Tuesday, October 6, 2009

नदीच्या दुसर्‍या किनारी असताना...

२००४ ते २००६ मी फ़िरतीची नोकरी केली. फ़िरतीची म्हणजे अगदी १००% प्रवास...रविवार संध्याकाळ किंवा सोमवारी पहाटे निघुन आठवडाभर क्लायन्टकडे काम करुन मग गुरुवारी किंवा शुक्रवारी विकेन्डसाठी घरी. सुरुवातीला वाटलं होतं की काय आपण आपलं खाजगी आयुष्य सोडुन भटकतोय. पण नंतर तशी सवय झाली. मला तशी स्वयंपाकघरात गती नव्हती. आता काय पळ काढायला निमित्त होतं. शिवाय प्रत्येक नव्या प्रोजेक्टला नवी जागा, नवे सहकारी आणि नवी लोकल रेस्टॊरन्ट्स. शिवाय हॉटेल मधली रुम सर्विसने आवरलेली खोली त्यामुळे तिथेही काम नाही. घरी आल्यावर कधीकधी इतका पसारा वाटायचा. पण तरी घरी आल्यावर तो बॅक होम फ़ील असायचा त्याची तुलना नाही.
जाताना नवरा मला एअरपोर्टला सोडायला यायचा ना तेव्हा नेहमी त्याच्या सुचना आणि मग चेक-इन झालं का ते अगदी मोबाईल बंद करेपर्यंत काही ना काही बोलणं. त्यातल्या त्यात एक बरं होतं ते सर्व प्रोजेक्ट्स क्लायन्ट स्पॉन्सर्ड होते त्यामुळे त्यांच्या खर्चाने प्रत्येक आठवड्याच्या शेवटी घरी येता यायचं. त्यामुळे कितीही घरची आठवण आली तरी पुन्हा लवकरच जाऊ अशी सोनेरी किनार त्याला होती. आणि संपुर्ण आठवडा कामात जायचा त्यामुळे इतकं कळायचं नाही. संध्याकाळी रुमवर आल्यावर वाटलं तरी पुष्कळदा रात्री कधी संपुर्ण टिम नाहीतर कधी एखाद्या कलीग बरोबर जेवायला जायचं असायचं आणि आल्यावर चिक्कार झोप आलेली असायची. काही प्रोजेक्टसला दिवसाचे दहा तास भरुन गुरुवारी रात्री निघायचं असे मग तर विचार करायलाही वेळ नसे. सकाळी ७ ते रात्री ७ कामावर मग थोडं फ़्रेश होऊन जेवण, झोप आणि मग लगेच पहाटे उठा असं. श्वास घेतोय का कळत नाही असा दिनक्रम. शुक्रवार ते रविवारची संध्याकाळ तर कळत नसे कसा पटापट वेळ जाई. कधी कधी मी नवर्याला विचारत असे कसं वाटतं रे तुला घरी? मग तोही म्हणे कंटाळा येतो पण मी जास्तीत जास्त वेळ कामात राहतो आणि घरी टि.व्हि. पाहतो. तेव्हा मला त्याच्या नुसत्या बोलण्यातुन कळत नसे की मग घरी नक्की कसं वाटतंय.
पण आता गेली काही महिन्यांपासुन फ़ासे पलटलेत. आणि शिवाय आता घरी एक छोटं बाळही आहे. तो नोकरीसाठी लांब गेलाय आणि आम्ही घरी त्याची वाट पाहतोय. शिवाय त्याच्या येण्याजाण्याचा खर्च कंपनी करणार नाही त्यामुळे तो प्रत्येक आठवड्याच्या शेवटी य़ेणार नाही. पहिल्या वेळी गेला तर नंतर एक सुटीचा सोमवार येत होता तेव्हाच उगवला; म्हणजे जवळ्जवळ तीन आठवड्यांनी. मला आठवतं मी त्याला एअरपोर्टवरुन घेऊन आले तर माझा मुलगा त्याने उचलल्यावर पाच मिनिटे आमच्याकडे पाहात नुसता हसत होता. त्याला किती आनंद झाला होता ते त्याला फ़क्त हसण्यातुनच व्यक्त करता य़ेणार होतं.
इथे या भल्या मोठ्या आडव्या पसरलेल्या देशाचा एका कोपर्‍यात तो आहे आणि दुसर्या कोपर्‍यात आम्ही. आमच्यात तीन तासाच्या वेळेचा फ़रकही आहे म्हणजे इतरवेळीही आमचं फ़ोनवर बोलणं फ़ारवेळ होत नाही कारण त्याला निवांत वेळ मिळेपर्यंत आमची मध्यरात्र. परवाच्या रविवारी त्याला विमानतळावर सोडायला गेल्यावर पुन्हा तीच विचित्र फ़िलिंग त्रास देऊ लागली. गाडी जमेल तितकी सावकाश चालवुन म्हणजे अगदी मामा येऊन सांगेल बाई स्पिड लिमिट ५५ आहे तू काटा वाढव आणि सगळे सिग्नल शांतपणे घेऊनही लवकर पोहोचल्यासारखं झालं. येता येता नेमकं सीडी लावली तर गाणही "गाडी सुटली रुमाल हलले...."इतकं पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटलं ना...आता मुलाचं रुटिन सांभाळा, त्यात स्वतःचं काही करा आणि इतकं सगळ करुन दिवसाच्या शेवटी निवांतपणे चार क्षण बसायचं असलं तर तेही तसं एकटंच. आज अचानक मला माझं दोन वर्षांपुर्वीचं रुटिन आठवलं आणि इतक्यांदा आपल्याला सोडुन रिकाम्या घरी परत आलेल्या नवर्‍याला कसं वाटलं असेल ते प्रथमच जाणवलं. त्याला सोडून परत आलं की आधी भरलेल्या घरात पुर्वी नसलेली ही पोकळी कशी पटकन अंगावर येते आणि खूप काही कामं समोर असली तरी एक विचित्र उदासी आल्यामुळे कशातच मन रमत नाही. अगदी यंत्रवत आपण नंतर काहीबाही करतो आणि स्वतःलाच समजावतो की हेही दिवस जातील.
कसं असतं ना grass is green on the other side असं म्हणतात. अगदी शंभर टक्के खरयं ते. नदीच्या या किनारी मी प्रथमच आलेय. त्या किनार्यावर असताना कधी न जाणवलेली एकटेपणाची भावना आणि ज्यांना खरंच आपला संसार एकट्यानी चालवावा लागत असेल त्यांची मनस्थिती समजतेय. एका मैत्रिणीशी या विषयावर बोलताना मी म्हटलंही की अगं इथे त्या single moms (इथे अगदी खर्‍या अर्थाने एकट्या असतात ना इथे नशिबाने आई काही दिवसांसाठी आलीये सोबतीला) कसं बरं करत असतील सर्व. त्यावर तिचं उत्तर होतं की अगं त्या सर्व स्वतःच करत नाही विशेषकरुन मुलांचं. त्या रेडिमेड जेवण इ. देतात आणि पाळणाघरात ठेवतात मग जो थोडा-फ़ार वेळ मिळतो तो कसा जात असेल कळतही नसेल...असेलही..
पण तरी नको रे हे देशातल्या देशात "दूरदेशी गेला बाबा" टाइपचं जीणं असं झालंय...लवकरच यावर तोडगा काढतोय. पण सध्या तरी एअरपोर्टवरुन परतताना एक विचित्र पोकळी घेऊन येणारे हे रविवार माझ्या कायम लक्षात राहतील.

11 comments:

  1. Grass is green on the other side....असेच वाटत असते नेहमी. मग जेव्हां आपण त्या अदर साईड्ला जातो तेव्हांच ती ग्रीनरी का आणिक काय ते कळते.अपर्णा, ही रविवारची पोकळी आहे खरी विचित्र पण सोबत बाळ व आई आहे ही आनंदाची बाजूही आहे. लवकरच दूरप्रदेशातील बाबा तुमच्याबरोबर येऊ दे व हे सगळे रविवार तुझ्या विस्मरणात जाऊ देत यासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. hmmm hote khare ase aadhi maza navarya cha pan marketing cha firati cha job hota mala jam bore vayche kayam tangati talwar asay chi aata ha kadhi nighanar .... thank god aata tase nahi .... pan ajun hi mala aai kadun nighatana or aai/baba maza kadun gelyavar kayam asech feeling aste ........... tumacha parat ektra yanya cha praytna sathi maza kadun ALL THE BEST :)

    ReplyDelete
  3. ek choti bhavna dete....vach

    हे सर्व भारतातून नेण्याचा विचार होता...............

    चिमणी,काव्ल्ल्याची अंडी,इथे प्रजाती वाढण्याकरिता,

    पारिजातकाच्या बिया, फुलांचा सडा पाहण्याकरिता,

    मातीचा सुगंध, शेतकरी आठव्ण्याकरिता,

    आईचे अश्रू , तिचीच आई होण्याकरिता................

    पण हे आठवले केंव्हा, विमानाने पाय बंद केले तेन्व्हा.

    ReplyDelete
  4. aprna,
    hya bhavna,hi pokli aamhala purna bharta yenar nahich,pan blogs na,vachkana,ek kopra tari nakkich bharta yeil.
    so,stay with us.be a brave girl,navryachya manat hurhur theun kamala pathu nakos......
    adhik kay sang?aaila vichar
    be happy

    ReplyDelete
  5. @भानस, बहुतेक बाबाकडे आम्ही जाऊ...लिहेन नंतर कधीतरी त्याविषयीसुद्धा....शुभेच्छांबद्द्ल धन्यवाद.
    @ अनामिका, अगं आई-बाबा परत जातानाच्या क्षणांइतकं अवघड काहीच नाही..मी तो विचारही करत नाही इतकं मला वाइट वाटतं त्याचं...म्हणजे इतरवेळी मी एकटी जायचे त्याचंही मला काही वाटायचं नाही...
    @अनुजा...कविता खूपच छान आहे...काही गोष्टी आपल्याला जेव्हा मिळणार नसतात तेव्हाच त्यांचं महत्त्व कळतं हेच खरं...आणि नवरोबाला तिथे दडपण नको म्हणून तर ब्लॉगवर लिहिलंय...तो हा ब्लॉग अजिबात वाचत नाही....फ़क्त कधी मी त्याच्यासमोर पान उघडलं तर बघतो आणि म्हणतो वाचुन दाखव ना काहीतरी...मग मी म्हणते...."आओ पढाए, कुछ कर दिखाए..." :)

    ReplyDelete
  6. Superb:)खुपच छान आहे जमलेलं. खुप सेंटि वाटतंय..

    ReplyDelete
  7. महेन्द्रकाका,खरं नाणं खणखणीत वाजतं तशा खर्या भावना/अनुभव लवकर कागदावर उतरवता येतात ना तसं...नंतर कदाचित हे दिवस विसरायलाही होतील म्हणुन खास नोंदवुन ठेवलंय...

    ReplyDelete
  8. नमस्कार !

    आपण जे लिहीले आहेत त्या प्रक्रीयेतुन सध्या मी ही जातोय फ़क्त संदर्भ वेगवेगळे इतकच. त्यामुळे येणारया प्रत्येक रवीवारी "तुमचे अहो" तुमच्याबरोबर असावेत ही इश्वरचरणी प्रार्थना, आणि हो Wake Up Sid बघा कारण जे काही मि लिहीले आहे हा माझा वैयक्तीक अनुभव आहे. तुमचा वेगळा ही असु शकतो.

    कळावे, लोभ असावा

    हर्षल श. नेने

    ReplyDelete
  9. हर्षलजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपणही एका कठिण परिस्थितीतून जाता याची मला कल्पना येऊ शकते कारण मी दोन्ही जागी होते...आता लवकरच आम्हीच आमचं बस्तान हलवु...लेकाला घेऊन एकटीनं जास्त कठीण जातंय.."वेक अप सिड" आमचं किड एखाद्या दिवशी छान झोपलं की पाहू...:)

    ReplyDelete
  10. अपर्णा,
    मी तुझ्या या पोस्टला स्वत:ला बरचस रिलेट करु शकले. अजय जेव्हा जपानला गेला तेव्हा त्याला एअरपोर्टवर सोडुन आल्यावर मला जाम कंटाळवाणं वाटत होत. वाटलं नाही मिळाले जास्त पैसे तरी चालतील पण दोघ एकत्र असण जास्त महत्वाचं. नंतर दोन महिन्यांनी मी ही तिकडे गेले पण मला सहावा महिना चालु होता त्यामुळे एक महिन्यानी परत आले. तेव्हा टोकियो एअरपोर्टवरचे ते क्षण मी कधिही विसरू शकत नाही, आता सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलं वाचताना. दोघांनाही खूप जड गेलं.

    ReplyDelete
  11. सोनाली आत्ता आम्ही जो मग घर बदलण्याचा निर्णय घेतला त्याचं कारणही तेच आहे...मी पैशावर पाणी सोडलंय पण निदान आम्ही एकत्र आहोत हे महत्त्वाचं...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.