Monday, December 6, 2010

गाणी आणि आठवणी ७ - सप्तसुर

सारखं जुन्याच गाण्यांनी मन रिझवायचे दिवस सुदैवाने कमी झाले आहेत आणि त्याला कारण आहेत सारे नव्या दमाचे मराठी संगीतकार आणि गायक कलावंत. असंच एकदा ’मराठी बाणा’ पाहायला दिनानाथला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात लालबागच्या एका विक्रेत्यांचा मराठी सीडीजचा स्टॉल होता. त्यात हपापलेली खरेदी झाली हे वेगळं सांगायला नको आणि त्यातच हाती लागला दोन सीडीजचा हा टवटवीत अल्बम "सप्तसुर"...Generation Next....


मुख्यपृष्ठावर ओळखीचे चेहरे आणि आत पहिलंच ’मन उधाण वार्‍याचे’ हे तेव्हा एकमेव ओळखीचं गाणं पाहून आणि ऐकुया नंतर निवांत असा विचार करुन घेतलेला संच. परदेशात नाइलाज म्हणून गाणी डालो केली जातात पण जेव्हा संधी मिळते तेव्हा संग्रहासाठी मी शक्यतो आवडीच्या गाण्यांना विकत घेतेच.तसंच थोडंसं...

परत परदेशी आल्यावर गाणी अर्थातच ऐकली गेली. पण खर्‍या अर्थानं पारायणं झाली ती बरोबर मागच्या वर्षी ओरेगावात आलो तेव्हा. अरे हो! वर्ष झालं नाही या नोव्हेंबराखेर? नवी जागा आणि नेमका इथल्या भाषेतला "हॉलिडे सिझन".आल्याआल्या कुठली जागा आवडायला आणि इतका ३००० मैलाचा प्रवास, सामान लावणं इ. दगदगीमुळे फ़िरतीचं प्लानिंग करण्याचं त्राण अर्थातच नव्हतं. त्यावेळी मग एखाद्या दुपारी जेवणं झाली की गाडी काढून थोडंफ़ार गुगलून आसपासचा परिसर धुंडाळताना नेमका हाच संच गाडीत असल्यामुळे सारखा ऐकला गेला आणि या गाण्यांशी वेगळं नातं जुळलं गेलं.

त्यात आणखी एक योगायोग म्हणजे यातली जास्तीत जास्त गाणी पावसाची आहेत आणि इथे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे संततधार (आणि तुरळक बर्फ़) मोसम. त्यामुळे वैशालीच्या आवाजातलं "भुईवर आली सर, सर श्रावणाची" ऐकलं की आम्ही इथल्या एका सिनिक ड्राइव्हला जातोय आणि पाऊस पडल्यामुळे खाली आलेले ढग पाहताना घरी आलेला कंटाळा विसरतोय हेच दृष्य कोरलं गेलंय. तर अवधूतच्या संगीत आणि आवाजातलं "पावसा येरे पावसा" आणि "थेंबभर तुझे मन" थोडं रॉकच्या शैलीत असलं तरी एकदा थंडी असतानाही थोडं ऊन होतं म्हणून गेलेल्या कॅनन बीचवर उधाणलेल्या सागराची आठवण करुन देतो. "स्पर्श" हेही अवधूत आणि वैशालीच्या आवाजतलंच आणखी एक रॉक धर्तीतलच पण एकंदरित आपण "फ़्रेश" म्हणतो तसं गाणं ऐकताना मला इथला पाऊस आठवतो. खरं तर यातल्या जवळजवळ सगळ्याच गाण्यांना मी माझ्या इथल्या सुरुवातीच्या थंडी-पावसाचे दिवसांच्या आठवणींशी जोडू शकते.


सगळीच गाणी रॉक स्टाइल आहेत असं नाही आहे. सुरुवात "मन उधाण वार्‍याचे" हे सगळ्यांनाच माहित असलेलं गाणं आणि नंतर साधना सरगम यांच्या आवाजातलं "रंग रंग रंगा ग" हे एकदम झोपाळ्यावर टाळ्या घेत म्हटल्यासारखं, मन ताजंतवानं करणार्‍या गाण्यांनी होते आणि मध्ये पुन्हा मूड बदलुन पावसाची किंवा संगीतकार अशोक पत्की यांचं "राधा ही बावरी"चाही समावेश या अल्बममध्ये आहे. पावसाच्या गाण्याबरोबरच अचानक बासरीसारखं गोड श्रेया घोषालच्या आवाजातलं "हरि हा माझा प्राण विसावा" हे गाणं माझं अत्यंत आवडीचं गाणं झालंय. तिचंच आणखी एक "अजुन तरळते" हेही कृष्णावरचं गीतही सुरेख झालंय.या दोघांचं संगीत "मिलिंद जोशी" यांचं आहे.

हे सगळं इतक्या सविस्तर सांगण्याचा उद्देश म्हणजे जास्त काही माहिती नसताना एखादी सिडी उचलली जाते, ती सुरुवातीला सहज म्हणून ऐकली जाते आणि मग एका विशिष्ट वातावरणाशी तिचा मेळ जुळतो तेव्हा त्यातली सारीच गाणी कशी लाडकी होतात याचं माझ्यासाठी उत्तम उदाहरण माझ्यासाठी हा संच आहे. ही गाणी ऐकली नसती तर कदाचित माझे सुरुवातीचे ते दिवस खूप कंटाळवाणे झाले असते, तो पाऊसही नकोसा झाला असता.

परदेशातली विशेषतः अमेरिकेतली कुठली नवी जागा ज्यांनी हिवाळ्यात पहिल्यांदी पाहिली आहे त्यांना मला काय म्हणायचंय ते नक्की कळेल.अशावेळी अशी फ़्रेश गाणी दिल्याबद्दल मी "सागरिका"चे आभारच मानले पाहिजेत...आणि त्या अनाम विक्रेत्याचे ज्याने त्यादिवशी खूप छान छान मराठी सीडीज तिथे आणण्याचं काम केलं..नाहीतर त्या फ़ेरीत हवी ती मराठी गाणी कुठे विकत घ्यायची हा एक यक्षप्रश्नच झाला होता. (आणि अद्यापही आहे...है क्या कोई मुझे राह दिखानेवाला?)

आता पुन्हा एकदा तोच पाऊस सुरु झालाय आणि त्याच सीडी मी पुन्हा आठवणीने गाडीत ऐकायला सुरुवात केली आहे. फ़रक इतकाच की आता ती गाणी माझ्या तोंडावर कडव्यांसकट आहेत.

13 comments:

  1. सही सही... खरंच.. फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' च ओळखीचं वाटतंय.. बाकी नाही ऐकलीत..

    बाकी अमेरिकेतल्या हिवाळ्यात नवीन जागेत स्थलांतर करून तिथे सेट होणं हे खरंच मोठं दिव्य असतं !!

    ReplyDelete
  2. वाह!

    ‘सप्तसुर’ ची सिडी मिळवुन ऎकायला हवी. तसही मुंबईत अजून पाऊस पडतच आहे अधेमधे.. ;-)


    बेला शेंडे चा ‘हृदयामधले गाणे’ अलबम ऎकलास का? ‘तुझ्याविणा’ हे गाणे अप्रतिम गायलेय तिने..
    http://music.raag.fm/Marathi/songs-27322-Hridayamadhale_Gaane-Bela_Shende

    ReplyDelete
  3. बस्स! माझंही असंच काहीसं होतं! आयपॉड मध्ये साठवलेल्या गाण्यांचं असं वेडच लागलयं जणु ! यावर मलाही एक पोस्ट टाकायची होती! थँक्स तु आठ्वण करुन दिलीस!!

    ReplyDelete
  4. वैशालीने गायलेले भुईवर आली सर... छान आहे आणि श्रेयाचंही मस्तच. यातली सगळी गाणी ऐकल्यासारखी वाटत नाहीयेत. आता जालावर मिळाली तर ऐकतेच.

    त्या अनाम विक्रेत्याने तुझी चंगळच केली की... :)

    ReplyDelete
  5. फक्त 'मन उधाण वाऱ्याचे' च ओळखीचं वाटतंय.. बाकी नाही ऐकलीत.. +१

    चांगला वाटतोय संच!

    ReplyDelete
  6. हेरंब, हिवाळ्यामुळेच ती गाणी ऐकली नाहीतर मला तरी कुठे सर्व माहित होती...पण ऐक कधी.
    नाही तर इथे ये....(हिवाळा पण आहेच...:)

    ReplyDelete
  7. दीपक, ‘तुझ्याविणा’ आताच ऐकलं..अजून एक ताजं गाणं पाठवल्याबद्दल हाबार्स. बेला शेंडे अगदी तिच्या सा रे ग म प काळापासून आवडते...:)
    सप्तसुर नक्की ऐकून बघ...एकदम फ्रेश वाटेल....
    तुझी पोस्ट पण लवकर टाक....:)

    ReplyDelete
  8. श्रीताई, तुला आधी सुचवलं असत तर तुला तिथेच घेता आली असती सीडी...मायाजालावर आहे का माहित नाही..
    आणि विक्रेता अनाम झाला कारण आमच्याकडून त्याच कार्ड हरवली आणि अशी मंडळी काही ब्लॉग वाचत नसतील न??...
    तू एक कामं कर एकदा ओरेगावात ये मग निवांत गाणी ऐकत माझ्या इतर फर्माईशी पुऱ्या कर..कशी वाटते कल्पना?? हव तर हेरंबचा पण नंबर लावू कसं??

    ReplyDelete
  9. बाबा, आता तू मायदेशी जाशील तेव्हा लिस्टवर ठेव...जास्त नाही फक्त दीडशे रु.ची सीडी आहे..पण आपल्या पिढीला आवडतील अशी गाणी आहेत...
    आणखी एक "राधा ही बावरी" पण यात आहे. ते पण फेमसपैकी आहे. पण आता ऐकून ऐकून हे गाणं मला जरा रटाळ वाटायला लागलाय...मुख्य आतलं संगीत....आता इथे कुणी या गाण्याचा पंखा असेल तर मार खायची तयारी ठेवायला हवी....:)

    ReplyDelete
  10. सप्तसूर सीडी चांगली आहे, त्यात सर्व गाणी (नवीन भावगीते व सर्वाना आवडतील अशी गाणी समाविष्ट केले आंहे)कोणाही काही आवडो पण गाणी एकदम चागली व मनात गुंगुणारी आहेत मराठी गाण्याची आवड निर्माण करणारी आहे.वाढदिवसाला भेट दिल्यास मराठीचा प्रचार पण होईल व गाणी ऐक्ल्य्याचे समाधान पण मिळेल.

    ReplyDelete
  11. महेशकाका गाण्याची ते पण मराठी गाण्याची सीडी वाढदिवसाला देण्याची कल्पना आठवून दिल्याबद्दल आभारी.. पूर्वी मी "तेजोमय नादब्रम्ह" द्यायचे आता हिचा नंबर लावावा लागेल....:)

    ReplyDelete
  12. यस्स... मला आवडेलच गं. हेरंबलाही नक्की आवडेल. :)

    ReplyDelete
  13. दोन वेगळ्या दीपकांनी टाकलेल्या प्रतिक्रिया घाईत पहिल्या म्हणून अजून एक माझी प्रतिक्रिया...
    दीपक परुळेकर, तू तुझी पोस्ट पण टाक..
    आणि दीपक (पु.ल.प्रेमी) मी नंतर सगळाच अल्बम ऐकला आणि वेडी झाले...मस्त गाणी आहेत..म्होरल्या वक्ताला इकत घेईन कसं...:)thanks for the link...:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.