Monday, June 17, 2013

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडताना....

पाच वर्षांपुर्वी जेव्हा आमच्या घरी बाळ येणार होतं, त्याच्या निगराणीसाठी मी घरी राहायचं ठरवलं.त्यावेळचा माझा एक कॉंट्रॅक्ट जॉब होता. ज्यात एक तासाची कमाई आणि अर्थात कामाचं समाधान सोडलं तर बाकी काही सवलती नव्हत्या. त्यावेळी मग ती सोडताना फ़ार वाईटही वाटलं नव्हतं. 

मग यथावकाश पुन्हा नवी नोकरी सुरू केली. यादरम्यान आमच्या पहिल्या (आता थोडं मोठं झालेल्या) बाळाला दुसरं भावंडं येऊ घातलं होतं. यावेळीही पुन्हा निगराणीसाठी घरी राहायला, बाळाला जास्त वेळ द्यायला नक्की आवडलं असतं. पण वाढलेल्या आर्थिक जबाबदारीची जाणीव आणि त्याहीपेक्षा असं सारखं सारखं करियरमध्ये ब्रेक घेणं धोकादायक, म्हणून काम करणं थोडं भागच होतं.

असं म्हणतात ज्याने चोच दिली तो चाराही देतो. तसं माझ्या मनातल्या या आंदोलनावर उतारा म्हणून की काय मला पूर्ण वेळ घरुन काम करायची परवानगी मिळाली. अर्थात कधी वेळ पडेल तर आठवडाभर घराबाहेर जावं लागे. पण त्याची वारंवारता तशी कमी होती. माझ्यासाठी खरं तर हा "ड्रीम जॉब" वगैरे होता. कदाचीत सगळ्याच मातांसाठी (आणि बाप लोकांसाठींदेखील) हा ड्रीम जॉब असावा. म्हणजे कसं असतं आठ-दहा तासाची ड्युटी आपण सहजी करून जातो. ते अंगवळणी पडलेलं असतं. पण त्याभोवतीच्या प्रवासाचे जे काही बाकीचे तास एकप्रकारे व्यर्थ जातात ते आपण आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आणू शकलो तर ज्याला वर्क-लाइफ़ बॅलन्स म्हणतो तो खर्‍या अर्थाने साधता येईल.

तर गेले जवळपास तीनेक वर्षे मी माझ्या घरट्यात बसून काम करायची लक्झरी का काय म्हणतात ती उपभोगली. हा अनुभव कामाच्या दृष्टीने मला बरंच काही शिकवून गेला आणि खरं तर एक करियर म्हणून यातल्या कमतरता मलाही कळल्या. आणि आता पुन्हा परिस्थिती बदलतेय.मागचे महिने मी पुन्हा एकदा रोज प्रवास करून कामावर आपल्या क्युबमध्ये काम करायच्या रूटिनमध्ये रूळावतेय.

इतक्या वर्षात क्लायन्टकडे जायचे मोजके प्रसंग सोडले तर हा अनुभव मी जवळजवळ विसरलेच होते. म्हणजे एखाद आठवडा असं जाणं वेगळं आणि दररोज आपल्या टीम बरोबर काम करणं वेगळं. पहिला आठवडा तर ठरल्यावेळी तयार होऊन निघणं हाच माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. कारण त्याची सवयच नव्हती. जायचं यायचं ड्राइव्ह या विषयावर तर वेळ मिळाला तर रोज एक पोस्ट लिहिता येईल. इतकं ते हॅप्पनिंग (आणि वेळखाऊ) प्रकरण आहे. काम करायची मजा वेगळी आणि तो अनुभव टीम बदलली की बदलतो हे सार्वत्रिकच.

सगळ्यात मोठा बदल जाणवतोय ते माझ्या कुटुंबासाठीचा वेळ कमी झालाय त्याबद्दल. इतकी वर्षे ऑफ़िसचं काम संपलं की त्या रूममधून बाहेर येऊन तडक माझ्या ग्रृहिणीपदात शिरून मुलं घरात यायच्या आत त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी करून ठेवत असे. आता मात्र मी अडकले तरी ती माझ्याआधी घरात आलेली असतात आणि मग माझी जी धावपळ उडते त्यात मग त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल या विचाराने मी कावरीबावरी होते. 

त्यादिवशीच माझा एक मनकवडा मित्र मला म्हणालाही, एक लक्षात ठेव या सगळ्यापाठी तू जी धावतेस, त्याचं कारण तुला तुझ्या मुलांना चांगलं आयुष्य द्यायचं आहे. तुझा वेळ ही त्याची किंमत समज.

पुन्हा एकदा घरट्याबाहेर पडतानाची ही हुरहुर कदाचीत आणखी काही दिवसांनी थोडी कमी होईल. हा अनुभवही मला काहीतरी नवीन शिकवून जाईल. त्यातलं ब्लॉगवर किती मांडता येईल माहित नाही पण ही एक पोस्ट या हुरहुरीला थोडं शांत नक्कीच करेल. 

-अपर्णा
मे २०१३

10 comments:

  1. शुभेच्छा!

    आता तू बरीचशी रुळली असशील तुझ्या क्युबिकलमधे. मात्र घरची तारांबळ आणि विकांताची कामांची रांग रुळायला वेळ लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. रोजचं काहीतरी नवीन सुरु आहे गं. शुभेच्छांबद्दल आभारी.

      Delete
  2. घरातून काम करणं आणि कार्यालयात जाऊन खूप फरक पडतो. हळूहळू घरातलं नियोजन करायला शिकशील आणि केव्हा रुळ्सलीस ते समजणारही नाही. Good Luck!

    मी घरून काम करते पण जेव्हा जायला लागायचं तेव्हा आठवड्यांच्या भाज्या (नवरा आणि मी ) शनिवार, रविवारी चिरून ठेवायचो. शनिवार, रविवारी हा मोठा कार्यक्रम असायचा घरातला. आमचं पाहून मुलगाही भाज्या चिरायला शिकला लवकर :-) भाजी दुप्पट करून निम्मी फ्रिज करून टाकायची असे मार्ग निघातात.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं सांगू का मोहना, मी दोन्ही केलंय पण मुलं सांभाळून बाहेर पडायची ही पहिली वेळ. So tension. तुझ्या कमेंटमुळे बराच धीर आला बघ. :)

      Delete
  3. बेस्ट लक ग ... एव्हाना रुळलीही असशील बर्‍यापैकी! हे सगळे पुढच्या यत्तेतले धडे आहेत माझ्यासाठी :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गौरी. अगं पाण्यात पडल्यावर आपोआप पोहोशील. सध्या मस्त छकुलीला वेळ दे. :)

      Delete
  4. You are always my inspiration aparna !!! Mi pan next year job suru karnare mazya pillala day care madhe theun... :(( tenva tuzya kahi post parat vachayla lagtil to boost myself heheheee

    ReplyDelete
    Replies
    1. निशा, आज हरभर्याचं झाड़ घेऊन आलीस का काय ;)
      तुला खूप खूप शुभेच्छा आणि काळजी करू नकोस.

      प्रतिकियेबद्दल आभार.

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.