Wednesday, May 11, 2011

ती गेली तेव्हा.....

२०११ च्या फ़ेब्रुवारीमध्ये मेयरपदाची माळ गळ्यात पडली आणि तेव्हापासुन फ़ुतोशींना उसंतच नव्हती. आपल्या प्रवासाकडे थोडं मागे वळून पाहिलं तर जपानच्या उत्तर किनार्‍यावरचं रिकुझेन्टकटा (Rikuzentakata) हे एक छोटंसं शहर खरं म्हणजे त्यांच्या बाबांचं जन्मगाव. त्यामुळे जन्म आणि वयाची २८ वर्षे राजधानीत काढली तरी बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा त्यांचं संगणक अभियंत्याच्या नोकरीमध्ये भागेना तेव्हा परतीसाठी हेच गाव निश्चित करायला फ़ार अवधी लागला नाही. तिथल्या एका स्थानिक पोल्ट्री प्रोसेसिंग कंपनीत आपली पहिली नोकरी करतानाच त्यांना ’कुमी’ भेटली. त्यांच्यापेक्षा सात वर्षे लहान..."अजुनही ती विशीचीच दिसते", ते म्हणतात.तिला काचसामान जमवायची आणि हस्तकलेची आवड. स्वतः बनवलेल्या अशा काही वस्तू आपल्या काही मित्र-मैत्रिणींच्या दुकानात ती विकतही असे.यथावकाश त्यांच्या संसारवेलीवर फ़ुललेली दोन फ़ुलं मोठा मुलगा ’ताइगा’ आणि धाकटा ’कनातो’. फ़ुतोशीनाही या थोड्या लेड बॅक आयुष्यात स्थिर व्हायला फ़ार वेळ लागला नाही. एक कुठलंही साधं चौकोनी जपानी कुटुंब एका छोट्या शहरात जगेल अगदी तसंच.

मध्येच हे मेयर व्हायचं कसं काय डोक्यात आलं असं वाटावं; पण त्याला पार्श्वभूमी होती त्यांच्या वडिलांचं राजकारणात असण्याची.बर्‍याच वर्षांपुर्वी सिटी कॉंन्सिलची निवडणूक होणार होती; त्यासाठी काही ड्राफ़्ट्स बनवण्यासाठी सगळ्यांना संघटित करायचं काम फ़ुतोशींच्या वडिलांनी केलं होतं. त्यामुळे एके दिवशी गावातल्या साधारण दिडेकशे वृद्धांचा समुह त्यांच्याघरी आला तेव्हा त्यांना काय म्हणायचं हेच फ़ुतोशींना कळेना. दशक झालं बाबा गेले त्याला पण ते म्हणाले होते की एक दिवस माझा मुलगा इथेच परत येईल आणि नक्कीच शहरासाठी काम करेल. भानावर येईपर्यंत फ़ुतोशींचे पोस्टर गावात दिसु लागले आणि सिटी कॉन्सिलमध्ये त्यांचं काम सुरुही झालं. जेव्हा आधीचा मेयर आजारपणामुळे पुन्हा निवडणूक लढणार नव्हता तेव्हा फ़ुकोशींचं मेयरपदासाठी प्रयत्न करणं जवळजवळ निश्चित झालं होतं. कुमींनी फ़क्त नवर्‍याला ’मम’ म्हटलं. प्रशांत महासागराचा सुंदर किनारा लाभलेल्या या शहराचं कर्ज कमी करुन पर्यटकांना आकर्षुन घेण्यासाठीच्या त्यांच्या योजना होत्या आणि फ़ेब्रुवारीमध्ये त्यांच्या मेयरपदावर शिक्कामोर्तबही झालं.

तेव्हापासुन कामाची उसंतच नव्हती. आता खरं तर बायकामुलांसाठी वेळच नव्हता पण तो नंतर नक्की येईल हेही त्यांना माहित होतं. ११ मार्च २०११ ची त्यातल्या त्यात शांत दुपार म्हणून दुपारी साधारण २.४० च्या सुमारास आपल्या बायकोला फ़ोन करुन मुलांना एका बार्बेक्युला न्यायला सांगितले आणि तीही त्यांना मेल करुन कळवेन म्हणाली...खरं तर हे संभाषण तसं पाहता अगदीच त्रोटक होतं पण कदाचित नियतीने त्यांच्यासाठी तेच लिहुन ठेवलं होतं.त्यानंतर अगदी सहाच मिनिटांनी म्हणजे २:४६ च्या आसपास ९ रिश्टर स्केलच्या भुकंपाच्या हल्ला झाला आणि गावातली वीज, फ़ोन सारं काही बंद पाडून सुनामीच्या काळलाटा गावात घुसल्या. तिथल्या स्थानिक लोकांबरोबर चार मजली सिटी हॉलच्या छपरावर चढलेल्या फ़ुकोशिंना समुद्रसपाटीपासुन जवळ असलेला आपल्या घराचा भाग दिसत होता. मुलंतर शाळेत होती आणि त्यांची शाळा एका टेकडीवर होती. पण यावेळी घरी असणार होती ती एकच व्यक्ती त्यांची अजुनही विशीत दिसणारी ’कुमी’.इतर कुठल्याही नवर्‍याप्रमाणे त्यांनाही गाडी घेऊन सरळ आपल्या घरी जाऊन तिला शोधायचं होतं.....

But I really could not do that....I was thinking the whole time: 'I hope she was able to get away'.

आपल्या गावाला सुंदर पर्यटनस्थळ बनवायचा मेयरचा अजेंडातर सुनामीने पार धुतलाच होता. पण आता जबाबदारी होती ती पुन्हा उठून उभं राहण्याची आणि तेही सार्‍या गावासकट.....आता नवा अजेंडा ’help survivors'...आपल्या मित्रांच्या मदतीने त्यांनी शक्य असेल त्यांना शिजवलेल्या भाताचे गोळे वाटायला सुरुवात केली. लष्कराला रस्ते मोकळे करायला लावले जेणे करुन आणखी कुमक आतपर्यंत आणता येईल. साधारण एका आठवड्यात बाहेरुन अन्न आणि पाणी जरा नियमितपणे गावात यायला लागलं. पण तरी आणखी काही आवश्यक गोष्टी जसं ब्रश, डायपर अजुनही मिळत नव्हत्या. इंधन, वृद्धांसाठी औषधं या वस्तुंचीही मारामारच होती. फ़ुतोशींनी तोकियोमधल्या काही कायदेपंडितांना एक दिवस गावातल्या आपत्कालीन रहिवासात राहायला बोलावलं जेणेकरुन सरकारवरही जादा मदत पाठवण्यासाठीचा दबाव येईल. दिवस जात होते तसं नव्याने मेयर झालेल्या फ़ुतोशींचा एक नवा दिनक्रम सुरु झाला होता. रोज दुपारी पत्रकारांना आतापर्यंतचा मृतांचा आकडा आणि यादी द्यायची आणि त्यांच्याबरोबरीच्या सहकार्‍यांबरोबर पुनर्वसनाची कामं करायची.लोकांना राहण्यासाठी तात्पुरती घर बांधायच्या ऐवजी काही लोकांना जिथे भुकंपाने झालेलं नुकसान कमी आहे अशा ठिकाणी पाठवायचा खुद्द पंतप्रधानांचा सल्लाही धुडकावुन आमची लोकं एकत्रच राहतील हे ठामपणे सांगताना शेवटी २६ मार्चला बांधकामांची सुरुवात झाली. आतमध्ये प्लंबिंग आणि हिटर असेल अशी ३६ अपार्टमेंट्सची लगोलग बांधणी सुरु झाली.

साधारण हजारेक लोकांनी भरलेल्या प्रवेशिकांमधुन लॉटरी काढुन ती ताब्यात द्यायचं ठरलं. आणखीही छोटे छोटे विजय होतेच. एक स्थानिक कापडाची कंपनीला स्त्रियांसाठीचे कपडे बनवण्यासाठी डोनेशन मिळवुन दिलं.हळुहळु तातडीच्या गोष्टी कमी झाल्या तरी आभाळंच फ़ाटलं होतं. सगळे रस्ते, पुल, रेलरोड यांची वाट लागली होती.जागोजागची वीजेची कनेक्शन्स तुटली होती. एक पाणी निचरा करायचा जवजवळ २०० मिलियन डॉलरचा प्लान्ट गायब झाला होता. शहराशी संबधीत सगळी कागदपत्र लाटांनी धुऊन नेली होती.सगळ्या महत्वाच्या इमारती जसं सिटी हॉल, अग्निशमक दल, स्पोर्ट सेंटर पाडुन नव्याने बांधायच्या होत्या. सगळीकडे मेयर म्हणून फ़ुतोशींना या सगळ्या कामांना लागणारा पैसा उभा करायचा होता. देवाने काम करायला आपल्याला दोन हात जास्त द्यावे असंच वाटण्याचा हा प्रसंग होता.

साधारण महिन्याभरानंतर फ़ुतोशींनी केलेल्या मेहनतीची फ़ळं दिसु लागली. आता शहरात एक पोलिस स्टेशन, एका बॅंकेची शाखा, चेंबर ऑफ़ कॉमर्स दिसू लागलंय. ती बांधायला घेतलेली घरंही ताब्यात दिली गेलीत. लोकांचा इतर कुठे न पळता याच शहरात राहायचा आत्मविश्वास वाढतोय.

काम,काम आणि फ़क्त काम करणार्‍या फ़ुतोशींना एका मंगळवारी एक फ़ोन आला...निदान आतातरी सगळं बाजुला करुन जायलाच हवं असा....त्यांच्या घरापास्नं साधारण २००० फ़ुट उंचीच्या एका टेकडीवर कुमींशी साधर्म्य असणारं एक प्रेत मिळालं होतं.आता निघायला हवं म्हणतानाही कार्यालयातुन निघताना फ़ुतोशींना काही तासांचा अवधी द्यावा लागलाच. गेले काही महिने जेव्हा इतर लोकं आपापल्या घरच्यांना शोधत होते तेव्हा मुलांना त्यांच्या काकाकडे ठेऊन हा मेयर आपलं कर्तव्य बजावत होता.प्रेत ओळखण्याच्या पलिकडे गेलेलं असलं तरी ती त्यांची कुमीच होती.मेयर म्हणून आपले कर्तव्य बजावताना नवरा म्हणून आपल्या पत्नीला शोधायला आपण जाऊ शकलो नाही ही खंत तिला श्रद्धांजली वाहताना त्यांनी तिला मनोमन व्यक्त केली.आपल्या बारा आणि दहा वर्षांच्या मुलांनी तिला असं पाहु नये असं वाटताना त्यांना ही बातमी कशी द्यावी याची चिंताही आहेच...

She was like a friend to them. Since I was always so busy, they always ran to their mother.

एक नवरा,बाप म्हणून आपल्या कर्तव्याची जाणीव असली तरी या अफ़ाट आपत्तीपुढे आपलं काम करत राहाणंच त्यांना सुरुवातीच्या दिवसांत योग्य वाटलं. आपल्या पत्नीचा शोध घ्यायची इच्छा कर्तव्यापुढे गौण ठरली...

When I think about that, it really makes me question what kind of human being I am..........

 सुनामीच्या या आपत्तीचा सामना करणारे फ़ुतोशींसारख्या जपानमधल्या राजकारण्यांबद्द्ल वर्तमानपत्रात वाचताना एकीकडे आपल्या देशातल्या खबरींमध्ये लाचखोरीचे नवे नवे रेकॉर्ड्स प्रस्थापित करण्याची स्पर्धा लावलेले भारताचे राजकारणी पाहिले की मान खरंच शरमेने खाली जाते. आज जपानवर आलेल्या या संकटाला दोन महिने पूर्ण होताहेत.

हिरोशिमा-नागासाकीच्यावेळी राखेतून वर आलेला हा देश, भुंकपासाठी सतत तयार असणारा.. पण फ़क्त ती तयारी वरवरची नाही तर असे अनेक फ़ुतोशी या देशात आहेत म्हणून पुढे वाटचाल करणारा एक चिमुकला देश.या आपत्तीत आपले प्राण गमावणार्‍या नागरिकांना या ब्लॉगवाचकांतर्फ़े ही श्रद्धांजली आणि केवळ देशासाठी आपले घरचे दुःख विसरून कर्तव्यपरायणतेचं स्तंभित करणारं रुप दाखवणार्‍या अनेक फ़ुतोशींना मनापासुन सलाम.


वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये वाचलेल्या एका लेखावर आधारित


11 comments:

  1. सलाम......

    सर्व नागरिकांना भावपुर्ण श्रद्धांजली...

    ReplyDelete
  2. सलाम .............

    ReplyDelete
  3. अजूनही आठवतो दिवस जेव्हा मला मित्राने फोनवर सांगितलं की टीव्ही लाव, निसर्ग कोपलाय आणि ते दृश्य टीव्हीवर बघून हात पाय लटपटायला लागेल... :(

    तरी जपान ने मोठ्या धीराने शहर उभी केली, त्या सगळ्यांच्या हिंमतीला सलाम आणि मृतांना भावपूर्ण श्रध्दांजली

    ReplyDelete
  4. स्पष्ट बोलायचे झाले तर ही पोस्ट वाचुन मी रडवेला झालो आहे, आधीच जपानी म्हणजे सुभाषबाबुजींच्या अस्थी जपुन ठेवणारा, आपल्याला स्वातंत्र्यलढ्यात सख्या भावासारखा मदत करणारा देश. आपला आशियाई सख्खा भाऊ समजा. त्यात हे संकट. माझ्या जपानी बंधुंना ह्याच्यातुन लवकर मार्ग मिळावा.

    टीप:- महानायक हे पुस्तक आयुष्याचे बायबल मानले त्या दिवसा पासुन मला ह्या बुटक्या लोकांबद्दल कमालीचा आदर आहे. राषबिहारी बोस बाबुं पासुन माझ्या देशाला मदत त्यातही निरपेक्ष मदत करणारा फ़क्त माझा जपान बंधुच होता.

    ReplyDelete
  5. खरंच ज्यांच्यावर ही पाळी आली असेल त्यांचे काय हाल झाले असतील विचारही करवत नाही :( फारच भयंकर होतं ते.. तेव्हा आम्ही अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर होतो आणि पश्चिम किनाऱ्यालाही धोका आहे हे जेव्हा कळलं तेव्हा आमची काय अवस्था झाली होती ते आठवलं. सुदैवाने काही झालं नाही पण त्यानुले प्रत्यक्ष त्या प्रसंगात अडकलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करवत नाही !!!

    फुतोशी आणि अशा असंख्य अनाम फुतोशींना मानाचा मुजरा !!!!

    ReplyDelete
  6. फुतोशी व अशा अनाम फुतोशींना सलाम व सगळ्या मृतांना मन:पूर्वक श्रध्दांजली व सलाम !!!

    आपत्ती हातात हात घालून एकामागोमाग एक कोसळतच राहतात त्याचे उदा आहे हे. फार भयावह घटना घडली.

    ReplyDelete
  7. Vachun dolyat pani aala Aparna...
    One need a very big and strong heart to give priority to the duties towards country over personal emotions..
    Salute to such people!!

    ReplyDelete
  8. Yogesh +1 ... फुतोशींना सलाम.

    ReplyDelete
  9. माझ्याकडून पण सलाम! फुतोशी आणि त्याच्यासारख्या सर्वांनाच!

    अपर्णा...मी पहिल्यांदाच तुझा Blog वाचला. छान वाटलं.

    ReplyDelete
  10. या पोस्टवरच्या प्रतिक्रियांवर मी खरच काय बोलणार? प्रसंगच असा आहे की आपण फक्त अशा वीरांना सलाम करू शकतो आणि त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याचं ठरवू शकतो.

    गुरुनाथ आणि श्रीराज ब्लॉगवर स्वागत. गुरुनाथ 'महानायक' मी वाचलं नाहीये पण प्रयत्न करेन वाचायचा..

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.