मागे एकदा गानसंस्कारावर लिहून झालं. ते सुरु आहे पण तरी ती गाणी मुलांना आवडावी म्हणून आपण त्यांना ती ऐकवणेखेरीज फार काही करू शकत नाही. म्हणजे घोड्याला पाण्याजवळ नेण्यासारखं. त्यांना काय आवडेल याचा आपण काहीच अदमास घेऊ शकत नाही. मागे बरेच दिवस घरात आणि गाडीत वाजता वाजता हे गाणं ऋषांकच्या तोंडात कधी बसलं मला माहित नाही.
मला स्वतःला येता जाता गुणगुणायची आईसारखीच सवय आहे. एकदा मी "लाभले आम्हास भाग्य", म्हणून थांबले आणि त्याने मग "बोलतो मराठी" पासून सुरु केलं. बरेच दिवस आम्ही हा खेळ खेळत होतो. मग एक दिवस स्काईपवर त्याच्या मावशीला तो म्हणून दाखवत असताना एकदा रेकॉर्डपण केलं. तेव्हा तो पहिली चार वाक्यच नीट बोलत होता.
खरं तर ही पोस्ट जागतिक मराठी भाषा दिनीच यायची पण तेव्हा पुरावा नव्हता म्हणून राहिलंच. आज नेमकं महाराष्ट्र दिन आहे तर तेही एक चांगलं निमित्त आहे असं वाटतंय म्हणून आज त्याला पुन्हा विचारलं मला गाऊन दाखवशील का? तर आज थोडी जास्त प्रगती आहे.
मला माहित आहे की एक दोन गाणी आता आली, म्हणून कदाचित त्यांची मराठी कायमची चांगली होईल किंवा मोठे होईपर्यंत राहील असं नाहीये. त्यावर जमेल तितकी मेहनत पालक म्हणून आम्ही घेऊच. पण अशी गाणी आहेत म्हणून आमच्या मुलांना आपण मराठी का बोलतो हे मला आवर्जून सांगावं लागत नाही हे मला आवडलं.
इथे घरातली चार आणि स्काईपवर शनिवारी वगैरे होणारी संभाषणं सोडली तर या मुलांना फार मराठीचा संपर्क नाही. त्यामुळे त्यांचं कौतुक जास्त. इतकं छान गाणं पुढच्या पिढीसाठी दिल्याबद्दल कौशल आणि टीमचे पुन्हा एकदा आभार.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा.
खूप छान :)
ReplyDeleteआभार, इन्द्रधनू :)
Deleteउत्तम! मराठी जपा..
ReplyDeleteआभार अपूर्व. प्रयत्न सुरु आहे.
Delete