Friday, July 16, 2010

आठवणीतलं घरगुती पावसाळी खाद्यजीवन....

मे महिना सुट्टीचा म्हणून आवडीचा म्हणायचा तर शेवटाला एकदम भाजून निघाल्यासारखं व्हायचं आणि सगळ्यात जास्त वाट पाहिली जायची ती पावसाची...तोही (तेव्हा) वेळेवर यायचा आणि मातीच्या धुंद वासानं वेडं करायचा..शाळेचं दप्तर पाठंगुळीला आणि हातात छत्री असलं भिजरं ध्यान मग पावसात मुद्दाम वाटेतल्या डबक्यामध्ये अडखळायचं...रेनकोट कधी स्वतःसाठी घेतला नाही पण दप्तरावर रेनकोट घातलेली मुलं पाहताना का कुणास ठाऊक त्यांची उंटासारखी बाकदार पाठ पाहिली की हसायला यायचं.हळुहळु गवतफ़ुलं उगवायला लागली की शाळेतही रुळणं व्हायचं आणि पाऊसही तोवर आपलं बस्तान चांगलं बसवून असे. गावाबाहेर कुठं जाणं झालं की हिरवा आसमंत, हिरवे डोंगर, सगळंच कसं हिरवं आणि ताजं...

अशाच पावसात वटसावित्रीला आईबरोबर गेलं की मिळणारे ते छोटे आंबे चोखतानाची मी मला आठवते...मिळतात का ते छोटे, फ़क्त चोखूनच खाता येतील असे आंबे आजकालही? त्या ओटीतला फ़णसाचा गराही खूप आवडायचा. आणखीही बरंच काही असायचं पण भर पावसात खाल्ला जाणारा हा आंबा...अहाहा! काय वर्णावं त्याचं रुप आणि चव...

पावसाळ्यात काही काही चविष्ट गोष्टी आणखी चविष्ट लागतात...कुणाही सर्वसामान्याप्रमाणे माझंही मत कांदाभजींना तोड नसली तरी मोड आलेल्या वालाची आमटी, भात आणि भाजलेला उडदाचा पापड हे अप्रतिम त्रिकुट ज्याने पावसात खाल्लं  असेल त्याच्या तोंडात आत्ताही त्या चवीने पाणी येईल. मग लगोलग आषाढ आला की पावसाची सवय शरीराला बाहेरुन झालेली असली तरी पोट मात्र हमखास बिघडायचं आणि धर्मानं ख्रिश्चन असले तरी आमचे नेहमीचे डॉक्टर त्या पोटाला आषाढी लागली की काय? म्हणून मग थोडा ताबा ठेवायचा सल्ला देत. कसंबसं आषाढ अमावास्येपर्यंत तग धरायचं आणि गटारीला सगळं सामिष मनसोक्त खायचं. आषाढ कधी एकदा जातो असं व्हायचं आणि त्याचं कारण ही "आषाढी"ची पळापळ आणि गटारी नसे, तर नंतर येणारा श्रावण.मला मुंबईतला पावसाळा आवडतो की श्रावण? असं कधीतरी गणित मांडायला हवं..पण तरी खात्री आहे मला श्रावणाला जास्त मार्क मिळणार ते.

श्रावणाच्या सुरुवातीलाच आई-बाबांचा एक नेहमीचा संवाद घडे. आई नेहमी पहिले पाच दिवस तरी कडक असं म्हणायची पण मग जसजसे तिचे एक-एक उपवास यायचे तसं मग ’सगळा गॅस धुवायला लागतो’ किंवा ’तुम्ही खा. मला सारखं केस धुवायला होत नाही’ अशी लंगडी कारणं देऊन शेवटी श्रावण घरात पाळला जाईच. नेहमीचे गुरुवार करणार्‍या आईचे सुरु व्हायचे श्रावणी सोमवार आणि शनिवारचे तसंच वेगवेगळ्या सणांचे उपवास. श्रावणातले उपवास चारच्या सुमारास सोडायचे असा काही नियम आहे का माहित नाही पण आई मात्र अशी चारच्या आसपास जेवायची. फ़्लॉवर-वटाणा भाजी, तळलेले पापड आणि अळूवडी यांना या जेवणात हमखास मान असे. प्राथमिकला असेपर्यंत तर मलाही श्रावणी सोमवार आणि शनिवारी शाळेला अर्धा दिवसाची सुट्टी असे. त्यामुळे आईने जेवणाला सुरुवात करेपासून मी तिच्यासोबत काही छुटकू-मुटकू गोष्टी करत नाहीतर नुस्तं तिचं निगुतीने अळूवड्यांची पानं वाळणं पाहात राही. आणि मध्ये मध्ये तोंडातलं पाणी आवरत; कारण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय पापडाचा तुकडाही मिळत नसे..श्रावणातल्या जेवणाची ती न्यारी चव नंतर कॉलेजजीवनापासून कधी आलीच नाही असं वाटतं.

श्रावणघेवडा हे नावच कसं श्रावणाची आठवण ताजी करतो, यासारख्याच वाल इ. सारख्या अनेक शेंगाभाज्या, मक्याची कणसं बाबा नेहमी घरीच उकडून खायला द्यायचे त्यामुळे बाहेरचं काही चटकमटक खायची गरजच पडली नाही...अर्थात अधुनमधुन मक्याचं भाजलेलं कणीस यायचंच घरी आणि तेही तितक्याच आवडीने खाल्लं जाई. पावसाळ्यात मी माझ्या मामाची पण उत्कंठेने वाट पाही कारण मामीने वाड्यात लावलेली काकडी आणि आणखी काही भाज्यांची चव न्यारीच असे...मोठ्या पण कोवळ्या काकडीला आमच्याकडे "मिणी काकडी" म्हणत आणि सर्दी झालेली असली तरी आईची नजर चुकवून बाबा हळूच मला एखादा तुकडा तरी देत...

अनेक पालेभाज्या लालमाठ, चवळी आणि पालघर, तानसा अशा ठिकाणच्या जंगलात आपोआप उगवलेली ’करटोली’ सारखी फ़ळभाजी अशा अनेक पावसाळी भाज्या खायची मजा हवी असेल तर त्यासाठी पावसाळ्याची वाट पाहायलाच हवी....पण श्रावण आणि एकंदरित माझ्या पावसाळी खाण्यावर कळस चढला तो शेवळ्याच्या आमटीने.. शेवळे ही पण एक रानभाजी फ़क्त पावसाळ्यातच मुंबईत जवळजवळ सर्वत्र मिळते. मला वाटतं आदिवासी लोकं जंगलात जाऊन गोळा करुन त्यांच्या छोट्या जुड्या करुन विकतात.ही साफ़ करणं एक कला आहे नाहीतर सगळी भाजी खाजरी होऊ शकते शिवाय खाज कमी करण्यासाठी यात काकड म्हणून एक आवळ्यासारखं फ़ळ असतं त्याचा रस घालतात. माझी एक मावशी आमच्या घरापासुन साधारण रिक्शाच्या अंतरावर राही. माझा श्रावण घरात जरी पाळला जायचा तरी एखादा रविवार या मावशीकडे गेलं की तिने केलेले मासे पाहून माझा श्रावण पाळण्याचा उत्साह एका मिनिटांत गळून जाई..असो...आमच्याकडे पहिली आमटी केली त्यावेळेस काहीतरी करुन आई त्या दिवशी मावशीला बोलवे किंवा सरळ एक वाटी आमटी पाठवून तरी देई. मग त्यानंतर त्या जेव्हा भेटत त्यावेळी आमटीच्या चवीबद्द्ल एक परिसंवाद घडे. बहुधा त्याच्या आसपास केलेल्या मावशीच्या आमटीला अम्मळ खाज आलेली असे किंवा असंच काही आणि मग माझी ’आमटी एक्सपर्ट आई” तिला काकडाचा रस जास्त घाल किंवा थोडी चिंच-गूळ घाल अशा टीपा देई. आता हे लिहिताना उगाच भरुन आलंय की चवीचा हा ठेवा मी फ़क्त खाण्यापुरताच मनात ठेवलाय. पण हे असे बर्‍याच जणांना माहितही नसलेले पदार्थ आता शिकायला हवं असंही वाटतंय...(किती बदलतेय मी? असं माझे वर्गमित्र नक्की म्हणतील हे वाचलं तर असो...)

आमच्याकडे एक स्वतःची वाडी करणारे काका चांगली भाजी असली की घरी घेऊन यायचे. त्यांच्याकडची हळदीची पानं आली की मग आई पातोळे करी..मला तो प्रकार विशेष आवडत नसे पण चवबदल म्हणून खाणं व्हायचं...एकंदरित शाकाहारी खाण्याचे इतके प्रकार असायचे की मांसाहाराला तात्पुरतं विसरता यायचं.

जसे हे दोन उपास तसंच श्रावणात येणारे सणही श्रावण आवडायचं महत्वाचं कारण असावं. नागपंचमीला नागपूजा, लाह्या, तर नारळी पौर्णिमेला नारळी-भात आणि कधीतरी समुद्रात जाऊन नारळ अर्पण करणं; नंतर गोपाळकाल्याला दहीहंडी लागली की मग ती फ़ुटेपर्यंत मान मोडेस्तोवर गॅलरीतल्या धक्याला रेलून पाहात राहणं सारंच एकापेक्षा एक सरस. आणि मग एखाद्या सुरेल मैफ़िलीच्या शेवटची भैरवी तसा येणारा पोळा म्हणजेच श्रावण अमावास्या.लहान असताना कुमारीकेचा मान म्हणून शेजारच्या काही काक्याही आधीच सांगुन ठेवत संध्याकाळी यायला आणि आईचीही तयारी सुरु असे. तांदळाची खीर आणि पुरी असं हातात घेऊन देवापुढे बसून कोण आलेय ते न पाहता फ़क्त डोक्यावरुन मागे वाटीचा हात नेत विचारायचं "अतिथी कोण?" उत्तर अर्थातच "मी" आणि मग ती खीर-पुरी खाऊन पुढच्या खीर-पुरीसाठी तयार. कुठे गेलं हे सारं? असा विचार करत असतानाच मागच्या वर्षी आईचं श्रावणात माझ्याकडे असणं मला पुन्हा त्या श्रावणात घेऊन गेलं आणि काय चालंलय या दोघींचं असा विचार माझा लेक करेस्तोवर शिरा-पुरीची वाटी त्याच्या हातात होती.

श्रावण संपल्याचं काही वाईट वाटायच्या आतच गणपती येत त्यामुळे मग सगळ्या आसमंतातच आरत्यांचा आवाज आणि उदबत्तीचा वास भरून राहिलाय का असं वाटे. माझी आणखी एक मावशी विरारला राहायची. ती असेपर्यंत तिच्या घरचा दीड दिवसांचा गणपती म्हणजे आमचा घरचा गणपती असल्यासारखं असायचं. चलतचित्राने सुशोभित केलं जाणारं गणपतीचं मखर, हटकरांची शाडूची मूर्ती (डोळे हे यांचं वैशिष्ट्य), जागरण आणि आरत्यांमध्ये दशावताराची आरती आणि अर्थातच प्रसादापासून जेवणापर्यंत केला जाणारा वेगळा खाद्यपदार्थांचा घाट ही या उत्सवाची पाच मुख्य बोटंच म्हणायची. माझी आई धरुन पाच बहिणींमध्ये सुगरणपणाचा मान जर कुणाला द्यायचा असेल तर फ़क्त याच मावशीचा विचार करता येईल. अगदी मटण चॉपपासुन ते बासुंदीपर्यंत सगळे पदार्थ करणे आणि त्याहीपेक्षा जास्त प्रेमाने ते खाऊ घालणे हे आमच्या नातलगांमध्ये करणारी ही एकमेवच. गणपतीला तिच्या हातचे मुगाचे लाडू आणि उकडीचे मोदक छान की अळूवडी आणि प्रत्येक जेवणातल्या तर्‍हेतर्‍हेच्या भाज्या, मे महिन्यात खपून केलेले पापड-लोणची छान याचा विचार न करता ते खाणं हेच उत्तम. शिवाय जागरण हा म्हणजे विरंगुळा आणि खाद्य संस्कृतीचा परमोच्च बिंदु. मावशी असेपर्यंत तिने कायम स्वहस्ते केलेला एखादा नवा, वेगळा पदार्थ आणि चहा-कॉफ़ी असे तर आजकाल बाहेरून ऑर्डर देऊन खायची रेलेचेल केली जाते. तिच्या मागे त्याच उत्साहाने गणपती उत्सव साजरा करणारा माझा मावसभाऊही प्रत्येक वर्षी मखराची कल्पकता तर कलाकार असल्याने जपतोच पण जागरणासाठी येणार्‍यांची सोय संगीताची साथ करणारा एखादा वादक बोलावुन आणि जिव्हा तृप्त करणारा आचारी समोर वडे तळून देतोय किंवा चाट बनतेय या सर्वांची सोय करतो. खरंतर फ़क्त या गणपती उत्सवावर एक वेगळी पोस्ट होईल.दीड दिवसांचा गणपती गेल्यावर मखरासमोरच्या फ़ळांचा एकत्रित केलेला प्रसाद म्हणजे तर काय देवाचीच कृपा. त्यात खाल्ल्या जाणा‍र्‍या नारळ, टरबुज, खरबुज, पेरु, संत्री अशा अनेक फ़ळांनी एकमेकांच्या साथीने त्यांची चव द्विगुणीत केली असते असं मला नेहमीच वाटतं..अगदी थोडंसं कडवट तुरट असं ग्रेपफ़्रुटही आपण खाल्लं हे नंतरच कळतं..आणि या सर्वाला थोडासा उदबत्तीचा किंवा कापराचा असा तो मिक्स प्रसादी वास असतो दीड, पाच, सात की अकरा दिवसांचा मुक्काम हेही सांगून जातो.

गणपती गावाला गेले की मात्र जरा हळवं वाटे..पावसाळाही अनंत चतुर्दशीला बहुधा याच कारणासाठी हजेरी लावे. यानंतरचा पाऊस म्हणजे बोनस. पडला तर पडला नाहीतरी काही हरकत नाही...आणि खरं तर नंतर येणार्‍या घटस्थापनेच्या दृष्टीने तो न पडला तर बरंच असंच सगळ्यांना वाटतही असेल...सण आणि त्यानिमित्ताने होणारी खाद्ययात्रा काही इथे संपणारी नसते पण तरीही पावसाळ्याचे गेले तीन-साडेतीन महिने केलेली खादाडी आणि विशेष करुन शाकाहारी खादाडी माझ्या वार्षिक खाद्यजीवनात फ़ारच मोलाचं स्थान ठेऊन आहे...गेले कित्येक वर्षे तसे पावसाळे आले नाहीत किंवा मन तृप्त होईस्तोवर ती शेवळ्याची आमटी, उकडलेल्या शेंगा, अळूवड्या, उकडीचे मोदक, प्रसादाची एकत्रित फ़ळं खाणं झालं नाही असं ही पोस्ट लिहून झाल्यावर वाटतंय आणि थोडं उदासच व्हायला होतंय..पण तरीही या अमोल खाद्यठेव्याचा गेली अनेक वर्षे आपण भाग होऊ शकलो हेही नसे थोडके....

सर्व छायाचित्रे मायाजालावरुन साभार

28 comments:

  1. उत्तम ललित लेखन.. छान हळवा झालाय लेख.. !!

    मात्र माझ्या प्रचंड प्रिय अळूवड्यांचा उल्लेख करून तू मला उगाचच उदास करून टाकलंस आणि निषेध नोंदवायला भाग पाडलंस..

    निषेध !!!!!!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब..अरे हे सगळं लिहिताना मी स्वतःच माझा निषेध करतेय.....मला फ़क्त अळूवडीच नाही तर यातल्या प्रत्येक चवीच्या आठवणीने इतकं हळवं व्हायला झालंय नं की बास....पुन्हा एकदा का आलो आपण इथे असं सगळं....जाऊदे....भरकटत नाही....

    ReplyDelete
  3. भाजलेलं कणीस ओ हो नाकात कसा घमघमाट सिरलाय । काय हे असं नुसताच बोलाचाच भात अन्.........

    ReplyDelete
  4. खरंय आशाताई..पण नाविलाज को क्या विलाज??

    ReplyDelete
  5. मला देखील त्या आंब्यांची अन अळुवडयांची चव आठवली......दोन आठवडयांपूर्वी गावी जाउन आलो..पण हे सर्व अनुभवायला थोडा उशीर झाला होता...असू दे पण काही हरकत नाही अपर्णा तुझ्यामुळे सर्व लाभले....कोटी कोटी धन्यवाद..

    ReplyDelete
  6. आभारी गणेश आणि ब्लॉगवर स्वागत...सध्या आपल्याला वाचुनच समाधान मानायचंय...पण काही हरकत नाही....:)

    ReplyDelete
  7. छानच लिहलं आहेस!
    करटोली म्हणजे काय गं?
    बर्‍याच आवडत्या पदार्थांची आठवण करुन दिलीस.. :)

    ReplyDelete
  8. आजच आणतो कोथिंबीर वडी - जी मला जास्त आवडते :)
    पोस्ट एकदम खवैय्या कॅटॅगरीतलं..

    ReplyDelete
  9. आपला लेख चांगला वाटला आपण वर्णन खायच्या द्र्ष्टीने बरोबर वाटतात ,सणामुळे असे पदार्थची चव घेता येते ,आणि घरोघरी हे पदार्थ त्यामुळे होतात .पावसाळ्या वातावरणात तर एकदम छ्यान ,आपण आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे, ...........महेशकाका

    ReplyDelete
  10. Khoop sunder lihilayas ga taai...!!! Sagale dolya samor ubhe rahile...!!!

    ReplyDelete
  11. धन्यु मीनल...अगं करटोली ही कारल्यासारखी काटेरी दिसणारी पण आकाराने गोल आणि साध्या बोरापेक्षा थोडी मोठी अशी फ़ळभाजी आहे...पावसाळ्यात मुंबईतल्या मंडईत दिसते..ही खूप पौष्टिक असल्याने आजकाल बरीच महाग असते असं आई म्हणते..खरं तर या पोस्टला हवे तसे फ़ोटो टाकायला मी आत्ता तिथे हवी होते असं मला फ़ार वाटत होतं...केव्हातरी मी ते फ़ोटो मिळवून ही पोस्ट खर्‍या अर्थाने परिपूर्ण करेन...:)

    ReplyDelete
  12. अरे हो महेंद्रकाका, मी बहुधा अळूवडीच्या नादात को.वडीला विसरले...खरं ज्या ज्या पावसाळ्यात माझी आज्जी आमच्याकडे होती तेव्हा तेव्हा कोथिंबीर आणि मेथी असा वड्यांचा घाट असायचा..आज्जी स्वतः मेथी आणि को.चा ढीग निगुतीने साफ़ करायची.....हरवले पुन्हा मी बहुतेक...

    ReplyDelete
  13. महेशकाका, आवर्जुन प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल धन्यवाद...आपली मराठी खाद्यसंस्कृती यापेक्षा खूप विपुल आहे म्हणा...माझा हा एक छोटा प्रयत्न...:)

    ReplyDelete
  14. धन्यवाद मैथिली...

    ReplyDelete
  15. अळु वडी...आंबे....हा..हा...(अळु वडी गुरुवारीच हादडली आहे)...लय भारी...
    मस्त झाली आहे पोस्ट.

    ReplyDelete
  16. अरे वा यो...मजा आहे तुझी...मी इथे झुरतेय अळूवड्यांसाठी....

    ReplyDelete
  17. तूला कर्टोलीचा फोटो पाठवतो आज-उद्या... आणि हो आळूवड्या आज घरी बनल्या आहेत... देऊ का पाठवून.... हेरंबा तूला सुद्धा... :P

    ReplyDelete
  18. अपर्णाताई, श्रावणाची सात्विक खादाडी आवडली..

    ReplyDelete
  19. अळूवड्यांचा निषेध...
    बाकी एकदम हळवा लेख झालाय. बालपणाची सैर करवून आणलीस एकदम.

    ReplyDelete
  20. रोहन, फ़ोटो आला की याच पोस्टला लावेन....आणि तू सेनापती आहेस त्यामुळे आपने बोला और हमने सुना......च्यामारिकेत येताना डीप फ़्रीज करुन अळूवड्या घेऊन आलास तर मी आणि हेरंब नक्की खाऊ आणि तुला दुवा देऊ...:)

    ReplyDelete
  21. भारत, आभारी...श्रावणातलं वातावरण असं असतं की ती सात्विक खादाडी कुठल्या सामिष प्रकाराची आठवणही होऊन देणार नाही...

    ReplyDelete
  22. खरंय़ बाबा...तसंही बालपणीच्या नुस्त्या खादाडीच नाही तर कुठल्याही आठवणीत गेलं की मोठं (वयाने) झाल्याचं दुःखच होतं...म्हटलंय ना,"बाळपणीचा काळ सुखाचा" हेच खरं.

    ReplyDelete
  23. एकदम मस्त लिहिलं आहेस... खरंच बालपणात नेलं..

    ReplyDelete
  24. शेवळ्याच्या आमटीच्या आठवणीने ऊर दाटून आला! :-) कधी एकदा तो पावसाळा यतोय???!!

    ReplyDelete
  25. अभिजीत आपलं ब्लॉगवर स्वागत...शेवळ्याची आमटी मला पण खायची आहे पण सध्या फक्त आठवणी कारण यावर्षी पण त्यावेळी मुंबईत नसणार....
    प्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक आभार..

    ReplyDelete
  26. करटोली, शेवळे,काकड, पातोळं ही सगळी नावं आज पहिल्यांदा ऐकली.
    बाप्रे माझ्याच पिढीला या भाज्या माहित नाहीयेत तर माझ्या पुढच्या पिढीला या आणि अजुन किती भाज्या माहित नसणारेत देव जाणे.
    बाकी पोस्ट नेहमी प्रमाणेच मस्त. सध्या तरी आईकडे आहे तोपर्यंत मला हवी ती वडी, भाजी हवी तेंव्हा मिळेलचं... पुढेही मिळत रहावी एवढीच अपेक्षा :)

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिया, माझी खूप लाडकी पोस्ट वाचून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्द्ल खूप मस्त वाटतंय गं..(आता तुझे आभार नाही मानणार आहे नं गं मी) :)
      अगं माझ्या सगळ्या भाज्या जास्त करून कोकणातल्या असल्याने तुला बहुतेक माहित नसाव्यात. एकदा त्यासाठी माझ्याच आईला साकडं घालावं लागेल..
      सध्या आईकडे सगळं मस्त मस्त खायची मजा आहे ती करून घे..माझं बघ भाज्याच दिसत नाहीत गं इथे :(

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.