Monday, August 10, 2009

अशीही एक मंगळागौर

अमेरिकेत आल्यावर पंढरीच्या वारीचा बुक्का कपाळी लावावा तसं पहिलं ड्रायव्हिंग लायसन्स पदरात पाडून घेतलं आणि मग नवनवीन ठिकाणी जायच्या आधी "आधी वंदु गणराया" उक्तीप्रमाणे पहिला नमस्कार मॅपक्वेस्ट्ला करुन रस्त्याचा नकाशाचं (इथल्या भाषेत डिरेक्शन्सचं) दान पदरात पाडून घ्यायचं. हे नमन झालं की मग एकदा गाडीत बसलं की मग बहुतेक करुन मुक्कामाच्या जागीच गाडीतुन उतरायचं. अर्थात कधी एखादा रस्त्याचं नाव नेमकंच वाचलं गेलं नाही की मग मारा गिरक्या नाहीतर कुणाच्या घरी जात असु तर करा त्यांना फ़ोन. आणि मैलोनमैलचे हायवे बिनबोभाट तुडवल्यावर गाडी अडायची ती मुक्कामाचं ठिकाण हातभर अतंरावर असताना."डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे" सारखं.
तसं प्रवासाचं मला भारी वेड. आणि योगायोगाने नोकरीसाठीही बरचं भटकावं लागलं. आठवडाभर क्लायंटकडे आणि विकेन्डसाठी फ़क्त घरी. त्या पहिल्या चार वर्षात नवनव्या ठिकाणी रेन्टल गाडी घेऊन हिंडण्यात फ़ार मजा होती. दरवेळी रस्ते चुकायचे आणि नवे रस्ते शोधायचे. कधीकधी अगदीच नाही सापडलं तर मग एखाद्या दुकानात नाहीतर पेट्रोल पंपाला थांबुन विचारायचं.पण तरी बर्याच ठिकाणी मी या माझ्या वर उल्लेखलेल्या मॅपक्वेस्ट नामे दैवताच्या कृपेने नीट पोहोचायचे. आता नाही म्हटलं तरी जरा अतिआत्मविश्वास आल्यासारखं झालं होतं. आणि अशातच आमच्या ओळखीत एका ठिकाणी मंगळागौरीचा कार्यक्रम (अर्थातच फ़क्त महिलांसाठी) एका बाईंच्या घरी करण्याचं ठरलं. त्यांनी एक शनिवार पक्का केला आणि झाडून सगळ्यांना बोलावलं. हो शनिवारच कारण मंगळागौर मंगळवारी साजरी करायला अर्थातच कुणालाही जमणार नव्हतं.
आमच्या पेन्सिल्व्हेनियात आधीच उतार-चढावामुळे डोंगरासारखं वाटणारे भाग जास्ती आहेत. आणि टिपिकल अमेरिकन मेंटेलिटीची अति एकांतवासाची घरंपण भरपुर. ही अशी घरं जितकी एकांतात तितकी जास्त महागही असतात त्यामुळे आम्ही त्यांना सरसकट मिलियन डॉलर हाऊसेस म्हणतो. असो.
त्यामुळे माझी एक मैत्रीण मला म्हणालीही की एकत्र जाऊया. पण त्यासाठी मला आधी तिच्या घरी एक तास जा मग तिच्या घरुन पुन्हा इथे या. आणि परत जाताना तिच्या घरुन माझ्या घरी. विचारानेच कंटाळा आला. आणि मॅपक्वेस्टवर डिरेक्शन्स पाहिली तर हे घर माझ्या घरापासुन जास्त जवळ पडणार होतं. फ़क्त माझ्या बाजुने जाणारं दुसरं कुणी तिथे नसणार होतं म्हणून मग मी एकटीनेच येईन असं ठरवलं.
सगळ्यांनी जागरण करायचं ठरवलं होतं आणि रात्रीच्या जेवणाचा बेत होता त्यामुळे निघायची वेळ संध्याकाळची होती. मी माझ्या घरचं आटोपुन निघाले आणि नेहमीप्रमाणे रस्त्याला लागले. गाडीत आवडीची गाणी लावली. सुरुवात बरी झाली आणि लोकल हायवे संपल्यानंतर तो तसा टिपिकलवाला भाग चालु झाला. मुख्य म्हणजे सिंगल लेन आणि थोडे छोटे रस्ते आणि दोन्ही बाजुला शेतं.थोडं कंट्रीसाईड सारखं. काही मोठी-मोठी रॅंचेस. एक घर गेलं की बर्याच वेळाने दुसरं घर. रस्त्यावर कुठेही पेट्रोलपंप किंवा दुकानं नाहीत. गाड्यांची रहदारीदेखील जेमतेम.
पोहोचायला एक-दोन मैल उरले असताना मला एका ठिकाणी डावीकडे वळायचं होतं ते काही केल्या मिळेना. मग चुकले असेन असं समजुन आधी तसच सरळ थोडं पुढे जाऊन पाहिलं. छ्या! असं-कसं झालं? मग पुन्हा उलट्या बाजुने तसंच जाऊन पाहिलं तरी मिळेना. नंतर विचार केला की फ़ोन करुया तर पाहते तर फ़ोनला लिंकच नाही. आता कठीणच होतं. मग विचार केला की परत घरी जाऊया. पण हे उलट-सरळ जायच्या नादात रानभूल पडल्यासारखं तेही वळण कळत नव्हतं. सगळेच रस्ते सारखे वाटायला लागले. आता फ़ोनला लिंक येईपर्यंत सरळचं जात राहुया असा विचार केला. सहज म्हणुन गाडीच्या गॅस इंडिकेटरकडे नजर टाकली तर शेवटचा क्वार्टर बापरे! एकतर शेवटचा क्वार्टर लवकर संपतो आणि इथे तर कुठे इंधनाची सोयही दिसत नाही. त्यामुळे एका ठिकाणि फ़ोनला लिंक आल्यावर सरळ एका घराच्या एँट्रन्समुळे उजवीकडे जरा जास्त जागा होती तिथे सरळ हजार्ड लाइट्स लावुन गाडी बाजुला घेतली आणि फ़ोन लावायला सुरुवात केली. आता अंधारही पडायला लागला होता. आणि इथे तसही बर्याच रस्त्यांवर दिवेही नसतात.
माझ्या सेलमध्ये माझ्या माहितीत तिथे जाणार्या सर्व मैत्रीणींचे नंबर होते त्यामुळे शहाणपणा करुन मी ज्यांच्या घरी ही मंगळागौर असणार होती त्यांचा घरचा नंबर घ्यायलाही विसरले होते. एक-एक मोबाईल नंबर फ़िरवायला सुरुवात केली आणि माझे धाबे दणाणले. बहुतेक तिथे इतक्या लोकांच्या आवाजात कुणालाही रिंग ऐकु येत नव्हती. सगळ्यांचे नंबर व्हॉइस-मेलमध्ये जात होते. आणि इथेतर माझ्या काळजाचे ठोके वाढायला लागले होते. कारण मला कळतही नव्हते की मी नक्की कुठे आहे म्हणजे मी नवर्याला तरी फ़ोन करुन मला घ्यायला बोलावु शकेन. काय करावं कळत नव्हतं नशिबाने एका मैत्रीणीने तिचा फ़ोन उचलला आणि हाय कंबख्क्त ती त्या मंगळागौरीच्या इथे नव्हती कारण तिच्या मुलाचा वाढदिवस होता. आणि मुख्य म्हणजे तिला जेव्हा कळलं की मी कुणाकडे जातेय तेव्हा तिलाही माझ्यासाठी टेंशन आलं कारण तिच्यामते त्यांचं घर थोडं असं फ़ोनवरुन समजावुन सांगुन मिळण्यासारखं नाही. ती स्वतः बाहेर जेवायला असल्याकारणाने ती मला दुसरे कुठले नंबर देऊ शकणार नव्हती. पण मला परत फ़ोन करायला सांगुन हा फ़ोन मी ठेवला. आता मात्र मला जरा जास्त दडपण आलं. शेवटी मी माझ्या अजुन एका मैत्रीणीच्या घरी फ़ोन केला कारण ती जरी मंगळागौरीला असली तरी तिचा नवरा घरी असणार म्हणजे तो काहीतरी करुन मला त्या घरचा नंबर शोधुन देईल असं मला वाटलं. माझा त्याला फ़ोन लागला तेवढ्यात माझ्या मैत्रीणीनेच त्याला फ़ोन करुन सांगितलं होतं की ती मला फ़ोन करायचा प्रयत्न करतेय पण तिचा लागत नाहीये. ही स्वतः कोणाबरोबर जेव्हा त्या घरी गेली तेव्हा तिला रस्ता पाहुन कल्पना आली की हा थोडा ट्रिकी रस्ता आहे आणि एकटीने येणारी मीच होते.
हे होइस्तोवर बराच वेळ झाला होता. मी ज्या घराबाहेर थांबले होते तिथुन बहुतेक एक अमेरिकन बाई बराच वेळ मला गाडीत पाहात असणार. मी साधारण सेफ़ व्यक्ती आहे अशी काही कल्पना झाल्यावर ती आपल्या गेटच्या बाहेर आली आणि मला दिसली. मी खिडकीची काच खाली केली आणि तिने मला विचारलं की मी बराच वेळ तुला इथं पाहातेय काही मदत हवी आहे का? मग मी तिला रस्त्याचं नाव सांगुन विचारलं की मी कुठे आहे म्हणुन. तिने जी खूण मला सांगितली ती मला साधारण कळली कारण इतका वेळ जा ये करताना मी एका सेव्हन वे स्टॉप साइनला दोनदा तरी थांबले होते आणि माझं डावं वळण त्या स्टॉप साइनच्या एका कोनाला होतं जे आरामात चुकतं. तिचे आभार मानतेय तोच माझ्या मैत्रीणीचाच मला फ़ोन लागला आणि मी सुटकेचा निश्वास टाकुन तिला सांगितलं मला त्या स्टॉप साईनपाशी यायला.
यावेळी मी जरा नीट पाहिलं. साधारण चार रस्त्याला स्टॉप साइन असेल तर एकच डावं वळण असतं आणि रस्त्यांची नावंही नीट दिसतात. इथे जरा प्रकरण थोडं ट्रिकी होतं. म्हणजे मुख्य
चार रस्तेच होते पण अजुन थोडं पुढे जाऊन डावीकडे दोन आणि उजवीकडेही वळणं होती. ती थोडी दूर असल्याने त्या रस्त्यांची नावंही दिसत नव्हती. म्हणजे इथं पहिल्यांदी येणारा प्रत्येकजण चुकतच असेल अशी निदान मी माझी समजुत करुन घेतली आणि साधारण डावीकडे बाजुला थांबले.याला आपण सात रस्ता म्हणुयात असंही डोक्यात आलं.
थोड्याच वेळात मला घ्यायला आमच्या होस्टबाईच त्यांची गाडी घेऊन आल्या आणि पुढे त्यांना फ़ॉलो करत जाताना मी म्हटलं या घरी कुणी हरवलं तर फ़क्त त्याच आणू शकतील. एकदाची पोहोचले आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊनच काय ती पहिल्यांदी भेटले.
जमलेल्या सगळ्या बायकांच्या गप्पा-गाणी यांना ऊत आला होता. मी मात्र आता रात्री पुर्ण जागुन सकाळीच निघण्याचं स्वतःच ठरवुन टाकलं कारण पुन्हा रात्रीच्या पारी हरवण्याची माझी बिल्कुल इच्छा नव्हती. नंतर उरलेली रात्र खरचं खूप मजा आली. सर्वांनी पुस्तकं, इंटरनेट वरुन माहिती काढुन सगळं साग्रसंगीत मंगळागौरीचं जागरण केलं. अगदी बसफ़ुगडी, गाठोडं इ. सुद्धा. म्हणजे मुंबईत राहिल्यामुळे किंवा आमच्याकडे अशा काही प्रथा नसल्याने मला स्वतःला मंगळागौर भानगड तशी माहित नव्हतीच. बरेच खेळही तिथेच कळले. खूप मजा आली. खायचं पण सर्व छान-छान आणि आयतं होतं.
सकाळी मला त्या काकु अगदी मुख्य रस्त्यापर्यंत सोबतीला आल्या; तरीही सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो हा त्यांच्या घरी जाण्याचा प्रवास आणि तो सात रस्ता.

4 comments:

  1. Chaan lihilay...
    aasa rasta chukana faar ghabrawoon sodata hey nakki

    ReplyDelete
  2. हो खरंय. आता GPS आल्यापासुन ती हरवण्यातली मजा गेली असंही कधीकधी वाटतं. :)

    ReplyDelete
  3. नविन ठिकाणी ते सुद्धा अश्या अडनिड्या वेळी हरवलं तर किती वाट लागत असेल ना!

    ReplyDelete
  4. वाट??? मेरी तो.....जाऊदे....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.