Thursday, October 29, 2009

असाही एक निरोप

आज कॅथीची  निरोपाची मेल आली. उद्या तिचा या कंपनीतला शेवटचा दिवस. २७ वर्ष तिथे तिने इमाने-इतबारे काम केलं ती कंपनी दुसर्या कंपनीने विकत घेतल्यामुळे झालेल्या उलथापालथीत नोकरी गमावणार्यांपैकी ती एक. या शेवटच्या निरोपाच्या मेलमध्ये तिला माझी आठवण यावी हे मी माझंच भाग्य समजाव. कारण खरं तर मी या प्रोजेक्टवरुन निघाल्याला आता जवळजवळ दिड वर्ष होईल. मधल्या काळात किती गोष्टी होऊन गेल्या, मी जे काम तिच्याबरोबर करायचे त्यासाठी किती अजुन जण येऊन गेले असतील पण तरी तिला या निरोपात मलाही सामावुन घ्यावसं वाटलं हे खरंच खूप आहे. मी तिथुन गेल्यानंतर आम्ही कधी बोललोच नाही असंही नाही पण तरी तिच्या ऑफ़िसच्या कामाचा मी आता भाग नव्हते हेही तितकंच खरंय.
खरं तर कॅथी या कंपनीत २७ म्हणजे तशी खूप वर्ष आहे आणि इथल्या मोठ्या कंपन्यांचे रिटायरमेन्ट बेनेफ़िट्स पाहात ही नोकरी गेल्यावर जिचं फ़ारसं नुकसान होणार नाही अशातली ही एक अशी बर्याच जणांची समजुत. पण तिचा धाकटा मुलगा अजुन कॉलेजला आहे आणि मुख्य म्हणजे याच कंपनीत असणार्या तिच्या नवर्याची नोकरीही एक दोन महिन्यांपुर्वीच संपली आहे हे लक्षात घेतले तर हे जाणं तिच्या दृष्टीनेही सुखकर नसणार. शेवटी महिन्याचा पगार हातात पडणे आणि पेंशनचा पैसा यात फ़रक तर आहेच ना?? पण तिची ही मेल वाचताना तिने इतकं समजुतीने सगळं लिहिलंय की खरंच अशा माणसांचं कौतुक वाटावं. आपल्याला काढलं गेल्याची कुठेही कटुता नाही. नेहमीसारखं टाइम टु से गुड-बाय किंवा अशाच अर्थाचं काही म्हणण्यापेक्षा ती म्हणते "धिस वॉज अ गुड रन". जेवणाच्या सुट्टीत रोज काही मैल पळण्यासाठी ती तशीही संपुर्ण इमारतीत प्रसिद्ध होतीच. आणि आपल्यालाही लोकं धावण्यासाठी ओळखतात हे बहुधा माहित असणार त्यामुळे हे शब्द खूप काही सांगुन जातात. 
आपल्या मेलमध्ये चार मुख्य प्रश्नांची चर्चा ती करते 
१. या कंपनीमधला माझा वेळ इतका छान का होता? 
२. मी इथे काय शिकले 
३. मी इथलं काय लक्षात ठेवेन? 
४. हा मेल वाचणार्यांसाठी मी काय सांगु इच्छिते? 
उत्तरांमध्ये अत्यंत मोकळेपणाने तिने काही इतरांना न माहित असलेल्या गोष्टींचे उल्लेख केलेत जसं तिचं पदवी आणि त्यानंतरचं शिक्षण कंपनीच्या खर्चाने झालंय. आणि त्यामुळे ती कशी पुढे जाऊ शकली. शिवाय तिचा नवरा तिला इथेच भेटला आणि मुख्य तिने इथेच असताना धावायची सुरुवात केली. तिच्या डेस्कपाशी तिचे अनेक ठिकाणच्या मॅरेथॉनचे फ़ोटो मी पाहिलेत.मलाही एकदा तिने तिच्याबरोबर लंच टाइममध्ये धावायचं तर ये असं म्हटलं होतं पण मी आपलं फ़क्त चालायचीच. बोलता बोलता एकदा धावल्यामुळे तिचा घरगुती आणि कामाचा स्ट्रेस कमी होतो असंही म्हणाली होती. तिने लिहिलेलं सगळं तिच्याच शब्दात देण्याचा मोह जास्त होतो पण तरी अशा प्रकारे तिचं तिने ठरवलेल्या माणसांना लिहिलेलं पत्र असं उघड करणंही प्रशस्त वाटत नाही म्हणून तिनं लिहिलेली काही वाक्यं जशीच्या तशी देतेय.
What have I learned ?  
Most important - I learned that people matter more than things or jobs or tasks. 
What will I remember?   
I'll remember that  the relationships I developed along the way are what enriched my life.
What can I leave you with now?   
1)  Don't worry - Be Happy  !  (My middle name is Anxiety). 
2)  Count your blessings !  What really matters at the end of the day is that you know you are loved and you are the most important person to somebody in this world. Try to love others.  The rewards are immeasurable. 
When feeling frustrated with yourself or others, remind yourself that you are doing the *very best*  job you can - and most times, so are others.  

मी तिच्याबरोबर काम करताना जेव्हा माझ्या जाण्याची वेळ आली तेव्हा मला खासगीत मग मी तुला इथेच ठेवण्यासाठी तुझ्या मॅनेजरशी बोलु का? किंवा बाळ झाल्यानंतर कामावर यायचं पाहायचं का? असं आपुलकीने विचारणारी, दोनेक वर्षांपुर्वी माझे आई-बाबा इथे आले होते त्यांच्या भारतात परत जायच्या दिवसाबद्द्ल लक्षात ठेऊन मला समजावणुकीचं बोलुन, कधी तिचेही घरगुती काही प्रश्न सांगणारी, कामाच्या वेळी तिला काही अडलं तर अगदी स्वतः क्युब मध्ये येऊन चर्चा करणारी आणि मुख्य म्हणजे केलेल्या कामाचं दिलखुलास कौतुक करणारी, माझ्या शेवटच्या दिवशी कार्ड आणि होणार्या बाळासाठी मायेने भेटवस्तु घेऊन घेणारी अशी कॅथी ही बरीच रुपं या पत्राने मला आठवली. आता पुन्हा कधी चुकुन-माकुन त्याच ऑफ़िसमध्ये जाणं झालं तर अजुन एक ओळखीचा आणि भेटल्याबरोबर गळामिठी मारणारा एक चेहरा तिथे नसेल याचं मनापसुन वाइट वाटतंय. पण हे पत्र पुन्हा पुन्हा वाचलं की निरोपाची वेगळी भाषा खूप काही शिकवुन जाते. 

11 comments:

 1. ही अशी प्रेम लावणारी माणसे आपल्याला आपलेसे करून घेतात अन कायमची मनावर कोरली जातात.कॆथीला पुढील आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा!किती योग्य व नेमकी विचारधारा आहे तिची.
  तुझ्या लिखाणातून तिच्याप्रती असलेला स्नेह जाणवला.

  ReplyDelete
 2. किती सरळ सोपं लिहलयेस ग!!!! पण मनाला भिडतय पोस्ट......तुझ्या मैत्रीणीला शुभेच्छा!!!

  ReplyDelete
 3. अतिशय सेन्सिबल लेख आहे. तिचा इ मेल मला फॉर्वर्ड कराल?? एक संग्रहणीय इ मेल म्हणुन ठेवला येइल. एखादं डीफिट पण कॅजुअली घेता येणं ही पण एक कलाच आहे. आता २७ वर्ष नौकरी केली, मग त्याला डिफिट म्हणणं पण कदाचित चुकीचं ठरेल. कदाचीत पुर्णत्वाची भावना घेउन ती जात असेल, खरं खोटं राम जाणे.. पण जीवनाकडे पहाण्याचा एक निराळाच दृष्टीकोन शिकलो या मुळे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

  ReplyDelete
 4. भाग्यश्रीताई, तन्वी आणि महेन्द्रकाका प्रतिक्रियांबद्द्ल धन्यवाद. काल सकाळी पहिलीच मेल मी तिची वाचली आणि खरं सांगते अख्खा दिवसभर मी तिचा विचार करत होते. शेवटी रात्री साडे-दहाच्या दरम्यान ही पोस्ट लिहुन मोकळं झाले. तिला खरोखरंच सर्वांच्या शुभेच्छा मिळणार आहेत. आपण जास्त सेंटि असतो की माणसं वयपरत्वे आणि अनुभवाने जास्त सेंस्निबल होतात त्याचाही विचार करतेय...

  ReplyDelete
 5. अपर्णा, सकारात्मक दृष्टीकोन असलेली व्यक्ती नोकरी गेली, देश बदलला, त्यांच्या वैयातिक आयुष्यात कितीही घडामोडी झाल्या तरी चांगले काय होते ह्याचा विचार अधिक करतात.तुझी कॅथी मला पण हेच शिकवून गेली व मैत्री हि झाली.तिला शुभेश्च्या माझ्याही. तुझे पत्र मिळाले आणि तुला मी कॅथी च्या ठिकाणी ठेवले.

  ReplyDelete
 6. धन्यवाद अनुजाताई. आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा हे आपण सर्व ऐकतो, शिकतो पण प्रत्यक्ष प्रसंग आला की कळतं कुणी ते खरं आचरणात आणलंय...

  ReplyDelete
 7. मला पण माझी मैत्रीण आठवली आणि तिचे कंपनी सोडणे.
  http://www.pankajz.com/2009/08/emptiness.html

  ReplyDelete
 8. धन्यवाद पंकज.....
  माझ्या ब्लॉगवर लिंक दिलीस म्हणून बरं झालं...खरंय...एखाद्या ठिकाणी ग्रुप जमतो आणि मग एखादा मेंबर गळाला की खरंच कसंतरी होतं...

  ReplyDelete
 9. अपर्णा,

  मला वाटतं माणूस अश्यावेळी फार भावना प्रधान होऊन नाही वागत कारण त्यानं मनातून पक्क केलेलं असतं की आता आपण इथून जाणार म्हणून! पण फार थोडी माणसं असं आत्मपरिक्षण करतात अन् कळत नकळत आपल्यालाही विचार करायला लावतात!
  people matter more than things or jobs or tasks. Yeh that's true but sopmetimes we realize this & by that time we can not change the things!

  बादवे मलाही ती मेल फॉरवर्ड करशील जर काही फार खासगी नसेल तरच अर्थात. I'd love to read :)

  थान्क्यू फॉर रिडींग मा ब्लॉग ;) पण लिहिलेल्या पोस्टवर एकही अक्षर न लिहिता निघून गेलीस असं का? :(

  आणि एक आय मीन दोन गोष्टी!!! तू जरा तारीख टाकशील का? अन् तुझा ब्लॉग कॉपी पेस्ट करता येत नाहीये! का? (नाही चौर्यकर्मावर आमचा विश्वास नाही! जे जे उत्तम ते ते ऑफलाइन अन् मग जमलच तर प्रिंटून संग्रही ठेवून वाचावे असे वाटते म्हणोन विचारले :ड :ड


  मी कधीतरी एकदा येऊन तुझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या प्रतिक्रियांमुळे जर तू इथं येऊन वाचणार असशील तर अवश्य वाच! पण बघ पुन्हा एकदा विचार कर. संवादिनीचा सूर, तेजस्वीनीचे तेजस्वी लेखन, ट्युलिप च्या सदाबहार गोष्टी अन् असं बरच काही मौल्यवान नाही मिळणार कदाचित पण थोडफार आ/नावडल तरी सांग नक्की म्हणजे अस्मादिकांना हुरूप येईल. सानियाची गोष्ट नंतर सांगेन ती एक वेगळीच गंमत आहे. अशीच येत रहा स्वागत आहे :)

  ReplyDelete
 10. दीप, तुझा मुद्दा वेगळा आणि खरंच पटण्यासारखा आहे. आणि ब्लॉगचं म्हणशील तर तुला कुठले पोस्ट संग्रही हवे असतील तर नक्की कळव मी पोस्टाने (मेलने रे) पाठवेन. आणि प्रिंट तर काय तू मारु शकतोस ना असंही...
  तारखेच पाहाते..जरा आळशी झालेय मागचे काही दिवस ब्लॉगचं रुपडं थोडं ठिकठाक करावं लागेल. तुझे पोस्ट जरा सवडीनं वाचेल काल आमच्याइथे बरीच रात्र झाली होती म्हणून सविस्तर वाचणं झाल नाहीये....
  आणि हो असाच धुमकेतुसारखा येत जा मध्ये मध्ये...इथेही तुला अगदी साहित्यिक किंवा जगावेगळा मजकुर कदाचित नाही सापडणार पण मनात जास्त ठेवुन त्रास होतो अशा गोष्टी ब्लॉगरुपी जपुन ठेवायचा प्रयत्न आहे...

  ReplyDelete
 11. धुमकेतुसारखा>> hahaha yein nakki aata mi tula reader var aani blog var hi addly so updates samjteel mala! aani mala ti mail havi hotee jamlyaas mail :) i guess "baaherchee" maans phaar moklee aani sshTvaktee astaat!

  mail id de tes ka?

  ** mingrmarathi sahee maph kar pan aalsaavar ilaaj naahi!! (mhnun kadachit maaybolichee galchepee hot asawee ;) )

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.