Wednesday, March 10, 2010

फ़ुलोरा...कोणास ठाऊक कसा..

लहान मुलं भेदरली की सशासारखी दिसतात आणि खेळत असली तरी पिंटुकल्या सशासारखीच..तशी सशासारखी भित्री भागुबाई तर असतातच म्हणा आणि त्यातुन आई नावाचं कवच सगळ्याच भितीपासून आपलं संरक्षण करेल असा एक आत्मविश्वास असतो या वयात. असे हे आपले पिंटुकले ससे, मनावर दगड ठेऊन आपण त्यांना पाळणाघर, शिशुवर्ग इ.मध्ये पाठवतो..अशा पिंटुकल्यांसाठीच हे गाणं आहे हे, आज ही पोस्ट लिहिताना अचानक उमगलं..नाहीतर लहान असताना या गाण्यावर नाच चांगला व्हायचा म्हणून बर्‍याचदा निवडलं जायचं..
आमचा ससुल्या आता धीटपणे पाळणाघरात राहतो म्हणून तो परत आला की त्याच्यासाठी हे गाणं म्हणते शिवाय आता येऊ घातलेल्या इस्टरच्या मुहुर्तावर बाजारात सगळीकडे ससुले दिसू लागलेत म्हणून या महिन्यात जमतील तितक्या ससुल्याच्या आठवणी काढल्या जातील.....
कधीतरी मोठा झाल्यावर तोही ही गाणी गाऊन दाखवेल या आशेने आजकालची गाणी असतात...पण अर्थात एकतर परदेश त्यामुळे नाही तरी सारखं सारखं पु.ल. ऐकते त्यावेळी वाटतं त्या शंकर्‍यासारखं मेरी जिंदगी में मुहब्बत का सारखं काहीतरी बरळेल आणि त्यावेळी कदाचित ती पण गम्मतच वाटेल असो...सध्या तरी आपणंच गाणी म्हणणं हेच सुरू आहे...हे गाणं कुणी लिहिलंय ते माहित नाही आणि चाल शाळेतल्या कुठल्याही कवितेसारखीच..मायाजालावर व्हिडीओपण आहे...


कोणास ठाऊक कसा पण सिनेमात गेला ससा
सशाने हलविले कान घेतली सुंदर तान
दिग्दर्शक म्हणाला वाह वाह
ससा म्हणाला चहा हवा.

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा
सशाने मारली उडी भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला छान छान
ससा म्हणाल काढ पान.

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा
सशाने म्हटले पाढे घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले शाबास
ससा म्हणाला करा पास.

18 comments:

  1. वॉव. आमच्या सश्याचं हे पर्सनल फेव्ह आहे.. पारायणं चालू असतात या गाण्याची. पण सही आहे. मला पण खूप आवडतं.

    ReplyDelete
  2. सही आहे हेरंब...काश की या दोन सशांना मला भेटवता आलं असतं.....

    ReplyDelete
  3. उर्वी (म्हणजे माझी भाची- वय २ वर्ष) आमचा ससा. . .खूप आवडत तिला हे गाण. .. दिवसातून ३-४ वेळा तरी ऐकून होत!!!
    मस्तच आहे हे गाण!!! :)

    ReplyDelete
  4. तुम्ही पुलंच्या शंकऱ्याचा उल्लेख केलात त्या शंकऱ्याची पुनरावृत्ती आमच्या घरात सध्या चालू आहे. आमचा "शंकऱ्या" सध्याची सिनेगाणी एव्हढी दळतोय की कान विटले. सध्या मराठी सिनेमाला दिवस चांगले आहेत तेव्हा ह्या "शंकऱ्या"च्या तोंडी सध्या चक्कं लावण्या आहेत. बाकी प्रवासात सतत असा मी असामी ऐकल्यामुळे, माझा पण उल्लेख बाबा असा न होता कधी कधी लाडाने फादर असा होतो :)

    बाकी काल परवा पर्यंतच्या आमच्या ह्या सश्याचा शंकऱ्या कधी झाला ते कळलेच नाही.

    ReplyDelete
  5. आर्यनला पण हे गाण प्रचंड आवडतं आणि आम्हाला पण, मोबाइल मध्ये सेव्ह केलं आहे. रडायला लागला की हे गाण लावते, लगेच रडू थांबत :)

    ReplyDelete
  6. वा! अजरामर गाणी आहेत ही. वाचता वाचता चक्क मीही म्हणू लागले. :)

    ReplyDelete
  7. मनमौजी उर्वीच्या निमित्ताने तुमच्याकडेही अजून छान छान गाणी असतील ती आम्हालाही कधी कळवा...

    ReplyDelete
  8. हा हा हा...निरंजन शंकर्‍या आता तुमच्या ब्लॉगवरही भेटेलं अशी आशा करूया...बाकी हे ससुले जेव्हा शंकरे होतात तेव्हा काय काय गमती घडतील सांगता येत नाही...मी मागच्या वेळी मुंबईत होते तेव्हा माझा भाचा "उगवली शुक्राची चांदणी" असं मध्येच लहर आली की गायचा ते ऐकायला जाम आवडायचं....

    ReplyDelete
  9. सोनाली ही मुलं लहानपणी अशी गाणी आवडतात असं करून आपल्यालाही तीच गाणी ऐकायला लावतात नाही का?? आमच्या गाडीत असंच अग्गोबाईची सिडी सब दर्द की दवा म्हणून ठेवलीय...

    ReplyDelete
  10. अरे तू पण श्रीताई..आजकाल आम्ही दोघं अशीच कुठली बडबडगीतं दिवसभर गुणगुणत असतो आणि मग अंगाईगीताच्या वेळी आरुषने खूप वेळ लावला की मी चक्क हिंदी-मराठी सिनेमातली पण गाणी चेंज म्हणून गाऊन घेते आणि माझा सूड(?) उगवते...हे हे....

    ReplyDelete
  11. मस्तच आहे बडबडगीत...
    हे एकवल की नाहीत तुमच्या ससुल्याला..

    ससा ससा, दिसतो कसा,
    कापूस पिंजून ठेवलाय जसा,
    लाल लाल डोळे छान,
    छोटे शेपूट मोठे कान,
    पाला खाउन होतो टूम
    चाहूल लागता पळतो धूम.

    ReplyDelete
  12. देवेंद्र बरं केलंस लिहिलंस ते...मला पाला खाऊन टुम्म व्हायचं आठवतच नव्हतं....:)

    ReplyDelete
  13. mast ga kal ch comment daychi hoti pan as usual tuze comment che page gandale hote ............aaj kal me pan kayam gani mhanat aste muli sathi sadha chandomama dakhav la lagech ganya chi farmaish hote hehehe .....me pan tuza sarakhe hindi/marathi gani mhante madhun ch :)

    -Ashwini

    ReplyDelete
  14. हम्म्म..अश्विनी आमच्याकडे ’आई’ हा एक शब्द जरा जास्त तोंडात असल्याने फ़र्माइश नेहमी आई आई ची होते आणि आजकाल कधीकधी चिऊताईची..पण या बाबतीत मुली जरा जास्त लाड करून घेतात असं वाटतं...माझी भाची अद्यापही गाणी,गोष्टी,विनोद असं वयपरत्वे फ़र्माइशी करतच असते....

    ReplyDelete
  15. हे हे मस्त, लहानपणीचे दिवस आठवले, शाळेत हाफ पॅंट, चौकडीचा शर्ट घालून एक सुरत समुह गान केला होता एका कार्यक्रमात :)

    ReplyDelete
  16. धन्यवाद सुहास...नाचासाठी हे गाणं म्हणजे बालदोस्तांचं ऑल टाइम फ़ेवरिट असंच म्हणायला हवं...

    ReplyDelete
  17. मस्तच गं... आमच्या घरातही बालगीते नेहेमी असतात, थोडासा बदल ईतकाच की शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे अधे मधे साहेबाची बालगीतं पण येतात,,,
    पण ही गाणी अजरामर आहेत गं!!!

    ReplyDelete
  18. खरंय गं तुझं...आमच्याकडे शाळा नसतानाच नुस्तं लायब्ररीमधून ऐकुनही साहेबांची गाणी येतात त्यामुळे तर ही गाणी मी आवर्जुन कानावर घालत असते...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.