Tuesday, May 12, 2015

दोन डॉलर आणि "एकमेका सहाय्य करू" पंथ

आमच्याकडे क्रेस्ट फार्म म्हणून एक फार्म टू स्कूल अशी संकल्पना असलेली संस्था (की शाळा?) आहे. मला त्या शाळेची पूर्ण माहिती नाही, पण डॉ. जेन गुडाल यांनी डोनेट केलेली ही संस्था आमच्या भागातल्या शाळेतल्या मुलांना environmental education च्या मध्ये मध्ये संधी देते असं पाहण्यात आहे. केव्हातरी त्यांचा लागवडीचा तुकडा घ्यायचं माझ्या मनात आहे. 

यावर्षीचा लागवडीचा हंगाम आता सुरु होतोय बहुतेक त्यानिमित्ताने मुलांना वाफे, रोपं आणि एकंदरीत बागकाम जवळून पाहता यावं, याची संधी म्हणून शाळेतर्फे एक फिल्डट्रिप जूनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. शाळेपासून ही जागा जवळच आहे त्यामुळे नाममात्र दोन डॉलर शुल्क भरून पालकांच्या परवानगी आणि इतर माहितीचा हा फॉर्म भरताना एक कॉलम चटकन नजरेत भरला. Would you like to donate for some other student to attend? 

ही सरकारी शाळा आहे, म्हणजे इकडच्या भाषेत पब्लिक स्कूल. इथे सर्व आर्थिक स्थरातील मुलं येतात. शाळेतले बरेचसे प्रकल्प, देणग्या आणि फंडरेझर मधून चालतात कारण सरकारी मदतही आधुनिक सुविधा मिळवायला अपुरी पडत असणार. "एकमेका सहाय्य करू" पंथ हवाच. माझं स्वतःच प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झालं आहे आणि आई-बाबाच जि.प.च्या शाळेत शिक्षक असल्याने मीही याच पंथाची पुरस्कर्ती. फक्त माझ्या पुढच्या पिढीला तसे परिस्थितीचे चटके बसत नसल्याने मी हा पंथ पुढे कसा वाढवावा हे मला नेहमीच त्यांना सहज समजवता येत नाही. असो. नमन काही संपत नाहीये. 

तर तो वरचा प्रश्न मी आमचा फॉर्म भरत असताना मुद्दाम माझ्या पहिलीत शिकणाऱ्या मुलालाच विचारला आणि त्याने नाक उडवून नाही सांगितलं. मला कळलंच नाही की फक्त दोन डॉलरसाठी हा नाही का म्हणतोय? माझ्यातली  ती (वेळ मिळाला तर) संस्कार वगैरे पण करणारी आई जागी झाली आणि मी त्याला माझ्या डिप्लोमाच्या वेळेची गोष्ट सांगितली. 

मला वाटतं चौथ्या सेमिस्टरला आम्हाला एक industrial tour असायची. या भावी इंजिनियर होणाऱ्या मुलामुलींना प्रत्यक्ष कारखान्यात जाऊन तिथले वातावरण आणि इतर तांत्रिक बाबी माहित व्हाव्यात म्हणून. आमच्यावेळी अहमदाबादला जाऊन मग येताना माउंट अबूची सहल करून परत असा प्लान होता. सगळेच जाणार होते पण त्यावेळी आम्ही तिघं भावंडं शिकत होतो त्यामुळे मला काही घरच्यांकडून लगेच चार-पाचशे रुपये फक्त माझ्यासाठी घ्यावे हे पटत नव्हतं म्हणून मी नाही म्हटलं. आमच्या केळकरसरांनी मला बोलवून माझ्याकडून कर्ज घे आणि नोकरी लागल्यावर परत कर म्हटलं. खरं तर आमच्या त्यावेळच्या प्राध्यापकांपैकी सर्वात कडक सरांनी स्वतःहून सांगितलं तर मी कर्ज म्हणून तरी घ्यावं की नाही? पण माहित नाही का मी तरीही नाहीच म्हटलं. काळ काही आपल्यासाठी थांबत नसतो. त्या ट्रीपनंतर का माहित नाही बरेच महिने मला इतर मुलं आणि मी यांच्यात उगीच एक दरी जाणवायची. त्याचा त्रास नाही वाटला पण त्यांच्या तिथले संदर्भ असेलेले विषय आले की मी आपसूक गप्प बसे. अर्थात पुन्हा एकदा, काळ काही तिथेच थांबणार नव्हता. त्यामुळे पुढच्या सेमपासून माझं-त्यांचं मैत्र पुर्ववत झालं. 

तो दोन डॉलरच्या प्रश्नाचा उल्लेख मला माझा जुना प्रसंग आठवून गेला आणि मी तेव्हा ती मदत घेतली असती तर तो एक टप्पा आला नसता आणि ते जे काही टीमबिल्डींग मी मिस केलं ते झालं नसतं असं इतक्या वर्षांनी मला प्रथमच जाणवलं. मी मुलाला थोडक्यात माझा अनुभव सांगितला म्हणजे त्याला ही मदत देण्याची थोडी पार्श्वभूमी यावी. 

माझं सांगून झाल्यावर मुलाने मला शांतपणे विचारलं, "आई, तुला किती पैशे हवे होते?"
मी म्हटलं, "चार पाचशे रुपये". 
मग तो म्हणाला, " पण आई दोन डॉलर?"

आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. दोन डॉलर इतकी कमी गरज कुणाची असू शकेल हे माझ्या लहानग्याला जड जात होतं. मग मी एक साधारण पटेल असं उदाहरण देऊन "हम्म, देऊया" हे त्याच्याकडून वदवून घेतलं.
 
बरेचदा या पिढीला "आमच्यावेळी" हा सूर लावायच्या आधी, मुळात त्यांचा त्याच घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन पहिला तरी तो सूर न लावता काम होईल का, असा एक आशादायी विचार माझिया मनात येतोय. तुम्हाला काय वाटतं? 

 
image credits - free images on net


4 comments:

  1. "आमच्यावेळी" असा सूर आईने किंवा आजीने लावलेला मला तरी नको असायचा, साधारण एक विचार यायचा की तुमच्यावेळी तसं होतं तर आम्ही काय करणार… मुलांनाही "आमच्यावेळी" चा अनुभव नसल्याने relate करायला अवघड जात असेल कदाचित.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर इंद्रधनू. माझ्या भाचीबरोबर बोलताना हे मला मागेच जाणवलं होतं अर्थात तिला तो सूर लावणारी मी नव्हते पण कदाचित माझ्या मुलांबरोबर मी तसं करायला लागले तर मूळ मुद्दा बाजूला राहायला नको म्हणून हा प्रसंग नोंद केला. काय म्हणतात ते सोनारानेच कान टोचले माझे. :)
    प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.

    ReplyDelete
  3. Uttam lihilays. Unfortunately and I must say Bharataatach he baghayla milta. The older generation hardly moves with Time and so the gap between amchya weli and aajkal, persists for ever.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे तुझं म्हणणं. आताहळुहळु चित्र बदलेल अशी आशा. मुळात दुसऱ्यांचे निर्णय आपण घ्यायची एक वृत्ती असते तिच्यामुळे या अशा तुलना होत असाव्यात का?

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.