Sunday, August 4, 2013

मैत्री


तो गेला. जवळजवळ वर्ष होईल त्याच्या शेवटच्या ई मेलला. पण त्याच्या शब्दाला जागला, कारण त्यानंतर त्याने कधीच स्वतःहून संपर्क साधला नाही. 


त्याच्या माझ्या मैत्रीची वर्षे मोजायची नाहीत आस  माझं मीच ठरवलं होतं आणि नाहीच मोजली. इतर वर्गमित्रमैत्रिणीबरोबर झाली तशीच आमची मैत्री पण बेस्ट फ्रेंडच्या यादीत फार लवकर आला तो. माझ्या त्या वर्षी कॉलेजमध्ये घडलेल्या काही अप्रिय घटनांमधून मी सावरताना त्याला मैत्रीचा आधार द्यावासा वाटला आणि मला वाटतं तिथेच आमचे मैत्रीचे सूर जुळले. 

सुरांवरून आठवलं, हो  "गाणी" देखील आमच्या मैत्रीचं एक  अविभाज्य अंग होतं. मला गझल ऐकायला शिकवायचं सगळं श्रेय त्याला. म्हणजे मला त्या माहित नव्हत्या असं नाही पण कुठच्या वेळी कुठली गझल आठवावी यासाठी तोच हवा. मग ऐकण्यातली खुमारी वाढते हे अनुभवावं. 

त्या मैत्रीला आमचं  कॉलेज संपलं म्हणून खंड पडण वगैरे झालं नाही. तो अंधेरीचा आणि माझी कामाची जागा अंधेरी, त्यामुळे येताजाता platform वर ओझरत्या भेटी होत. मोबाईल, इ-मेल च सुकाळ व्हायच्या आधीच्या मैत्री अशाच जपल्या. कधीतरी आमचा जुना ग्रुप एकत्र खादाडी करायला जमायचा तेव्हा पुन्हा जुनाच धांगडधिंगा. 

"तू मोठी कधी होणार आहेस का" हा न विचारता विचारलेला प्रश्न मला दुसरं मुल झालं तरी तसाच. 
आताशा अगदी मेल पण कमी झाले होते पण  स्काईपवर वर्षातून एक दोनदा पोटभर बोलणी केली की  खर तर बरच कव्हर व्हायचं. त्यात पुन्हा कुठे गायब होतो वगैरे प्रश्न आलेच नाहीत. 

मग माशी शिंकली कुठे हा विचार मी करतेय तोच त्याच्या काही वैयक्तिक अडचणींचा  पाढा वाचणार एक मोठं पत्र आल. मी हतबल. काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला अत्यंत आवडणाऱ्या गोष्टी सोडाव्या लागतात. तसाच विचार करून सोडून दिली. त्याने मागितली म्हणूनच इतक्या वर्षांची न मोजलेली पण जीवापाड जपलेली आमची मैत्री सोडून दिली. 

अशी ती सोडता येते का याचा विचार करत हेही वर्ष सरेल. त्याचं ठाम उत्तर मिळणार नाहीच आहे. फक्त पुन्हा अशी गाढ मैत्री नव्याने करायला आवडेल का याच उत्तर मात्र ठाम नाही आहे. हा हट्ट नाही आहे. स्वतःला पुन्हा त्या मैत्रीतून बाहेर पडतानाचा होणारा त्रास पुन्हा होऊ नये इतकचं वाटतंय. 

खर तर मागच्या आठवड्यात वीस वर्षांनी मी माझ्या एका खूप जुन्या मैत्रिणीला भेटले अगदी पहाटे एक वाजेपर्यंत तेही वीकडेला गप्पा मारल्या आणि मैत्रीचा आनंद पुन्हा अनुभवला आणि हा इकडे लिहिलेला अनुभवही मनात आहेच. दोन्ही वेगळ्या व्यक्ती असल्या तरी आजच्या जागतिक मैत्रीदिनी मला मात्र माझीच मैत्रीची ओंजळ अर्धी रिकामी, अर्धी भरलेली वाटतेय. 


जाता जाता या विषयावरच मला आवडणारं एक गाणं. 






8 comments:

  1. लेख खूप आवडला.असा मित्र किंवा मैत्रीण आणि अशी मैत्री खूप मोठा ठेवाच म्हणेन मी!
    तुला ह्या मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गं श्रिया. या मैत्रीचा आता तरी फक्त ठेवाच आहे.

      Delete
  2. Replies
    1. मैत्रीदिनाच्या शुभेच्छा आशाताई.

      Delete
  3. अशीही मैत्री!

    ReplyDelete
  4. माझी एक मैत्रिण नुकतीच गेली. गेली म्हणजे या इहलोकातून गेली. ती गेली डिसेंबर २०१२ मधे आणि ती गेल्याचं मला परवा समजलं. दिवसभर विचित्र मनस्थितीत होतो. त्यामुळे मैत्री तुटण्याचं दु:ख वेगळ्या पद्धतीने अनुभवतो आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मंदार तुझं दु:ख कळतंय. काळजी घे.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.