Monday, April 23, 2012

दोन ओंडक्याची होते जर्सीमध्ये भेट.....


खरं तर अशा प्रकारची पोस्ट या ब्लॉगवर साधारण दोन वर्षांपुर्वीच्या जुलैमध्येच येणार होती...म्हणजे यायला काहीच हरकत नव्हती..पण ओंडका क्रमांक एक किंवा खरं तर ओंडकी उर्फ़ माझिया मनातली "मी" हिने अति डोकं लावून विमानाचं तिकिट काढताना गोंधळ केल्याने काही केल्याने ओंडका क्रमांक दोन उर्फ़ वटवट सत्यवान याला प्रोजेक्टरुपी लाटेने च्यामारीकेच्या दुसर्‍या किनारपट्टीवर वेगळं ठेवलं..
यावेळी मात्र ओंडकीला आधीच पुर्वीच्या चुका न करण्याची अक्कल आल्याने (वाचा...लेसन्स लर्न्डच्या कृपेने...) आधी उल्लेखलेले हे दोन ओंडके मागच्या आठवड्यात एकदाचे जर्सीतल्या एका शांत कुटिरेत भेटले.....शांत कुटीर उर्फ़ सत्यवानाचं घर हा या (अघोषित) मेळाव्याचा मुख्य पंडाल होता हे आता लक्षात आलं असेलंच.....
या दोन परिच्छेदात अशा प्रकारे ही पोस्ट या ठिकाणी खरं तर संपली आहे... पण प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या असंख्य अलिखित नियमाप्रमाणे थोडी फ़ार असंबद्ध बडबड केल्याशिवाय किंवा थोडक्यात त्या आधी म्हटलेल्या शांत कुटिरेचं रुपांतर हास्यकल्लोळ, तू हे कर तरच मी हे करेन या आणि अशा असंख्य कलकलाटाने भरल्याशिवाय ही पोस्ट कशी पूर्ण होणार???
मागे काही दिवसांपूर्वी वटवटच्या फ़ेबुवर (मी फ़ेबुवर नाही आहे हो...फ़ेस आला तोंडाला माझ्या त्यांची प्रायव्हसी सार्वजनिक करण्याची पद्धत पाहून..असो तर..) हां तर त्या वटवटच्या फ़ेबुवर गाजलेल्या एका फ़ोटोमुळे घडलेल्या एका छोट्याशा मेळाव्याचा हा मोठा वृत्तांत....वॉर्न करायचं काम केलंय नंतर पोस्ट संपत नाही वगैरे किंवा पुन्हा एकदा मनातलंच इ.इ. छाप प्रतिक्रियांचं मूल्य शून्य असेल हा (आगाऊ) इशारा...:)
तर झालं असं किंवा खरं तर झालं काहीच नाही माझं एक हापिसचं काम नेमकंच पूर्व किनारपट्टीच्या जवळ निघालं..आणि मी फ़क्त त्याच्यात माझ्यासाठी शनिवारचा एक दिवस मागितला (नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे शुक्रवारही मागावा लागला ही वेगळी बाब पण वरिजिनल प्लानमध्ये माझ्याकडे फ़क्त शनिवार होता) सुदैवाने नव्या यॉर्कातलं विमानतळ कामासाठी वापरावं लागत असल्याने मी यावेळी हॉटेलमध्ये न राहता नव्या जर्सीतल्या एका शांत कुटीरेची निवड केली...(म्हंजे काय आहेच माझी साधी राहणी आणि साधेच विचार) आता ह्याच शांत कुटीरमध्ये राहणारा ब्लॉग ओळखीमुळे आता चांगली गट्टी जमलेला हेरंब उर्फ़ वट्टू (आता ओंडका म्हणायचा मोह होतच नाहीये कारण गप्पाची भट्टी चांगलीच जमल्यामुळे आमची गट्टी जमलीय नं...) याने माझं हे असं आगाऊपणे त्याच्या (आता अशांत केलेल्या) कुटीरेमध्ये येणं खिलाडूपणे स्विकारून मध्यरातीला माझ्यासारख्या सभ्य मुलीला नवीन यॉर्कातल्य कुणी त्रास देऊ नये म्हणून खास जातीने हजर राहून माझ्यातला सुजाण ड्रायव्हर जागा केला...(होय कंपनीने भाड्याने दिलेल्या गाडीला ड्राइव्ह करून शांत कुटिरकडे न्यायचं पवित्र कार्य मीच पार पाडलंय आणि यावर दोन शब्द येताहेतच...)
अरे हे काय...नाही नाही काही नाही तर मेळाव्याचं पहिलं पुष्प गुंफ़ायला सगळ्यात महत्वाची मदत केली ती विमानतळातल्या एअर ट्रेनने बंद पडून...त्यामुळे अर्थातच आमच्या आनंदावर विरजण पडायचं काहीच कारण नव्हतं म्हणा..कारण ती भर आम्ही तिथेच उपलब्ध असलेल्या बस सर्व्हिसवर आमचा भार टाकून लगेच भरुन काढली....:) आणि हो तो वर म्हटलेला ऐतिहासिक फ़ेबु फ़ोटोने (इथून पुढे ऐतिहासिक हा शब्द बर्‍याच उल्लेखांमध्ये अध्याहृत असेल हे चा वांच्या ध्यानात आलं असेलच) तर त्यादिवशीच्या फ़ेबुवर तर बॉंबच फ़ुटला..."हे काय नवीन आता?" "हा मेळावा कधी झाला आता?" या आणि इतर प्रश्नांनी वट्टुच्या फ़ेबुला फ़ेस आला.....त्यामुळे अर्थातच ही पोस्ट लिहायची जबाबदारी त्याने माझ्यावर टाकली...( आणि हेच नाही बर्‍याच जबाबदार्‍या त्याने माझ्यावर टाकल्या....मी त्यातल्या किती कशा पेलल्या ते त्याला हवं तर तो लिहील आणि नाही लिहिलं तर इथे वट्टूची वट वाढवायची संधी मी सोडणार नाही हे तुझ्या ध्यान्यात आलं असेलच नं सत्यवाना...)
तर आता त्याने मला इतकं प्रेमाने आणि मध्यरात्रीही एकही जांभई न देता (आणि हातात फ़ुले-बिले अस्लं काही आणून ते सांभाळायचा त्रास मला न देता) विमानतळावर रिसिव्ह केलं याबदल्यात मीही त्याला माझ्या कामासाठी घेतलेल्या गाडीने (चक्क) नवीन यॉर्कातले रस्ते, एव्हेन्यु न चुकवता, एकही भोंग्याची देवाणघेवाण न करता आणि सगळ्यात मुख्य एन वाय पि डीवाल्यांना न पिडता वाहतुकीचे नियम काटेकोर पाळीत इप्सित स्थळी म्हणजे शांत कुटीरेमध्ये घेऊन गेले...इथे खरं तर तांत्रिक दृष्ट्या कामाचा दिवस सुरु व्हायला काहीच तास शिल्लक राहिल्याने आम्ही विश्राम करून मेळाव्याचा विचार नंतर करायला हवा होता पण काही (किंवा खर तर बर्‍याच बाबतीत) आमचं लाइक माइंड असल्याने विश्रामाचा विचार बाजुला ठेवून आम्ही सरळ चर्चेला सुरूवात केली..चर्चांचे विषय महत्वाचे नव्हते कारण ते सारखेच बदलत होते.
मॅगी बस दो मिनिट....खाने और पकाने के लिए....:)
प्रत्येक छोट्या मोठ्या मेळाव्यांमधला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे दीडिखा आय मीन खादाडी यावर मात्र एक छोटा वाद निर्माण झाला...(म्हणजे थोडक्यात नॉर्मल मेळाव्यासारखंच) तर झालं असं सत्यवानाने काय खाणार असा प्रश्न विचारल्यावर जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून नको रे वगैरे करून माझिया मनाला खास सत्यवान स्पेशल मॅगीचे वडे खायची इच्छा झाली आणि त्यात माझी फ़क्त दोन मिन्टात बनलेलं मॅगी देऊन ती धुडकावण्यात आली...अर्थात सुदाम्याचे पोहे खाऊन वाढलेल्या संस्कृतीतले आम्ही दोघं असल्याने हा वाद मॅगी लगेच संपवून (आणि भांडी घासायची जबाबदारी सत्यवानाकडेच देण्यात येऊन) आम्ही पुन्हा एकदा चर्चा सुरू केल्या...आणि पुन्हा तेच आधी म्हटल्याप्रमाणे वातावरणावरून सुरू झालेल्या या चर्चा विविध वळणांनी फ़क्त हास्याचे फ़वारे, लोल्स आणि मंडळींना आवाहन इ.इ. रुपी फ़ोडण्या पडत पुढे सरकत संपायचं नावच घेत नव्हत्या.....
पण अखेरीस घड्याळाचा काटा फ़ारच पुढे गेल्याने आम्ही साधारण तीनेक तासाच्या विश्रामाचा ठराव मंजुर करून पहिले सत्र (अक्षरश: वेळेअभावी) आटोपते घेतले..
आता दोन दिवस माझ्या कामाचे असल्याने त्याविषयावर ब्लॉगवर लिहिण्यात काहीच पॉइंट नाहीये पण झलक म्हणून हा नकाशा पाहिलात तर कामही किती अटीतटीचे झाले हे लक्षात येईल..(इथे मी दोन दिवसांत पाच राज्यांचा दौरा करुन एक नवाच उच्चांक प्रस्थापित केला हे काही सुजलेल्या मनगटाने लिहायचं नाहीये मला पण लिहिताना ते ओघानेच आलं आहे याची पुन्हा एकदा सु.वा. नोंद करतीलच.)
हा माझा छोटासा प्रवास कामाचा आणि गाडी परत देण्यापर्यंतचा...
तर (एकदाचं काम आटोपून) पुन्हा परत येताना आधीचा विमानतळाचा अनुभव लक्षात घेऊन भाड्याची गाडी परत द्यायचं ठिकाण आम्ही बदललं होतं...नशीबाने शांत कुटीरेपासून ते खरं तर तीनच मैलावर होतं. पण पाच राज्य जितकी लवकर कव्हर करता आली त्याच्या ऐवजी या तीन मैलापैकी शेवटचे तीनशे यार्ड कव्हर करताना आली...म्हणजे इतकं विक्रमी वेळेत येऊनही अखेर हेची फ़ळ इ.इ. विचार माझिया मनात येणार तोच वटवट्याने कुणालाही रस्ता न विचारायचा (जगातल्य यच्चयावत पुरूष जमातीचा) नियम मोडीत काढून चक्क रस्त्यातल्या पोलीसाची मदत घेतली...आणि त्याने अर्थातच आम्हाला चुकवले नाही हे इथे नोंदवायला हवं....इथेही मर्फ़ीबाबा आले का असा अभद्र विचार डोक्यातून काढून टाकून मी तर सरळ मनातल्या मनात मेळाव्याचे दुसरे पुष्प गुंफ़ायला सुरूवातही केली..
आणि या पुष्पाचं संपूर्ण श्रेय शांत कुटीरमालक सत्यवानाला जातंय. कारण माझ्या लाडक्या नवीन यॉर्कात एका शुक्रवारच्या संध्याकाळी हे पुष्प गुंफ़ायची कल्पना फ़क्त त्यालाच सुचू शकते...
सत्यवान म्हणे पोळीपेक्षा
फ़मिलिया
 पिझा भारी
हे शहर आधीच्या एका पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे मला माझ्या मुंबईची याद देते त्यामुळे इथे जायला मी तसंही कधीही तयार असतेच इथे तर मेळाव्याचा प्रश्न होता..आता मागे हटणे नाही..तिथल्या (नेहमीच्याच) वार्‍यांना न जुमानता आम्ही आमची पदयात्रा जारी ठेवली...आणि त्याचबरोबर काही मार्मिक गोष्टींवर आपल्या टिपण्ण्या करून माझं मनोरंजन करायची संधी सत्यवानाने सोडली नाही...जास्त गर्दीच्या ठिकाणी मोठ्याने हसायची संधी मी नेहमीच साधून घेते....टाइम्स स्क्वेअरला ती मी पुरेपुर साधली हे आता पुन्हा सांगायला नको.....:)
गार्लिक नॉट्स...यम्म्म
आता प्रश्न होता तो म्हणजे पोटपुजेचा...माझी लाडकी पोळी त्याच्या घरी करून द्यायचा माझा लाडीक हट्ट सत्यवान काही पुरवणार नाही हे माहित होते (खरं तर म्हणूनच मी ती ऑफ़र त्याला प्रत्येक पुष्पाच्या ब्रेकमध्ये दिली होती हे आता मेळावा संपून दुसरा आठवडा उजाडल्याने सांगायला हरकत नाय) तर खायच्या बाबतीतले सगळे हक्क मी आधीच वट्टुला दिले असल्याने त्याने त्याची चांगलीच वट असलेल्या मध्ये मला सगळ्यात ब्येस्ट पिझा म्हणजे फ़मिलिया या जगप्रसिद्ध दुकानात पिझा खायला नेलं..तिथेच गार्लिक नॉट या खाद्यपदार्थाशी त्याने माझा परिचय करुन दिला त्यामुळे नंतर रात्रीच्या सत्रासाठी आम्ही ते आठवणीने बांधून घेतले (आणि खायला आठवणीने विसरलो. म्हंणजे वट्टुने आतापर्यंत ते एकट्यानेच गट्ट्म केले असणार....)
चॉकलेट आइस्क्रिम कोई शक??
तर अशा प्रकारे पिझा खाल्यामुळे आम्हाला गोडाचे वेध लागले त्यामुळे मग नंतर लगेचच आम्ही आमचा मोर्चा "कोल्ड स्टोन"कडे वळवला..हे ठिकाण आमच्या लाइक मांइड्स मधलं आहे हे जाता जाता नोंदायला हरकत नाही.इथे तुम्हाला हवं ते आइस्क्रीम, त्यांतल्या अन्य पदार्थांसोबर थंड दगडावर मिक्स करून दिलं जातं..म्हणून कोल्ड स्टोन (अरेच्च्या हाही एका जळाऊ पोस्टचाच विषय आहे...)
तर त्यानंतर एक कॉफ़ी आणि एक चॉकोलेट फ़्लेव्हरच आइस्क्रिम हातात आल्याने चर्चा थोड्या मंदावल्या पण पटापट आइस्क्रिम संपवून चर्चासत्र आम्ही जारी ठेवले....
साधी राहणी आणि साधं खाणं
आता साधारण दहा वाजत आल्याने एका सभ्य मुलीला शांत कुटीरमध्ये न्यायची जबाबदारी कार्यवाहक या नात्याने सत्यवानाने (पुन्हा एकदा) आनंदाने पार पाडली.
आता मात्र चर्चेमध्ये आणखी एक प्रतिनिधी असावा असे आम्हांस वाटू लागले आणि तोच फ़ेबुचा फ़ोटो पाहून अचंबित झालेल्या खुद्द पोटोबा लेखिकेने दूरध्वनीवरून आपली हजेरी लावली..हा दूर ध्वनी इतका दूरवरून आला होता की त्यामुळे आमची पोटोबाची घरगुती सोय न केल्याने तिलाच आम्ही बोल  लावले....त्यातच माझ्यासाठी तर सत्यवानाला पोळी नाही तर निदान पापड तरी भाजून दे सदृश्य मागण्या मांडण्यात आल्या..अर्थात घेतलेल्या जबाबदार्‍या कशाप्रकारे झटकून टाकायच्या यावरती एक पी एच डी पूर्वीच झाल्याने मी निश्चिंत होते..शिवाय पहिल्या पुष्पाच्या दिवशीच शांत कुटीरचा एक मुआयना केल्यावर पोळीचं पीठ काय मीठही असेल की नाही अशा शंका आल्याने इथे काही आपल्या पाककुशलता सत्यवानाला दाखवून अवलक्षण करायची वेळ येणार नाही याची खात्री मा.म.ला होती...
त्यानंतर पुन्हा एकदा शेवटच्या दिवसाचे पुष्प कशा प्रकारचे गुंफ़ायचे याच्या काही माफ़क चर्चा करून आम्ही दुसरे पुष्प संपवले..खरं तर तोस्तर तांत्रिक दृष्ट्या तिसरा आणि शेवटचा दिवस सुरू झाला होता हे पुन्हा एकदा सु.वां...च्या.....
तिसरा दिवस घाईत जाणार असे सुरूवातीपासूनच वाटत होते कारण पाहुणे मंडळीने किंवा खरं तर मी शांत कुटीरेच्या माझ्या कक्षात कागदपत्र, वायरी इ.ची बरीच गर्दी केली होती..ती आवरणे हे जिकिरीचे काम होते..कारण शांत कुटीरवाले यात काहीच सहकार्य करणार नव्हते..सहकार्य कस्लं खरं तर सकाळी भरपूर मस्का लावून पाव जातीने भाजून देऊन वर खाताना आणखी मस्का मारून मला आग्रहाने खायला लावले...लवकरच ही मस्कापट्टी मी कॉफ़ीची जबाबदारी घ्यावी म्हणून होती हे लक्षात आले.....अर्थात त्यामुळे शाही कॉफ़ी बनवायची संधी मला मिळाली...
बटर लावता लावता

या प्रसंगामुळे मला अर्थातच माझ्या घरी जसं एक काम तू, एक काम मी हे नेहमी सुरू असतं त्याची कमी भासली नाही... आणि हे सत्र अगदी जरा पेन दे नंतर आता मी पेन दिलं होतं तर पुस्तक तू घेऊन ये अशी सारखीच कामाची समप्रमाणात वाटणी करून वट्टूने आपली लाइक माइंड्सची पेटंट्स पक्की करायचं कामही हा मेळाव्यात हिरीरिने केलं...
हीच ती शाही कॉफ़ी
इथे एक महत्वाचा मुद्दा लिहायचा राहूनच गेलाय की मी पहिल्या पुष्पाच्या दिवशी पोहोचले तेव्हा शांत कुटीरमध्ये माझा स्वच्छ कक्ष पाहून मला मी नक्की अपेक्षा केली होती त्या घरात आले होते का या शंकेचं तिसर्‍या पुष्पात ज्या काही घरगुती गप्पा झाल्या त्यात झालं...ते म्हणजे निदान दोन दिवसांची का होईना पण नोटीस देऊन आल्यामुळे सत्यवानाने आपलं साफ़ सफ़ाई कौशल्य पणाला लावून मेळाव्याच्या स्वागत समितीचं काम एकहाती संपवलं होतं...मला पोळी करायची संधी मिळू नये याची सोयही तेव्हाच केली असावी असा त्यावेळी मला दाट संशय आला..
सगळ्यात जास्त रंगलं ते तिसरं सत्र..कारण इतक्या वेळ विस्मरणात गेलेले (अर्थात आम्हा दोघांचेच) ब्लॉग हा विषय यात होता...(विस्मरण या शब्दावर श्लेष आहे हे चा वांच्या.....) .चित्रपट हा सर्वच ब्लॉगर्सचा लाडका विषय त्यामुळे त्यावर एक साधक चर्चा सुरू झाली. पण चित्रपट कलावंत, त्यांची नावे आणि कहाण्या लक्षात ठेवायचं माझं कौशल्य पाहता (आणि या विषयावरच्या रसिक वाचक/ब्लॉगर्सची अनुपस्थिती लक्षात घेता) ही चर्चा बाधक होईल का अशी शंका येऊन त्याऐवजी चित्रपटापट सत्यवानाचं पुनरूज्जिवन करून आठवड्याला अनेक चित्रपट पाहून झाल्यावर निदान एका तरी चित्रपटावर पोस्ट लिहायची असा एक ठराव सर्वानुमते (म्हणजे मत मांडणं आणि ठराव पास करणं दोन्ही करणारी व्यक्ती मीच होते म्हणा) हां तर ठराव सर्वानुमते संमत झाला..
गाणी आणि आठवणीं या विषयावर एक छोटी चर्चा शेवटी मला गावंसं वाटावं लागण्यावर आली आणि मेळावा आटोपणार याचे बिगुल वाजायला लागले...(गाणं ऐकताना पेंगलेल्या सत्यवानाचे डोळे याची साक्ष देतच होते म्हणा)
अखेर बाहेर जेवायच्या बोलीवर शांत कुटीरेचा मी निरोप घेतला...खरं तर मेळाव्याच्या निमित्ताने त्या कुटीरेमध्ये केलेला कलकलाट, खादाडी, गप्पा, इ.इ. सोडून पाय निघत नव्हता..पण विमानतळाने आल्यावेळसारखेच सहकार्य केले तर कायमचाच मेळावा होण्याची सत्यवानाला काळजी लागली त्यामुळे वेळेच्या बाबतीत आम्ही कुठलंच कॉम्प्रोमाइज किंवा साध्या भाषेत आय एस टी केलं नाही..त्यामुळे सुसंगत चर्चा, खादाडी, फ़िरणे इ.इ. होऊ शकले हे सु.वां..च्या.....
परत निघाल्यावर ट्रेनने नवीन जर्सिमधून नवीन यॉर्कात जाणे या विषयावर खरं तर एक वेगळी कंपोस्ट होऊ शकते...(सत्यवान इथल्या इथे तुला निदान चारेक पोस्टींची संधी म्या उदार मनाने देत आहे...वाचतोय्स का??) या प्रवासात मला मी मुंबईच्या मेळाव्याला गेले होते तेव्हा असलेल्या मेगाब्लॉकची आठवण झाली एकंदरीत मेगाब्लॉक आणि मेळावा यांचं नातं जूनं दिसतंय तर..... शेवटी एकदाचे वेळेच्या थोडं फ़ार आधी पोहोचल्यावर मुंबईत रविवारी होणारा मेगाब्लॉक नव्या यॉर्कात शनिवारी दुपारी रंगीत तालीम म्हणून करतात की काय विचार असा एक टिपिकल मुंबैकरीण म्हणून माझ्या मनात डोकावून गेला.
एअरपोर्टची छोटी खादाडी
तर आमची वरात सुस्थितीत विमानतळावर पोहोचल्यावर एक शेवटचा खादाडी प्रयत्न झाला....आणि मग मात्र सेक्युरिटी चेक इनकडे पावलं वळवावीच लागली...
ब्लॉगिंगमुळे जर चार चांगल्या लोकांशी संबंध आले तर दोन जणांच्या मेळाव्यानेही बरंच काही (म्हंजे काय ते आता विचारू नका. पोस्ट प्लान्ड परिच्छेदांच्या कधीच पुढे गेली आहे...) साध्य होतं हे या तीन पुष्पांच्या निमित्ताने लक्षात आलं आहे..फ़क्त घरच्या सर्व मंडळींना पुन्हा लवकर वेठीस धरता येणार नाही याची कल्पना असल्याने पुढचा मेळावा ओरेगावात घ्यायचे योजिले आहे...तरी इच्छुकांनी विमानांची डिल्स पाहायला सुरूवात करावी..तारीख काय कधीही फ़ायनल करता येईल...
जाता जाता माझिया मनात एक जूनीच कविता नव्याने आल्याशिवाय राहवत नाही...
दोन ओंडक्यांची (आपलं ब्लॉगर्सची) होते नव्या जर्सीत भेट
एक डायरेक्ट फ़्लाईट दूर सारे
पुन्हा ओरेगावी (होईल तेव्हा) भेट.....
तळटीप...फ़क्त महत्वाचे काही फ़ोटो तातडीने वरच्या पोस्टमध्ये टाकण्यात आले आहेत...आणखी फ़ोटो सवडीने पिकासावर टाकण्यात येतीलच. इच्छुकांनी करभरणी (वाचा: आपली मौल्यवान प्रतिक्रिया/सूचना इ.इ.) देऊन नावनोंदणी करावी......:) आणि हो ही सक्तीची करभरणी का लागू झाली यासंबंधी काही शंका असल्यास जरा एकदा गुगलबाबांच्या वर्तुळात चक्कर मारून यावे...कसे...:)

Thursday, April 12, 2012

हिंदोळेच मनाचे.............:(

एका साध्या सोप्या आयुष्यात एक नवी नोकरी येते...येत नाही ती आपण निवडली असते...."आई" व्हायची.....जगात सगळ्यात कठीण काम आई होणं आहे हे आजवर फ़क्त ऐकलेलं असतं....पण त्याचा नक्की अर्थ काय हे आपलं आपल्यालाच अनुभवायचं असतं.....एकदा का पहिलं मूल झालं आणि मनाचे ते हिंदोळे अनुभवले की सारं सहज सोप असावं असं उगीच वाटतं..पण नाही ....ते तसं नसतंच नं मुळी...
आपण पुन्हा एकदा "आई" होतो आणि पुन्हा तेच....यावेळी तर त्याला बाहेर ठेवायचा (कठोर) निर्णय एखाद्या प्रोजेक्ट प्लानप्रमाणे आधीच झालाय....नवव्या महिन्यात तो जायला लागतो..तिथली त्याचा संभाळ करणारी "टोशा" त्याला सहजगत्या आवडू लागते....आपणही आपल्या रोजच्या दैनंदिनीत रूळावतो..मनातली खंत जराही वर न काढता....थोडक्यात निर्ढावतो....हो निर्ढावणंच ते...दुसरं काय म्हणणार??
मग पुन्हा एक वळण येतं...आजाराचं....त्या निमित्ताने माझ्याच मुलाला जास्त वेळ द्यायची संधी मला मिळते...मी पुन्हा माझे जुने, घरी फ़क्त मुलाला सांभाळायचे, दिवस जगते....चार दिवस घड्याळाची चाकं त्याच्या दैनंदिनीप्रमाणे फ़िरू लागतात....कॉन्फ़रन्स कॉलच्या आवाजापेक्षा त्याची बातचीत, बकबक आणि खेळाची सवय होते.....मित्रमंडळांचे फ़ोन घेता घेता निसटून जातात...हातात किबोर्ड ऐवजी छोटी वाटी, चमचा, खणांचं ताट आणि खेळणी येतात...सगळं विसरून पुन्हा हे करताना अजिबात वेगळं वाटत नाही....त्याची तब्येत सुधारावी म्हणून त्याला आवडेल, झेपेल ते सर्व करायची मनाची आपोआप तयारी होऊन जाते..
चार दिवस कसे गेले कळतही नाही आणि तो पाचवा दिवस उगवतो....मागचे कित्येक महिन्यांचं निर्ढावलेपण गळून पडतं..आजचा पाळणाघरातला टाटा जसा त्याला कंफ़्युज करतो त्याहीपेक्षा मला तो जास्त अपराधी करतो, टोचतो....
परत येताना मी सुन्न असते...आज कामात लक्ष लागेल का? माहित नाही.....हे मी सगळं पुन्हा त्याच्यासाठी करू शकेन का? माहीत नाही...आणि हो त्यासाठी मला तो आजारी पडायला नको आहे...
माझ्या बाळाला जसं चांगलं आरोग्य दे असं मला त्या कुठे असेल त्या कर्त्या करवित्याला सांगायचं आहे नं तसंच माझ्याही मनाला पुन्हा एकदा सावरायला माझं मलाच शिकायचं मला बळ दे हेही सांगायचं आहे....

जेव्हा एखाद्या परिस्थितीतून हवा तो मार्ग काढता येणार नसतो तेव्हा सामोरं जाणं इतकंच पालक म्हणून मला करायला हवं...नाही का???

अपर्णा,

१२ एप्रिल, २०१२



Tuesday, April 3, 2012

गाणी आणि आठवणी ११ - माय लव लेटर



एप्रिल महिना मला फ़ार आवडतो...म्हणजे फ़क्त हे एकंच कारण नाहीये त्याचं..पण एप्रिल फ़ुलपासून कशी धमाल असते...शाळा/परीक्षा पण आटोपायच्या त्यावेळी कैर्‍या शोधायला जायची मजा तर होतीच पण अगदी देश बदलला तरी मार्च कसाही गेला तरी एप्रिलपासून हिवाळ्याचा भयाणपणा कमी व्हायला लागतो म्हणूनही..थोडक्यात काय तर देश असो वा परदेश एप्रिल इज द ब्येस्ट.....म्हणून विचार करत होते की एप्रिलच्या ब्लॉग पोस्टची सुरूवात जरा धमाल असायला हवी...आणि अर्थात त्यासाठी जास्त ताण नाही द्यायला लागला...म्हणून आज हे एक धमाल गाणं आणि त्याची आठवण...
..................................................................................................................................................................................................
माझ्या गाण्याच्या आठवणी जेव्हा मागे जाऊन माझी मीच वाचते तेव्हा मला त्यात नेहमी एक गंभीर वळण दिसतं...म्हणजे गाणी गंभीर नसली तरी आठवणी का इतक्या हळव्या असाव्यात असं वाटण्याइतपत....आणि म्हणून मी आठवत होते की असं एखादं तरी गाणं हव न की ज्याच्या आठवणीने आपण तुफान हसत सुटल पाहिजे...जस इतरवेळी मित्रमंडळात किंवा कुठला चित्रपट पाहताना कैच्याकै कमेंट्स करताना खी खी करून हसतो तस...म्हणजे नुसतं गाण्यासाठी का म्हणून सिरीयस व्हा..असा मी नुसता विचार करताक्षणीच आठवलेलं हे गाणं आहे..मुख्य म्हणजे हे फारसं कुणाला आता आठवत पण नसेल याची खात्री आहे मला...पण करमणुकीची हमखास खात्री.....


तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो. आमच्या शेजारी एक मारवाडी कुटुंब राहायचं आणि त्यांच्याकडे (किंवा फक्त त्यांच्याकडे) टेपरेकॉर्डर होता...त्याचा आवाज अर्थात त्या घरातल्या मुलांच्या मर्जीवर वर-खाली व्हायचा...किंवा फक्त वर व्हायचा असं म्हटल तरी चालेल...कमीबिमी नाही.एकतर बंद नाही तर उच्च सुरात काही ना काही सुरु असायचं...
म्हणजे सकाळी त्या घरच्या कर्त्या पुरुषाने उच्च आवाजात कुठली भजन सुरु केली की तो दुकानात गेल्यावर त्याचा मुलगा क्र १ येऊन त्याची लाडकी श्रीदेवीच्या पिक्चरमधली गाणी बापापेक्षा अम्मळ जास्त आवाजात लावे, मग क्र २ ची आवड आणि आवाज असं करत क्र. ५ पर्यंत हा कार्यक्रम चढत्या आवाजात आणि अर्थात "उनकी उनकी पसंद के" गीतात सुरु असे...आम्ही त्यांचे सख्खे (म्हणजे भिंत शेअर करणारे) शेजारी असल्याने हा सारा अत्याचार सहन करायची ताकत आमच्या कानात सगळ्यात जास्त होती असं म्हणायला हवं....बरं त्यांना हा अत्याचार बंद करा म्हणून सांगायची काही सोय नव्हती कारण त्यांची तोंड उघडल्यावर ऐकू येणाऱ्या ओव्या (वाचा: शिव्या) ऐकण्यापेक्षा असतील ती गाणी परवडली अशी गत होती....
जोवर हिंदी किंवा ओळखीची गाणी असत तोवर ठीक होतं म्हणजे कानाचा पडदा तग धरून तरी असे...पण जर त्यांची गावी फेरी झाली असेल तर अस्सल मारवाडी मिट्टीमधली गाणी सारखी सारखी ऐकायची म्हणजे मोठं संकट...शाळा सुरु असे त्या दिवसात या गाण्यांचा फारसा त्रास जाणवला नाही कारण संध्याकाळी एकदा का दुकान बंद करून पैसे मोजायची वेळ आली की गल्ला भरला असेल त्याप्रमाणे छन छन वाजणारी नाणी ऐकावी लागत...जेव्हा पैसा सगळीकडेच कमी दिसे तेव्हा हा वाणी आम्हाला चांगलाच श्रीमंत वाटे..असो मी त्या गंभीर वळणावर नेहमीप्रमाणे वळायच्या आत आपण त्या गाण्याकडे वळूयाच कसं...:)
तर या वरील सगळ्या गानपार्श्वभूमीवर (नाणी विसरूया आता...तस पण नोटांचा जमाना हाय आणि क्रेडीट कार्डांचा) एक असा काळ किंवा महिना आला जेव्हा त्या घरातल्या समस्त मंडळींना आवडणार एक गाणं किंवा खर तर एक अल्बम मिळाला...म्हणजे मुलांनी सुरु केलेला धिंगाणा क्र १ पासून पाचपर्यंत सर्वांना आणि चक्क बापाला पण आवडला..त्यामुळे सकाळची भजन बिजन सोडून ही जी एक कसेट त्यांनी टाकली ती बहुदा पूर्ण घासल्यावरच बाहेर काढली असणार....यस येतेय मी त्या चाळप्रसिध्द गाण्यावर....पण आधी जरा थोडे धक्के..
तेव्हा आता सारखे उठ सुठ अल्बम निघत नव्हते ना त्यांच्या चित्रफितीचा पूर यायचा...शिवाय असे फारसे नट-नटी पटकन उठून चला माझ्या गाण्याचा अल्बम काढा म्हणणारे आणि ते अल्बम लगेच बाजारात आणणारे ही बाजारात जास्त नव्हते.....
तर तेव्हा नुकताच लोकांच्या थोड्या फार विस्मरणात गेलेल्या "पद्मिनी कोल्हापुरे" ही होती मुख्य गायिका आणि तिला खास या अल्बमद्वारे पुन्हा एकदा लोकांच्या समोर आणण्याचं धैर्य केल होत आपले सर्वांचे लाडके "बप्पीदा"....:)

सोन्याचा भाव वाढल्यापासून बप्पीदाबद्दल मुळात असलेला आदर (आठवा: "जब कोई बात बिघड जाये" ) आता जरा काकणभर (सोन्याचं नाही) अधिक झाला आहे हे जाता जाता सांगायलाच हवं.....तर बप्पीदा आणि पद्मिनी हे combination (काहींच्या मत जर असेल तर ) त्या दोघांनी मिळून गायलेलं हे गाणं त्यावेळी आमच्या चाळीत तुफान हिट होत...ते गाणं होतं....

प. - सॉरी सॉरी सॉरी सर आज मुझे जल्दी जाना घर....
ब. -  रुको रुको रुको मगर टाईप करू पहले लेटर
प. -  क्या??
ब. -  लव लव लेटर माय लव लेटर



आणि मध्ये कधी तरी ती हे पण म्हणते सी यु लेटर...

आता धृपदच इतक जमलंय अगदी यमकासकट तर हे आणि यातली इतर गाणी चाळ न ऐकून सांगते कुणाला.....खरं म्हणजे त्या टेप रेकॉर्डरमधून जे काही आम्ही गाणी या नावाखाली ऐकलय त्यापुढे हे म्हणजे अगदी श्री कृष्णाने सांगितलेली गीता नसली तरी दर सोमवारी चाळी खालून "तुजविण शंभो मज कोण तारी" म्हणणारे एक वृद्ध आजोबा जात निदान त्या लेवलच होत असं म्हणायला हरकत नाही...
बाकी पु ल नी एका ठिकाणी म्हणून ठेवल्याप्रमाणे शेजारच्यांचा ठणाणा करणारा रेडीओ आपल्यासाठी वाजतोय अशा आनंदात ऐकावा त्याप्रमाणे ही टेप आम्ही नुसती ऐकून नाही तर त्यावर थोडा विनोदी घरगुती नाचबीच करून धमाल केलीय...तेव्हा ते "एकता का वृक्ष" यायचं न त्यातला नाच बऱ्याच गाण्यावर जातो...बाप्पिदाच्या बिट्सचा परिणाम असावा आणि नाविलाज को क्या इलाज असही असेल....
आज नक्की किती वर्षापूर्वी ऐकलं होत तेही आठवत नाही पण तरी वरचे शब्द चालीसकट आठवले यात या गाण्याचं यश आहे असं बप्पीदा कधी मला भेटले (आणि चुकून पद्मिनीताई पण दिसली) तर मी नक्की सांगणार आहे...
अजूनही जर असं काही गाणं आहे यावर विश्वास बसत नसेल तर (आपल्या जबाबदारीवर) इथे त्याचा आस्वाद घ्या....तुम्ही पण हसत हसत नाचायला (किंवा लोळायला) लागाल ..माझी खात्री आहे....:) आणि हो त्या एकता का वृक्ष च्या स्टेप्स नक्की ट्राय करा....ही ही ही.....:)

Friday, March 30, 2012

सो कॉल्ड "मनातलं" आणि असंच काही....

आजचं वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते असं म्हटलं तर.....तर कशाला ते तसंच आहे म्हणा...तर अशाच एका रद्दीत एक पान मिळालं....टराटरा फ़ाडायचे पण कष्ट घेणार नव्हते तरी एक वाक्य टोचलंच...."अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो." आणि त्याच्या आधीचं जरा जास्त...."अनेकजणींचे ब्लॉग आज ‘दुपारच्या मासिकां’ची उणीव भरून काढतात"...बरं हे तारे तोडणारे महाशय/महाशया कोण हे कळण्याचं काही कारण नव्हतंच...रद्दीला जसा भाव नसतो तसंच रद्दीच्या कागदांना मालकही नसतो म्हणे...डायपरला प्रसिद्धी मिळायच्या आधी असं म्हणतात की रद्दीला जास्त भाव होता..कारण लहान मुलांच्या घरातली लोकं ती विकत नसत...मग दुकानदार रद्दीची वाट बघत बसायचे....म्हणून रद्दीचा भाव पुर्वी फ़ार जास्त होता म्हणे.....
असो काही संबंध लागतोय?? नाही न....या आणि अशाच प्रकारचे संबंध नसलेले लेख वाचायचे असतील तर वाचायलाच हवा फ़ेकसत्ता....हो मला जाम आवडलंय हे नाव...जरी बाकीच्या सदरांसाठी आवडत असलं तरीही जाणून-बुजून ब्लॉगर्सना उकसवायचा नवा उद्योग (खरं तर धंदा म्हणायचा मोह आवरतेय) सुरू केल्यामुळे फ़ेकसत्ता हेच नाव बरं वाटतंय....खरं तर मला जे काही सांगायचं होतं ते बर्‍यापैकी माझ्या मित्र ब्लॉगरने इथे सांगितलंय....(बरं केलंस बाबा नाहीतर आता रद्दीच्या लिंका कुठे शोधु बाबा....तू तुझ्या लेखात सगळं लिंकुन ठेवलंस ना...हाबार्स...)
मग मला काय लिहायचंय...काहीच नाही...याच निमित्ताने मला फ़क्त जाहिरात करायची संधी मिळतेय माझ्याच ब्लॉगची आणि तिचा वापर मी पुरेपुर करणार आहे...तेही स्वतःच्याच ब्लॉगवर....तसंही ब्लॉगहीट्स मिळायला आम्हा सर्व ब्लॉगर्सकडे मराठीब्लॉग्ज डॉट नेट आहेच की....त्यासाठी तरी रद्दीत जाणार्‍या वर्तमानपत्रांकडे जायची वेळ आली नाहीये....
तसं या ब्लॉगचं कौतुक/उल्लेख इ. वर्तमानपत्रात झालेत आणि त्याची योग्य दखल ब्लॉगर म्हणून उजव्या बाजुला आहेच....पण इथे कुणी भेदभाव करत नसताना वरचा तो स्त्री ब्लॉगर म्हणून झालेला शेळका उल्लेख सगळ्याच स्त्रीयांसाठी मला तरी खटकतोय आणि "ओळखीपाळखींचं" आणखी एक गलिच्छ वाक्य नाही म्हटलं तरी वाकुल्या दाखवतंय...
शिवाय असे रद्दी लेख लिहिणार्‍यांना ब्लॉग कसे वाचावे हेही शिकवायची संधी मिळतेय...एक स्त्री म्हणून मलातरी असं वाटतं की सुधारणेला सगळीकडे वाव असतो...अगदी नाठाळ मुलही आई बरोबर वठणीवर आणू शकते...अरे देवाने आम्हाला तसंच बनवलंय...म्हणून इतके दिवस पाहत बसले होते की या सदरात नक्की काय चालणार आहे....आता त्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरूवात केलेच आहेत तर होऊन जाऊ दे...
ह्म्म्म तर काय म्हणायचं होतं मला...हं...मनातलं....ब्लॉगर मग तो स्त्री असो की पुरूष का ब्लॉग लिहितो हे कळायचं असेल तर त्याची पहिली पोस्ट वाचा...कदाचीत तुम्हाला कळेल की त्याला/तिला हा ब्लॉग का सुरू करायचा आहे...

माझ्याबाबतीत म्हणाल तर मी इथे स्पष्ट म्हटले आहे की मला गप्पा मारायच्या आहेत...काय हरकत आहे?? फ़क्त पेज थ्री लोकांच्याच आयुष्याबद्दल गप्पा मारता येतात किंवा आदर्श राजकारण्यांबद्दल?? आमच्या साध्या-सोप्या-सरळ आयुष्यात काही होणारच नसतं का जे आम्ही मांडू शकतो??? स्वकीयांचं जीवनच तर आम्ही अनुभवतो नं मग लिहिलं त्यातल्या आपल्या आवडीवर ...केलं कौतुक भातुकलीच्या संसाराचं...किंवा मला आजोबा नाहीत म्हणून परदेशात भेटलेल्या एका आजोबांवर 
लिहिले चार शब्द ....बरं हे जाऊदे माहीत आहे मला मी काहीच करू शकणार नाहीये मी त्या शेतकर्‍यांसाठी पण जर त्यांचं दुःख माझ्या मनाला भिडलं आणि लिहिले मी चार मोडकेतोडके शब्द...हो आवडतात मला मी साजरे करायची ते सण आणि त्याबद्दलचे माझे अनुभव लिहिले मी .........लहानपणापासून गाणी ऐकतेय...आहेत त्याच्या आठवणी आणि मांडते त्या मी इथे ....हवी होती मलाही एक गोड बाहुली ती नाही मिळाली म्हणून दिला मी संदेश.....कुठे बिघडलं???
जास्त मी मी वाटतंय ???हो असू शकेल...पण त्यात फ़क्त कुणालातरी मला हे असं वाटतंय..तुमच्याकडेही काही शेअर करण्यासारखं आहे का बास इतकाच हेतू आहे...कुठेही अहंकार नाहीये....
बरं मी मी चं राहुदे...स्वकीयांच्या जीवनाशैलीची अपरिहार्यता जर एखाद्या सव्वीस जानेवारीला आठवली तर ते रद्दीत जाणार नाहीये...प्रत्येक सव्वीस जानेवारीला निदान एक तरी जण हे वाचुन जातो.....(हो दुपारच्या वेळीच)
देशाबाहेर असलो तरी देशात मराठीसाठी एखादा कौशल त्यासाठी काही करत असेल तर वाटते आत्मीयता आम्हालाही मग त्याने त्याच्यावर आपलं कौतुक केलं तर तेही ओळखीतुनच का??

तुझं नाही माझं नाही..लांब तिकडे इराणमध्ये कुणी स्त्री बंदी म्हणून डांबली जाते त्या अनुभवांच एक पुस्तक निघतं...कुणी दुपारी वाचू नये की काय??
एका दुपारी माझ्यादारावर टकटक करून माझ्या डोळ्यात अंजन घालणारी माझी शेजारीण माझ्या ब्लॉगवर येऊन जर आणखी चार माणसांच्या डोळ्यातही तेच अंजन घालू शकली तर त्यांच्या दुपारी काय कोमेजणार आहेत??? एका हळव्या क्षणी त्याच्या बॅकपॅकबद्द्ल वाटतं लिहावंस...काय करणार?? आवडतात मराठीतले काही कार्यक्रम..म्हणतो आम्हीही मस्त..मस्त..मस्त ..निदान असंबद्ध परीक्षण करून त्यांचं डोकं तरी फ़िरवत नसू आम्ही.......
खरं सांगु का या रेटने तर माझ्या ब्लॉगमधल्या कितीतरी पोस्टांचं महत्व मी या पोस्टमध्ये पटवून आणखी जाहिरात करू शकते..पण मुद्दा तो नाहीये.....आणि मुख्य हे मी दुपारी लिहित नाहीये...मला या जगातल्या दुसर्‍या कुठल्याही स्त्रीसारखं घरची, हापिसची, पोराबाळांची, मी या व्यतिरिक्त स्वतःसाठी करत असलेल्या अनेक गोष्टींची कामं पण आहेत..आणि सगळ्यात महत्त्वाचं  माझ्या १४२ फ़ॉलोअर्सना आणि सगळ्याच वाचकांना याची गरज नाहीये.....

राहिला प्रश्न ओळखी आणि पाळखींचा..पाळखींच माहित नाही पण ओळख केली की ती होते...२००९ नंतरचे माझ्यासारखे ब्लॉगर पाहिले तर त्यांच्या सुरूवातींच्या पोस्ट पाहिल्या तर चार बुकं नीट वाचलेल्या कुणालाही कळेल की हा मामला ओळखी-पाळखींचा नाही आहे....एक साईट आहे मराठी ब्लॉग्ज डॉट नेट नावाची तिथे सगळ्यांनी एकमेकांचे ब्लॉग पाहिले, वाचले, त्यांच्यातल्या समविचारींचे सूर जुळले आणि मग आपल्या लाडक्या ब्लॉगरला प्रतिसाद देणं आपसूक झाल....हे वाटेल ते झालं नाही आहे..योग्यच झालं..त्यातलेही काही संबंध राहीले काही नाही...काही नवेही जुळले गेले.....आमच्यासारख्या वाट्टेल त्या लोकांनी सगळ्यांना फ़क्त आपलं म्हटले...त्याचे टक्के काढायला मात्र कुणाला जमलं नाही.....

काय आहे आमचं गणित कच्चं असेल पण भाषा पक्की आहे..ती आणखी पक्की व्हावी म्हणून आमच्या भाषेत आम्ही लिहितो....हे लिखाण आणखी काही वर्षांनी बाकी कुणाला नाही तर निदान स्वतःला जबरदस्त आवडणार आहे याची निदान आज माझ्या ब्लॉगची जाहिरात करताना मी तरी सांगणार आहे....
कारण ही रद्दी नाहीये..यातल्या प्रत्येक पोस्टला काही न काही संदर्भ आहे...आणि इथे आलेल्या प्रत्येक कमेंटला अर्थ आहे....त्या त्या व्यक्तीची भावना आहे..आणि सगळ्यात मुख्य हे सारं माझं आहे..माझिया मनाचं आहे....मला कोणासाठी लिहावं लागत नाही...कुणी ते दुपारी वाचतंय का संध्याकाळी याची चिंता करावी लागत नाही...माझ्या स्वकीय/परकीय जे काय असेल त्या लोकांसाठी मी कदाचीत फ़ार काही करू शकत नसेन..पण जर त्याबद्द्ल मी काही लिहून थोडा-फ़ार अवेअरनेस निर्माण करू शकले तर त्याचं समाधान मला नक्कीच असेल...सगळ्यात मुख्य ते समाधान मिळवताना मला दुसर्‍या कुणाचेही पाय खेचून खेकडेगिरी करावी लागत नाही....

खरं तर एकमेकांचं कौतुक करूनच तर आम्ही ब्लॉगर लिहायला शिकलो नाहीतर इतकी वर्षे वर्तमानपत्रे वाचून ती नित्यनियमाने रद्दीत जातच होती की!!! त्याने ना कुणाच्या दुपारी स्पेशल झाल्या ना कुठल्या आदर्श गोष्टी व्हायच्या थांबल्या.....आणि सगळ्यात महत्वाचं न कुणाला मराठी ब्लॉगिंग करावंसं वाटलं...त्यामुळे रद्दीतले कागद वाचण्यापेक्षा माझंच लिखाण वाचते आणि म्हणते  जय हो ब्लॉगिंग....

Friday, March 23, 2012

पाडवा गोड झाला....

आठवणींच्या ब्लॉगवर जर आठवणीच काढल्या नाहीत तर काय होतं तसंच थोडंसं गेले काही महिने झालं होतं...म्हणजे जे काही सांगायला हवं ते थोड्याफ़ार प्रमाणात लिहायला लागलेय पण तरी लेखणी अर्धी म्यान असल्यासारखी....मग त्या दिवशी मैत्रेयीच्या वॉलवर तिच्या हाताने लिहिलेला एक शेर एक मुलगी पक्षी हातातून सोडतेय अशा चित्राबरोबर दिसला..तो शेर होता.....



चल दे देती हूं आजादी

मेरे इश्क कर आज
जिसे बांध को रखा था
दिल ने बरसों से
अब वो भी कर सकेगा आवारगी!

तिच्या त्या पोस्टला कमेंट देताना आपसूकपणे तिचीच एक आवडती गझल लगेच आठवली आणि मग अर्ध्या म्यान लेखणीला बाहेर काढायची आठवण आली....येस्स....गाणी.....माझ्याबरोबर गाणी नसती तर मला वाटतं मी कधीच हरवून गेले असते...
विशेष करून उत्तर अमेरीकेतल्या सहा महिन्यापेक्षा कमी-अधीक काळ असणार्‍या थंडीत....कारण किती नाही म्हटलं तरी ते वातावरण खूप जास्त मानसिक परीणाम करणं..एकवेळ कुणी आपल्याला काही बरं-वाईट बोललं तर ते विसरणं शक्य असतं पण हिवाळी, मळभी वातावरणावर निदान माझ्यासाठी तरी गाण्याशिवाय इलाज नाही....
अशाच एका थंडीत माझी ओळख मैत्रेयीबरोबर झाली....तिचं माझं नातं गुरू-शिष्येचं...माझ्या पेन्सिलव्हेनियातल्या वास्तव्यात माझ्यासाठी घडलेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एका घरगुती गणपती उत्सवात नरेंद्र चिरमुले यां एका अत्यंत गुणी तबलावादकाची ओळख होणं आणि मग त्यांनी माझ्यासाठी मैत्त्रेयीकडे पुन्हा गाणं शिकवायची विनंती करणं. म्हणजे बरीच वर्षे तिने आपलं घर-मुलं यासाठी गाणी शिकवणं सोडलं होतं. अर्थात गाण्याचे लोकल कार्यक्रम ती तेव्हाही करायची पण शिकवायचं थांबवलं होतं.
माझी तिची फ़ोनवरची भेट म्हणजे माझा मी करून दिलेला परिचय...खरं तर तिने काही न विचारता (आणि फ़ी पण न सांगता) तू ये मग जर आपल्या दोघींना जमत असेल तर हे करून पाहू अशा अर्थीचं बोलणं होतं. आता त्याआधीची माझी स्वतःची गानपार्श्वभूमी अशी काहीच नव्हती. निव्वळ गाणं ऐकायला आवडतं...हिंदुस्थानी क्लासिकल ऐकते थोडंफ़ार पण कळत काहीच नाही. तिला हे मी अगदी स्वच्छ शब्दात तिला सांगितलं आणि "सा रे ग म" पासून आमची शिकवणी सुरू झाली. तिला गुरूवार जमत होता म्हणून मग त्यादिवशी ऑफ़िसवरून घरी आलं की साडे सात ते साडे आठ अशी वेळ आम्ही ठेवली होती. साधारण दीड वर्षे म्हणजे आरुषचे पोटातले साडे-आठ महिने पूर्ण होईपर्यंत मी तिच्याकडे प्रत्येक आठवड्याला जात होते. त्यानंतर अर्थात आरुषचा जन्म झाल्यानंतर ते थांबलं आणि मग पुन्हा सुरू करायचा विचारही करायच्या आत अठरा महिन्यांच्या आरूषला घेऊन आम्ही पार ३००० मैल लांब आलो.
असो...तर हे नमनाचं तेल संपल्यावर गाण्याकडे वळायला हवं. मला वाटतं २००७ च्या हिवाळ्यात, मी आणि वंदना म्हणून आणखी एक विद्यार्थिनी माझ्याच बरोबर शिकायला यायची, आम्ही दोघी बरेचदा मैत्रेयीला नॉन क्लासिकलही म्हणायला लावायचो. आम्हाला शिकवताना तिला ऐकायची संधी सोडायची नाही असं आमचं न बोलता ठरलंच होतं जणू..आणि अशाच एका दिवशी स्वतः रचलेली आणि कंपोज केलेली एक गजल मैत्रेयीने आम्हाला ऐकवली.

इस विराने देस में न दिल लगे मेरा

रात है लंबी कब होगा सबेरा....

ही गजल पूर्ण ऐकली तेव्हा आमच्या दोघींच्या अंगावर काटा आला. आम्ही तिला ती पुन्हा गायला सांगितलं आणि तिच्या संमतीने ते रेकॉर्डही करून घेतलं..

आपण आपला देश सोडतो आणि अगदी देशातल्या देशातही दुसर्‍या प्रांतात जास्त काळासाठी जातो तेव्हा कधी ना कधी अशा लंबी रातेंचा सामना आपण केला असेलच ना? त्यात उत्तर अमेरीकेत तर हिवाळ्यात एकदा का घड्याळ मागे झालं की रात्री खर्‍या अर्थानेही मोठ्याच होतात. मी तेव्हा निरागसपणे मैत्रेयीला विचारलंही होतं, "क्या आपने ये गजल विंटर में लिखी है?" यावरचं तिचं प्रसन्न हसू मला आजही आठवतंय..



इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
ना कोई चहलपहल
बस कांच के महल
जाने क्यों जमा दिया मैंने यहां डेरा
रात है लंबी कब होगा सबेरा
ना लगे अपनापन
सब अपनी धून में मगन
जाने क्यों समझ बैठी
इस देस को मेरा........
इस विराने देस में न दिल लगे मेरा
रात है लंबी कब होगा सबेरा....
वरचे शब्द वाचले आणि तिच्या आवाजातलं गाणं ऐकलं की मला वाटत नाही आणखी काही सांगायची गरजही लागणार आहे.....आपापल्या सोयीने आपल्या एकटेपणाला हे गाणं सोबत करू शकतं आणि त्यासाठी परदेशातच असायला हवं असंही नाही आहे....आपले प्रश्न हे फ़क्त आपले असतात. या अवस्थेतून जेव्हा आपण जातो तेव्हा कदाचित आपणही यातल्या निदान दुसर्‍या कडव्याशी नक्की सहमत होऊ शकतो....
गेले कित्येक दिवस गाण्यांच्या आठवणी लिहीणं मी थांबवलं आहे..याचा अर्थ गाणी मनात वाजायची थांबली होती असा नाही पण लिहायचा तो मूड येत नव्हता. पण सगळ्यात वरच्या प्रसंगात म्हटल्याप्रमाणे मैत्रेयीशी तो संवाद सुरू झाला आणि गाणी सोडून अनेक विषयांवर आम्ही बोललो. त्याच बोलण्यांत मग मी तिच्याकडे हे गाणं ब्लॉगवर टाकायची परवानगी मागितली..तिने ती लगेच दिलीच आणि गाणंही लगेच उपलब्ध करून दिलं. मी तिच्याबरोबर नुस्त्या पेटीवर ऐकलेल्या गाण्यापेक्षा हे गाणं वेगळा परीणाम करतं..तिचा कसलेला आवाज आणि गाण्यातली समज मी तिची शिष्या म्हणून समजवण्याची माझीच पात्रता नाहीये..खरं तर मला आज हिंदुस्थानी क्लासिकल ऐकायची जी काही समज आली त्यात तिचाच वाटा आहे हे म्हणणं जास्त समर्पक आहे....पण आज या पाडव्याला, या ब्लॉगच्या वाढदिवशी, मला माझ्याच गुरूला माझ्या ब्लॉगवाचकांसमोर सादर करायला मिळणं यापेक्षा आनंद तो काय??
आयुष्यातल्या वेगवेगळ्या वळणांवर अत्यंत गुणी आणि मोठ्या उंचीवर जाऊनही ज्यांचे दोन्ही पाय खंबीरपणे जमिनीवर आहेत अशा अनेक व्यक्तींबरोबर मला प्रत्यक्ष शिकायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. मैत्रेयीचं स्थान त्या दृष्टीने माझ्यासाठी खूप मोठं आहे....आम्ही फ़क्त गुरू-शिष्या अशा कधीच नव्हतो..तिच्या घरगुती कार्यक्रमात तिनं माझी, "ही माझी पहिली शिष्या" म्हणून ओळख करून देणं माझ्यासाठी खूप मोठं आहे........
अजूनही मला जर परत पेन्सिलव्हेनियाला जायला मिळालं तर माझ्या स्वतःच्या घरासाठी जितकं जायला आवडेल तितकंच पुन्हा एकदा माझं गाणं सुरू करायला मैत्रेयीच्या घराची घंटी वाजवायलाही मला नक्की आवडेल...तो सुदिन येणार का माहित नाहीए पण आज हा पाडवा गोड करताना

May I take this pleasure to introduce my teacher, my guru, the best person I met who opened the big doors not just to Hindustani Classical music but help me take little steps in other aspects of day to day life mentoring me even now to take care of myself whenever I felt lonely in the other coast of US of A......

Ladies and gentlemen please put your hands together for Maitrayee Patel....:)



वरती तो व्हिडीओ आहे तिथे "इस विराने" नक्की ऐका आणि टाळ्यांचा प्रतिसाद मैत्रेयीपर्यंत जाऊद्या...:)



तळटीप . मैत्रेयीबद्दलची अधीक माहिती तिच्या साइटवर इथे आहे...

Tuesday, March 20, 2012

निळ्या छत्रीचा धडा अर्थात ब्लु अम्र्बेला

हिमाचल प्रदेशातलं एक छोटं गाव. तिथल्या खत्री स्टॉलचा मालक नंदू खत्रीची इंग्रजीत त्याचं भविष्य ऐकताना झालेली गंम्मत आणि मग लगेच पायावर ताल धरायला लावणारं "मेरा डेसू यहीं अडा" हे गाणं म्हणत येणारी गावातली चंदा गोळा करणारी छोट्या मुलांची टोळी याने सुरूवात होणारी ही गोष्ट....लहान मुलांचा एखादा चित्रपट असेल असं वाटून आणि खरं तर रस्किन बॉंड आणि विशाल भारद्वाज ही दोन भारदस्त नावं वाचली म्हणून पाहायला सुरू केलेला हा चित्रपट. दीडच तासाचा आहे ही माझ्यासारख्यांसाठी आणखी जमेची बाजू. शिवाय लहान मुलांना सांगितल्या गेलेल्या कथांमध्ये रमणारी मोठी मंडळी ज्या कुठल्या कॅटेगरीत मोडतात त्यातलीच मी. एखादी कथा जेव्हा दृकश्राव्य माध्यमातून आपल्यासमोर मांडली जाते तेव्हा तिची मांडणी, लोकेशन्स, पात्रपरिचय आणि पार्श्वसंगीत या आणि अशा सगळ्या तांत्रिक बाबीही जुळून आल्या की आपण त्या कथेचा एक भाग होऊन जातो. हा चित्रपट पाहताना तसाच काहीसा अनुभव मलाही आला.
इथे पहिल्या पंधरा मिनिटांत पंकज कपूर यांचा "नंदू" आणि श्रेया शर्मा या अत्यंत गोड दिसणार्‍या मुलीने तितकीच सुंदर सादर केलेली "बिनिया" या दोन व्यक्तिरेखा कधी ही कथा ऐकणार्‍यांच्या समुहात आपल्याला सामील करुन घेतात हे कळत नाही. बाकी व्यक्तिरेखा आणि हिमाचलमधल्या हा छोट्या गावाचं रूप हळूहळू अधोरेखित होतानाच या कथेची आणखी एक नायिका जिचं नाव या चित्रपटाला दिलंय ती म्हणजे एक जपानी पद्धतीची निळी छत्री अर्थात "ब्लु अम्ब्रेला"ही लगोलग अवतरते आणि कथा आकाराला घेते.
नंदुचा ती चहा-पाण्याची टपरी सोडून एक आणखी आवडता उद्योग म्ह्णजे गावातल्या लोकांना (किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्याच्याकडे गोळ्या-बिस्किटं घेणार्‍या छोट्या मुलांनाही) उधार पैसे देऊन मग ते परत घ्यायच्या वेळेस दुसरं काही ना काही मागत बसायचं किंवा हडपायचं. हे अर्थात सगळ्यांना माहित आहे पण तरी कुणी नं कुणी बकरा त्याच्याकडे असतोच. चित्रपटाच्या सुरूवातीलाच एका लहान मुलाकडून दुर्बिण बळकावण्याचा त्याचा प्रयत्न पाहिला की हे आपल्यालाही स्पष्ट होतं. "लोणचं" ही त्याला अत्यंत आवडणारी गोष्ट. त्याला आता ही गावात सगळ्यांना हेवा वाटणारी बिनियाकडे असणारी छत्री स्वतःकडे हवी असावीशी वाटणं साहजिकच आहे. बिनियाला तो वार्षिक खाऊचं आमीष दाखवून ती मिळवायचा एक केविलवाणा प्रयत्न करतो त्या प्रसंगात त्या दोघांचा अभिनय, संवादफ़ेक पाहण्यासारखी आहे. इथे हा चित्रपट आपली पकड आणखी मजबूत करायला प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण चित्रपटाला जे विनोदाचं अंग दिलंय त्याने आपल्याला हे सर्व अनुभवतानाची मजा येते.....कुठल्याही लहान गावात कदाचीत अजुनही अशा प्रकारचे प्रसंग होत असतील अगदी असंही वाटून आपण या चित्रपटाशी आणखी समरस होतो...
अर्थात बिनियाही अतिशय हुशार पोरगी आहे. ती काही त्याला दाद लावू देत नाही. तिची ती भूरळ घालणारी निळी छत्री आपल्यालाही भूरळ घालू लागते. या संपुर्ण चित्रपटात आपल्या चेहर्‍याने प्रेक्षकांच्या ह्रदयाला हात घालणारी ही मुलगी फ़ार मनात बसते. तिची विधवा आई जेव्हा ही छत्री कुणा पर्यटकाने ही छत्री अशीच कशी दिली असा तिच्या मागे लकडा लावते त्यावेळी तिच्या पहेलवान भावाने स्वतः अस्वलाच्या दाताचं आणलेलं लकी लॉकेट देऊन घेतलेल्या छत्रीवरचं तिचं प्रेम चित्रपटात जागोजागी दिसतं...त्यानंतर या छत्रीने नेमकं ती तिच्या भावावर हल्ला करायला आलेल्या सापाला पळवून लावते आणि अर्थातच या छोट्याशा गावात ती आणि तिची छत्री याचं कौतुक जास्तच पसरतं. छत्री घेऊन तिच्याबरोबरच्या इतर मुलामुलींबरोबरचं गाणं हे चित्रपट पाहताना आपल्याही मनात रुंजी घालतं...आपणही नकळत म्हणतो "कुक कुकडी कुक, कुक कुकडी कुक".
आता अर्थातच अपेक्षेप्रमाणे ही छत्री हरवते आणि मग त्यानंतरची इतर चित्रपटात प्रेमभंग झालेली नायिका असते तशीच भकास बसलेली बिनिया आणि तिचं सांत्वन (अर्थात बाहेरून) करणारे नंदू आणि गावातल्या इतर काही व्यक्तिरेखा ज्यांना आधी फ़ार फ़ुटेज न खाता व्यवस्थित ओळख करून देण्यात आलंय. जसं अपेक्षेप्रमाणे ही छ्त्री हरवते तसंच अपेक्षेप्रमाणे जेव्हा ती अवतरते तेव्हा किंवा त्याआधी ती नंदूने घेतली असेल असं आपल्याला वाटू न द्यायचं काम दिग्दर्शकाने आधीच्या काही प्रसंगात नंदूचं "चोरी करना पाप है" किंवा त्याचं त्या छत्रीची बाजारतली किंमत काढणारा नंदू या सगळ्याने कमी होतो. पण तरीही बिनिया त्याच्या पोलिसांना घेऊन त्याच्या दुकानावर छापा घालते आणि इथे हा चित्रपट किंवा ही कथा बालकथेतून आपल्याला बाहेर काढून मोठ्या माणसांच्या खर्‍या जगात घेऊन येते.
छत्री अर्थातच नंदूच्या दुकानात सापडत नाही पण झालेल्या अपमानाने त्याच्याबरोबर आपणही व्याकूळ होतो. अर्थात आता ही छत्री जोवर येणार नाही तोवार आपण लोणच्याला हात लावणार नाही असं सांगून गावच्या लोकांसमोर लोणच्याची एक बरणी फ़ोडणारा नंदू पाहिला की चित्रपट पाहणार्‍या आपल्यासाठी मात्र थोडं हलकं होऊन जातं. थोडसं पु.ल.देशपांड्याच्या भानावर आलेल्या गटण्याप्रमाणे...:)
या पार्श्वभूमीवर "पर्बतों पे बर्फ़ा बरसा लागे" हे गाणं हिमाचलमधला विंटर समोर आणतो...त्या हिवाळ्यात छत्रीच्या आठवणीने उदास झालेली बिनिया दिग्दर्शकाने अतिशय मार्मिकपणे टिपली आहे.
दुसर्‍याच काही क्षणात पुन्हा ऋतु बदलतो आणि स्वच्छ सुर्यप्रकाशात तशीच गुलाबी छत्री नंदू गावच्या लोकांच्या समोर टाळ्यांच्या गजरात काढून कथेचा पुढचा टप्पा गाठतो. आता आधीचे काही अतृप्त आत्मे जसे लिलावती आणि तिचा नवरा यांना लोणच्याच्या बदल्यात छत्री भाड्याने देणे वगैरे उद्योग किंवा सगळीकडे ती छत्री मिरवणे हे त्याच्या शब्दात सांगायचं तर आत्मा संतुष्ट करायचे उद्योगही सुरू करतो. गावात अधेमधे येणारी चित्रपटवाली मंडळीबद्दलचे प्रसंगही कथेत थोडीफ़ार मीठ-मिरी घालतात.
आणि मग येतो तो शेवटच्या वळणाआधीचा टप्पा. बिनियाने घेतलेला वेगळ्या पध्दतीने छत्रीचा शोध..यावेळी खरा चोर सापडतो आणि अर्थातच तो नंदूच असतो (ती ते कसं शोधते हे लिहिण्याचा मोह मी टाळते कारण जवळजवळ सगळीच कथा या पोस्टमध्ये आहे) पण यावेळी गावकर्‍यांनी त्याला आधी दिलेल्या मान-मरातबामुळे तो चोरच नाही तर खोटारडाही ठरतो आणि सगळं गाव त्याला वाळीत टाकतं...इथे पुन्हा एकदा हिमाचलमधला हिवाळा...देवदार वृक्षांवरून बरसणारा बर्फ़ आणि आधीचं हिरवगार असणारं आता पांढरंशुभ्र झालेलं कुरण हे दिग्दर्शन  चित्रपट आतपर्यंत पोहोचवायला खूप मदत करतं....
त्यानंतर जे काही प्रसंग दाखवलेत त्यात हवालदिल होऊन मुलांना फ़ुकट चॉकोलेट देऊ करणारा आणि मग मुलांच्या "नंदकिशोर छत्रीचोर" अशा ओरड्यामुळे त्यांच्या मागे लागणारा नंदू....गावकर्‍यांच्या घालून-पाडून बोलण्याने चेहरा पाडून घेणारा नंदू...तो एका ठिकाणी दाढी करायला जातो तेव्हा न्हाव्याला "तिनका जरूर निकाल देना" किंवा त्याने देऊ केलेलं अस्वलाच्या दाताचं लॉकेट नाकारताना "चोरी का होगा तो कहीं भालू न पिछे पडे" अशा प्रकारे त्याला चिडवण्याची संधी न सोडणारे गावकरी या अशा प्रसंगातून त्याचं दीनवाणेपण समोर येतं तसं तसं आता याचं काय होणार हे आपल्यालाही कळत नाही. नकळत या इतक्या छोट्या छत्रीमुळे एखाद्या माणसाचं झालेलं हरण कुठेतरी आपल्याला आजुबाजुलाही असं कुणाला वागवलं जात असेल तर त्याचं कसं होत असेल हा एक अ‍ॅंगल दाखवून देतो.
आता पुढे काय हे आपल्याला जास्त विचारात न पाडता एक सुखद वळण कथाकार आपल्यासमोर घेऊन येतो. हे सगळे प्रसंग पाहून खूप विचार करणारा बिनियाचा चिमुकला जीव यावर एक सुंदर उपाय काढतो आणि नंदूच्या दुकानात असंच काही काम काढून जाताना ती छत्री तिथेच ठेऊन येते. छत्रीमुळे तावून-सुलाखून निघालेला नंदू तिला ती छत्री परत द्यायला जातो आणि आपल्या सुंदर हास्याने ती त्याच्याच लकबीत त्याला ती छत्री स्वतःची नाही म्हणून सांगते...खूप गोड वाटतं तिचं ते "बाय चान्स".....

त्यानंतर मग सुरुवातीला म्हटलेला तो इंग्रजीतलं भविष्य ऐकायच्या प्रसंगाने ही कथा एका चांगल्या वळणावर येऊन संपते....खत्रीच्या स्टॉलचं नाव छत्री स्टॉल झालेलं असतं....
गोष्टी ऐकायला ज्यांना आवडतं त्यांना गोष्टीचा हा दृक-श्राव्य परीणाम जरूर आवडेल. कुठल्याही चित्रपटाच्या कथेत न म्हटलेले संवाद हे पार्श्वसंगीत भरून काढू शकतं असं विधान करायचं असेल तर ब्लु अंम्ब्रेलाचं अप्रतिम पार्श्वसंगीत त्या छोट्या गावातल्या हिवाळ्यात आपल्याला नेऊन सोडतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या गोष्टीचा बाऊ करून एक जीवन उदासीनतेच्या वाटेवर लागलेलं असतं त्यावर एक छोटीशी मुलगी किती निरागसपणे उपाय करू शकते हा संदेशही सोप्या भाषेत हा चित्रपट देऊन जातो.
हा चित्रपट मी या हिवाळ्यात एकदा आई आणि एकदा बाबा दोघांबरोबर पाहिला आणि दोघांनाही तो खूप आवडला. २००५ मध्ये आलेला चित्रपट मला नेटफ़्लिक्सवरच्या सजेशन्स मध्ये आला होता...ज्याने कुणी ही सजेशन्सची कल्पना सुरू केलीय त्याचे आभार आहेतच. विशाल भारद्वाज जो लहान मुलांसाठीच्या "मोगली"मुळे मला तेव्हापासून आवडायचा त्याचं सादरीकरण हे या चित्रपटाचं यश आहे. यापूर्वी मी ज्यांना वाचलंय पण आठवत नाही अशा लेखकांमध्ये रस्किन बॉंड यांचं नाव आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचं साहित्य मिळवून वाचायचाही प्रयत्न आहेच. त्याबद्दल जर कुणाकडे अधीक माहिती असेल तर नक्की द्या...आणि हो आपणही हा चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला तो कसा वाटला ते नक्की कळवा....:)