Thursday, July 8, 2010

दर्शन

तसं पाहायला गेलं तर मी नास्तिक नाही पण फ़ार देव देव केलं जातं असंही नाही.रोज सकाळी आंघोळीनंतर देवाच्या पाया पडायचं आणि एक स्तोत्र म्हणायचं हे अंगवळणी पडलंय. त्यात आस्तिकतेचा भाग किती आणि खरा भाव किती असंही कधीकधी स्वतःबद्द्ल स्वतःलाच वाटत. पण तरी देवाच्या पाठी जाणार्‍यांपैकी नाही. खरं तर आमच्या भागातल्या एका सुप्रसिद्ध साईमंदिरापास्नं माझं घर फ़ारच जवळ तरीही जेव्हा लोकं स्टेशन ते देऊळ पायी असं काही गुरुवारी करायचे, तेव्हा मी त्या बाजुला फ़िरकतही नसे. मात्र एखाद्या मधल्या दिवशी वाटलं की गाभार्‍यात जाऊन बसायला चांगलंही वाटे.


देश सोडल्यानंतर मात्र उगाच देवळात जात नाही याची उगाच चुटपुट का हे मात्र कळत नाही.आतापर्यंत जिथे कुठे राहिलो तिथे देऊळ किमान ३० मैल तरी लांब त्यामुळे मग जाणं महिन्यात एकदा वगैरे. त्यात माझा नवरा पडला पक्का देऊळवाला म्हणजे सोमवारी किंवा मंगळवारी देवळात गेलं नाही की त्याला कसंतरी व्हायचं आणि मला ऑफ़िसमधुन आल्यावर पटापट स्वयंपाक करुन मग ते ३० मैल तुडवत जा आणि भुकेल्या पोटी परत या ही एक प्रकारची शिक्षा वाटायची..पण तरी जमेल तसं जायचो.

आता ओरेगावात मात्र देऊळ त्यातल्या त्यात जवळ म्हणजे साधारण १०-१२ मैलावर आहे त्यामुळे दर आठवड्याला जायचा प्रयत्न करतोय तरीही काहीना काही तरी कारण निघतेच आणि जाणं राहातं...परवा मात्र ठरवलंच जायचंच. मग निघालो आणि हिंदु टेम्पल की स्वामी नारायण हा पुढचा प्रश्न होता.(अरे हो सांगायचं राहिलं इथे एकाच गावात ही दोन देवळं आहेत.) मला स्वतःला स्वामी नारायणाच्या देवळात जायला आवडत नाही आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे तिथे अगदी चपला काढायच्या जागेपासून स्त्री-पुरुष अशी विभागणी असते. मग दर्शनालाही तसंच वेगळं वेगळं राहायचं आणि जास्त गर्दी असेल तर मग परत चक्क बाहेरच भेटायचं.

शिकागोला एक मोठठं स्वामी नारायणाचं देऊळ आहे आणि त्याचा जीर्णोद्धार करुन बाजुला पुन्हा जवळ जवळ महालासारखं दुसरं देऊळही बांधलंय. तिथे मी निव्वळ खालच्या कॅफ़ेटेरियात समोसा चांगला मिळतो आणि त्यांची शुद्ध तुपातली मिठाई, फ़रसाण इ. नवर्‍याला आवडायचं म्हणून दोन-तीन महिन्यांत एकदा जायचे. असो.

या पार्श्वभूमीवर जेव्हा नवरा म्हणाला की आज स्वामी नारायणाच्या देवळात जाऊया तेव्हा मी विचार केला "जाऊया आणि येताना काही विकतचा खाऊ घेऊन येऊया". पोहोचलो तेव्हा नेमकं दर्शनाचे पडदे बंद करण्यात आले होते. मला वाटतं सायंआरतीच्या आधीची काही पद्धत असावी किंवा तिथल्या एका बाईचं गुजराती कानावर पडलं त्याप्रमाणे "भगवान जमेछे" म्हणजे देव जेवताहेत त्यासाठी असेल. मग आम्ही आपापल्या विभागात खाली बसलो. मी सवयीने मनातल्या मनात गणपती स्तोत्र म्हणायला लागले. कधी उघडणार यासाठी नवरा नेत्रपल्लवी करतोय (याला देवळात येण्याइतकीच बाहेर पडण्याची पण हौस) तोच सरकन पडदा बाजुला झाला आणि सोन्याचा मुलामा दिलेल्या दालनात पिवळ्या धमक प्रकाशात निळी वस्त्रं ल्यालेलं राधा-कृष्णाचं रुप इतकं मोहक वाटत होतं की बाकीच्या जगाचा विसर पडावा. त्यांच्या बाजुला दिमाखात उभे असलेले स्वामी नारायण आणि आणखी एक स्वामीही त्याच निळ्या वस्त्रात जणू आपल्याकडे पाहुनच स्मित करताहेत असं वाटावं. त्यांच्या उजवीकडची राम-सीतेची जोडीही पिवळ्या तेजात न्हाऊन स्मितहास्य करून त्यांचं लक्ष फ़क्त आपल्याकडेच असावं असं भासवत होती.अगदी डावीकडचे गणपती आणि शंकर-पार्वतीची जोडीही इतकं सुंदर हास्य ल्याली होती की आपला सगळा अहंकार गळून पडावा. "ठीक आहे गं तुला या देवळात यायला मनापासून आवडत नाही पण आम्ही तर तेच आहोत नं आणि सदैव तुझ्या पाठीशी" असं काही ते सांगत तर नसावेत नं? आज नेहमीपेक्षा जरा जास्तच वेळ मी या मुर्ती आणि त्यांचा साजशृंगार अगदी मनापासून पाहात, सरळ लक्ष केंद्रित करुन बसले होते.

इथे अमेरिकेत याआधी काही दाक्षिणात्य पद्धतीच्या देवळांमध्येही हा अनुभव एक-दोनदा आल्याचं आठवलं. काही पुजारी इतकं छान सजवतात की देवाला अगदी पाहात राहावं आणि भान हरपावं. डेलावेअरच्या हिंदु टेम्पलमध्ये पडदा उघडल्यानंतरचं लक्ष्मीचं रुप एकांतात आठवलं तर शहारा येतो. एकदा सोमवारी पिंडीला अभिषेकानंतर भस्म विलेपल्यानंतरचं रुपही पाहिलं आणि मंत्रमुग्ध झाले. आज स्वामी नारायणाकडे हाच अनुभव आला.

देवळात गेल्यावर देवाचं दर्शन हा तसा देवळात जायचा उद्देशच पण देवानं आधी वाट पाहायला लावून नंतर दिलेलं आताचं हे आणि अशीच दर्शनं मात्र कायम मनात राहतील आणि मग आपण आस्तिक नास्तिक की मधले? असे प्रश्न आपसूक विसरले जातील.उरेल तो निस्सीम भाव आणि कुठल्या तरी अकल्पित जागी पोहोचलेलं मन.

25 comments:

 1. सुंदर झालीये पोस्ट..

  वेगळीच एकदम.. अनलाईक अपर्णा..

  ReplyDelete
 2. खरंय हेरंब..त्यादिवशी मंदिरात मलाही तसंच वाटलं की this is unlike Aparna....:)
  धन्यवाद...

  ReplyDelete
 3. एक वेगळी पोस्ट. छान जमली आहे

  ReplyDelete
 4. धन्यवाद महेंद्रकाका. त्यानिमित्ताने आपलं दर्शन ब्लॉगला झालं....:)

  ReplyDelete
 5. मस्त झाली आहे पोस्ट!!

  ReplyDelete
 6. धन्यवाद योगेश.

  ReplyDelete
 7. मी आस्तिक की नास्तिक या बद्दल माझं मलाच अजुन कळ लेल नाही. मी देखील प्रार्थना करतो ती एकद म यांत्रीक पणे. केवळ लहानपणापासून लागलेली सवय म्हणून. पण नाही केली तर चैन पडत नाही. कुठेतरी भीती वाटते. देवळात गेल्यावर देवापेक्षा देवाच्या नावावर आपल्या पोत ड्या भरणारे जास्त दिसतात निर्मनुष्य जंगलातल्या एखाद्या देवळातल्या गाभा र्‍या त जी शांतता अनुभवायला मिळते ती शहरातल्या झग मगीत प्रसिद्ध मंदिरात नाही. प्रॅक्टिकली विचार केला तर देव, धर्म, रूढी, परंपरा याबाबत असंख्य अनूत्तरीत प्रश्न मनात आहेत. आज तुमची पोस्ट वाचून हे सगळं पुन्हा आठवलं.

  ReplyDelete
 8. खरंच अनलाईक अपर्णा. हेरंब + १
  सुंदर लिहिले आहे.

  ReplyDelete
 9. मस्त झालीय पोस्ट...
  हेरंब +१

  ReplyDelete
 10. धन्यवाद सिद्धार्थ. मला वाटतं आपल्या पिढीतल्या बर्‍याच जणांचा हा गोंधळ असेलच...त्यादिवशी दर्शन घेताना मला ते प्रकर्षाने वाटलं आणि मग आपसूक ही पोस्ट लिहिली गेली....(आता मला कळलं की कविता सुचते असते असं लोक का म्हणतात...लिहिणंही असंच होतं...:))

  ReplyDelete
 11. धन्यवाद आनंद आणि बाबा...हेरंबला सांगितलंच आहे काय ते...:)

  ReplyDelete
 12. लेख सुंदर आहे, नास्तिक जरी नसला तरी आपली(सर्वांची ) देवावर श्रद्धा आहे हे काही कमी नाही? नुसत नामस्मरण केले तरी पुरे,श्रद्धा असावी पण अंधाश्रद्धा नसावी ,इतर दिवशी आपणास चांगले दर्शन मिळतेच की,आजच्या पिढीने जरूर हा लेखाची नोद घ्यावी,,,,,,,,,,,,महेशकाका

  ReplyDelete
 13. मी सुद्धा अगदी असाच... असणार का नाही, एवढे सायन्स रीलेटेड सबजेक्ट्स शिकतोय, त्यामुळे देव-धर्म इत्यादी सगळं थोतांड वाटतं, त्यामुळे घरापासून २ मिनिटाच्या अंतरावर असलेली २ मोठी मंदिरे पण मी बोटांवर मोजता येईल, इतक्या वेळाच दर्शनली(?) आहे... अशा वेळी मी नास्तिक असल्याचा तुम्हालाच नव्हे तर मलासुद्धा पक्का भास होतो... पण जेव्हा पण मंदिरात जाण्याचा योग येतो, मग ते कोणी बळजबरीने ओढत का नेलेले असेना, तुझ्यासारखाच अनुभव असतो... समोरच्या मुर्तीचे करुण व तेजोमय स्वरूप, आध्यात्माचा विरल पण मोहून टाकणारा सुगंध, मंदीराचा भव्य गाभारा, सभामंडप अन् घुमट शिवाय आजुबाजुचे मोकळे पटांगण, हिरवीगार वृक्षवल्ली ह्या गोष्टी पाहण्याने जो आत्मिक आनंद आणि समाधान मिळते, ते मला तरी अशा नकळत झालेल्या दर्शनांमध्ये विलक्षण वाटते, पण तेथे एखाद्या नित्य सवयीप्रमाणे जाणे मला मुळीच खपत नाही, त्यामुळे मी पक्का आस्तिक तर मुळीच नाही, पण नास्तिक म्हणणेही योग्य वाटत नाही... परमेश्वराची खेळीच तशी आहे, कोणाचेही हृदय कितीजरी पाषाण-रुपी असेल, तरी तो त्या पाषाणाला योग्य वेळी वितळवू शकतो...

  तुझा अनुभव प्रापंचिक आहे पण तुझ्या स्वभावाशी साम्य असल्याचे नक्कीच दर्शवतो... बाय द वे, नेहमीपेक्षा जरा हटके विषय, आणि मस्त यशस्वी प्रयत्न!

  ReplyDelete
 14. निव्वळ खालच्या कॅफेटेरियात समोसा चांगला मिळतो..... अपर्णा अगं, डिट्टो नचिकेतच की. ही ही... पोस्ट हटकेच आहे खरीच पण इतके मन शांत करणारे-आश्वासक मोहक रुपडे पाहिल्यावर भान विसरली नसतीस तरच नवल होते.:)

  तुझी ही पोस्ट वाचूनच खूप बरे वाटले गं.

  ReplyDelete
 15. खूप खूप आभारी, महेशकाका...

  ReplyDelete
 16. विशाल आपल्या पिढीतल्या बर्‍याच जणांची अशी थोडीशी संभ्रमलेली अवस्था असेल असं मलाही ही पोस्ट लिहिताना वाटलं....तुझी सविस्तर प्रतिक्रिया वाचायला आवडली...लोभ आहेच तो वाढावा ही आशा...:)

  ReplyDelete
 17. :) श्रीताई...तुझी प्रतिक्रिया पाहून त्यापेक्षा जास्त बरं वाटतंय....

  ReplyDelete
 18. मी हि तसा देव वेडा नाही परंतु अचानक कधी देवदर्शनाची इच्छा होते आणि मी जातोही
  तसे आम्ही मित्र शिर्डीला असेच अचानक दर्शनाला जातो तिथे जाऊन आले कि खरच बरे वाटते
  बाकी चांगला अनुभव आहे तुझा

  ReplyDelete
 19. खरंय विक्रम. शेवटी आपले लहानपणापासुनचे देवासंबंधीचे संस्कार आपल्या मनात कुठेतरी खोलवर असतातच ना...

  ReplyDelete
 20. मी देवळात जाण्याचे खरे कारण म्हणजे मला 'विविध मुर्त्या' बघायला खूप आवडतात... आपण खर्या अर्थाने मूर्तीपूजक...

  ReplyDelete
 21. छान हाय पोष्ट तुमची. :-)

  टीप: अवो ताय, ‘गुजराथी’ नाय वो, ‘गुजराती’ असा शब्द हाय. ‘गुजरात’ नावाच्या प्रांतात बोलली जात्ये ती ‘गुजराती’

  ReplyDelete
 22. त्ये "गुजराती" क्येलं दादा....:)

  ReplyDelete
 23. Devachya darshanane aanand aani trupti milat asel tar te khare darshan... khupda dev dev karanari manase vagtana devala aawadel ase vagat nahit... kadachit tu khup dev dev karat nashiil pan tuzya rojchya jeevanatli sagali kartavya aani jababdarya tu atishay uttam pane aani taktine par padtes mhanun devane aapanhoun to durlabh asa darshananand tula dila asel :)

  ReplyDelete
 24. देवाच्या दर्शनाने आनंद मिळत असेल तर ते खरं दर्शन...अगदी खरय निशा...:)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.