आमच्या घरात सकाळी साडे पाचला आई-बाबा उठत आणि साधारण सहाच्या आसपास रेडिओ सुरू होई.सकाळी आठेक वाजेपर्यंत म्हणजे ती राजाभाऊंची श्रुतिका होईपर्यंत मराठी आणि मग हिंदीची बारी.नंतर मग संध्याकाळी पुन्हा ’सांजधारा’ आणि त्यानंतर ’फ़ौजी भाईको की फ़र्माईश’ ते मग रात्रीचं बेला के फ़ूल’ पर्यंत काही न काही वाजत असे...त्यामुळे अगदी लहानपणापासून गाणी कानांवर पडत राहिली.आजही बरीचशी गाणी त्याबद्दलची बाकी माहिती आठवत नसली तरी चाल आणि शब्द अशी आपसूक लक्षात आहेत.....
गाण्यांचं कसं काम करताना ऐकली तरी कामात खंड पडत नाही.आपला हात एक आणि कान एक (आणि मेंदु बहुधा तिसरंच काही) करायला तरबेज होतात.मल्टीटास्कींग म्हणावं का याला? काय म्हणायचं ते असू दे पण बरं बरोबर जमतं, नाही का?? माझं गुणगुणंणं काही वेळा अविरत सुरू असतं...अगदी एखादा कॉन्फ़रंस कॉल म्युट करुन ऐकतानाही एखादी लकेर चुकारपणे येऊन जाते आणि मिटिंगची मरगळ आपसूक जाते...न कळता आम्हा भावंडांवर हा गानसंस्कार करणार्या माझ्या आई-बाबांचं मला त्यासाठी खूप कौतुक वाटतं...
मागे एकदा आरुष बराच आजारी होता. त्याच्यासाठी आम्ही दोघं आलटून पालटून सुट्ट्या काढत होतो त्यावेळी त्याला सारखं जवळ घेऊन बसावं लागे. मग बाजुलाच एक प्ले लिस्ट लावून ठेवायचे. तो शांतपणे पहुडला असे आणि मी माझं फ़्रस्टेशन गाण्यामुळे तरी विसरायचा प्रयत्न करायचे. या नादात एक झालं, तो बरा झाल्यावर एके रात्री मला झोपवताना त्या प्ले लिस्टमधल्या काही गाण्यांच्या त्याने फ़र्माईशी केल्या. त्यातलं एक तर चक्क हिंदुस्थानी क्लासिकल, आरतीताईंचं "जा रे जा रे संदेसा"...म्हणजे त्याला न येणार्या हिंदी भाषेतलं...मी तर उडालेच..
मग मलाच एक छंद लागला. रोज मी गाडीतून सकाळी मुलांना सोडते त्यावेळात एक गाणं लावायचं आणि आठवडाभर तेच एक गाणं सकाळी वाजवायचं. यात शक्यतो मराठी गाणी मी लावते. कारण मराठी भाषा मुलांना कळते म्हणजे गाण्याचे शब्दही ते ऐकतात. हिंदी गाणी आम्ही फ़िरायला वगैरे जातो तेव्हा असतात त्यावेळी आजकाल मुलं चक्क गोंधळ घालतात म्हणजे कॉलेजमध्ये एखादा विषय पोरांच्या पूर्ण डोक्यावरून जायला लागला की त्यांनी मोठमोठ्याने गप्पाबिप्पा मारायला सुरूवात करावी तसं. इतर वेळी घरी मूड असेल तेव्हा यु ट्युबवरची त्याच्या लहानपणी लावायचो ती बालगीतं पण लावायची म्हणजे अगदीच पुढचं पाठ नको...बालगीतं तर काय असंही मुलं ऐकतात. पण सारखं एखादं गाणं ऐकलं की ते गाणंही त्यांना आवडलं की ते ऐकत राहतात...आणि थोडी शांतही बसतात.अर्थात हे काही औषधाच्या मात्रेसारखं गाण्यांची मात्रा वगैरे नाही पण जोवर लक्षात आहे तोवर आपले शब्द, भाषा आणि अर्थात संगीत परीचयासारखं होऊ शकतं.
मध्येच मी कामासाठी आठवडाभर बाहेर गेले आणि परत आले तर बाबाच्या राज्यात त्यानी "ढिंग चिका" पण शिकुन ठेवलंय...बाबाने "ढिंग चिका" म्हटलं की "हे हे हे" करतानाचा जोश थोडा वेगळाच. थोडक्यात कानावर पडलेलं लक्षात राहायचं वय आता सुरू झालंय. मग त्यात ते कसंही का असेना....:)
सर्वात जास्त मला आवडलं ते
मागे मी जी श्रीधरजींची कार्यशाळा केली त्यातलं एका गाण्यातलं वाक्य आरुषला गुणगुणताना ऐकते तेव्हा...त्यांनी आम्हाला शिकवलं होतं की "उन्हात्त पान मनात्त गान" यात त वर जोर आहे..(म्हणून मी ते त ला त जोडून "त्त" लिहिलंय)...आणि छोट्या आरुषचं "उनात्त पान" ऐकताना इतकी गम्मत वाटते की असं ऐकून ऐकून एकेका गाण्याची ओळख करून द्यायचं तंत्र मलाच आवडलंय..
ऋषांकसाठी तर गाण्यांनी मलाच आधार दिलाय कारण तो लहान होता तेव्हा मला एकटीनेच पहिले तीन महिने काढायचे होते. मग मी "रंग बावरा श्रावण"ची सिडी कायम आमच्या बुम बॉक्समध्ये घालून ठेवली होती..त्याच्या झोपायच्या वेळी त्याला पाळण्यात घातलं की मी ती सिडी लावून चक्क स्वयंपाकघरात काम करत बसे..."बाळ उतरे अंगणी"ने सुरू केलेली सिडी साधारण तिसर्या गाण्याला माझा बाळ निवांत झोपलेला असे....सीडी संपली की काहीवेळा मी ती पुन्हाही लावे. त्यावेळी ही आरुष कधीकधी मध्येच मोठ्याने "आला किनाला" म्हणत असे.
मागच्या वर्षी आई-बाबा आल्यावर दिवसा ते दोघा मुलांसाठी गाणी म्हणत आणि काहीवेळा रात्री ऋषांकसाठी एकदा सिडी असं आमचं रूटीन होतं.. त्यानंतर जरा चळवळ्या झाल्यावर त्याने त्या बुम बॉक्सचा डब्बा गुल केला, पण आम्ही ही गाणी आमच्या आय पॅड, आय पॉड वगैरे समस्त ठिकाणी सुखरूप ठेवलीयत..त्यादिवशी एका रिसॉर्टमध्ये साहेब रात्री (की पहाटे) दोनला उठून पुन्हा झोपायलाच तयार नाहीत तेव्हा मी आय पॅडवर तीच गाणी सुरू केली आणि माझा गुणी बाळ थोड्या वेळाने झोपला..
तो झोपताना किती त्रास देतो याचं परीमाण पण लहानपणी गाण्यावर असायचं. म्हणजे तिसर्या गाण्याला झोपला तर चांगला..अख्खी सिडी संपून पुन्हा लावायला लागली की मग बाहेर येऊन तसा रिपोर्ट असं आमचं सुरू असतं..या पार्श्वभूमीवर तो बोलायला लागला की त्याला हे गाणं नक्की माहीत आहे का हे जाणून घ्यायची माझी केव्हाची इच्छा होती. मग एके दिवशी झोपायला नेताना मी सहज त्याला विचारून पाहिल,"ऋषांक, आता आपण कुठली गाणी लावायची??" आणि त्याने चक्क त्याच्या बोब्ल्या बोलात "बा..." असं सांगून झोपण्याची अॅक्टिंग पण करून दाखवली...मला त्यावेळी इतकं सही वाटलं की पुढच्या वेळी पद्द्मजाताई भेटल्या की त्यांचा आवाज जर त्याने ओळखला तरी मला नवल वाटणार नाही..
आता लवकरच ऋषांक दोन वर्षांचा होईल. त्यामुळे त्याचे बोबडे बोल ऐकायला मजा येतेच आहे पण त्यात जर त्याने अशा प्रकारे सारखं ऐकलेल्या गाण्याची ओळख दाखवली की मस्तच वाटतं. सारखं सारखं ऐकून आरूषने एकदा "हे गगनाआआआ" असा सूर लावला त्यातला "हे"चा थोडा अमेरिकन "हेय..."सारखा उच्चार ऐकून हसायला येत होतं तर त्यापुढल्या वाक्यातल्या "सर्व कहाणी?"चं उत्तर ऋषांकने "थावी(ठावी)" असं दिल्यामुळे माझी चांगलीच करमणूक झाली. मी आरुषच्या वेळेस एक घरगुती गाणं बनवलं होतं म्हणजे कुठल्याही प्राण्यांचं किंवा पक्ष्याचं नाव घ्यायचं आणि गाण्यातच हा काय करतो? असा प्रश्न विचारुन तो झोपतो असं म्हणायचं. बेसिकली मुलं काहीवेळा झोपायचं सोडून गाणी आणि गोष्टी ऐकत बसतात त्यावर हा माझा घरगुती उतारा होता. तर कधी कधी ऋषांकला म्हटलं की "मला झोपव", की तो मग त्याच्या बोबड्या बोलात "चिव चिव चिमणी काय कत्ते, काय कत्ते? चिव चिव चिमणी झोपते" असं बोलतो ते ऐकायला खरंच फ़ार गोड वाटतं आणि त्यात मग त्याला आवडणार्या इतर प्राण्यांचे अॅडिशन्सही येतात फ़क्त त्या सगळ्यांचे आवाज आ आ असतात म्हणजे आ आ पिगी काय कत्तो, आ आ नायनो (डायनो) इ.इ.
आतापुरता सांगायचं तर ही मुलं इंग्रजी माध्यमात शिकतील, मोठी होतील..मातृभाषा म्हणून मराठी तर त्यांना यायलाच हवी. अर्थात कलेच्या म्हणजे पुस्तकं, नाटकं, गाणी याच्या अनुषंगाने मराठीची गोडी मी कितपत लावू शकेन माहित नाही. पण अशा गाण्याच्या निमित्ताने त्यांना काही चांगले शब्द,गाणी लक्षात राहिली तर ते मला हवंच आहे. आणि थोडंफ़ार गुणगुणूही शकले तर सोन्याहून पिवळं नाही का?
फ़ार पुढचा विचार नाही पण त्यांच्या आत्ताच्या वयापासून वेगवेगळी गाणी ऐकवणे हे मात्र मी करत राहणार आहे...त्याचं एक कारण मलाही गाणी ऐकत राहायची असतात आणि दुसरं अर्थातच न कळत मुलांवर होणारे गान संस्कार...जसे माझ्या लहानपणी माझ्या आई-बाबांनी नकळत आमच्यावरही केलेत....
आजच्या बालदिनाच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवाचकांच्या अवतीभवती असणार्या मुलांना शुभेच्छा देता देता त्यांच्याकडूनही या विषयावरच्या आणखी काही टिपा/अनुभव ऐकायला नक्की आवडतील. आपण आपल्या मुलांना लहानपणापासून गाणी ऐकायला शिकवता का?