Sunday, April 4, 2010

My prison, my home

"One Woman's Story of Captivitiy in Iran" आणि त्यानंतर लाल अक्षरात ठळकपणे लिहिलेलं शीर्षक MY PRISON, MY HOME....असं लिहिलेल्या मुखपृष्ठाने लक्ष वेधलं आणि लायब्ररीमधुन नव्या फ़िक्शन विभागातून हे पुस्तक उचललं आणि सुरूवातीपासुन शेवटपर्यंत त्याच उत्कंठेने वाचलं.शक्य असतं तर संपुर्ण वाचेपर्य़ंत खालीच ठेवलं नसतं इतकं छान लिहिलंय...


ही कथा आहे ६७ वर्षीय Haleh EsFandiari या मूळच्या इराणी आणि आता अमेरिकेत स्थायिक असणार्‍या एका इराणी महिलेची. इराणमध्ये असताना पत्रकार असणारी ही स्त्री अमेरिकेत प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत शिकवायची शिवाय काही मोठ्या फ़ेलोशिपच्या आधारे तिने Reconstructed Lives: Women and Iran's Islamic Revolution हे पुस्तकही लिहिलंय आणि सध्या वॉशिंग्टन डि.सी.च्या वुड्रो विल्सन सेंटरच्या मध्यपुर्व कार्यक्रमाची मुख्य सचिव.या केंद्रासाठी ती मुख्यतः मध्यपुर्वेकडच्या इराणसकट अन्य देशांच्या प्रतिनिधींची व्याखानं,कॉन्फ़रंसेस यावर काम करायची.थोडक्यात अमेरिका आणि इराण यांच्यात सुसंवाद होण्यासाठीच्या प्रयत्नांमध्येही एक कार्यकर्ता म्हणून तिची भूमिका. पण आपलं हे काम आपल्यासाठी तुरुंगाचा रस्ता दाखवील हे तिच्या कधी स्वप्नातही आलं नसेल.

२००६ च्या ३१ डिसेंबरच्या रात्री इराणमध्ये असलेल्या आपल्या आईला भेटून परत अमेरिकेला निघताना एअरपोर्टच्या एक्सिटला तिच्या टॅक्सीवर हल्ला होऊन तिचे दोन्ही(अमेरिकेचा आणि इराणी) पासपोर्ट आणि सगळं सामान लुटलं जातं. वरवर लुटारुचं वाटणारं हे काम असतं इराणी सरकारच्या इंटेलिजंस मिनिस्ट्रीचं. पासपोर्ट परत मिळवण्याच्या हेलपाट्यात आपल्याच देशात बंदिवान म्हणून आणि तेही तब्बल १०५ दिवस इराणच्या बदनाम एविन तुरुंगातून सुटका करून २००७ च्या सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळजवळ आठ महिन्यानंतर परत अमेरिकेत जाईपर्यंतच्या लढ्याची ही चित्तथरारक कथा आहे.

२००६ म्हणजे पाहायला गेलं तर आत्ता आत्ता घडलेली गोष्ट...तसं तर त्यावेळी मीही अमेरिकेतच होते आणि त्यामुळे मला हे पुस्तक वाचताना सारखं आत्ताच काळात इराणमध्ये असं चालतं?? हा प्रश्न निर्माण झाला..एक स्त्री आणि त्यातही वय ६७ म्हणजे जवळपास माझ्या आईच्या वयाची ही स्त्री मानसिकदृष्ट्या किती खंबीर राहू शकली आणि इंटेलिजंस मिनिस्ट्रीचे वेगवेगळ्या पद्धतीने चालणारे शोधकामाचे वार झेलुनही त्यांच्या दबावाला बळी पडली नाही याचं कौतुकच आहे...

हे पुस्तक या लुटीने सुरु होतं पण लेखिकेच्या बालपणीचं इराण ते तिने अमेरिकेला यायचा निर्णय घ्यायच्या वेळेपर्यंतचं इराण याचा इतिहास डोळ्यापुढं उभा राहातो. कधी न पाहिलेला हा देश, जास्त इतिहासही मला माहित नव्हता पण त्यावाचुन अडत नाही इतकं वास्तववादी चित्र निव्वळ शब्दांतुन डोळ्यापुढे उभं केलंय. जसा इराणचा इतिहास आहे तशीच अमेरिका-इराण संबंधांची अगदी क्लिंटनपर्यंतच्या प्रत्यत्नांचं वर्णन, लेखिकेची त्यावरची मतंही थोडक्यात सांगितली गेलीत....

सुरुवातीला नुस्तं मिनिस्र्टीच्या ऑफ़िसमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांना तास तास सामोरं जाता जाता, एक दिवस अवेळी घर तपासणी आणि शेवटी तुरुंगात अनिश्वित काळासाठी रवानगी होते आणि मग एक वेगळं इराण डोळ्यापुढं दिसतं..तुरुंगातल्या प्रत्येक प्रसंगाचं, पहारेकर्‍याचं इतकं विस्तृत वर्णन करायला ६७ व्या वर्षी मन खरंच खूप खंबीर हवं..घरची आठवण होऊ नये म्हणून केलेल्या काही त्यागांचं वर्णन डोळ्यात पाणी आणतात...खंबीर असलं तरी त्या मनात एक आई,आजी, लेक आणि अर्थातच पत्नी दिसत राहाते आणि काहीतरी सलत राहातं...खरंच कसं सहन केलं असेल सगळं? स्वतःच्याच देशात, आपल्याच सरकारकडून न केलेल्या गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी केलेलं कुटिल कारस्थान...

एका व्यक्तीचं जवळजवळ आत्मचरित्रच वाचावं आणि मग तिची सुटका झाली म्हणून आपणही निश्वास टाकावा आणि संपलं एवढ्यावरच नाहीये..शेवटच्या epilogue मध्ये अजुन एक धक्का आहे...हे सगळं लेखिकेच्याच शब्दात वाचलं गेलं पाहिजे म्हणून खूप मोह होतोय पण तरी पुस्तकातला एकही परिच्छेद मी इथे लिहित नाहीये...

अमेरिकेने इतर राष्ट्रांकडून प्रचंड दबाव आणून तिला सोडवलं पण कदाचित असे कितीतरी नागरिक असतील ज्यांना आपल्याच देशात अशा प्रकारची वागणूक मिळून कधीच बाहेरही येत नसतील...त्या सगळ्या हिमनगाचं एक टोक म्हणजे ही कथा..सगळ्यांनी वाचायलाच हवं असं आजच्या काळातल्या घटनेचं डोळ्यात पाणी, अंगावर काटा आणि मनात अनेक प्रश्न निर्माण करणारं पुस्तकं my prison, my home....

20 comments:

 1. अपर्णा, अगं मी पण ऐकलेयं या Haleh EsFandiari बद्दल. खरेच किती ही परवड गं आणि तीही स्वत:च्याच देशात तेही वयाच्या ६७व्या वर्षी. तू इतका छान आढावा घेतला आहेस की आता तर मला लगेच मिळवून वाचायलाच हवे. धन्स.

  ReplyDelete
 2. श्रीताई आवर्जुन वाच...मी लिहिलंय ते काहीच नाही, पण हे पुस्तक वाचल्यापासुन चैन पडत नव्हतं त्यासाठी हा उल्लेख....अशी पुस्तके इथल्या खिन्न हिवाळ्याला आणखी खिन्न करतात हेही जाता जाता....

  ReplyDelete
 3. एक तरी प्रसंग लिहियाचा होतास अस वाटतय मला...६७ व्या वर्षी अटक व नंतर त्यासाठी सुटकेसाठी प्रयत्न ..वाचायला हव..

  ReplyDelete
 4. सागर अरे पुस्तक वाच..मला असं संदर्भ सोडून काहीतरी वेगळं टाकावसं वाटलं नाही आणि ऑफ़िशियली असं करु नये असंही आहे...

  ReplyDelete
 5. माहिती बद्दल आभार. आपल्याला तर हिमनगाचे टोक देखील माहीत नाही असे जाणवते आहे. असे कितीजण असतील...

  ReplyDelete
 6. खरेच, असे कितीतरी नगरिक असतील ज्यांना अशी वागणूक मिळून ते तिथेच अडकून राहत असतील.एकदन छान वर्णन केले आहे.

  ReplyDelete
 7. वाचायलाच हवं, असे कितीतरी अजुन असतिल ज्यांची हाक बाहेरपर्यंत आलीच नसेल :(

  ReplyDelete
 8. शैलजा, प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप आभार आणि हो ब्लॉगवर स्वागत...

  ReplyDelete
 9. आनंद अगदी जरुर वाच...

  ReplyDelete
 10. रोहन अगदी बरोबर आपल्याला काहीच माहित नसतं पण लोक कुठे, कधी, कशा प्रकारच्या परिस्थितीतून जात असतील काहीच सांगता येत नाही....

  ReplyDelete
 11. बाप रे. भयंकरच आहे हे. बघतो पुढच्या महिन्यात ग्रिशमचं पुढचं पुस्तकं घेण्याच्या ऐवजी हेच घेतो.

  ReplyDelete
 12. हेरंब नक्की वाच...शेवटी खरी घटना आहे ती...तिची लेखनशैली मला आवडली...

  ReplyDelete
 13. वाचायलाच हवं हे पुस्तक. रोहन म्हणतो ते खरंय ... हिमनगाचं टोकसुद्धा आपल्याला माहित नाही हे जाणवतंय.

  ReplyDelete
 14. गौरी अगदी जरुर वाच..आणखी काय बोलु???

  ReplyDelete
 15. तू Nat Geo वरचे Jailed Abroad बघतेस का त्यात हे असे अनेक किस्से असतात... आपल्याला खरच कल्पना नसते ......आपण एका देशातून दुसऱ्यात वगैरे पटापट आणि सुखरूप उडतो...पण त्या प्रवासाला अशी काही बाजू असेल असे कधी मनातही येत नाही!!!

  ReplyDelete
 16. NGeo सध्या नाही आहे...एकदम बेसिकवर आलो आहोत सध्या त्यामुळे फ़क्त ऍनिमल प्लॅनेट आणि डिस्कव्हरी..पण या कार्यक्रम नाही पाहिला मी अद्याप...आपण खरंच पटापट इकडून तिकडे उडत असतो. एक चित्रपट नाव विसरले त्यात असे चुकून बॉर्डर ओलांडलेले अमेरिकेतले गिर्‍हारोहक का कुणी कसे अडकले त्याची कहाणी आहे...अशा खूप घटना नक्कीच आहेत....पण या पुस्तकाने त्या लेखिकेचं जीवन त्याक्षणी आपण जगतोय असं वर्णन आहे...वाच जमल्यास...

  ReplyDelete
 17. Tu Not Without My Daughter wachala aahe ka.. asach kahisa sandarbh aahe....

  ReplyDelete
 18. लीना ब्लॉगवर स्वागत..Not Without My Daughter बद्द्ल ऐकलंय पण राहिलंय वाचायचं...बरं झालं आठवण केलीस नक्की वाचेन...प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद..

  ReplyDelete
 19. Life & Death in Shanghai या पुस्तकाची आठवण झाली.
  My prison वाचायला हवं!

  ReplyDelete
 20. मीनल, नक्की वाच इतकंच म्हणेन

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.