Friday, July 26, 2013

संदिग्ध

मागच्या आठवड्यात अमेरीकेत मोठ्या प्रमाणावर चर्चिल्या गेलेल्या मार्टिन खून खटल्याचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा कृष्णवर्णीय आणि  गौरवर्णीय समाजातले मतभेद समोर आले. या पार्श्वभूमीवर याच देशाच्या कृष्णवर्णीय राष्ट्रपतीची जाहीर प्रतिक्रिया मला फार महत्वाची वाटते

याबद्दलची बातमी या लिंकवर आहे. थोडक्यात भाषांतर करायचे तर ओबामा म्हणतात, " मोठ्या दुकानांमध्ये खरेदी करताना कुणी आपल्यावर लक्ष ठेऊन नाही असे फार कमी काळे या देशात असतील. एलेवेटरमध्ये शेजारी उभ्या असलेल्या बाईने आपली पर्स आणि श्वास घट्टरोखून धरण्याचे अनुभव आलेले कृष्णवर्णीयही विरळाचआणि  यात मी ही आलोच. माझ्या तरुणपणी रस्त्याच्या कडेने चालताना गाड्यांची कुलुपे खटखट बंद होतानाही मी ऐकलीत. काळ पुढे जातोय तसे आपण अधिकाधिक चांगला समुह होऊ पाहतोय. याचा अर्थ आपण परफेक्ट झालोय असा नाहीये. समाजातला काळा-गोरा भेद अजूनही गेला नाही. मार्टिनबद्दल आपण स्वतःलाच विचारावं की त्या दिवशी त्या रस्त्यावर जर असा एखादा शस्त्रधारी मार्टिन उभा असता, तो आपल्याला मरेल या भीतीने त्याच्याच मागे गाडी घेऊन  कुणी झिमरमन धावला असता, तर त्याची हत्या झाल्याबद्दल त्या मार्टिनला कुठली शिक्षा झाली असती? तोही या प्रकारे सुटला असता का? या प्रश्नाच्या  उत्तराने  जर आपल्याला संदिग्ध होत असू तर मग असे निकाल देणारे कायदे आपण नक्कीच तपासले पाहिजेत."
आता ज्या ठिकाणी हा राष्ट्रपती उभा आहे त्या घडीला अशी बाजू मांडायची तर खरच धैर्य हवे

मनातल्या मनात या काळ्या सत्याला नमून मी पुन्हा माझ्या देशातलं काही वाचावं म्हणून त्याच आठवड्याचा लोकप्रभा उघडते आणि एका आईचा संघर्ष माझ्या मनाचा ठाव घेतो. या बातमीबद्दल मी काही लिहिणे उचित नाहि. अजून हे पुस्तक माझ्या हातात केव्हा येईल तेदेखील मी सांगू शकत नहि. पण या लेखातला एक उल्लेख मात्र नक्कीच बोचतो
तो लेख या लिंकवरआहे. हा एक परिच्छेद कुणाची परवानगी घेत इथे चिकटवत आहे
"मंत्र्यांच्या भेटीगाठी...
शरद पवार त्यावेळी संरक्षणमंत्री होते. अमरच्या मृत्यूविषयीचा लेख त्यांनी वर्तमानपत्रात वाचला होता. माजी मंत्री स्व. नकुल पाटील यांच्या सहकार्याने आमची शरद पवार यांच्याशी नवी दिल्लीत भेट झाली. अमरचा उल्लेख आम्ही करताच तो लेख वाचल्याचे पवार यांनी सांगितले. अमरच्या मृत्यूविषयीचा चौकशी समिती अहवाल मिळावा, अशी मागणी केली. पवार यांनी नौदल मुख्यालयात अ‍ॅडमिरल विष्णू भागवत यांना दूरध्वनी करून पळधे कुटुंबीयांना तुमच्याकडे पाठवितो. त्यांना सहकार्य करा असे सांगितले. तातडीने आम्ही नौदल मुख्यालयात गेलो. अ‍ॅडमिरल भागवतांनी अहवालातील महत्त्वाची माहिती देण्याचे कबूल केले. आम्हाला नंतर जे संक्षिप्त निष्कर्ष दिले त्यामध्ये अपेक्षित असे काही नव्हते. भागवत यांच्याकडूनही आमचा हिरमोड झाला होता. शरद पवार एकदा डोंबिवलीत माजी मंत्री नकुल पाटील यांच्याकडे आले होते. त्यावेळी आम्ही त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला ओळखले. पण, आम्ही नौदलाविरुद्ध न्यायालयात गेल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे ते पूर्वीसारखे सहकार्य करण्याच्या मन:स्थितीत दिसले नाहीत. 
नंतर जॉर्ज फर्नाडिस संरक्षणमंत्री होते. त्यांना डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या ओळखीने नवी दिल्लीत भेटलो. सप्तर्षीची कोणतीही ओळख नसताना एका शब्दाने ते पुण्याहून नवी दिल्लीत आले होते. सप्तर्षीचा मान राखण्यासाठी काही सेकंदांसाठी फर्नाडिस यांनी 'सवड मिळाली की फाइल मागवितो व तुम्हाला कळवितो' असे आश्वासन दिले. ती सवड त्यांना कधीच मिळाली नाही आणि त्यांनी कधी काही कळविलेही नाही. आता स्त्री जागृतीविषयी विविध कार्यक्रम घेणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना अमित नानीवडेकर या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने भेटले. आपले दु:ख त्यांनी समजून घ्यावे त्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा ठेवून आम्ही त्यांना भेटलो. एका आईचे दु:ख दुसरी आई समजून घेईल असे वाटले होते. आम्हाला पैशाची मदत नको होती. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मदतीचा हात हवा होता. मी अमरच्या मृत्यूची कहाणी सुप्रिया सुळे यांना सांगत होते. पण त्यांचे माझ्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. त्या फक्त ऐकल्यासारखे करत होत्या. त्यांच्याकडे आपल्यासाठी वेळ नाही असे माझ्या लक्षात आले. त्यांच्या दालनातून बाहेर पडले. त्यानंतर मंत्री, नेते, राजकीय पुढाऱ्यांना भेटून आपला मनस्ताप वाढून घ्यायचा नाही. नाहक पैशाची उधळपट्टी करायची नाही. आपला लढा आपणच लढायचा असे मनाने पक्के केले".


पहिला एका बलाढ्य देशाच्या राष्ट्रपतीचा एका नागरिकाची बाजू घ्यायचा मुक्तपणा आणि दुसऱ्या प्रसंगातले  कुठे एका ढळढळीत सत्याला थोडाही आधार न देणारे वर उल्लेखलेले काही सो कॉल्ड नेते.


माझ्या बुरख्यातल्या झाडावरच्या पोस्टला एक मार्मिक प्रतिकिया आली आहे ती म्हणजे "भारतात अस काही होईल? ". तिच्यावर विचार करताना पहिल्या प्रसंगात म्हटलंय तसचं म्हणावस वाटतंय ते म्हणजे हाच अमर त्याला दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांपैकी कुणाचाही मुलगा असता आणि हीच घटना घडली असती तर कायदा २१ वर्षे थांबला असता का? आणि याचं उत्तर जर संदिग्ध असेल तर आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे निश्चित. 

6 comments:

 1. changla lihla ahe.. post awdli !:)

  ReplyDelete
  Replies
  1. आवर्जून प्रतिक्रिया आल्याबद्दल, अनेक आभार भाग्यश्री आणि ब्लॉगवर स्वागत.

   Delete
 2. तुम्ही फारच घाई करता की... आपल्याकडे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यासाठी अजुन लैई, लैई, लैई, लैई म्हणजे लैई मोठा पल्ला गाठायचाय. रस्त्यावरच्या खड्ड्यातून वाचून जनता सुखरूप घरी गेली तरच मग अश्या गहन विषयांवर विचार होऊ शकतो पण अजुन किमान पाचशे वर्षे तरी थांबा.

  ReplyDelete
  Replies
  1. ते तर आहेच सिद्धार्थ. खड्डा आणि इतर बरेच प्रश्न सुटल्यावर हा प्रश्न आपण जमल्यास बघु. तूर्तास या post ला place holder समज. :)

   Delete
 3. आपल्याकडे कायदा एकच आहे पण तो कायदा कुणासाठी कसा वापरायचा याचा कायदा मात्र निरनिराळा आहे.

  ReplyDelete
  Replies

  1. कांचन, तुझं वाक्य आवडलं आणि पटलं पण. कधी कधी मला वाटतं आपण पण अशी कायद्याची पार्शलिटि चालवून घेतो. गुन्हा करणारी लोकं सुट्टीवर काय जातात आणि बरेच जण "क्लीन चीट" नावाची चीटिंग सामान्य नागरिकाशी करू पाहतात. हतबल होणे खेरीज तसं काय करू शकतो आपण? असा मी काही वेळा विचार करते. खरच माझं डोकं तरी नाही चालत बाबा आपल्या राजकारण्यापुढे..:(

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.