इतक्यात आमच्याकडे एक (किंवा एकदाचा) "बोस" आला(की आली???)...गेली बरीच वर्षे आपण बोस घेऊया बोस घेऊया म्हणून (अर्थातच) नवरा मागं लागला होता...त्यासाठी बोसच्या आउटलेटमध्ये त्याचा डेमो पहा, मग मला पटवण्यासाठी ’अगं, तू बोसला नाही म्हणतेस म्हणजे एका भारतीय कंपनीला नाही म्हणते...हे बोस म्हणजे आपले सुभाषचंद्र कसे बोस? तसेच कोलकोतावाले..बघ विचार कर’ ही आर्जवंही झाली होती...त्यांच्या लकी ड्रॉमध्ये कार्ड टाक असले उद्योगही करुन थकलो. याचा हट्ट काही संपेना आणि मग माझं "जाऊदे रे खूप महाग आहे..शिवाय त्यांचा डेमो फ़क्त त्यांच्या त्या विशिष्ट डिव्हीडिसाठीच छान वाटतो" असली आणि नवनवीन कारणं देऊन त्याला मागं सारणं आणि त्याचं पुन्हा पुन्हा हट्ट करत राहणं हे सुरुच होतं...
मग आम्ही घर घेतलं तेव्हा नेमकं लिव्हिंग रुमला टिव्ही ठेवण्याच्या जागेच्या अनुषंगाने आतून सराउंड साउंड सिस्टिमसाठी वायरिंग वगैरे सगळं तयार होतं फ़क्त तशा सिस्टिमची (किंवा याच्या भाषेत "बोस"ची) कमी होती...फ़क्त यावेळी ’स्वतःचं घर’ या मुदलातच खूप पैसे खर्च झाल्याने मग पर्यायच नाही म्हणून त्यातल्या त्यात स्वस्त सोनीची एक सिस्टीम आमच्या घरी आली..मग कधीही सराउंड साउंडवाले चित्रपट पाहताना गाडी डावीकडून उजवीकडे जाण्याचा आवाज यासारखे साउंड इफ़ेक्ट (माझ्यामते) व्यवस्थित ऐकू येत असले तरी ’अगं, बोस असता तर अजून छान ऐकायला आलं असतं’, अशा हृद आठवणी येतच आणि मग काही सुचलं नाही तर आपण भारतात परत जायच्या आधी (म्हणजे कधी????-इति मी) घेऊ, तिथे जास्त महाग पडते वगैरे गप्पा चालायच्या..मी काय आता लग्नाला काही वर्षे झाल्यावर जो सराईत कान असतो त्याने ऐकून दुसर्या आणखी सराईत कानाने ते सोडून देई...आणि ही असली संभाषणं अगदी इतक्यात घर सोडून ओरेगावात आलो तरी सुरुच होतं...(आणि अर्थातच माझं ए.का.ऐ.दु.का.सोडून देणंही)
आणि त्यादिवशी त्याने चक्क मला विचारलं नाहीतर सांगितलं, "मी बोस घेतलीय..." बापरे हा पण आता सराईत नवरा कॅटेगरीत गेला वाटतं..मी उडालेच...किंमत विचारायची माझी हिंमत झाली नाही...मी फ़क्त आवंढा गिळत "खरंच??" प्रश्न (कम राग) चिन्ह...."अगं जवळजवळ ३० % कमीला पडलीय़" "जूनी(इsssssssssss जरा ताणूनच)???" उत्तरादाखल "म्हणजे हो आणि नाही" बापरे हे काय नवंच?? कारण इथे जुनं सर्रास घेतलं जातं पण ही(म्हणजे आमचे ’अहो’) तुपाशी खाणारी कॅटेगरी इतक्या सहजी जूनी भानगड घेणार नाही हे मला साधारण माहित होतं...पण आजकाल वैताग घालवायचा असेल तर मी कमीत कमी प्रश्न विचारते म्हणजे मग न विचारल्या प्रश्नांची उत्तरंही आपसूक मिळतात...असो..
तर शेवटी हा नवाच बोस घरी आला आणि वरील भानगडीची उकल झाली. ही सिस्टिम म्हणजे त्याचा बास, पाच स्पिकर्स सगळं त्याच्या मूळ बॉक्समध्ये आणि मॅन्युअल तर उघडलेलंही नाही...नक्की स्वस्त पडली नं रे?? का बरं विकली असेल?? अशी प्रश्नचिन्हं मनात घेऊन मी होतेच, तेवढ्यात याने सांगायला सुरुवात केली..ही सिस्टीम ज्याची आहे त्याचा डिव्होर्स झाला आणि सेटलमेन्टमध्ये घर त्याच्या बायकोला गेलं आणि त्यात व्यवस्थित माउंट केलेली याने घेतलेली बोस त्याची त्याच्या कस्टडीत आली...कस्टडी हा मुद्दाम वरीजीनल श्टोरीतला तसाच ठेवला आहे..आतापर्यंत मला मुलांची कस्टडी माहीत होती पण नवर्यांच्या राज्यात साउंड सिस्टीम पण पोर या कॅटेगरीतच मोडणार म्हणा..असो..तर ही सेटलमेन्ट होईस्तोवर पठ्याने स्वतःच्य नव्या घरी सगळं इंटरनल वायरिंग इ. करुन नवा बोस घेऊनही टाकला होता आणि इथे जुन्या घरात असलेल्या बायकोला सगळं छान सेट केलेल्या त्या सिस्टिमला द्यायला बहुधा जीवावर आलं होतं...होता होता तिने मूळ सिस्टीम तशीच ठेवली आणि याला कॉम्पेन्सेशन म्हणून तशीच दुसरी सिस्टीम घेऊन दिली...आता ही नवी सिस्टीम घेऊन हा काय करणार म्हणून त्याने ती मिळेल त्या किमतीला विकली....काय देश आहे....एकतर भांडतात, वेगळं होतात, त्यात मग अशा वस्तूंवरचं प्रेम, हक्क जे काही असतं त्यातल्या भानगडीत पैशाची (आणि खरं तर वस्तूंचीही) नासाडी करत राहतात...आपण पडलो देशी बनावटीचे...भांडलो तरी एकत्र राहून परत कशावर किती खर्च करायचा म्हणत राहतो आणि मग कधी तरी नशीबाने होतं, ’दोघांच भांडण आणि तिसर्याचा लाभ’ किंवा सुधारीत भाषेत ’गोर्यांच भांडण आणि देशींचा लाभ’.....
आम्हाला पण म्हणजे नवरोबाला ’बोस’ घ्यायची आहे. परत अशी कुठे स्वस्तात मिळाली तर माझ्यासाठी पण एक घेवुन टाक, बरं का! :)
ReplyDeleteसोनाली
हा हा... ;)
ReplyDeleteसेटलमेंट मधे बोस ची सिस्टीम?
ReplyDeleteपण एक आहे. बोसला पर्याय नाही.. ( आयुर्विम्याला पर्याय नाही त्या प्रमाणेच) मी एक लहानसा आयपॉड डॉक घेतला तर चक्क १४ हजार लागले . आहे महाग, पण क्वॉलिटी बेश्ट!!
हे हे... सहीच...!!! :D
ReplyDeleteबोस घेतल्याबद्दल अभिनंदन! बोसच्या सिस्टीम मधून सिनेमातले आवाज किंवा गाणी ऐकणे हा अवर्णनीय आनंद आहे. आमच्या संसारातील पहिली बचत आम्ही बोस घेण्यासाठी वापरली होती :) दुर्दैवाने आता त्यातला रीसिवर बिघडला आहे आणि भारतात दुरुस्त करणारा सापडत नाहीये, म्हणून बिचारे बोस खोक्यात बंद आहेत :(
ReplyDelete-निरंजन
सोनाली, ब्रेक के बाद स्वागत... सगळ्याच नवर्यांच्या लिस्टवर बोस एकदम टॉपला आहे असं दिसतंय...बघते आणखी एखादा बकरा मिळतो का...:)
ReplyDeleteधन्यवाद विशाल आणि मैथिली..
ReplyDeleteअहो काका त्यांच्या सगळ्या संसाराची अर्धी अर्धी वाटणी झाली असणार नं किमतीच्या हिशेबात?? त्यात तिला घर आणि याला सिस्टिम आणि अजून काही आलं असेल..त्यातही तो स्वतः घर बांधणाराच का काय होता म्हणून त्याने लगेच दुसरं घर त्यात नवी सिस्टीम इ. लगेच करुन घेतलं...असो...ते तुमचं आयुर्विम्याला पर्याय नाही हे यकदम पटलंय...:)
ReplyDeleteअगदी बरोबर निरंजन...पं.झाकीर हुसेनचा तबल्याचा बोल न बोल ऐकताना ते कळलंच म्हणा की पैसा वसुल आहे म्हणून....अर्थात पाकीटही बर्यापैकी हलकं करुन जातात हेही खरं...तुमची बोस भारतात दुरुस्त होऊ शकत नाही यावर खरं विश्वास बसत नाहीये..म्हणजे इतके दिवस मला वाटायचं आपल्याकडचे कारागीर इतके हुशार आहेत की त्यांना काहीही खराब करुन दिलं तरी ते ठीक करुन देतील... पण मग दुसर्या कंपनीचा रिसीवर आणि बोसचे स्पीकर असं कॉम्बो पाहिलंत का?? चालत असेल तर निदान बॉक्समधला अर्धा माल बाहेर येईल...
ReplyDeleteवा वा सहीये.. २-३ वेळा बोसचे डेमो ऐकले होते त्यांच्या शोरूम मध्ये जाऊन.. तेवढाच काय तो बोसशी संबंध :) .. पण जाम सही वाटतं ऐकायला..
ReplyDeleteबाकी, अजून असेच गोरे भांडत राहोत आणि बोसांची अजून रत्नं तुमच्या घरी येओत या शुभेच्छा.. ;)
हा हा... हे झकास झालं गं. पुन्हा त्या दोघांकडेही बोस आहेच आणि तुमच्याकडेही आला. सो तिघांचाही लाभच लाभ.:D बाकी बोसला पर्याय नाहीच. :)
ReplyDeleteकाय गंमत आहे... आमच्याकडे सुद्धा ह्या ब्रेकमध्ये 'बोस'चे वारे वाहत होते... (परत गेलो की अतिवेगाने वाहणार आहेत..) मी नाही मात्र शमिकाला बोस हवे... :) येणार बहुदा लवकरच... आहे का अजून कोणी डिवोर्स झालेला??? हा हा हा ... :D म्हणजे मला पण ३० टक्के सूट मिळेल ना!!!
ReplyDeleteहा हा हा...नवरा बायकोच्या काडीमोडात साऊंडसिस्टिमची कस्टडी????बाकी गोरे काय वाट्टेल ते करतील यात शंकाच नाही.
ReplyDeleteअपर्णा अभिनंदन...गोरे असच भांडत राहो...:):)
ReplyDeleteबोस केवल नाम ही काफी है...
ReplyDeleteत्याचा केवळ हेडसेट ७०००/-चा पाहीला होता.. सध्या तरी अशक्य कितीही मनात असलं तरी....
गरीबांचा बोस "सोनी" वर समाधान ;)
हा हा हेरंब..एक रत्न आलंय तितकं पुरे...बोस ३०% नी स्वस्त पण बर्यापैकी खिसा कापून जातं रे....
ReplyDeleteलो कल्लो बात भाग्यश्रीताई...तिघांचा लाभ विसरलेच होते बघ मी...:)
ReplyDeleteरोहन तू हे शमिकाच्या नावावर खपवत नसशील अशी खात्री आहे मला....पण तरी तुझा नंबर दुसरा आहे..सोनालीने अगदी लेख टाकल्या टाकल्या नावनोंदणी केली आहे....:)
ReplyDeleteहा हा शिनु, अगं ते "कस्टडी" प्रकरण खास माझ्या नवर्याच्या श्टाइल मधलं आहे....त्याला तसंही मला पटवण्यासाठी ही कथा अम्मळ रंगवूनच सांगावी लागली नं??
ReplyDeleteयोगेश आभारी...:)
ReplyDeleteआनंद एकदम बरोबर बघ...खरंतर मला अख्ख्या सिस्टिमपेक्षा तो हेडसेटच जास्त आवडतो..पूर्वी कामासाठी बरंच फ़िरणं व्हायचं तेव्हा एअरपोर्टवर पाहताना मनात होतं घ्यायचं पण राहिलंच...आणि हे गरीबांचा बोस आक्षी खरंय बग...
ReplyDeleteसहीच लिहिलयंस!
ReplyDeleteआणि ती घटस्फोटाची गोष्ट खूपच 'आवरा' कॅटेगरीतली आहे! ;)
हे गोरे काय काय करतील ना खरंच!
धन्यवाद बाबा...अरे यांच्या घटस्फ़ोटाच्या काही काही गोष्टी खरंच "आवरा" कॅटेगरीतल्या असतात.....माझ्यापेक्षा तू जास्त छान लिहू शकला असतास....:)
ReplyDeleteलेख उत्तम वाटला ,बोस आवडला असणारच गाणी एकण्यासाठी व इतरहि बॉसचा उपयोग होणारच ,गोरेचे भाडन असेच चालू द्या महेशकाका
ReplyDeleteमावशीबोलीतल्या कवितांसाठी तुला ’खो’ दिलाय!
ReplyDeleteमहेशकाका धन्यवाद...सध्यातरी बालहट्टाची गाणी आणि "निमो"चा धमाका सुरु आहे..पण एकदा शांत चित्ताने मनसोक्त गाणी ऐकायची आहेत मलाही...
ReplyDeleteमीनल सध्या कामांमुळे माझ्या ब्लॉगची अवस्था पाहिलीस तर त्यालाच एक मोठा खो देऊन कुणा जबाबदाराला सांभाळायला द्यावं म्हणते...:) पण तू माझी आठवण काढल्याबद्द्ल धन्यवाद...
ReplyDelete