Thursday, June 24, 2010

न भूतो न भविष्यती

विश्वास बसतोय का, की ६८-७० ही शेवटच्या सेटमधली गुणसंख्या चक्क लॉन-टेनिस मधली आहे म्हणून? विम्बल्डनच्या नियमाप्रमाणे अंतिम सेटमध्ये टाय-ब्रेकर नसतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूची सर्विस ब्रेक होईस्तोवर खेळलं जातं.त्याच तत्वावर झालेली न भूतो न भविष्यती अशी ही ११ तास ०५ मिनिटे अमेरिकेचा जॉन आइस्नर आणि फ़्रान्सचा निकोलस माहु यांच्यातली गेले तीन दिवसांची झुंज. अखेरीस जॉनने निकोलसची सर्विस ब्रेक केली आणि या सामन्याचा निकाल लागला.


गेले तीन दिवसांत टेनिसच्या पंढरीत कोर्ट क्रमांक १८ मध्ये काय नाही झालं?? दोन योद्धे लढले, त्यांनी त्यांच्या वैयत्किक बरोबर कित्येक जागतिक विक्रम रचले. सामन्याचा कालावधी तर वर म्हटल्याप्रमाणे आतापर्यंतचा सर्वाधिक आहेच. याआधीची सगळ्यात मोठी लढत झाली तेव्हा शेवटच्या सेटमध्ये २०-२२ असा गुणफ़लक होता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ही दोघं खेळली. विजेत्या जॉनने तब्बल ११२ एसेस आणि ४७८ गूण जिंकले तर हरलेल्या निकोलसचं पारडं याबाबतीत थोडं जड म्हणजे ५०२ जिंकलेले गूण आणि साधारण तोडीस तोड म्हणजे १०३ एसेस. पहिल्या दिवशी खेळ सुरु झाला तेव्हा साधारण तीनेक तासांचा खेळ झाल्यावर वेळेअभावी हा सामना दुसर्‍या दिवसावर गेला तेव्हा उपस्थित लोकं, पंच, कॉमेंट्रेटर कुणालाही दुसरा दिवस ही दोघं फ़क्त पाचवा सेट खेळत राहतील असं वाटलं नव्हतं. दुसर्‍या दिवशी इतर कोर्ट्स्वर जेव्हा एकापाठी एक मॅचेस संपत होत्या त्या वेळी कोर्ट क्रमांक १८ मात्र फ़क्त या दोन खेळाडूंची एकमेकांची जिद्द पाहात होता. या सेटमधल्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही खेळाडूंनी दाखवलेली संयत वृत्ती. कुठेही मुठी आवळणं नाही, एकमेकांकडे रागाने पाहाणं नाही किंवा धुसफ़ुसत बोलणं नाही. मी आणि माझी सर्विस. दोघांनी जणू शांततेचं मोठं ग्लास भरुन सरबत पिऊन ठेवलं होतं. मध्येच याविषयावर बोलताना कॉमेन्ट्रेटरनी म्हटलंही की बहुतेक मुठी आवळण्यातही ताकद घालवायची इच्छा नसावी यांना. सात तासानंतर अंधुक प्रकाश, वेळ आणि खेळाडूंची मागणी यामुळे हा खेळ थांबला त्यावेळी पाचव्या सेटचे गूण ५९-५९ होते. तिसर्‍या दिवशी मात्र ती एक सर्विस राखताना अपयश आल्यामुळे एका तासाच्या खेळानंतर शेवटी सामन्याचा निर्णय लागला आणि पाचव्या सेटमध्ये ६८-७० अशी आघाडी घेऊन अमेरिकेचा जॉन आइस्नर जिंकला; तेव्हा त्यांने अक्षरशः लोटांगण घातलं.

या चिवट लढ्याची इतरवेळी नियम एके नियम करण्याची ब्रिटीश आवड असणार्‍या विम्बल्डनच्या आयोजकांनीही या युद्धाची दखल घेतली आणि सामना संपल्यावर दोन्ही खेळाडूंचा सत्कार आणि एक छोटेखानी मुलाखत मैदानावर झाली. दोघा खेळाडूंना मेमेन्टो द्यायला पुर्वीचा ब्रिटीश टेनिसपटू टिम हेन्मनला बोलावले होते. खरं तर निकोलस या अपयशातून सावरला नव्हता त्यामुळे त्याचं नाव घेतल्यावर उठणं त्याला जड जात होतं, पण आयोजकांनी समयसुचकता दाखवून दोघंही खर्‍या अर्थानं विजेते असल्याने दोघांना एकत्र बोलावले. त्यानंतर लोकाग्रहास्तव त्या ऐतिहासिक गूणफ़लकाकडे दोघांना एकत्र उभं करुन फ़ोटोही काढले गेले. खरं तर वाटत नव्हतं की ही या दोघांची या स्पर्धेतली पहिलीच मॅच आहे म्हणून. पण शेवटी इतिहास घडवलाय या दोन्ही खेळाडूंनी. तेव्हा इतकं कौतुक तर नक्कीच व्हायला हवं.

इतका मोठा लढा देऊन जॉन आता (फ़क्त) दुसर्‍या राउंडमध्ये पोहोचला आहे.मला उगाच वाईट वाटलं की जर इतकी लढाई देऊन यातल्या विजेत्याला अंतिम लढतीपर्यंत पोहोचता नाही आलं तर हेची फ़ळ आले काय मम तपाला म्हणा..असो पण ही खेळीही तितकीच महत्वाची आहे. कारण संपुर्ण जगाच्या टेनिस इतिहासात ही महत्वाची नोंद या (सध्या) दिग्गज नसलेल्या दोन योद्ध्यांच्या नावावर होणार आहे. आणि या मॅचची व्याप्ती पाहिली तर टेनिसचा इतिहास पुन्हा असा क्षण (म्हणण्यापेक्षा तीन-चार दिवस) पाहिल असं वाटत नाही.इतका वेळ खेळण्यासाठीचा स्टॅमिना फ़क्त शारिरीकच नव्हे तर मानसिकही संतुलनही नीट ठेवणे हे काही खायचं काम नव्हे. इतर खेळांचा विचार करता हा एकट्याने ताकदीने खेळून आणि तेही जेव्हा सतत सात तास खेळायचं तेव्हा मोठा ब्रेक, हाफ़ टाइम असले चोचले नाहीत. या सर्वांचा खूप विचार केला तर ही मॅच म्हणजे नक्की खरंच असं कुणा मानवांनी केलं की भास असंच वाटावं. या दोघा योद्धयांना सलाम आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

21 comments:

  1. एकदम जबरदस्त गेम होता हा..दोन्ही खेळाडूंच्या स्टॅमिना मानला.
    एक अभूतपूर्व सामना होता हा..खरच असा क्षण परत ह्या लॉन टेनिस मध्ये शक्यच नाही...Kudos to both of them :)

    ReplyDelete
  2. हो सुहास..त्या दोघांच्या जागी कुणी असं-तसं असतं तर चालुही शकलं नसतं. सर्विस वगैरे तर दूरच.

    ReplyDelete
  3. खरंच अभूतपूर्व !!!!! टेनिसच्या इतिहासातल्या यापूर्वीच्या सर्वात जास्त वेळ चाललेल्या संपूर्ण सामन्यापेक्षाही यांचा शेवटचा सेट जास्त वेळ चालला.. अजून काय बोलणार... They are on the verge of being called Robos.. !! सलाम !!!

    ReplyDelete
  4. स्ट्युपेंडो फ़ेंटाबुलसली फ़ेंटास्टीकल सामना होता तो...

    ReplyDelete
  5. अपर्णा....जबरदस्त सामना झाला हा!!!

    या सामन्यानंतर दोघांच्या प्रतिक्रिया सुद्धा तेवढ्याच चांगल्या होत्या.....

    ReplyDelete
  6. हेरंब, खरंय..खरं म्हणजे आधीचे सेट कुणाच्याही गणतीत नसतील असा तो शेवटचा सेट होता...

    ReplyDelete
  7. योगेश, दोघांच्याही प्रतिक्रिया खरंच छान होत्या. मला वाटतं की थोड्या पुढच्या राउंडला हवे होते दोघेही...इतकी मेहनत जास्त सार्थकी लागली असती.

    ReplyDelete
  8. जब्बरदस्त... दोघांचे कौतूक करावे तेव्हडे थोडेच आहे

    ReplyDelete
  9. खरंय आनंद...तिथल्या तिथे त्यांचं कौतुक झालं हे फ़ार बरं केलं विम्बल्डन असो. ने

    ReplyDelete
  10. खरंच मस्त झाला सामना.
    एका ठिकाणी छान वर्णन वाचले होते ...

    Court-side, admiration turned to laughter turned to disbelief. Men who had sat down clean shaven scratched their straggly beards. Ball-boys became ball-men.

    ReplyDelete
  11. पंकज, अगदी....वर्णनं जितकी ऐकावीत तितकी मजाच आहे....आमच्या इथे कॉमेंट्रेटरची सॉलिड धमाल सुरु होती...विशेष करुन दुसर्‍या दिवशी पाचवा सेट शेवटपर्यंत राहिला त्यावेळी तर एकदम धमाल...मध्येच शेवटी रेडिओवर ऐकत होते तर सामना थांबता थांबता तो म्हणाला चला आता आपण रेस्टरूम ब्रेक घेऊया एकदाचा...

    ReplyDelete
  12. सुंदर ,अपतिम ,छान आहे ,---महेशकाका

    ReplyDelete
  13. सुंदर ,अपतिम ,छान आहे ,---महेशकाका

    ReplyDelete
  14. आभारी, महेशकाका.

    ReplyDelete
  15. आइस्नरला माहूने दिलेली साथ मला खुप आवडली... माहू शिवाय आइस्नरला अशी ऐतिहासिक विनिंग मॅच खेळणं तसं कदाचित शक्य झालं नसतं... आतापर्यंत रॉडिक, फेडी, राफा यांच्या जास्तीत जास्त साडे पाच तास चाललेल्या बर्‍याच मॅचेस मी बघितल्या आहेत, पण पहिल्यांदाच तब्बल ११ तास चाललेल्या अशा रोमांचक मॅचचा अनुभव रोमांचकच आहे...

    याशिवाय या विम्बल्डनच्या पहिल्याच दिवशी फालाने लॉन कोर्टचा मास्टर असलेल्या फेडीला शेवटपर्यंत झुंजत ठेवले होते, कसतरी बचावात्मक खेळत आणि डबल/ट्रिपल ब्रेक पॉइंट्स मिळवत फेडीने ती मॅच जिंकली होती आणि माझ्यासारख्या त्याच्या अनेक चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असेल! असो... तूझं वर्णन मस्त आहे...

    ReplyDelete
  16. वेल सेड विशाल.ही मॅच दोघांचंही श्रेय होतं...
    आणि फ़ेडररचं काय सांगावं त्याची ती मॅच मीही पाहिली...म्हटलं अरे बाबा पहिलाच राउंड आहे नं...तसंही नादाल आणि तो अशी फ़ायनल झाली तर ती सगळ्यात रोमांचक मॅच असेल आणि for some reason I feel I am never going to like Nadal....He is just not of my type..I love RF's attitude and gesture when he plays as compared to Nadal....anyway lets see what happens this weekend....BTW what do u think about the photos I put in here...:)

    ReplyDelete
  17. अल्टिमेट मॅच होती ही..
    मी बघू शकलो नाही ह्याची खंत वाटते...
    बाकी..माहू(त) ला हत्ती मिळता मिळता राहिला!

    ReplyDelete
  18. ही मॅच पूर्ण पाहायची म्हणजे पण आपलीच सहनशक्ती पाहण्यासारखं होतं....
    माहु(त) आणि हत्ती एकदम जबरा....:)

    ReplyDelete
  19. ही मॅच पाहता नाही आली पण ह्या आधी दोन वर्षापुर्वी साडेपाच तास रंगलेली फेडरर-रॉडिक मॅच पाहिली होती. त्या अनुभवावरून ह्या सामन्याची कल्पना करू शकतो.
    बाकी मी देखील फेडररचा चाहता आहे. राफा आणि फेडरर दोघेही ग्रेट आहेतच पण फेडरर आपला वाटतो. राफामे वो बात नही. जसं धोणी, पॉंटिंग ह्या लोकांनी कितीही पराक्रम केले तरी त्याला सचिन ची सर नाही.

    ReplyDelete
  20. खरंय सिद्धार्थ. फ़ेडरर आणि सचिन आक्षी खरं हाय बग....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.