Tuesday, July 10, 2012

गाणी आणि आठवणी १२ - किसको ऐसी बात, बात कहें



एक प्रसन्न सकाळ.....बरेच दिवसांनी थोडं उबदार वातावरण मिळतंय..सध्याच्या माझ्याकडच्या थंड स्प्रिंगपेक्षा हा इस्ट कोस्टमधला स्प्रिंग मला नेहमीच आवडतो....ना खूप गरम ना खूप थंड....मैत्रीणींशी भेटही जवळजवळ दोन अडीच वर्षांनी.....रात्री एका रेस्टॉरंटवाल्यांनी  "चला आवरा आता" म्हणेपर्यंत खिदळत बसून मग परत तिच्या घरी आल्यावरही आणखी काही गप्पा मारून उशिरा झोपून बर्‍यापैकी वेळेत उठण्यात (किंवा उठवण्यात) आलेली सकाळ.....निवांत न्याहारी झाल्यावर आता मात्र काही कामाची कामं करूयात म्हणून सचैल स्नान करून दिवस सुरु करतेय.....

पण तरी पुन्हा या भागात फ़ेरी होईल किंवा नाही, म्हणून आम्ही पूर्वी इथे राहात असतानाचं आमचं देऊळ जवळपास आहे, तिथे एक नमस्कार करून जाऊया म्हणून बदलेला रस्ता....खरं तर काही अपवाद वगळता यावेळी रस्ते तसेच होते....बदललं होतं किंवा आणखी बदलत होतं ते देऊळ...अर्ध्या बांधकामातून मागच्या रस्त्याने आत जाऊन तिथल्या देवाला नमस्कार करून का कुणास ठाऊक मला तिथे फ़ार वेळ नाही बसवलं....पुजार्‍याने बहुदा चेहरा ओळखला असेल....त्याने सकाळी सकाळी मला प्रसादाचा दही-भात घेऊन जायला आठवण केली..त्याचं प्रसन्न हसू पाहून बरं वाटलं...

मग मात्र डोक्यात उरलेले रस्ते....कामं...आणखी काही भेटी......सरावाच्या ठिकाणी गाडीत तेल घालून...४९५, ९५ असं जायचं होतं....त्याचवेळी मी मला मागच्या वर्षी आईबरोबर खास मुंबईहून आलेली सिडी रॅंडम मोडला लावते...या प्रवासात भाड्याच्या गाडीने प्रवास करायचा असल्याने मी माझ्यापुरता ही आणि अजून एक अशा दोन सिडी घेऊन फ़िरतेय..

हा हायवे, इथला मर्ज आणि तिथलं माझं ब्लाइंड स्पॉट तपासणं सगळंच सरावाचं...पण आता नाही तर दोन अडीच वर्षांपुर्वीच्या सरावाचं....आणि मधल्या काळात फ़ारसं काही बदललं नसल्याने मी पुन्हा त्याच पुर्वीच्या सवयीने लेन चेंज करताना अचानक सिडीतला फ़ोल्डर बदलतो, नाट्यसंगीत हा विभाग खरं तर या सिडीत आहे, पण मी फ़ारसा न ऐकलेला त्यामुळे पुढे करू का असा विचार करत असतानाच तबल्याचे बोल आणि मनाचा ठाव घेणारी सरगम आणि कानावर पडतं.....सिडी बनवताना दिपूने गोंधळ घातलाय हे कळलंच. नाहीतर इतकी सुंदर बंदिश ऐकण्यासाठी मी गेले वर्षभर थांबून आणि तेही तीन हजार मैल दूर आल्यावर का बरं ऐकली गेली असावी??? असो.......

तर तबल्याचे बोल आणि मनाचा ठाव घेणारी सरगम कानावर पडते....
 सा रे ग म ... ग म ग ग सा...........
 किसको ऐसी बात, बात कहें 

ही एकच ओळ सुरूवातीला ज्या प्रकारे आळवली आहे त्याने या बंदिशीत आणखी रस येतो.....काय म्हटलंय बरं पुढे असं म्हणत मी एका हायवेवरून दुसरीकडे सटासट मर्ज व्हायचा आनंदही घेतेय.....सकाळच्या टिपिकल इस्ट कोस्ट ट्रॅफ़िकमध्ये आपली गाडी पुढे दामटायचा एक आनंद आणि त्यात साथीला पं. सत्यशीलजींचा आवाज सांगतोय ते "बा....त......." तो तबला आणि सतार....यांची प्रचंड सांगड मनाला एक वेगळीच अनुभूती येताना पुढचं वाक्य सामोरं येतं...

करे मौज पिया संग जो अपने 
उसपर करम परवर दिगार | 

खरं तर शृंगाररसच म्हणायचा...पण तरी हे गायन ठाव घेतं.....मला तसंही कवितांचे गूढ अर्थ वगैरे नाही कळत आणि शास्त्रीयही टेक्निकली कळत नाही....पण तरी सूरांनी घेतलेला हा ठाव नेहमीपेक्षा वेगळाच....मग पुढचं...

मय भी हो, मीना भी हो 
मौसम - ए - बरसात हो 
उसका यारों क्या कहना 
जिसका दिल बरसात (दिलबर साथ) हो |

योगायोगाची गोष्ट म्हणजे आदल्या रात्री इथे थोडा रिपरिप पाऊस होऊन गेला होता आणि त्यामुळे थोडीशी भिजलेली जमीन, सकाळच्या आंघोळीने प्रसन्न असलेलं शरीर, अजून थोडे ओले असणारे आणि गाडीच्या वेगाने लेन बदलताना मानेच्या होणार्‍या हालचालीने कपाळावर येणारे ओले केस मागे घेताना ’जिसका दिल बरसात हो" ची एक वेगळीच ओळख स्वतःलाच....

या सुरात गुंफ़ून घेताना नक्की काय वाटलं खरं शब्दात मांडणं कठीण आहे....म्हणजे एखादा पुरूष हा भाव किती कोमलपणे मांडू शकतो आणि त्यामुळे शास्त्रीय नाही कळलं तरी यातली प्रत्येक लकेर, तान आपल्याला एक वेगळाच अनुभव देऊन जाते याचा एक प्रत्यय मला त्या सकाळी आला....आणि उरलेला दिवस मलाही "किसको ऐसी बात कहें" गुणगुणत राहावंसं वाटलं....

असे बरेच रस्ते आहेत जिथे विशिष्ट गाणी, अल्बम ऐकले गेल्याने ती वळणं आठवतात....तसं या गाण्याने मला ४९५, ९५ चं लेन चेंजींग आणि एक प्रसन्न सकाळ आठवेल.. आधी रॅंडम मोडमधून लागलेलं हे गाणं त्यादिवशी मी रिपीट मोडला लावून किती वेळा ऐकलं त्याची गणनाच नाही....

हा सगळा प्रवास म्हणजे देऊळ, नंतर माझं जुनं घर तिथून आणखी एका मित्राचं घर आणि मग नवीन जर्सी हे सगळं मी कोणे एके काळी नित्यनियमाने माझ्या बेटर हाफ़बरोबर केलंय...यावेळी मात्र मी एकटीने इथे आले आणि सगळी पाच राज्य एकटी कामं करत गेले...ऑफ़िसच्या कामांचं ठीक आहे पण घरगुती पद्धतीची कामं पण एकटीनेच....ते पूर्वी एकत्र करत असण्याचे प्रवास आठवताना कदाचित त्याची साथ या गाण्याने मला मिळाली का असं घरी आल्यावर मला वाटलं.....

आपले मित्र, मैत्रीण, सखा, सोबती यांच्याबरोबर बर्‍याच गोष्टी आपण एकत्र मिळून करतो.......कधीतरी तेच सगळं त्यांच्या साथीविना करुन पाहावं.....मग अचानक आधीचं सगळं आपल्यासाठी किती खास होतं ते पटतं....नात्यांमध्ये अत्यावश्यक नसेलही कदाचित पण एकदा असंही करून पाहावं किंवा माझ्याबाबतीत यावेळी झालं तसं करावं लागलं, म्हणून तेच सगळं एकटीने केलं.....आपल्याभोवती असणार्‍या मंडळीचं आपल्यासाठी असणं काहीवेळा कसं आपणही गॄहित धरलं होतं असं काहीसं जाणवतं आणि मग ते नातं घट्ट व्हायला मदत होते.....पुन्हा सगळं एकत्र करतानाचे बंध घट्ट होतात.....

जितकं हे गाणं शृंगाररस दाखवतं त्याहीपेक्षा जास्त ते नातं घट्ट करण्यासाठीचा आवश्यक विरह आहे त्याकडेही निर्देश करतं, निदान माझ्यासाठी.....असं मी जेव्हा ते त्या ट्रिपमध्ये वारंवार ऐकलं तेव्हा मला जाणवलं...म्हणजे वर ते कंसातलं दिलबर साथ आहे ते बाहेर काढून 
उसका यारों अजी क्या कहना
जिसका दिलबर साथ हो....... हे एकदा जिसका मधल्या "का" वर जोर देऊन साथ मधला "सा" थोडा लांबवला की आपोआप प्रत्यय येतो.......

ऐकायचंय का तुम्हालाही हे गाणं?? तुमच्यासाठी आणखी एक वेगळा अर्थ घेऊन सामोरं येईल....

या लिंकवर ऑनलाइन ऐकायची सोय आहेच शिवाय फ़क्त एकच गाणं विकत हवं असेल तर माफ़क दरात तेही उपलब्ध आहे...जरूर ऐका.....

शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही...मी तर बरेचदा कुठचंही गाणं, "गाणं" म्हणून ऐकते आणि खूपदा मला त्याचा लागलेला अर्थ हा लौकिक अर्थापेक्षा वेगळाच असतो...पण तो माझ्यासाठी नेहमीच खास...ते गाणं ऐकायचा सगळाच प्रसंग मग आठवणीत जातो.....अशाच काही खास गाण्यांपैकी हे एक....



तळटीप - एप्रिलमध्ये केलेल्या बिझिनेस ट्रीपमध्ये ऐकलेल्या गाण्याची आठवण लिहिण्यासाठी जुलैची आणखी एक तशीच  ट्रीप उजाडावी हा आणखी एक छोटासा योगायोगच, नाही का? खरं तर पुन्हा तिच सिडी घेऊन आलेय हेच मान्य करते कसं....:)

18 comments:

  1. Replies
    1. धन्यु निशा...
      मी पहिल्यांदीच ऐकताना लगेच आवडलं मला पण...:)

      Delete
  2. nehami pramanech Mast jamun aalaay......ani itakee sundar bandish share kelyabaddal dhanyawad!

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा, आभार. खरं तर ही बंदिश माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिपकचे आभार मानले पाहिजेत.....
      तो वाचत असेल अशी अपेक्षा....:)

      Delete
  3. मस्त ! नेहेमीप्रमाणेच..
    "गाणी आणि आठवणी" चा टॅग आता माझ्यासाठी genre झाला आहे.
    आणि तो एक awesome playlist देतो.

    ReplyDelete
    Replies
    1. बाप रे शार्दुल...मोठीच कमेंट आहे ही माझ्यासाठी आणि त्याबद्दल खूप खूप आभार...
      खरं तर माझ्यासाठी गाण्यांच्या आठवणी ही या ब्लॉगवर लिहिता लिहिता मलाच मिळालेली एक सुंदर भेट आहे...जेव्हा जेव्हा अशा काही आठवणीतल्या गाण्यांवर लिहिते तेव्हा तेव्हा मला स्वतःलाच काही नवं कळतं....या आठवणी माझ्यासाठी खूप खास आहेत...:)

      Delete
  4. :-) प्रत्येकाची वेगळी गाणी आणि वेगळ्या आठवणी ..पण मनाचा प्रवास मात्र तोच!

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय नं सविता...गाणी आपल्याला मनाला कुठे फ़िरवून आणतील काही सांगता येत नाही...:)

      Delete
  5. नेहमीप्रमाणेच मस्त! :)
    शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही मी तर बरेचदा कुठचही गाणं ''गाणं'' म्हणून ऐकते आणि खुपदा त्याचा अर्थ हा लौकिक अर्थापेक्षा वेगळा असतो. पण नेहमी खास... १००% सहमत!!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गं पल्लवी..तुझ्या कविताही छान असतात फ़क्त माझं एक थोडं विचित्र आहे..मला सरळ कवितांचे शब्द कळण्याऐवजी मी त्याचंच गाणं ऐकलं की मला ते वेगळ्या प्रकारे कळत....:)

      Delete
  6. खुपच छान लिहिलयेस गं
    गाणं गाण्या- ऐकण्यापेक्षा गाणं जगावं अस अभी म्हणायचा
    आता मी गाणं जगतेच ;)
    त्यामुळे प्रत्येक गाणं माझ्यापर्यंत अगदी पोहचत.
    खुप खास लिहिलयेस :)
    लास्ट पॅरासाठी तर १०/१०

    ReplyDelete
    Replies
    1. आभार प्रिया आणि ब्लॉगवर खूप खूप स्वागत... :)
      अगं तुझ्या बोलण्यात तुझा अभि खूप जास्त असतो नं? असो त्याबद्दल मी तुला तुझ्याच ब्लॉगवर लिहिलंय म्हणून पुन्हा तेच लिहित नाही...
      गाणं जगलं की ते पोचतंच हा माझाही अनुभव...म्हणून असेल कदाचीत मला कविता कळत नाहीत पण गाणी मात्र लगेच भावतात..या ब्लॉगवर इतरत्र गाण्यांच्या आठवणी आहेत...तुला कदाचीत आवडतील....:)
      तूही लिहित रहा...मला कळत नसल्या तरी कविता स्पर्शून गेल्या की मी असते तिथेही... :)

      Delete
  7. का माहित नाही पण ही पोस्ट मला दिसलीच नव्हती.. हे बेस्ट बेस्ट गाणं मला तुझ्यामुळेच ऐकायला मिळालं... त्याबद्दल खूप धन्स... (व्हाया दिप्या) ;)

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या ब्लॉगर अकाउन्टला मध्ये मध्ये गंडायची सवय आहे...so..:)

      हे गाणं तुला ऐकवायच्या नादात तुझ्या शहरातला (जगप्रसिद्ध) खड्ड्यांनी भरलेला रस्ता चुकवताना किंवा खरं तर न चुकवताना मी गाडी कसली घातली होती ते आठवतंय की नाही?
      माझं तुला ऐकवायच्या आधीच गाण्याची पारायणं करून झाली होती त्यामुळे पोस्ट लिहिताना हे लक्षात आलं नाही पण आत्ता अचानक तेच आठवलं बघ..:)
      असो...मजा म्हणजे तुला ऐकवायचं कारण हे होतं की मी एकटीने ते गाणं इतक्यांदा ऐकल्यावर मला कुणाला तरी प्रचंड ते ऐकवावसं वाटत होतं आणि तुला नेमकं माझ्या सारथ्याखाली गाडीत बसावं लागलं मग तुलाच ऐकवलं...अर्थात तुला ते आवडलं म्हणून आपण आता दोघं मिळून दिप्सला हे ऑफ़िशियली सांगुया...हाबार्स दीपका....:)

      Delete
  8. यातली गाणी फारशी परिचयाची नाहीत, पण जे लिहीलंय ते मस्त वाटलं. काही विशिष्ठ गाणी ऐकली की काही वळणं, प्रसंग, ठिकाणं, इतकंच काय तर माणसं देखील झडझडून आठवतात.....बास बाकी लिहीत नाही, भरून आलंय!

    >>शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी त्यातलं शास्त्र नेहमीच कळायला हवं असं नाही.
    १००% सत्य.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभार मंदार आणि ब्लॉगवर स्वागत...:)

      हे गाणं माझ्यासाठी पण नवीनच होतं. लिंकवर ते गाणं ऐकायची सोय आहे बघ. आणि जनरली "गाणी आणि आठवणी" या लेबलमधलं एखादंतरी गाणं तुझ्या नक्की परिचयाचं असेल....तसंही बाराच गाण्यांबद्दल लिहिलंय आणि इतर काही गाण्यांशी संबंधीत पोस्टा...असो..

      वाचून अभिप्राय दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि तुला का भरून आलंय? तुझ्या ब्लॉगवर लिही कदाचीत तुला बरं वटेल....:)

      Delete
  9. त्यादिवशी ओझरती वाचली होती. वाचण्यापेक्षा फक्त नजर फिरवली होती..कारण तुला बोललो ना की मृत्युंजय वाचण्यात गुन्तलो होतो... माझी अतिशय आवडती बंदिश आहे ही आणि तू तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर मस्तच सजवलीस..
    त्या सीडीत सत्यशील यांची "पिया बीन दिन बीते" पन ऐक.. मस्त आहे...


    बाकी जास्त हाभार्स मानू नकोस मी डायटवर आहे माहीत आहे ना.. उगा मुठभर मांस चढायचं. :D:D:D:

    ReplyDelete
    Replies
    1. दीपू आभार्स....:)
      मला वाटलं तुला आत्तापर्यंत उचक्या कशा लागल्या नाहीत...:D :D

      त्या सिडीतला किशोरीताईंचा हंसध्वनीमधला तराणाही मला खूप आवडला आहे हे सांगायचं होतं....

      आभारासाठी डाएट कमी करू नकोस.तू फ़क्त वेळच्या वेळी ट्रेक्स करत जा...:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.