार्‍या गाड्या असं सारं असतं. तिथं माझ्यातल्या मुंबईकरणीला एकटीनं फ़िरण्यात गम्मत न वाटली तर नवलच. यावेळी मी पेनस्टेशनला उतरल्यावर सिटीत शिरण्याच्या आधीच एक छोटं शहर भटकंतीचं पुस्तक होतं ते घेऊन ठेवलं होतं....

विविध रुपातली ’गर्ल’
त्यात कुठेतरी "अमेरिकन गर्ल" असा एका दुकानाचा उल्लेख होता आणि त्याबद्दलचं वर्णन पाहुन मला आतमध्ये हे दुकान कसं असेल याची उत्कंठा होतीच...त्यानुसार माझी पावलं मी मॅनहॅटनच्या अगदी मुख्य विभागात पाचव्या ऍव्हेन्यु आणि एकोणपन्नासाव्या रस्त्याच्या दिशेने पावलं वळवलीच. दुकान उघडायला थोडावेळ होता पण बर्‍याच मायलेकींच्या जोड्या तिथे घुटमळताना दिसत होत्या त्यानुसार आपली निवड चुकली नाही याची खात्री मला आधीच होत होती..थोडावेळ इथे तिथे भटकुन पुन्हा मी दुकानात आले तोवर ये-जा (खरं तर जा नव्हतीच नुस्ती येच होती सकाळी) सुरु झाली होती...आणि मीही आत काय असेल याची कल्पना करत आतमध्ये गेले..मालिकेत झळकलेली पहिली ’गर्ल’
 थोडी मोठी बाहुली असणार हे अपेक्षित होतं पण तिचं ते हुबेहुब मुलीचं वाटावं असं रुपडं पाहुन मी तर तिच्या प्रेमातच पडले..तिला अनेक रुपात सजवलेलं एक मोठं कपाट स्वागतालाच होतं तिथेच तिला पाहताना बराच वेळ गेला. ही अमेरिकन गर्ल, केली, साध्या शब्दात सांगायचं तर एक ब्रॅन्डेड बाहुली. ही आणि हिच्या अशाच सख्या..त्यात अमेरिकेतल्या टिव्हि शोवर पहिल्यांदा झळकणारी सॅमान्था, माझ्याकडे आता असलेली कर्स्टन आणि अशा बर्‍याच मैत्रीणी आहेत. हे तीन मजली दुकान म्हणजे या बाहुल्यांचा इतिहास (अमेरिकेत इतिहास या शब्दाची व्याख्या वर्तमान अशीही असावी असं माझं मत पक्कं करणारं आणखी एक स्थान..असो...) आहे. हे या बाहुल्यांचं संग्रहालय आहे तसंच तिच्यासाठी वन स्टॉप शॉप म्हणावं अशी जागाही.


केशकर्तनालयात


तळमजल्यावर जवळजवळ सगळ्याच अमेरिकन गर्लचं कलेक्शन, वेगवेगळे कपडे आणि इतर ऍक्सेसरीज घेतलेलं तिचं रुपडं, तिच्या खोल्या, वस्तुंसकटचं तिचं वावरणं याचं दालन आहे...ते सर्व हरखून पाहताना आपण वेळेचं गणित कधीच विसरुन जातो. इतकं तिच्या प्रेमात पडायला होतं की एक घ्यावी का असा खट्याळ विचारही मनात येतो पण १२० डॉलर पाहुन विस्फ़ारलेले डोळे तो खट्याळपणा अर्थातच विसरायला भाग पाडतात...

मग पहिल्या माळ्यावर चक्क या बाहुलीसाठी एक हॉस्पिटल आहे..त्यांची इमर्जन्सी सर्विसपण आहे म्हणे...एखादीच्या (इतक्या महागड्या) बाहुलीला जर काही दुखापत झाली तर मग हॉस्पिटल हवंच नाही का? म्हणजे आणखी थोडे पैसे खर्च करुन का होईना पण परत तिच्याशी खेळता तरी येईल. इथल्या डॉक्टरशी बोलायला हवं होतं पण आणखी एक मजला होता त्यामुळे सरळ पुढे गेले.

एकसारख्या मायलेकी

तिथे तर चक्क बाहुलीसाठी सलान म्हणजे आपल्या भाषेत केशकर्तनालय आणि एकंदरित ब्युटिपार्लरही होतं..तिथे बाहुलीला बसवायला छोटीशी न्हाव्याच्या दुकानात असते तशी वर-खाली होणारी खुर्ची आणि बर्‍याचशा स्पेशालिस्ट होत्या...लोकं इथे येत असतील का असा प्रश्नच पडायला नको..गोर्‍या गोर्‍या छोट्या अमेरिकन मुलींची त्यांची त्यांची बाहुली घेऊन रांग लागली होती. कुणाला तिची हेअरस्टाइल बदलुन हवी होती, कुणाला तिचे केस थोडे कमी करायला हवे होते...काहींना चक्क तिची आणि स्वतःची हेअरस्टाइल मॅच करायची होती..हम्म... ’बडे बडे देश में छोटी छोटी बाते’ मी याची देही पाहात होते...

बाहुलीची किंमत एकदा पाहिल्यावर कुठल्याच दुसर्‍या किमती काढायच्या मी भानगडीत पडले नाही. इथे बाहुलीसाठी केसाच्या पिना, मॅचिंग पर्सेस अशा बर्‍याच गोष्टी विकायला होत्या तसंच छोटे आणि मोठे एकसारखे दिसणारे ड्रेसही होते..ती सोय होती तुमची बाहुली आणि तुम्ही एकसारखं दिसण्यासाठी केलेली सोय...माझ्या नशिबाने तशी एक जोडी मला तिथेच दिसली. मग तिच्या आईला विचारुन मी त्या दोघींचा एक फ़ोटोही काढला.


इतक्या सोयी आहेत मग एक छान शेजघर नको?
 बाहुली प्रस्थ कमी पडलं म्हणून की काय इथे एक ऍन्जेलिना नावाची उंदीराच्या कुटुंबालाही ब्रॅन्डेड केलेलं दिसलं..त्याचं इटुकलं घर, त्यातल्या खर्‍याच वाटणार्‍या इटुकल्या घरगुती गोष्टी पाहुन मला तर एक क्षण इथल्या अमेरिकेत वाढणार्‍या मुलींचा हेवाच वाटला...

बघता बघता दोनेक तासही सहज गेले असतील...जेवायची वेळ झाली होती हे पोटात ओरडणार्‍या बाहुल्या आपलं कावळे सांगत होते पण तरी पाय निघत नव्हता..मग शेवटी हो-ना करता मी एक छोटी बाहुली आठवण म्हणून घेतलीच..कर्स्टन नावाची...आमच्या लग्नाच्या मासिक वाढदिवसातला कुठला तरी वाढदिवस तेव्हा नुकताच होऊन गेला होता. हे खेळणं मी त्याचं गिफ़्ट अशा नावाने चिकटवुन नवर्‍याला तेव्हा फ़ोनवर पटवलं होतं...माझी एक सवय आहे मी स्वतः माझ्या मर्जीने काहीही खरेदी करु शकत असले तरी थोडावेळ हो-ना मध्ये त्याचं डोकं खाल्याशिवाय बहुतेक मला करमत नसावं किंवा त्या खरेदीला हे आपण एकत्र ठरवून घेतलंय असं गोंडस नाव त्यामुळे देता असं असंही असेल..असो....

कर्स्टन

या अमेरिकन गर्लनंतर मात्र महागडी कुठलीही बाहुली मी घेतली नाही....बाहुली घेतली तरी तिला घेऊन खेळत बसण्याचे दिवस केव्हाच संपलेत किंवा ते आले तरी होते का असंही वाटावं इतक्या दूर ते गेलेत....पण छोट्या छोट्या बर्‍याच बाहुल्या मी अधेमधे घेतल्या...इथे मिळणार्‍या पाठीला सपोर्ट लावुन उब्या केलेल्या किंवा बसवता येणारी एक कलेक्टिबलमधली बाहुली पण सॅव्हानाच्या ट्रिपमध्ये घेतली...मला वाटतं अमेरिकन गर्ल या दुकानात मांडलेल्या त्या वेगवेगळ्या रुपातल्या बाहुलीने माझ्या मनातही बाहुल्यांसाठी एक घर केलं असावं....फ़िलीमधल्या घरी माझ्या प्रत्येक खिडकीवर एक एक बाहुली होती..त्यावेळी आमच्याकडे घरी आलेल्या कुणीतरी मला म्हटलेलं आठवतं इतक्या बाहुल्या आहेत तुझ्याकडे पुढच्यावेळी तुला काय गिफ़्ट द्यायचं ते बरोबर लक्षात येईल...ओरेगावातही जपुन सार्‍या बाहुल्या आणून त्यांनाही नव्या जागा शोधुन दिल्या...

आज बर्‍याच दिवसानंतर मित्राच्या मुलीला पहिल्या वाढदिवसासाठी भेटवस्तु पाठवायला बाहुल्या आणि असंच टिपिकल मुलींच्या वस्तू शोधताना पुन्हा एकदा हरखलेय आणि लक्षात आलंय की माझ्या कर्स्टनच्या केसांची मुलानं वाट लावलीय...तिला काय आता त्या सलानमध्ये नाही नेणार पण कदाचित ही पोस्ट संपल्यावर ते ठीक करुन तिला कुठेतरी जरा वर ठेऊन देईन....मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि अर्थातच माझी एक मलाच माहित नसलेली आवड आठवणीत आणून देण्यासाठी.

8 comments:

 1. :-) मस्त पोस्ट... :)
  आणि हो, फोटोज awesome आहेत... :)

  ReplyDelete
 2. सुंदर मस्त ,मुलीना किवा लहान मुलांना बाहुलीचे वेड्असते ,ह्या गोष्टी सर्वाना ठाऊक आहे मोठी माणसे आपल्या लहान मुलीला किवा मुलाला एकदा तरी बाहुली आणतात ,लहान मुलीना काय द्यावे हा प्रक्ष असतो कि,फोटो पण छान आहे.तेवढंच तेवढाच लहान मुलांना विरगुला,कल्पना पण चागली आहे ,

  ReplyDelete
 3. मस्त आहे एकदम...
  फोटोजही आवडले!

  ReplyDelete
 4. मैथिली, महेशकाका आणि बाबा धन्यवाद....:)

  ReplyDelete
 5. झक्कास पोस्ट.. जाम आवडली. इथे रहात असूनही मला हे दुकान माहित नव्हतं.. अर्थात माहित झाल्यावर मी लगेच तिथे जाणार आहे अशातला भाग नाही :P

  >> न्यु यॉर्क हे एकतर माझं लाडकं शहर, माझ्या लाडक्या मुंबईची आठवण (तुलना नाही) करुन देणारं.

  + infinity !!

  १२० डॉलर्सची बाहुली? कसं चालतं हे दुकान?? मला इतके दिवस बार्ब्याच जाम महाग आहेत असं वाटायचं.. आता बार्बी म्हणजे एकदम यत्किंचित कःपदार्थ वाटायला लागलीये ;)

  ReplyDelete
 6. हेरंब, मी तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत होते...कारण अर्थात तू रोज माझ्या आवडत्या शहरात जातोस हेच...दुकानात जाणार नाही हे माहित असून....माझ्या नवर्याने दुकान जाउदे, मी तिथे काढलेले सगळे फोटूपण पाहिले नाहीत...ही ही....

  अशा गोष्टी मी शक्यतो एकटीने करते...नवरे आणि मित्र लोकांना नको त्या गोष्टीसाठी त्रास देऊ नये काय??

  इथली बरीच दुकान कशी चालतात हा एक प्रश्न आहे...पण या दुकानापुरता बोलायचं तर बघ इथे आईबाबा मुलांच्या college education वर पैसे खर्च करणार नसतात. मग मूल लहान असताना हे असले महागडे प्रकार त्यांना परवडतात....:)

  ReplyDelete
 7. 'बडे बडे देशमे छोटी छोटी बाते'..१२० डॉलर हं..बाहुल्या आणि त्यांचे नखरे..भारी आहे हे प्रकरण...
  तो मायलेकीवाला शेवटून तिसरा फोटू जाम आवडला ....

  ReplyDelete
 8. खरंय देवेन्द्र....फ़ोटू जुनेच आहेत..तो मायलेकीवाला फ़ोटो माझं लक होतं म्हणून त्या तिथे दिसल्या आणि फ़ोटो घेतला गेला...प्रतिक्रियेबद्द्ल आभारी...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.