Wednesday, July 17, 2013

गाणी आणि आठवणी १४ - तू न जाने आसपास है खुदा


खरंय  न कधी डोळ्यापुढे आसवांच धुकं दाटलं की  थोडा वेळ मान खाली घालून विचार केला की  सगळ्यात पहिले काय जाणवतं? आहे ही  परिस्थिती बदलायची तर आपलं आपल्यालाच सज्ज व्हायला हवं. आपण फक्त हिम्मत धरून मार्गक्रमण करावं बाकी सगळं कर्ता करवित्याकडे सोडावं. तो असेलच कुठेतरी त्या एका forwarded मेलमधल्या गोष्टीत म्हटलंय तस I was carrying you म्हणणारा. 

असाच काही विचार करत असताना एक सुफिया सूर आणि त्याच्या साथीला एक मधाळ आणि प्रेमळ सूर कानावर पडतो 


धुंदला जाए जो मन कही इक पण को तू नजर झुका 
झुक जाए सर जहान वही मिलता है रब का रास्ता 


खर तर कुठल्याच प्रकारच्या गाण्याची मला अलर्जी वगैरे नाहीये पण राहत फ़तेह अलीबद्दलचा माझा अभ्यास अंमळ कमीच आहे. हे गाणं तर सुरुवातीला मला कैलाश खेरचं वाटलं होतं. कदाचीत त्याच्या आवाजात पण ऐकायला भावलं असतं म्हणूनही असेल. 

खुद पे डाल तू नजर, हालातों से हार कर कहां चल रे ? 

म्हटलं  तर रोखठोक सवाल. है कोई जवाब?

पण मग पुढचं, 

तो  खुद तेरे ख्वाबोंके रंग मे, तू अपने जहान को भी रंग दे 
के चलता हू मै तेरे संग मै 
हो शाम भी तो क्या जब होगा अंधेरा तब पायेगा दर मेरा 
उस दर पे फिर होगी तेरी सुबह 

हे अगदी हवंहवंसं स्वप्न किंवा आशा. 

हे आणि पुढचं 

मीट जाते है सबके निशान बस एक वो मिटता नही …. तू न जाने आसपास है खुदा 

शेवटची ओळ मला तृप्तीच्या क्षणाला नेते आणि एक ड्युएट ऐकणं सार्थकी लागतं. हे पूर्ण गाणं  ऐकून झाल्यावर आपण सुरात न्हाऊन निघालो असतोच पण आपलं मनही बरंच हलकं झालेलं असतं. 

मूळ गाणं इकडे आहे 

Friday, June 28, 2013

बुरख्यातली झाडं

नेहमीच्या पार्किंग लॉटमध्ये हिरवाई आली की छान वाटतं. आज मात्र गाडीने ते वळण घेतलं तर पहिलंच झाड जरा वेगळं दिसलं. अरे हे काय याला चक्क बुरखा घातलाय?




गाडीतून खाली उतरल्यावर पाहिलं तर आमच्या नेहमीच्या हिरवाईला नटवायच्या ऐवजी लपवलं होतं. हारीने सगळी झाडं बुरख्यात.



मग एकदम त्यादिवशी एन पी आरवरची बातमी आठवली. सविस्तर वृत्त मायाजालावर आहेच पण ब्लॉगवर थोडक्यात सांगायचं तर गावच्या एका मॉलच्या पार्किंग लॉटमध्ये हजारोंच्या संख्येने मधमाशा मेलेल्या आढळल्या. त्याचं कारण काय असावं याचं रूट कॉज केल्यावर असं लक्षात आलं की हा मॉल मेंटेन करणाऱ्या एका कम्पनीने जंतुनाशक फवारणीकेल्यामुळे या मधमाशा मरण पावल्या होत्य. आता तात्पुरता उपाय म्हणून या झाडांना जाळी लावून बंद केलं आहे.



हे ऐकलेल्या बातमीचं प्रत्यक्ष पुरावा पाहताना जितका मला इथल्या लोकांच्या सतर्कतेचं आणि इतकी त्वरित उपाययोजना करणाऱ्या सिस्टिमच कौतुक वाटलं, तितकंच वाईट वाटलं ते दुसऱ्या एका वेगळ्या गोष्टीबद्दल. याच सिस्टिमने वर्षानुवर्षे अशीच फवारणी केलेली, जैवीक शास्त्रात नको ते बदल घडवून लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारी फळं, भाज्या, मांस याच लोकांना खायला घातलीत पण त्यासाठी मात्र ज्या बलाढ्य कंपन्या जबाबदार आहेत त्याबद्दल मात्र कुणीही आवाज उठवला तरी अशी प्रतिबंधात्मक योजना अजूनतरी ऐकिवात नाही. याबद्दल पुन्हा केव्हातरी..सध्या माणसांची नाही तर निदान मधमाशांची काळजी घेतल्याचं कौतुक करुयात.





Sunday, June 23, 2013

पाऊसवाट

पावसाचं माझं नातं जुनंच,  तरीही इकडे नेहमी पडतो म्हणून रुसवाच जास्त. मग एखाद आठवडा उघडीप मिळाली  की जणू  त्याने इतके दिवस केलेला छळ विसरतेच मी. मस्त शनिवारपर्यंत बाहेर जायची सगळी कामं करत राहते. रविवारी पण मुलांना बाहेर न्यायचा बेत करते आणि रविवारची सकाळ उजाडते तीच काळोख दाटलेली. 

का कुणास  ठाऊक,  आज त्याच्यावर रुसावंस वाटत नाही. उलट आजची त्याची रिपरिप मला माझी त्याच्यावरची जुनी प्रीती आठवून देणारी वाटते. काल रात्रीच एका जुन्या, जन्मजन्मांतरीचे संबंध असणाऱ्या मैत्रिणीशी गप्पा झाल्याचा हा परिणाम तर नसेल ना ? काल आमचे जुने भटकंती दिवस आठवत होतो. पुढच्या पावसाळ्यात तिच्या नव्या घरी राहायला भेटायचं आमंत्रण घेऊन संपलेला तो फोन माझ्या मनावर रेंगाळत असावा. सकाळी बहुतेक मग त्या भटकातीच्या आठवणीचीच धुंदी मला पुन्हा पावसाच्या जुन्या प्रेमात नव्याने भाग पाडतेय.

तसा अगदी धो धो नाहीये म्हणून मग "फ्रेश एअर"च्या निमित्ताने रेनी jacket घालून बाहेर चालायला जायचा एक छोटेखानी कार्यक्रम होतोच. चालत असते मी त्या रुळल्या पाउलवाटेने सराइतासारखी. खाली लक्ष द्यायची गरज नस्तेच. मग उंच वाढलेल्या गवताचा एक माळ  लागतो आणि मी जागेच भान विसरून जाते. 

ते भिजलं गवत मला आठवण करून देत असतं जुने पावसाळे असेच नवनवीन जागी गवत तुडवून वाट शोधेलेले आणि कधी हरवलेले. मनाने मी आधीच कित्येक मैल लांबच्या त्या अनवट जागी पोहोचली असते आणि एकदम साद येते "आई मला तुला काहीतरी सांगायचं आहे" माझ्या पिल्लाचा हात हातात घेऊन मग उरल्या पाउलवाटेच कौतुक करत आम्ही घरी येताना मध्येच  एका ठिकाणी थोड्या कमी उंचीच्या गवतातून पण गम्मत म्हणून चालतो. 


आधीच्या माझं मन हरवलेल्या त्या वाटेला मनातल्या मनात मी "पाऊसवाट" म्हणून नाव देऊन टाकलेलं असतं आणि माझ्यासमोर असतो प्रसन्न सुरु झालेला एक ओला  दिवस.   

Monday, June 17, 2013

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडताना....

पाच वर्षांपुर्वी जेव्हा आमच्या घरी बाळ येणार होतं, त्याच्या निगराणीसाठी मी घरी राहायचं ठरवलं.त्यावेळचा माझा एक कॉंट्रॅक्ट जॉब होता. ज्यात एक तासाची कमाई आणि अर्थात कामाचं समाधान सोडलं तर बाकी काही सवलती नव्हत्या. त्यावेळी मग ती सोडताना फ़ार वाईटही वाटलं नव्हतं. 

मग यथावकाश पुन्हा नवी नोकरी सुरू केली. यादरम्यान आमच्या पहिल्या (आता थोडं मोठं झालेल्या) बाळाला दुसरं भावंडं येऊ घातलं होतं. यावेळीही पुन्हा निगराणीसाठी घरी राहायला, बाळाला जास्त वेळ द्यायला नक्की आवडलं असतं. पण वाढलेल्या आर्थिक जबाबदारीची जाणीव आणि त्याहीपेक्षा असं सारखं सारखं करियरमध्ये ब्रेक घेणं धोकादायक, म्हणून काम करणं थोडं भागच होतं.

असं म्हणतात ज्याने चोच दिली तो चाराही देतो. तसं माझ्या मनातल्या या आंदोलनावर उतारा म्हणून की काय मला पूर्ण वेळ घरुन काम करायची परवानगी मिळाली. अर्थात कधी वेळ पडेल तर आठवडाभर घराबाहेर जावं लागे. पण त्याची वारंवारता तशी कमी होती. माझ्यासाठी खरं तर हा "ड्रीम जॉब" वगैरे होता. कदाचीत सगळ्याच मातांसाठी (आणि बाप लोकांसाठींदेखील) हा ड्रीम जॉब असावा. म्हणजे कसं असतं आठ-दहा तासाची ड्युटी आपण सहजी करून जातो. ते अंगवळणी पडलेलं असतं. पण त्याभोवतीच्या प्रवासाचे जे काही बाकीचे तास एकप्रकारे व्यर्थ जातात ते आपण आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आणू शकलो तर ज्याला वर्क-लाइफ़ बॅलन्स म्हणतो तो खर्‍या अर्थाने साधता येईल.

तर गेले जवळपास तीनेक वर्षे मी माझ्या घरट्यात बसून काम करायची लक्झरी का काय म्हणतात ती उपभोगली. हा अनुभव कामाच्या दृष्टीने मला बरंच काही शिकवून गेला आणि खरं तर एक करियर म्हणून यातल्या कमतरता मलाही कळल्या. आणि आता पुन्हा परिस्थिती बदलतेय.मागचे महिने मी पुन्हा एकदा रोज प्रवास करून कामावर आपल्या क्युबमध्ये काम करायच्या रूटिनमध्ये रूळावतेय.

इतक्या वर्षात क्लायन्टकडे जायचे मोजके प्रसंग सोडले तर हा अनुभव मी जवळजवळ विसरलेच होते. म्हणजे एखाद आठवडा असं जाणं वेगळं आणि दररोज आपल्या टीम बरोबर काम करणं वेगळं. पहिला आठवडा तर ठरल्यावेळी तयार होऊन निघणं हाच माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. कारण त्याची सवयच नव्हती. जायचं यायचं ड्राइव्ह या विषयावर तर वेळ मिळाला तर रोज एक पोस्ट लिहिता येईल. इतकं ते हॅप्पनिंग (आणि वेळखाऊ) प्रकरण आहे. काम करायची मजा वेगळी आणि तो अनुभव टीम बदलली की बदलतो हे सार्वत्रिकच.

सगळ्यात मोठा बदल जाणवतोय ते माझ्या कुटुंबासाठीचा वेळ कमी झालाय त्याबद्दल. इतकी वर्षे ऑफ़िसचं काम संपलं की त्या रूममधून बाहेर येऊन तडक माझ्या ग्रृहिणीपदात शिरून मुलं घरात यायच्या आत त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी करून ठेवत असे. आता मात्र मी अडकले तरी ती माझ्याआधी घरात आलेली असतात आणि मग माझी जी धावपळ उडते त्यात मग त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल या विचाराने मी कावरीबावरी होते. 

त्यादिवशीच माझा एक मनकवडा मित्र मला म्हणालाही, एक लक्षात ठेव या सगळ्यापाठी तू जी धावतेस, त्याचं कारण तुला तुझ्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तुझा वेळ ही त्याची किंमत समज.

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडतानाची ही हुरहुर कदाचीत आणखी काही दिवसांनी थोडी कमी होईल. हा अनुभवही मला काहीतरी नवीन शिकवून जाईल. त्यातलं ब्लॉगवर किती मांडता येईल माहित नाही पण ही एक पोस्ट या हुरहुरीला थोडं शांत नक्कीच करेल. 

-अपर्णा
मे २०१३

Thursday, May 30, 2013

मराठी मलाथी

मुलं बोलायला लागली की भाषेला एक अभूतपूर्व महत्त्व प्राप्त होतं. त्यात तुम्ही परदेशात असलात तर मातृभाषेला थोडं काकणभर अधीक जपावं लागतं. नाहीतर मुलांनी एकदा इंग्रजी सुरू केल्यावर त्यांना वेळीच थांबवलं नाही की आपण स्वतःच किती इंग्रजी वापरतो ते आपल्याच लक्षात येणार नाही. तर भाषेवरून सांगायचं तर हिंदी ही आम्हा दोघांची सांकेतिक भाषा आहे. मुलांना काही कळू नये असं बोलायचं असलं की आम्ही आमच्या बंबैया हिंदीला साकडं घालतो पण मुलांनी मात्र घरात कटाक्षाने मराठी बोलावं यासाठीचे प्रयत्न सुरू असतात. आणि त्यामुळे काही मजेदार प्रसंग घडतात.

म्हणजे आम्ही जसं मुलांना त्यांनी इंग्रजी सुरू केलं की "मराठी मराठी" असं आठवण करून देतो तसंच आमचं हिंदी सुरू झालं की त्यांचंही "मलाथी मलाथी" सुरू होतं. दोघा भावंडांनी आपसात मराठी बोलावं म्हणून मी नेहमी जमेल तसं मराठीचं मार्केटिंग करत असते. त्यात मग ही तुमची "सिक्रेट लॅंग्वेज" असेल, कुणालाही कळणार नाही आपण चौघे काय बोलतोय ते, हे एक नेहमीचं (सध्या) यशस्वी असणारं एक गमक आहे. त्यातून घडलेला हा एक छोटा प्रसंग. अगदी ताजा. मी दुसरं काहीतरी काम करत असतानाचा बाबा आणि मुलामधला संवाद.



मु - बाबा मला इंडियामध्ये लग्न करायचं आहे.

बाबा - छान. पण का रे आरुष?

मु - म्हणजे मला तीन तीन लोकांना माझी सिक्रेट लॅंग्वेज शिकवायला नको.

बाबा - तीन??

मु - हो दोन बेबीज आणि एक आई



मी तर उलटी पालटी होणारच होते तेवढ्यात आणखी एक निरागस स्टेटमेंट

"बाबा, मुंबईला हॉस्पिटल असतात नं?"


बाबा आणि आई दोघंही आपलं फ़क्कन येणारं हसू दाबून गप्प. मी माझ्याच डोक्यात टपली मारून घेणार आहे. कुणी सांगितलं होतं सांगायला की तुला आणि तुझ्या भावाला हॉस्पिटलमधून आणलं होतं? बरं आम्ही एक सांगितलं पण ते या दाराने बाहेर पडेल हे मात्र आम्हाला कसं कळणार :)

इथून पुढे मुलाला कुठली माहिती दिल्यावर ती कशाप्रकारे प्रोसेस होऊन बाहेर पडेल मी काहीच सांगू शकत नाही. पण हा प्रसंग मात्र नोंद केल्याशिवाय राहवत नाही.

Wednesday, May 15, 2013

रुपेरी पडद्यामागचं आत्मकथन अर्थात Diary of A Stage Mother's Daughter


मेलिसा फ़्रान्सिस, ऐंशीच्या दशकातली एक बालअभिनेत्री. अगदी लहानपणापासून जाहिराती,इतर छोटी मोठी कामं करता करता, वयाच्या आठव्या वर्षी Little House on the Prairie या तेव्हा गाजलेल्या सोप ऑपरामध्ये तिला काम मिळतं आणि तिनं काम करणं हे एक प्रकारे तिच्या आईची मानसिक (आणि कदाचीत आर्थिक) गरज बनते हे एक प्रकारे अधोरेखित होतं. तिच्या आईचं तिने  बालअभिनेत्री व्हायचं करियर सांभाळताना मेलिसाची झालेली कुतरओढ, जोडीला तिच्या मोठ्या बहिणीच्या आयुष्याची परवड, हे सगळं हताशपणे पाहणारे तिचे बाबा, आणि अर्थात या सर्वांवर मेलोड्रामाटिक वागणूकीने अंश ठेवणारी तिची आई, हे सगळं मोजक्या प्रसंगात आपल्यासमोर उभं करणारं एक आत्मकथन म्हणजे Diary of A Stage Mothers Daughter.  


हे पुस्तक सुरू होतं तिच्या आठवणीतल्या एका प्रसंगाने. तिच्या लहरी आईने तिला एका रस्त्यावर गाडीतून सोडून दिलं असतं आणि मग हट्टाने ती आई परत आलेल्या गाडीला दिसू नये अशी लपून बसते आणि अखेरीस चालत घरी जाते. मेलिसा, तिची मोठी बहिण टिफ़नी आणि तिचे आई-बाबा या लॉस एंजेलिसजवळच्या एका गावात राहणार्‍या या वरकरणी सगळं ठीक सुरू आहे असं दिसणार्‍या कुटुंबात लहरी स्वभावाची आई म्हणजे या कुटुंबालाच लागलेली एक कीड आहे असं या पुस्तकात आलेल्या बर्‍याच प्रसंगातून एकंदरित वाटतं.

मेलिसा निदान तिला एक मोठी सिरीज मिळाल्यामुळे बहुतेक आईच्या प्रेमाला थोडीफ़ार पात्र असते पण त्याचवेळी ऍक्टिंगमधून एक्झिट घेणारी तिची मोठी बहीण टिफ़नी मात्र आईसाठी अस्तित्वातच नसते.कुठल्यातरी डिप्रेशनमध्ये घरातल्या कुठल्याही कामात लक्ष न दिसणारी ही आई काहीवेळा आपल्या मुलींना शाळेतून परत आणायला जायला विसरते काय किंवा कारपुलसाठी स्वतःची वेळ असेल तेव्हा उशीराने पोहोचून इतर मुलांनाही उशीर करते, घरात बरेचदा नीट ग्रोसरी पण आणलेली नसते, घर साफ़ ठेवलेलं नसतं आणि ते साफ़ करून मैत्रीणीला घरी खेळायला बोलावणार्‍या मेलिसाला तू परस्पर असं कसं मैत्रीणींना बोलवू शकतेस असं सांगणारी आई, असे बरेच प्रसंग एकामागोमाग एक येतच जातात. 

This was half of my life. When we were at home, my sister and I lived in a state of constant wariness, always reading my Mom's mood and bracing for impact when that mood turned ominous. We were treated to riding lessons, skating lessons, the best school my parents could afford. But her vigilance was also a leash, one she could pull tight enough to strangle. 

हे एक टोक आणि मग दुसरं मेलिसाबरोबरचं तिच्या ऑडिशन्स, शुटिंगच्या वेळेसचं आईबरोबरचं तिचं टिमिंग याचे चांगल्या दृष्टीचेही उल्लेख आहेत. तिला लिटिल हाउसमध्ये काम मिळणं आणि एकंदरित तो काळ तिच्या आईच्याही भरभराटीचा. फ़क्त प्रत्येक चांगल्या गोष्टीचं श्रेय स्वतःकडे कसं ठेवता येईल हे पाहताना ही नक्की यांची आईच आहे का हा प्रश्न पडावा. त्यातही चुकीच्या मार्गावर जाणार्‍या टिफ़नीला आई म्हणून कुठलाच आधार तिने देऊ नये हेही मोठं कोडंच. 

साधारण कळत्या वयात म्हणजे हिशेब वगैरेचं कळायला लागल्यावर मेलिसा आपल्या आईला आपल्यासाठी ठेवलेल्या खात्यात किती पैसे असतील असं आईला विचारते. त्यावेळचा तिच्या आईचा त्रागा म्हणजे हद्द आहे. म्हणजे मुलांना महागड्या वस्तू, प्रायव्हेट शाळा हे सगळं पुरवायला त्यांनीच कमवायला लागणं आणि वर हे सगळं तुला मिळावं म्हणून मीच प्रयत्न करतेय. मी माझं करियर न करता फ़क्त तुला ऑडिशन्ससाठी फ़िरवतेय वगैरे वगैरे ऐकवणं म्हणजे पराकोटीची हद्द आहे. तोवर मेलिसाला कॉलेज करायचं असतं आणि त्याला पैसे लागणार हे माहित असतं त्यामुळे आईच्या नकळत ती कामं करून आलेले काही चेक्स एका वेगळ्या अकाउन्टला ठेवून तिला स्टॅनफ़र्डच्या समर प्रोगामसाठी ऍडमिशन मिळाल्याचं घरात सांगते आणि त्यावेळी आईचं पहिलं वाक्य असतं हे तू कसं काय ठरवलंस? आणि मुख्य स्टॅनफ़र्डसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. तुला तर अजून काम करायचंय. म्हणजे मुलीने काय करायचं, रुपेरी पडद्यावर राहायचं की नाही हे आई ठरवणार आणि तिने लहानपणापासून केलेल्या मेहनतीचं चीज तिला नाहीत.अर्थात मेलिसाला माहित असतं हे असंच होणार म्हणून ती देखील म्हणते माझ्याकडे तेवढे पैसे आहेत मग पुन्हा तमाशा, त्या बॅंकेला जाऊन धमकावणं की तुम्ही मुलांचे पालक नसताना असं अकाउंट कसं उघडू दिलं इ.इ. 

well that account was closed and she did not even have a gun.

इथून पुढे मग मेलिसाला हार्वडला ऍडमिशन मिळणं, तिचं लग्न, त्यावेळी तिच्या सासरकडच्यांना (ते सदर्न आणि हे वेस्टर्न अमेरिकेतले म्हणून) आईने कसं वागवणं आणि तोवर पूर्ण वाया गेलेल्या टिफ़नीचं लग्नात दारू पिऊन बेताल वागणं सारंच वाचायचं म्हणजे हे पुस्तक एकदा घेतलं की खाली ठेवताच येणार नाही.

हे सगळं जसं घडलं असावं तसं कमीत कमी प्रसंगातून आपल्यासमोर उभं करायचं मेलिसाचं लेखनकौशल्य कमाल आहे. तिचं लहानपण, कलाकार म्हणून सेटवरचे अनुभव, कॉलेजमधले प्रसंग, तिच्या आयुष्यात आलेली मुलं आणि तिच्यापाठी उभा असलेला तिचा नवरा, त्या दोघांचं भेटणं हे सगळं तिच्याच शब्दात वाचायला हवं. 

जाता जाता एक सांगितल्याशिवाय राहावत नाही. तिचं तिच्या बहिणीबद्दलचं प्रेम आणि आपण काही करू शकलो नाही याची तिची खंत जितकी जाणवते तितकीच जाणवते स्वतःच्या स्वार्थापोटी सगळ्याच कुटुंबाचं नुकसान करणारी तिचीच आई. स्वतःच्या आईबद्दलचे हे प्रसंग अशा प्रकारे लिहायलाही धैर्य लागतं. शेवटी शेवटी आईच्या थेरपीज आणि टिफ़नीच्या बाय पोलर डिसॉर्डरवर होणारा खर्च, शिवाय आईने घर सजवायला म्हणून घेतलेल्या महागड्या वस्तुंची बिलं हे सर्व खर्च करून जेरीला आलेले तिचे बाबा मेलिसाला घरातली सत्य परिस्थिती सांगतात (तेव्हा तिचं लग्न होऊन ती काही वर्षे सॅन फ़्रॅन्सिस्कोला आली असते). तिच्याबरोबर आपलंही डोकं सुन्न होतं. मग घर विकायचं ठरतं तशी तिची आई, बाबा आणि टिफ़नीला जणू वार्‍यावरच सोडते. नेमकं ज्यादिवशी मेलिसा आपल्या नवर्‍याच्या तिसाव्या वाढदिवसाची पार्टी ऍरेंज करत असते तेव्हाच त्या विकायला लागणा‍र्‍या घराचं कागदपत्री कामं वगैरे आहेत असं सांगून बाबा येत नाहीत. पण ही आई मात्र येते आणि पुन्हा एकदा तिच्या सासरच्यांकडे दुर्लक्ष करून जाते. काही दिवसांनी तिला टिफ़नी आणि बाबा भेटतात तेव्हा तिला कळतं की त्या पार्टीला यायच्या आधी आई त्या विकलेल्या घरातून, इतरांची देणी-बिणी देऊन उरलेले सगळे पैसे परस्पर चेक वटवून आणि बाबांच्या धंद्याच्या अकांउन्टमधलेही सगळे पैसे काढून आलेली असते. थोडक्यात स्वतःकडे फ़क्त पैसा ठेऊन रक्ताची नाती तोडून ही इकडे पार्टीमध्ये मजेत वावरून गेलेली असते. 

हे सांगताना टिफ़नी आणखी काहीतरी सांगते जे काळजाला घर पाडतं.
You know, I was lying in the hospital last time and in the middle of the night I was just in so much pain. And ...so scared. All I could think was, it would be so nice to have a mom.

त्यानंतर मात्र मेलिसाने आतापर्यंत स्वतःला सांभाळलेलं असतं ते सारं तुटतं आणि ती आईला फ़ोन करून आपला संबंध संपल्याचं कळवते. त्यानंतर काही दिवसांनी डॉट कॉमचा बबल फ़ुटल्यामुळे मेलिसाची नोकरी दोलायमान होते . ती आणि तिचा नवराही आपापल्या नोकर्‍या सांभाळायच्या की मेलिसाला न्यु-यॉर्कमध्ये न्युजलाइनमध्ये करियर करायचं असतं ते बरं पडेल या विचारात परत इस्ट कोस्टला जायचा निर्णय घेतात. त्याच दरम्यान आजाराने टिफ़नी जाते. मेलिसाला तिचं it would be so nice to have a mom हे वाक्य सारखं आठवत राहातं. आपल्या बहिणीसाठी आपण फ़ार काही करू शकलो नाही हेही तिच्या लिखाणात जाणवतं. 

एका अतिमहत्वाकांक्षी आईने आपल्याच मुलांचं केलेलं नुकसान. मेलिसाने खरं तर स्वतःच स्वतःचं आयुष्य घडवलं. ती सीएनबीसीच्या power lunch, The Call, On the Money अशा कार्यक्रमाची निवेदक होती. तसंच सध्या ती फ़ॉक्स बिझनेस नेटवर्कवर Money with Melisa Francis हा बिझनेस शो करते. आपल्या दोन मुलांसह न्यु यॉर्कमध्ये राहणारी मेलिसा स्वतः आई झाल्यावर आपल्या आईकडून आईने कसं असू नये हा धडा शिकल्याचं आवर्जून लिहिते.

तळटीप

हातात धरल्यावर खाली ठेवता येणार नाही असं एखादं पुस्तक मी बर्‍याच दिवसांनी वाचलं आणि त्याबद्दल थोडं लिहावं असं वाटलं.शेवटच्या काही घटनांचा उल्लेख केला नाही तर ही पोस्ट पूर्ण होणार नाही असं वाटलं म्हणून ते लिहिलं. हा ब्लॉग वाचणार्‍या प्रत्येकाला लगेच हे पुस्तक वाचायला मिळेलच असं नाही म्हणून तो उल्लेख गैर नसावा असं वाटतं.
सध्या एकंदरित सगळीकडे आपल्या मुलांना रुपेरी पडद्यावर येनकेन प्रकरणे झळकावं असं वाटायची एक लाट आली आहे. त्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक बर्‍याच पालकांच्या डोळ्यात अंजन घालेल अशी अपेक्षा. आपल्या मुलांनी रुपेरी पडद्यावर यशस्वी व्हावं आणि तिथेच त्यांनी करियर करावं म्हणजे आपल्यालाही इतर पालकांपुढे शेखी मिरवता येईल, पण हे पालकांचं वेड मुलांना आणि पूर्ण कुटुंबाला रसातळाला नेऊ शकेल हे कुणी प्रत्यक्ष अनुभवलं असेल तर ते मेलिसा आणि अर्थात तिच्या बहिणीने. त्यातल्या मेलिसाने ग्लॅमरसोबत वाहावत न जाता स्टॅनफ़र्ड आणि हार्वर्डसारख्या ठिकाणी आपली पात्रता सिद्ध करून यशस्वी होऊन दाखवलं.त्यासाठी आणि हे सगळं या पुस्तकात इतक्या नेमक्या शब्दात ते सत्य मांडायचं धाडस करणार्‍या मेलिसाचं कौतुक करायलाच हवं. 

Sunday, April 21, 2013

गाणी आणि आठवणींच्या पलिकडे


मागच्या वर्षी एक अकस्मात एक चांगला योग आला आणि एका कार्यशाळेच्या निमित्ताने श्रीधरजींशी परिचय झाला. आता त्यांचं संगीतक्षेत्रातलं स्थान पाहता माझ्यासारख्या परदेशात भेटलेल्या एखाद्या अगदीच होतकरू व्यक्तीची त्यांनी आठवण ठेवावी असं मी थोडंही मनात आणलं नव्हतं. माझ्यासाठी सगळ्यात मोठा धक्का हा होता की ते परत गेल्यावर त्यांनीच मला एकदा फ़ोन केला आणि एकंदरित त्या कार्यशाळेच्या अनुभवाबद्दल आम्ही बोललो. शिवाय त्यांची तिथे घेतलेली "लिलाव"ची सिडी आवडली का आणि त्याबद्दल तू नक्की मेल कर वगैरे त्यांचं सांगणं म्हणजे मी ते दोन तीन दिवस "आज मैं ऊपर" होते. अगदी माझ्या एका पोस्टवर कौशलची प्रतिक्रिया आली होती तेव्हासारखंच.

मग आमचे थोडे-फ़ार मेल्स इ. झाले.त्यामुळे यावेळच्या भारतभेटीत त्यांना नक्की भेटूया असं मी ठरवलं होतं.अर्थात भारतात गेल्या गेल्या काही वैयक्तिक गोष्टींमुळे तेही लगेच शक्य झालं नाही. मग मी फ़ोन केला तेव्हा ते गोवा दौर्‍यावर निघाले होते. आता ते परत येणार तेव्हा माझा परत निघायचा आठवडा म्हणून मी खरं तर फ़ार काही आशा लावून ठेवली नव्हती. पण त्या शेवटच्या आठवड्यात नेमकं पार्ल्याला माझं एक काम निघालं. तिथे तसंही आम्हाला मागच्या वेळेपासून "गजाली"ला जायचं होतं तेव्हा आम्ही दोघं आणि ऋषांकला बरं नव्हतं म्हणून फ़क्त आरुष असे तिघे निघालो. माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर झालं आणि मनात आलं बघुया श्रीधरजींना फ़ोन करून. निघायच्या आधी धावत-पळत भेटता आलं तरं. मी आत्ता पार्ल्यात आहे तर हो या की असं ते फ़ोनवर बोलले आणि अगदी आम्ही होतो तिथपासून रिक्षाने कसं यायचं हे सविस्तरपणे समजावलं. रस्त्यात त्यांच्यासाठी काहीतरी घेऊया असं मी म्हणत होते तर त्यांनी दिलेलं मार्गदर्शन इतकं परफ़ेक्ट होतं की सरळ त्यांच्या इमारतीसमोरच रिक्षावाल्याने थांबवलं. मग आणखी वेळ न दवडता सरळ त्यांच्या घराची बेल वाजवली.
वरचं ट्रॉफ़ीज ठेवण्याच्या जागेच डिझाईन त्यांच्या जावयाने केलंय

 खरं म्हणजे इतकी कमी वेळेची नोटीस देऊन त्यांच्यासारख्या व्यक्तीला भेटायला जायला मला कसंतरीच होत होतं पण माझ्याकडे खरं तर त्यादिवशी नसतं तर मग परतायची वेळच आली असती मग पुन्हा कधी म्हणून मी सरळ तो विचार पाठी सारला. त्यांनी स्वतःच दार उघडलं आणि प्रसन्न हसून स्वागत केलं. आमची एकंदरीत चौकशी करताना मला तर आमची जुनी ओळख असल्यासारखंच भासलं.



आरुषला मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायला सांगितले तेव्हा त्यांनी त्यांच्या भिंतीवर असलेल्या बाबुजींच्या फ़ोटोकडे बोट दाखवून त्या आजोबांचे आशीर्वाद घे म्हणून सांगितलं.मी नवर्‍याची ओळख करून दिली आणि आम्ही जन्मजन्मांतरीची ओळख असल्यागत त्यांनी आमच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. आम्ही अचानक गेलो तरी आधीच त्यांनी त्यांच्या घरी काम करणार्‍या बाईला त्यांनी उपमा करायला सांगितला होता. खरं तर आम्ही गजालीमध्ये जाणार आहोत हे मी त्यांना खास काही करायला लागू नये म्हणून सांगितलं होतं, पण त्यांचा आग्रह मोडणं शक्य नव्हतं. मग त्यांनी स्वतः आम्हाला आतल्या खोलीत नेलं आणि तिथे त्यांनी बाबुजींचं एक मोठं पोस्टर केलंय ते आणि त्यांची पेटी दाखवली. अगदी आवर्जून तुम्हाला फ़ोटो घ्यायचे आहेत का हे देखील त्यांनीच विचारलं. 
बाबुजींची पेटी ज्याच्यावर त्यांनी हजारो चाली रचल्या, कार्यक्रम केले

त्यानंतर मग आता काय सुरू आहे याविषयी बोलताना आम्ही भेटलो त्याच्या अगदी एक-दोन आठवडे आधीच केलेल्या अभंगाच्या अल्बममधली भक्तिगीतं ऐकवली. त्यांच्याच घरात, त्यांच्या सिस्टिमवर आणि प्रत्यक्ष त्यांच्याच निवेदनाखाली त्यांची इतर कुणीही न ऐकलेली गाणी ऐकताना मला खरंच सांगते काटा आला. म्हणजे त्यावर त्यांचं म्हणणं तुम्हाला वेळ असेल तर मी आणखी ऐकवू शकतो. खरं तर मला तो वेळ हवा होता पण एकंदरित त्या दिवसाची उर्वरीत रुपरेषा, सामानाची बांधाबांध इ.इ.चा विचार करता ते शक्य नव्हतं. पण जे अभंग ऐकले त्यातल्या गायकांचं कौतुक, त्यांची त्या गाण्यामागची पार्श्वभूमी अशी बरीच माहिती त्यांनी ओघानेच आम्हाला दिली. त्यांच्या घरी त्यांच्या सिस्टिमवर त्यांची इतकी ताजी गाणी ऐकायला मिळणे हे सगळं माझ्या तोवरच्या दगदगीच्या ट्रीपमध्ये खरंच अपेक्षित नव्हतं.माझ्यासाठी हा अनुभव एक स्ट्रेस बस्टरच होता.
बाबुजीं आणि श्रीधरजींना मिळालेल्य ट्रॉफ़ीज

मग त्यांनी अगदी आवर्जून मला त्यांच्या रामनवमीच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलं. माझे आई-बाबा बोरीवलीला राहात असल्याने त्यांनी जावं म्हणून मी ते लक्षात ठेवलं. 

मागच्या आठवड्यापर्यंततरी ही पोस्ट टाकायची होती पण शेवटी राहून गेलं. तरी ही आठवण मात्र लिहायला हवी. तो त्यांनी उल्लेख केलेला गीतरामायणाचा कार्यक्रम बोरीवलीच्या सावरकर उद्यानात आता परवाच्या रामनवमीच्या निमित्ताने पार पडला.अर्थात वर्तमानपत्रातल्या जाहिराती वगैरे पाहून माझ्या मुंबईच्या वाचकांनी नक्की या सर्वांसाठी विनामुल्य कार्यक्रमाचा नक्की लाभ घेतला असेलच अशी आशा.

आमच्या कार्यशाळेच्या वेळी "ऋतु हिरवा"चा विषय निघाला होता आणि सहज श्रीधरजी म्हणाले होते की मी आशाबाईंसाठी काही गाणी करून ठेवलीत आणि त्यांना त्याच्यानंतर माझ्याकडे गायलाच वेळ मिळाला नाही. मग आम्ही आपलं त्यांना म्हटलं की मग तुम्ही ती दुसर्‍या कुणाकडून गाऊन घेणार का? त्यावर त्यांनी ओठ घट्ट मिटत "नाही, मी ती तिच्यासाठीच केलीत" असं म्हणून तो विषय बंद झाला होता. तर आमच्या पार्ल्यातल्या भेटीत त्यांनी आवर्जून ती गाणी आशाबाईंकडूनच रेकॉर्डिंगला सुरूवात केलीय ही बातमी दिली. हे सांगताना त्यांचा फ़ुललेला चेहरा बरंच काही सांगून गेला. 

आशाजींच्या वैयक्तिक आयुष्यातली जखम ताजी असतानाचं त्यांचं गाणं सुरू होतंय ही खरंच चांगली बातमी आहे हे मी त्यांना नमूद केलं त्यावेळी त्या अल्बममधल्या एका कवितेचे शब्द सांगून ते म्हणाले की हे गाणं गायल्यावर आशाबाई अक्षरशः रडल्या आणि म्हणाल्याही हे असेच योग माझ्याही आयुष्यात येताहेत असं दिसतंय. मग "भोगले जे दुःख"बद्दलही आम्ही बोललो. बसावंसं खूप वाटत होतं पण वेळेची कमतरता होतीच. आम्ही निघतानाचा कळस म्हणजे त्यांनी स्वतः गेटवर येऊन कोपर्‍यावरच्या रिक्षावाल्याला स्वतः हाक मारून आम्हाला गजालीकडे सोडायला सांगितलं. हा त्यांचा विनम्रपणा आम्हा दोघांनाही थक्क करून केला. कुठल्या जन्माचं माझं पुण्य मला अशा चांगल्या व्यक्तीमत्वांशी भेट करुन देतं हे आधी एकदा नाना पाटेकर गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी शेजारी होते तेव्हाचं आणि आता श्रीधरजींचं अगत्य अशा काही प्रसंगी नक्की वाटतं. खूप मोठ्या उंचीवर गेल्यावरही दोन्ही पाय जमिनीवर ठेऊन कसं राहता येतं हे असे अनुभव येतात तेव्हा आवर्जून जाणवतं. 

मला वाटतं गाण्यांच्या ज्या काही थोड्याफ़ार आठवणी माझ्याकडे आहेत आणि आणखीही येत राहतील त्या सगळ्याच्या पलिकडे ही भेट आहे.इतक्या मोठ्या संगीतकाराने त्यांची अजून कुणी न ऐकलेली गाणी माझ्यासारखीला ऐकवणे काय किंवा त्यांचे हे गायक आणि रेकॉर्डिंगच्या वेळचे व्यक्तिगत अनुभव आमच्याशी घरचं कुणी असल्याप्रमाणे शेअर करणे काय, मला माझाच हेवा वाटतो. 
बाबुजी गेल्यानंतर त्यांचं केलेलं एक मोठं पेंटिंग श्रीधरजींनी आवर्जून दाखवलं

इतक्यात फ़ोनवर त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळी ते वर्ध्यामध्ये एक कार्यक्रम करून परत मुंबईला निघाले होते. त्या गडबडीतही त्यांनी आवर्जून आशाताईंचा अल्बम येत्या महिन्यात ठाण्याला रिलिज होतोय ही बातमी दिली आणि ती जी अभंगाची सिडी आहे त्यातली दोन गाणी एक मला वाटतं सुरेशजी आणि एक शंकर महादेवनचं राहिलं आहे पण आषाढी एकादशीच्या आसपास तीही सिडी येईल असं सांगितलं. 

या दोन सिडीजची मी व्यक्तिशः आतुरतेने वाट पाहाते आहे. जेव्हा केव्हा मी ही गाणी ऐकेन तेव्हा या गाण्यांच्या पलिकडच्या आठवणीत माझं मन नक्कीच जाईल.