Monday, July 2, 2012

इमो इमो


गेले काही दिवस आमच्या मुलांच्या पाळणाघरात पुढच्या वर्षीचं प्लानिंग नावाखाली मेल्स येताहेत. यंदा सगळीकडे अर्थात तीच बोंब आहे इकॉनॉमी,(नसलेलं) बजेट आणि असंच काही.शिवाय इकडच्या भागात एक नवीन सरकारी शाळा उघडताहेत.तिथे प्रिस्कूल सुद्धा आहे. साधारणतः या शाळा किंडरगार्टन पासून असतात पण ही जरा अपवाद दिसतेय.
ज्या आया घरी आहेत त्यांच्यासाठी तो पर्याय अर्थात आमच्या पाळणाघर कम प्रिस्कुलपेक्षा अर्थातच किफ़ायतशीर आहेच.शिवाय मुलं पुन्हा किंडरगार्टनला तिथेच जाणार म्हटल्यावर त्यांच्या आधीपासून तिथे रूळायचा फ़ायदा आहेच.
ही माहिती स्वतः वाचताना मला उगाचच आता इथली मुलं कमी होणार किंवा आमच्यासारखे अत्यंत गरजवंत पालकच इथे मुलांना ठेवणार हे सत्य साधारण समजतंय. याचा परीणाम काय हेही ढळढळीत सत्यच आहे..तिथे पण जॉब कट....:(

कधीतरी मलाही वाटतं की मी माझ्या मोठ्या मुलाला ते सरकारी, थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मग घरी एखादी नॅनी असं करावं का? मग उगीच त्या सगळ्या प्रेमळ शिक्षिका डोळ्यासमोर येतात ज्यांनी त्याला गेली दोन वर्षे जीव लावला. त्याला माझी खूप सवय होती आणि तिथे सुरूवातीला पाळणाघरात जायला तो सारखं रडायचा पण त्याचं सगळं रडगाणं, हट्ट सहन करून त्याला माझ्याशिवाय रमायला शिकवलं. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेल्ड डॉक्युमेंटेशन करून आम्हाला पाठवलं, त्यातलं निवडक काही शाळेतही लावलं. सगळ्यात मुख्य त्याला स्वतःला पुढच्या वर्षी म्हणजे इथलं शैक्षणीक वर्ष जे येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होईल  तेव्हा आपण इथल्याच प्रिस्कूलला जाणार हे माहीत आहे. मग मी तो आधी म्हटलेला विचार डोक्यातून काढून टाकते. एका वर्षासाठी कदाचीत थोडं स्वस्त प्रिस्कूल आणि मुलाचं मानसिक समाधान यात त्याच्या (आणि माझ्याही) मानसिक समाधानाची निवड करते.
शिवाय आमचा छोटाही तिथेच पाळणाघरात जातो. त्याला तर तिथल्या शिक्षिकांनी नऊ महिन्याचं बाळ असताना त्यांच्याकडे सांभाळलाय, त्याच्यासाठी ते आमचे काही शब्द शिकले, त्याच्या आजोबांच्या आवाजातली गाणी पण त्यांना हवी होती म्हणजे त्याला तिथेही घरच्यासारखं वाटेल...खरंच खूप सारे पैसे दिले तरी सुविधा मिळतीलच याची खात्री असते का? ती इथे हमखास आहे त्यामुळे निश्चिंत होऊन आम्ही दोघं आमच्या डेस्कला काम करू शकतो..माझ्याकडेही यंदा अप्रेजलच्या नावाने शंख आहे पण निदान नोकरी आहे..इथे मात्र वारे कधीच उलट्या दिशेने वाहू लागलेत.

कधीकधी वाटतं की आपण खरंच इतकं इमोशनल असायला हवंच का? का असं होतं की आपल्याला कुणाकडूनही काही वाईट बातमी ऐकली की कासावीस व्हायला हवं असतं? आज ही पोस्ट लिहायचं कारण सप्टेंबरची प्लानिंग मेल आली आणि त्यात माझ्या दोन्ही मुलांना सांभाळणार्‍या दोन गुणी शिक्षिकांची नावं नाही आहेत. त्यातल्या एकीचं बाळ आता सहा महिन्याचं होईल आणि ते बाळ झालं तेव्हाच तिच्या नवर्‍याची नोकरी गेली. हे आम्हाला कळल्यामुळे माझ्या तिच्या बाळापेक्षा बरोबर वर्षाने मोठ्या असलेल्या लेकाच्या कपडे/खेळणी यांचं काय करायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं....दुसरी तर इथे कित्येक वर्षे आहे म्हणजे तिने स्वतःच कदाचीत हे सोडून दुसरं कुठलं ठिकाण असा गेले दशकभरतरी विचार केला नसेल..

कसं बरं जायचं उद्या तिथे मुलांना सोडायला...इतके दिवस हे कदाचीत फ़क्त त्यांनाच माहित आहे पण आता आम्हालाही हे ऑफ़िशियली कळवलं गेलंय हे त्यांना माहित असणार..कसं बरं सामोरं जायचं??? श्या, काही केल्या बरंच वाटत नाहीये...

निरोप देणं हे मला काय सर्वांनाच नेहमी जड जातं.पण हा निरोप सगळ्यात जास्त जड वाटतो मला.कधीतरी एक सेंड ऑफ़ होईल आणि तेव्हा डोळ्यातलं पाणी बिल्कुल न दाखवता "सी यु समटाइम्स... विश यु लक ऑन युअर नेक्स्ट अ‍ॅडव्हेंचर" असं एलिशिया आणि सेरा या दोघींना म्हणताना दाटून आलेला गळा..मला तर आत्ताच खूप इमो इमो होतंय...:(

तळटीप :- त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे मागे मी टोशाची पोस्ट लिहिली होती त्याबद्दल काही चांगले अपडेट्स आहेत. तिची शस्त्रक्रिया सुरळीत होऊन ती आणखी एक दोन आठवड्यातच पुन्हा पाळणाघरात आपलं काम सुरू करेल...:) 

अपर्णा,
२ जुलै २०१२

9 comments:

 1. Very nice post. Good to hear about Tosha.

  ReplyDelete
  Replies
  1. आभार.टोशा एक दोन आठवड्यात कामावर येईल..:)

   Delete
 2. अपर्णा .....वाटत होतं की हे असं इमो फक्त मलाच वाटत राहत, इतर कोणालाही निरोप देताना वाटतं, त्यापेक्षा कितीतरी अवघड आपल्या सपोर्ट सिस्टीम पैकी कोणाला निरोप देताना वाटतं. घरी काम करणाऱ्या, पोळी-काकू, लेकीला सांभाळणारी एक छोटी होती तिला....प्रत्येक वेळी याच भावना असतात. एवढेच नाही तर लेकीच्या वेळी हॉस्पिटल मधून घरी येताना, ४/६ दिवस मायेने केलेल्या डॉक्टर्स, नर्स, मावशींचा निरोप घेताना पण गळा दाटून आला होता. त्यांच्या कामाचे पैसे तर आपण मोजतोच ग ....पण पैशांच्या विचारा पलीकडे जावून लावलेली माया तिचे मोल नाही करता येत ना ?

  ReplyDelete
  Replies
  1. हो गं अनघा..हळव्या मनाचे असणं हा एक फ़ार त्रासदायक प्रकार आहे...स्वतःसाठीच....:(

   Delete
 3. खरंच गं बाई.............. निरोपाचा क्षणच भलता अवघड असतो. पण जगराहाटी कुणाला चुकालीये?

  ReplyDelete
  Replies
  1. ते तर आहेच...जेव्हा मागे वळून पाहतो त्यावेळी हे क्षणही साधे वाटतील पण जेव्हा त्यातून पुढे जायचं असतं तेव्हाचं हळवं होणं अपरिहार्य आहे...

   Delete
 4. Replies
  1. वर्षा, स्वागत आणि आभार....

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.