Thursday, May 5, 2011

संदेश

प्रिय अपर्णास,

आत्ताच तुझा ऋषांक पालथा पडतोय हा बझ पाहिला आणि "यार मला यावेळीतरी मुलगी हवी होती रे" वाला आपला फ़ोन आठवला. हे पत्र लिहिताना आता किती वर्षे झाली आपल्या मैत्रीला हा प्रश्न अर्थातच आपण मुदलात आणत नाही कारण ते मोजायचं नाही हे आपलं कधीच ठरलंय...(आता इथे माझा पहिला वन-वे ब्रेक-अप आणि नंतर सारख्याच वेगवेगळ्या मुली आवडल्यामुळे सारखे-सारखे झालेले वन-वे ब्रेकअप याचा हिशेब काय करतेस?? माहितेय त्यात माझ्या लग्नाला झालेली वर्षे मिळवली की तितक्या वर्षांची आपली मैत्री....जाऊदे नं पण याची चर्चा तुझ्या ब्लॉगवर कशाला गं?? शेवटी प्रत्येकवेळी माझ्या पैशाने ते आपण कॅफ़े अल्फ़ातल्या पाव-भाजी आणि फ़ालुद्यात बुडवले त्याचा हिशेब कुठे मी करतोय... असो,तुझ्या ब्लॉगसाठी पत्र लिहायला बसलो म्हणून हे तेल च्यायला मध्येच ओततोय झालं) हा तर मूळ मुद्दा, तुझा जुना मित्र म्हणूनच नव्हे तर एका मुलीचा बाप या नात्याने दुसरा मुलगा झाल्याबद्द्ल तुझं अभिनंदन करायची ही संधी मी घेतोय(म्हणजे जाहिररित्या गं... ट्युबलाइट).

हे बघ सर्वप्रथम हे लक्षात ठेव की मला चांगलं ठाऊक आहे की तुला मुली (किंवा तुझ्याच शब्दात मुली"") आवडतात. या पार्श्वभूमीवर आता दुसरा(ही) मुलगा झाल्याचे काही फ़ायदे मला स्वतःला एक मुलगी आहे या अनुभवाधारे सांगावे म्हणतो.

हे बघ तुला मुलीला सजवायला आवडेल असा तुझा जो गैरसमज आहे तो ती मुलगी चुटूचुटू बोलायला लागली की लगेचच दूर होईल. कारण मग तुला तिला फ़क्त कपाटातच नव्हे तर दुकानातही कपडे, दागिने, टिकल्या, पर्स आणि जे काही तयारी या प्रकारात मोडतं ते तिच्याच मर्जीने घ्यावे लागेल. त्यात निव्वळ तुझी ती मुलगी सजवायची इच्छाच कमी होईल असंही नाही पण हे सर्व आताशा खूप वेळखाऊही होतंय ही नवी तक्रार तू करशील याची तुझा जवळचा मित्र म्हणून माझी खात्री आहे. कॉलेजमध्ये तुच तर आमच्या ग्रुपमधली टॉम बॉय होतीस नं जिला आम्ही आतापर्यंत आमची सगळी सिक्रेट्स सांगितली. ती काय तू तशी टिपिकल मुलगी होतीस म्हणून नव्हे तर तू आमच्याच पक्षातली जास्त होतीस..असो..या विषयावर नंतर जमेल तसं विषयांतर करेनच.

बघ आता सजवायची हौस अशी दोनेक वर्षांतच भागल्यामुळे पुढची वर्षे किती हालात जातील याची जरा कल्पना कर. त्यातुन काही अज्ञात कारणांमुळे तुझा परदेशातला मुक्काम पंचवार्षिक दराने वाढतोय. तो असाच वाढला आणि ही मुलगी तिथेच वाढली तर विचार कर ती लवकरच डेटिंग, प्रायव्हसी अशा मागण्या करील तेव्हा काय होईल? अर्थात मुलगे असं करणार नाहीत असं मी अजिबात म्हणत नाही. पण तरी आठव तुच मागे म्हणाली होतीस तुझ्या तिथल्या एका ओळखीच्या कुटूंबातील चार-पाच वर्षांच्या मुलीने आईकडे उन्हाळ्यात बिकीनीशिवाय पुलवर कसं जायचं विचारलं होतं आणि त्यांच्यापेक्षा तुलाच टेंशन आलं होतं ते.... मुलगे असल्यामुळे ही पंचवार्षिक योजना वाढवायची झाल्यास तुला थोडी तरी उसंत मिळेल.

तू जरी आमच्या सर्वांची खूप छान मैत्रीण असलीस तरी असं नॉर्मली (म्हणजे नॉर्मल मुलगी) आणि मुलगा यांच्यात सुरुवातीला भांडणं जास्तच होतात हा एक मुद्दा लक्षात घेतलास तर आता आरुषला त्याच्या खेळात सहभागी व्हायला एक मुलगाच मिळतोय याचा फ़ायदाही लक्षात घे. त्याची जुनी मुलांची खेळणी उपयोगात तर येतीलच (माहितेय मला तुला संपुर्ण भातुकली, बाहुलीचं घर इ.इ. घ्यायचं होतं...पण ते दुसर्‍या कुठल्याही मुलीला घेऊन दे गं(मी घेतलंय कधीच नाहीतर उगाच माझ्याकडचा पसारा वाढवशील)..नाहीतर असंच आणून ठेव) पण तू आरुषला थोडंस चढवलंस तर तो आपल्या लहान भावाला त्याच खेळण्यांबरोबर खेळायला मदतही करील. शिवाय बघ आपण याच्यासाठी नवीन नाही आणत आहोत असं सांगुन तू त्याला आणखी चढवू शकशील.मुलांना चढवायला वेळ लागत नाही (तिथेही मुलीच जास्त वेळखाऊ असतात) हा मुद्दा तुझ्यासारख्या सुज्ञीस सांगणे न लगे काय??

दोन दोन मुलगे असण्याचे काही तोटेही आहेत आणि एक मित्र म्हणून त्यांचीही जाणीव तुला करुन द्यावी म्हणतो.मुलांची भूक मोठी असते आणि तुझं स्वयंपाकघरातलं कौशल्य आणि आवडही (म्हणजे खायची गं) मला चांगली माहितेय. तर तुला करता येत नाहीत म्हणजे तुझ्या मुलांना पोळ्याच आवडणार हे लक्षात ठेव आणि त्याची सोय आधीच करुन ठेव. किंवा तुझ्या पंचवार्षिक योजना संपवुन परत यायचं अशा दरम्यान प्लान कर की त्यांची वाढती भूक आणि आपल्या देशात मिळणारी पोळीवाली बाई (ती आधीच तुझ्या रोज स्वप्नात येत असेलच) यांच्या वेळेचा योग्य ताळमेळ घालता येईल. शिवाय दुसरा मुलगा आल्यामुळे तुझ्या घरात आता तू फ़ॉर गुड मायनॉरिटीमध्ये आहेस हे लक्षात ठेव. पण फ़ंद-फ़ितुरीचा योग्यवेळी लाभ घेता आल्यास हा तोटा थोडाफ़ार कमी करता येईल. शिवाय समज तुला अगदी मुलीच जातात अशा कार्यक्रमाला जायचं असेल तर तुला प्रायव्हसी मिळण्याचा (आणि एक दिवस हक्काने पोरांना बाबाकडेच द्यायचा)आपोआपच फ़ायदा होईल.

बाबाचं नाव निघालंच आहे तर परत एकदा फ़ायद्यांकडेच वळावंसं वाटतं..अगं आता तुला बाहेर गेल्यावर मुलांना शी-शुला न्यायला (पुन्हा एकदा) हक्काने बाबाकडे पाहता येईल. आरुषमुळे तशीही त्याला सवय झालीच आहे त्यामुळे तोही काही नाही म्हणणार नाही. खरेदीच्या वेळीही तुला त्यांचे तेच तेच कपडे पाहायचा कंटाळा आल्यास बाबाला तुला मुलांच्या खरेदीतलं कळतं मग तू निवांत तुमच्या मुलींच्या सेक्शनकडे टाइमपास करुन आलीस तरी चालेल. अगं तसंही तू त्यांची खरेदी केलीस तरी तुझ्याच शब्दात सांगायचं तर कपडे काय घेणार शर्टच्या ऐवजी टी-शर्ट, हात सिझनप्रमाणे मोठे किंवा छोटे, रंग तेच मुख्य निळ्याच्या शेड्स नाहीतर एखादा पिवळा,हिरवा किंवा गेला बाजार भगवा, पट्ट्या उभ्या आडव्या किंवा चौकडी आणि पॅंट या प्रकाराबद्दल तर चर्चाच नको. हाफ़ की फ़ुल ते ठरवलं की फ़क्त काळा, निळा की उजळमध्ये फ़ेंट चॉकलेटी नाहीतर जीन्स...बास....त्यावर दागिने,पर्स, टिकल्या काहीही नको...इन फ़ॅक्ट हेच बजेट तू तुझ्यावर खर्च करु शकतेस. आहे की नाही फ़ायदा.

आणि हे बघ मुलगा झाला तरी शेवटी तो आपल्या आईचा लाडका असतो आणि मुख्य आईच्या तेवढ्याच जवळ असतो. पुढे मागे बायकोमुळे त्याला आईला वेळ देता नाही आला तरी आईसाठीचं प्रेम हे असतंच ते आतापास्नं त्याच्या मनात कसं जोपासायचं ते तू बघ. मुली आपल्या जागी असल्यातरी मुलगाही खंबीरपणे आई-बाबांच्या पाठी उभा राहू शकतो.

आईवरुन आठवलं.. आता आई आहे नं तुझ्याकडे आणि ती जे करु शकते ते मी तिच्या वयात (जर पोहोचले तर अर्थात) करू शकेन की नाही असं नेहमी म्हणतेस नं? मग फ़ायदा आहे नं तुझा..अगं जेव्हा (मी "जेव्हा" म्हणतोस नाहीतर वस्सकन अंगावर येशील) तू आजी होशील तेव्हा ती जबाबदारी कदाचित आपसूकपणे परस्पर तुझी विहीण उचलेल नं....आई गं...जास्तच आगाऊपणा करतोय का मी??

असो. सांगायचा मुद्दा म्हणजे आता मुलगी हा शब्द फ़क्त स्वतःकरता ठेव आणि आपल्या ग्रुपमध्ये जसा दंगा व्हायचा तोच घरात पण करायला तयार रहा..आम्ही मुलीवाले आहोतच तुझ्या घरगुती गमती-जमती ऐकायला. तसंही आरुष तुला "आई तू काय कत्तो?" म्हणताना ऐकलंय मी. खरं सांगतो कॉलेजमधले दिवस आठवले...

असो नमनाला आणि सगळे मुद्दे संपले तरी न संपलेलं तेल खपवायला माझ्याकडे इतका वेळ नाहीए गं..शेवटी एका मुलीचा बाप आहे मी..त्यामुळे सध्या घरातला वेळ हा फ़क्त तिनं डोकं खायला राखुन ठेवला आहे....

हा तर आता वरच्या पत्रातलं फ़क्त मुद्द्याचं (हो तेच ते कंस आणि तेल सोडून बाकीचं) वाचलंस तर तुला कळेल की एक काय दोन काय मुलगा व्हायचे बरेच फ़ायदेही आहेत तेव्हा त्याचा विचार कर आणि शांतपणे आज आरुष लवकर झोपलायस म्हटलं तर निवांत झोप...तुझ्याकडे तुझी काळजी करायला थ्री इडियट्स समर्थ आहेत आणि त्या वासरात एकटीच शहाणी गाय व्हायच्या संधीचा फ़ायदा घे....प्रत्येक मुलीकडून पोळल्यावर (अगदी स्वतःच्या पण) तुझी मदत घेणारा,

तुझाच मित्र.....

38 comments:

 1. रच्याक. भन्नाट.
  तू टॉम बॉय होतीस, आज ही आहेस आणि यापुढे ही रहाशील. त्याशिवाय का बझ्झवर आपल्या ग्रूपचं इतकं छान जमतं. तुझ्या टॉमबॉय इमेजमुळे शेवटी तुझ्या मित्राने शहाणी गाय म्हटले ते मी शहाणी Guy असे वाचले ;-)
  थ्री इडीयट्सना भविष्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

  (कमेंट आवडली नाही तर वस्सकन अंगावर येतेस तशी वस्सकन ऑनलाईन पण येशील का?)

  ReplyDelete
 2. कसलं भारी लिहिलंय !!! एकदम सुस्साट !!

  'संदेश' [;)] चा ब्लॉग आहे का ग? लिंक दे त्याची.. नक्कीच भारी भारी पोस्ट्स वाचायला मिळतील..

  की हा स्वतःशीच चाललेला 'संवादु' आहे?

  ReplyDelete
 3. रच्याक...एकदम सुपरभारी...

  कॉलेजात आपण समुपदेशकाची भुमिका उत्तम निभावली आहे अस वाटतय.. :) :)

  बरोबर आहे ना?

  ReplyDelete
 4. सिद्धु कमेंट आवडली नाही वगैरे होत नाही रे माझं...वस्सकन ऑनलाइन येते ते फ़क्त कामामध्ये असते त्यावेळी...मग पटकन पळावं पण लागतं ना? बाकी काय रे आपल्या बझग्रुपवर मात्र खरंच शॉलिट्ट धमाल येते हे मात्र शंभर टक्के खरं...तुम्ही लोकं आहातच माझा पाठलाग करणारे....
  रच्याक, तू ही कमेन्ट टाकलीस तेव्हापासुन नेमकंच ऑनलाइन येणं होत नाहीए बघ...:)

  ReplyDelete
 5. हाबार्स हेरंब...तसा हा माझाचा "संवादु" आहे ते पण आरुष झाला तेव्हापासुनचा..आज शेवटी पोस्टरुपी वाचा फ़ोडली...
  पु.ल.च "संदेश" वाचलंस का? मूळ कल्पना त्यावरुन (कधीच) सुचली म्हणून ते नाव दिलं..तुझ्यासाठी जालावर शोधत होते पण लिंक मिळाली नाही...रच्याक मी फ़क्त नाव ढापलंय त्यांची जाम भक्त आहे म्हणून...

  ReplyDelete
 6. योमु, समुपदेशकच रे..अगदी समर्पक..पण तू काय एकदम आदरार्थी सुरु केलंस??मैत्रीण म्हणून समुपदेशन केलं होतं रे..आणि काळजी करु नकोस सगळी बरोबर मार्गाला लागलीत....:) हाबार्स...

  ReplyDelete
 7. sahiye !! majja aali vachatana - we dont have children as yet pan jenva hoil tenva mala mulga zalela aawadel - specially te baher gelyavar washroom madhe jatana baba barobar porala pathavane kinva shopping etc porane baba barobar karane ya sathi ;)

  ReplyDelete
 8. निशा आभारी...मला मुलीच आवडतात पण आता पदरी पडलं पवित्र झालं या न्यायाने आपल्याकडे जे आहे त्याकडे फक्त एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायचा हा प्रयत्न आहे...तुम्हाला शुभेच्छा आणि हो मुलगा झालं तर ते तू म्हटलेले फायदे नक्कीच होतील...मला होताहेत त्यावरून तर खात्रीने सांगते...

  ReplyDelete
 9. चला मी आता कमेंटायला मोकळा, एक तर मला नक्की कळत नव्हतं की काय लिहिलयं ते! म्हणुन तुला त्यादिवशी चॅटवर विचारलं होतं ;)
  तू केव्हाचा पाठवलेला संदेश वाचायला हवा आता..
  तुला मुली आवडतात ना मग एक काम कर फॉर अ चेन्ज आरुष आणि ऋषांकला मस्त पैकी फ्रॉक्स घाल बघ कसे गोड बाहुली सारखे दिसतिल ते! खी खी खी !:)
  एनीवेज छान लिहिलयं..

  ReplyDelete
 10. दीपक यार तुम्ही लोकांनी माझ्यापेक्षा 'संदेश'चा पोपट केला...ही ही...असो म्हणून मी उगाच इनोदी लिहायच्या वाटेला जात नाही...असो..वाच आणि त्यावेळी लिंक लागली तर सांग..

  अरे, तुझ्या त्या फ्रॉकच्या कमेंटवरून आठवलं त्या दिवशी आरुष घरातली एक ओढणी घेऊन आईच्या मागे लागलाच होता मला साडी नेसव म्हणून...कसलं cute दिसत होत ते ध्यान....हे हे...

  ReplyDelete
 11. हाहाहा.. भन्नाट...
  दिलासे दिलेत.. ;)

  तू टॉमबॉय होती हे आधीही वाटायचं ;)

  जबरी लिहिलंय..

  ReplyDelete
 12. वाह मस्त लिहिलंयस...

  हा संवादु खुप खुप आवडला...

  ReplyDelete
 13. आई शपथ्थ...मला ही मुलगी नाही म्हणुन मी ही रडत बसायची..पण मुलगे असण्याचे एव्ह्ढे फायदे असतात हा विचार ही डोक्यात आला नाही...कोई गल नही...नव्याने सुरुवात....:P
  ..
  खरच आहे..आपली काळजी घ्यायला घरात एक नाही दोन नाही चक्क थ्री इडीयट्स आहेत गं...सो चील....
  मस्त मस्त भन्नाट एकदम.

  ReplyDelete
 14. :D माझी अमेरिकेत असलेली, एक मुलगा असलेली भाची, आता मुलगीच हवीय असा देवाकडे हट्ट धरून राहिलेय ! आणि आम्हां सगळ्यांना फोन करून सांगितलंय की देवाकडे आम्ही पण तिच्यासाठी आपापला वशिला लावावा ! :D
  दोन मुली, दोन मुलगे, एकुलती एक मुलगी, एक मुलगा व एक मुलगी अशी वेगवेगळी combinations आमच्या घरात आहेत...त्यातील गेला बाजार 'एक मुलगा व एक मुलगी' हे आदर्श combination असावं बहुधा...

  'तुझ्याकडे तुझी काळजी करायला थ्री इडियट्स समर्थ आहेत आणि त्या वासरात एकटीच शहाणी गाय व्हायच्या संधीचा फायदा घे'.... हे एकदम भारी आहे ! :D :D

  ReplyDelete
 15. समुपदेशन आवडलं..

  अगं उद्या सुना येतीलच की घरी.. तेव्हा हौस पुरवुन घे.. :-)

  ReplyDelete
 16. जहबहरदहस्त! :)

  ReplyDelete
 17. आभार रे आनंद...नवऱ्याच्या शब्दात सांगायचं तर तुला मुलगी झाली असती तर सांभाळता नसती आली टिपिकल मुलींसारखी म्हणून देवाने सोय केली...:P

  ReplyDelete
 18. खूप खूप आभार सुहास...

  ReplyDelete
 19. माउताई ब्लॉगवर स्वागत....अरे म्हणजे आपण मुलगेवाल्या आहोत तर....शेम पिंच....

  >>थ्री इडीयट्स आहेत गं...सो चील....

  पटेश...

  ReplyDelete
 20. अनघा, तुझा वरपर्यंत वशिला आहे माहित नव्हत ग.. नाही तर मागच्या वर्षी वशिले लावणारयामध्ये तुझा पण नंबर लावून पाहिलं असत ग...गेले ते 'गेलेले दिवस'...:D

  आता काय "देखणी बायको दुसऱ्याची" (आयला म्हणी पण मुलांच्याच येतात बघ लगेच) तस चांगल कॉम्बो दुसऱ्याच म्हणायचं आणि आपले दोन दगड सांभाळायचे...

  ReplyDelete
 21. दीपक, सुनांचा विचार आतापासून कुठे करा रे....मुली लहान असतानाची मजा घ्यायची होती न ती राहिली....

  जाता जाता, समुपदेशनासाठी always welcome मित्रा...

  ReplyDelete
 22. काय छान लिहिले आहेस ग मस्तच !!! धमाल आली वाचताना....:)

  ReplyDelete
 23. श्रिया बरेच दिवसांनी ब्लॉगवर दिसलीस...आभार...

  ReplyDelete
 24. सहीच! संदेश भावला. :)

  माझी पण दुखरी नसच गं ही. लेक नसल्याचे दू:ख फार. देवापुढे वशिला लावूनही... :(.

  ’ ऑफिसला जाणारी आई ’
  ’http://sardesaies.blogspot.com/ ची पोस्ट आठवते ना तुला. :D पण मुलगा असल्याचे फायदे असतात.
  :)

  ReplyDelete
 25. हं! एक मैत्रीण नाही मिळणार पण दोन मित्र मात्र नक्की तुझ्यासोबत असतील, अपर्णा. टॉम बॉय! तुला एकदाच पाहिलं होतं - ब्लॉगर मेळाव्यात. तेव्हाच तुझ्या चेहेर्‍यावरचे खोडकर भाव ओळखले होते मी. कशी दिसत असशील तू दंगामस्ती करताना? ;-)

  ReplyDelete
 26. हा हा कांचन तरी मेळाव्यामध्ये मी आवरलं कारण सगळ्यांना प्रत्यक्ष पहिल्यांदीच भेटत होते न...पण तू काय ग सिरीयस भाव घेऊन आमची मजा पाहत होतीस.....:P
  यावेळी जास्त धमाल करता आली असती पण यावर्षी तरी नाही जमणार. तुम्ही माझ्या वाट्याची मजा (आणि खादाडी) करून घ्या...

  दोन मित्र.. हो अगं मित्र परिवार वाढतोय...आधी भाचेकंपनी आता माझीच मुलं...मला सगळी नावानेच हाक मारतात (म्हणजे भाचर.. मुलं नाही...:))

  ReplyDelete
 27. श्री ताई, आपल्या काही दुखऱ्या नसा फार मिळत्या जुळत्या आहेत...आता एकदा भेटून आपण एकमेकांच सांत्वन करायला हवं...(खरं नुसतं तरी भेटायला हव सांत्वनाच नंतर पाहू...) तुझी पोस्ट पुन्हा वाचणार आहे मी....

  ReplyDelete
 28. पण मी आधी नंबर लावला भेटाभेटीचा :)).. दोघींशीही :))

  ReplyDelete
 29. वाह, ब्लॉग दूतावासामध्ये यायचं आम्ही आणि नंबर तू लावला ....धन्य....श्री ताई वाचतेस का?

  ReplyDelete
 30. स्थानमाहात्म्य हा विषय नसून नंबर कोणी लावला हा विषय आहे आणि तो मीच लावलाय :)

  ReplyDelete
 31. स्थानमहात्म्य?? लवकरच या स्थानामुळे त्या गावालाच महत्व प्राप्त होतंय ते बघ आधी.. :
  एकतर स्वतः कुठे हलायचं नाही आणि आम्ही (बिचार्‍या) आलो तर हेचि फ़ळ..... :)

  बरं बाबा त्या स्थानी राहून लावला तू नंबर.. हला जरा आता....दुसर्‍या पण जागा आहेत की ...:)

  ReplyDelete
 32. हा हा... अगं नचिकेत म्हणतोय ( मला हं का ) की बयो जरा निवडून निवडून स्थानमहात्म्य कर गं... यॉर्काला जायाचं करून इकडे आणलंस आता पुढचा नंबर कोन्या गावचा लावते आहेस.. :D:D

  ReplyDelete
  Replies
  1. माताजी अब आपही हमें स्थान का महात्म्य समझाईये ... ;)
   तुझ्या बाबतीत एक अढळ स्थान मला जास्त आठवतंय जिथे दर सहा महिन्यांनी तू आठवणीने नंबर लावतेस.... भागो.....:P

   Delete
 33. hi aparna...khup mast ahe.... mala khare tar mulaga ani mulagi donhi avadatat... pan mala mulaga hava hota adhi.... pan devane apekshepeksha changali mulagi dili.... really blessed....

  mazya lekiche nav swadha ahe.... ti zalyapasun mala ekadadi athavale nahi ki mala mulaga hava hota.... leki itake sanvedanshil konich nahi.... chhoti aaich mhan na...

  ata mi tham pane mhanu shakate, sagalyana mulaga asude va nasude pan ek god lek dech re deva...

  prachi

  ReplyDelete
  Replies

  1. प्राची, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. अरे बापरे मी ही पोस्ट २०११ मध्ये लिहिली आहे आणि आज परत पोस्ट आणि सगळ्या प्रतिक्रिया वाचताना मलाच गम्मत वाटते आहे. त्यामुळे तुझ्या खास प्रतिक्रियेसाठी आभार.

   तुझ्या लेकीचे नाव खूप छान आहे. अगं मुली गोड असतात हे नॉर्मल आहे पण
   मुलग्यांचीपण एक हळवी बाजू गेले काही वर्षे मी पाहते आहे. असो. या विषयावर बरेच काही बोलता येईल; पण तूर्तास आपले मूल, मग ते मुलगा असो वा मुलगी, निरोगी असावे आणि आपण त्यांच्यावर निर्हेतुक प्रेम करणे हे जास्त महत्वाचे इतकचं सांगेन :)

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.