Friday, October 9, 2009

रंगांचा बहर....

उत्तर गोलार्धातला मोठा हिवाळा संपुन सारी सृष्टी हिरवा शालु नेसुन बसली की हे तिचं रुपडं पाहायला सुर्यदेव आपला मुक्काम खास वाढवतात. लांबच लांब पसरलेल्या हिरव्या रांगा पाहात मोठे दिवस कसे जातात कळत नाही....


या हिरव्यागार वातावरणाची सवय होत असतानाच नेहमीच्याच रस्त्यावरुन चालताना हिरव्या झुडुपातून डोकावणारं एखादं केशरी पान दिसलं की चटकन लक्ष जातं

पण तरी उगाच आपण लक्ष नं दिल्यासारखं करावं तर एक-दोन दिवसात बाजुचं दुसरं एखादं झुडुप केशरी शालच पांघरुन बसतं. आता मात्र मान्य करायलाच हवं असं आपण म्हणतो. हवाही तशी थोडी थोडी थंड व्हायला लागली असते.


मग मात्र एका झाडाकडुन दुसरीकडे अशी रंगाची माळ सर्वदुर पसरायला सुरुवात होते.
हिरव्या रंगातल्या सृष्टीला पाहायची सवय असलेल्या सुर्यदेवांना हे थोडं नवं असतं ना..अजुन पुढे काय असेल बरं असा विचार करत पुढे पुढे जाणार्या सुर्यमहाराजांना कळतंच नाही आजकाल आपण अंमळ कमीवेळ राहतोय म्हणुन....दिवस हळुहळु लहान होत जातो तो असा...


सृष्टीने मात्र सुर्याला आणि खरं तर सर्वांना मोहवुन टाकायचा विडाच उचलला असतो जणु...मग ती वेगवेगळ्या रंगांचे ठेवणीतले शालु, साड्या नेसायला सुरुवार करते....तिचं रुपच असं की जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसं पिवळ्या, केशरी, किरमिजी रंगाच्या छटांनी कुठे कुठे पाहु असं होऊन जातं...अजुन काही आठवडे तरी हा साज लेऊन बसलेलं तिचं रुप पाहाताना आसपासची थंडी जाणवतही नाही...


आणि मग कधीतरी सुर्य आणि धरेचा मित्र-परिवार वारा आणि पाऊस हे कधी एकटे तर कधी एकत्र येऊन तिला त्रास द्यायला सुरुवात करतात...एखाद्या जिवलग मैत्रीणीला पिडावं तसंच ते तिला पडतात. किती तोल सावरणार आपला...सगळा साजशृंगार उतरला जातो आणि झाडांखालची पानगळ खारी गेल्या की कोल्हापुरी वहाणांसारखी करकरते...
अरे पण आता कुठे तर रंगांचा बहर सुरु झालाय...सगळीकडे आपल्याच नादात रंगलेली झाडं दिसताहेत आणि मी इतक्यात निष्पर्ण झाड आणि थंडीच्या आठवणी का काढतेय....


चला एखाद्या डोंगरावर जाऊन रंगांची उधळण पाहुन येऊया....

11 comments:

  1. अपर्णा.
    हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट........
    फारच अप्रतिम निसर्ग आम्हाला पहावयास दिला वरील गाणे आठवले,फोटो कित्त्ती सुंदर,मन,मूड फ्रेश केलास.
    निसर्ग वर्णन लेख,तेवःड्याच लीलया लिहितेस कि,चाबूक.तुझे स्वताचे भाव ठळक न करिता योग्य प्रमाणात ठेऊन निसर्गा कडे लक्ष वेधून घेण्यास अप्रतिम जमले.लिखाणाची मीमांसा करण्याची माझी आवड जुनीच म्हणून,पण मला जागाच ठेवली नाहीस इतके मन निसर्गाने भरून टाकलेस,
    अनेक रंगानी तुझा मन रुपी ब्लॉग भरून राहू देत,दीपावलीच्या शुभेश्च्या

    ReplyDelete
  2. १)पानगळ व कोल्हापुरी चपला............लक्षवेधी निरीक्षणात्मक अन्न्वार्थ विशेष आवडला
    २)सहजच दृलक्ष केले तरी...........रंगाने आकर्षून घेतले,मनाची वृत्ती चपखलपणे मांडलीस
    ३)सोप्या सहज भाषेत निसर्गाची प्रवाहतमक्ता, सूर्य.......निसर्गा चा लपंडाव खूप भावला
    सुंदर!......

    ReplyDelete
  3. अनुजा ताई...आपल्या दोन दोन प्रतिक्रियांबद्द्ल दोनदोनदा धन्यवाद...खरं म्हणजे मला फ़क्त फ़ोटो पोस्ट करायचे होते...कारण इथली पानगळ सुरु व्हायच्या आधीचे रंग खरंच मोहवुन टाकतात. मग नंतर विचार केला की थोडं थोडं लिहुन फ़ोटो टाकले तर अजुन मजा येईल म्हणून मग थोडं वेगळं वर्णन केलं.. निसर्गाची रुप पाहताना कधीकधी काही उपमा आपोआप सुचतात आणि एक छोटी पोस्ट तयात होते...त्यात प्रयत्न होता स्वतःचे भाव जास्त डोकावु न द्यायचे आणि थोडं थोडं जमलयं....
    आपण नियमित प्रतिक्रिया देता ना त्याचीही आजकाल सवय व्हायला लागलीय....:)

    ReplyDelete
  4. मस्त फोटो आहेत गं!!!! लिहीलयेस पण एकदम सही!!!मला स्वत:ला झाडांचे आणि पानांचे वेगवेगळे आकार रूकार आणि रंग नेहेमीच मोहोवतात...मेजवानीच दिलीस.....

    ReplyDelete
  5. अपर्णा फोटो व वर्णन मस्त झालेय.मी मिशीगन मध्ये- संपूर्ण घनदाट झाडींनी युक्त असा हा प्रदेश आहे. अप्रतिम रंग येऊ लागलेत पण थंडीही वाढतेय. ह्म्म्म, आज निघालोत रंग गोळा करायला. फोटोत गं.

    ReplyDelete
  6. तन्वी प्रतिक्रियेबद्द्ल खूप आभारी..अगं इथे निसर्गाने खूप रंग दिलेत त्याची मजा इथे आहेस्तो घ्यावी म्हणतेय....

    ReplyDelete
  7. भाग्यश्रीताई, यातले सुरुवातीचे फ़ोटो या वर्षीवे आहेत. पण ते डोंगरांतले आम्ही मागे एकदा (मुल नसताना) न्यु इंग्लंडचा फ़ॉल पाहायला गेलो होतो त्यातले आहेत..तिथली रंगाची उधळण पाहायला एकदा तरी जायलाच हवं...मिशिगन मध्ये जसं ट्युलिप्सचं आहे तसं....आमच्याइथे तसा रंगांचा बहर आहेच...तुमच्या इथले गोळा झाले की कळवा....:)

    ReplyDelete
  8. प्रथमच तुमच्या Blog वर आलोय.
    फारच प्रसन्न लिखाण !! आवडल. हा छोटेखानी लेख छानच जमलाय.
    वाचताना आणि छायाचीत्र पहाताना छातीत 'रुतु हिरवा' अवतरला होता... :)

    ReplyDelete
  9. धन्यवाद गौरव आणि स्वागत...उन्हाळ्यात इथे ऋतु हिरवा अक्षरशः जगतो आणि मग नंतरचे रंग भान हरपुन टाकतात...असेच अधुन मधुन आमच्या भेटीला याल अशी अपेक्षा आहे...

    ReplyDelete
  10. छान जमलाय लेख. आवडला मला. :-)

    ReplyDelete
  11. आज पुन्हा एकदा वाचला...मलाही आवडला....धन्यवाद संकेत.
    असे छोटेखानी पोस्ट लिहायला जमल पाहिजे...आजकाल नमनाच तेल फक्त वाढतंय..........

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.