Wednesday, April 21, 2010

गाणी आणि आठवणी २ - तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हुं मैं

काही काही गाणी एकदा भिडली की कायमच आपल्या आठवणींच्या कप्प्यात राहतात आणि मग वेगवेगळ्या वळणावर पुन्हा पुन्हा आपण त्यांना आठवत राहातो...माझ्यासाठी असंच एक गाणं आहे मासुममधलं ’तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हुं मैं.’ खरं म्हणजे अगदी लहान वयात ’लकडी की काठी’ या गाण्यामुळे पाहिलेला हा चित्रपट त्यावेळी कळणं शक्यच नव्हतं पण नंतर जेव्हा कळत्या वयात हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यातलं हे गाणं खूपच भिडलं.काव्य आणि चाल यांचा इतका सुरेख मिलाप आहे की गुलजारना श्रेय द्यायचं की आर.डी.चं गुणगान करावं हा प्रश्नच पडावा...
त्यातले हैरान व्हायचे प्रसंग तर इतक्यांदा आले की मी या गाण्याची आठवण आतापर्यंत सगळ्यात जास्त वेळा काढली असेल..अगदी कॉलेजजीवनातले आता लल्लुपंजु वाटणारे पण तेवढा प्रचंड दडपण आणणारे छोटे छोटे प्रसंग असो...इंजिनियरिंग मेडिकल अशा वेगवेगळ्या शाखा निवडल्या गेल्यामुळे होणारी मित्र-मैत्रीणींची ताटातूट असो किंवा घरात झालेले काही वाद असो...काही मनाला भिडणारे पराभव पचवताना, नको असताना घ्यावे लागणारे निर्णय स्वतःला पटवताना हे गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलेलं या गाण्यानेच अनुभवलंय.
जाण्यासाठीच येणारी माणसं खरोखरंच गेली की पुन्हा पुन्हा म्हणावसं वाटतं हैरान हुं मैं...किती गृहित धरलेलं असतं आपण सगळं आपल्या मनासारखं होणार म्हणून आणि मग ते तसं झालं की पडणार्‍या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे ’परेशान हुं मैं’ चा तो आकांत या गाण्याने कितीदा हलका केलाय...त्याचवेळी खूपदा पटलंय ही की ’जीने के लिए सोचा ही न था दर्द भी संभालने होगे’..आणि मुख्य म्हणजे ’मुस्कराने के भी कर्ज उतारने होगे’.........हसता हसताच हे आठवलं की डोळ्यात टचकन पाणी आल्याशिवाय राहात नाही...
अलिप्तपणे कधी कधी विचार करुन पाहाते की काय काय सांगितलंय या गाण्यात आणि किती मोठ्या मोठ्या प्रसंगांना साक्ष हे गाणं होऊ शकतं आणि तितकीच जास्त गुरफ़टत जाते या प्रत्येक शब्दात....कधी कधी वाटतं "एक आसु छुपाके रखा था’ म्हणून आणि मग तो या गाण्याच्या रुपाने बाहेर येतोय...त्यातलं "गम ने हमें रिश्ते नये समझाए" सुद्धा किती खरं आहे....आणि "धुप में मिले छाव के ठंडे साए" आठवले की थोडं बरंही वाटतं...
कधी तरी हे गाणं नुसतं गुणगुणलं तरी ती आर्तता डोळ्यातून पाणीच काढते...तसंही "आज अगर भर आयी है बुंदे बरस जाएगी" या गाण्यातही आहेच नं....अगदी सगळं काही सुरळीत सुरु असेल तरी हे गाणं ऐकलं की मी आपसूक आठवणींच्या जगात जाते आणि आजवर जितक्या वेळा ऐकलंय त्या त्या वेळा कुठल्यातरी अनामिक दुःखाने भरुन यायला होतं पण तरी ते दुःखी न वाटता आपल्याबरोबर चालतंय असंही भासतं...

15 comments:

 1. 'जीने के लिये सोचा ही न था दर्द संभालने होंगे'....

  पोस्ट जाम आवडेश* (c) हेरंब

  ReplyDelete
 2. सुंदर.. very expressive !!

  पहिल्यांदा ऐकलं तेव्हापासूनच 'मुस्कुरानेके कर्ज उतारने होंगे' हे खूप भावलं. कारण ते कुठेतरी आत टोचून गेलं होतं.

  आनंद आणि समस्त जनता : पटेश,आवडेश, कलटेश आणि समस्त 'एश' मी आता ओपन सोर्स करत आहे. त्यामुळे माझ्या संदर्भाशिवायही आपण हे वापरू शकता ;-) ;-) no more copyright :-).

  सॉरी अपर्णा, उगाच तुझ्या सुंदर, सिरीयस पोस्टचा मूड बिघडवला :(

  ReplyDelete
 3. आनंद आणि हेरंब धन्यवाद...
  हेरंब तुझी वटवट सगळीकडेच दिसतेय..एकमेकांचे ब्लॉग आपण वाचतोय हे आपल्या पोस्ट्स आणि कॉमेन्ट्समधुन कळतंय हेही खरं तर छान आहे...मैं नाराज नहीं हुं बॉस सिर्फ़ थोडीसी हैरान....:)
  आणि पोस्ट लिहिताना असलेला मुड पोस्ट एकदा बाहेर आली की जावा हेच बरं....निदान सिरियस मुड साठी.....त्यासाठीच तर हा "माझिया मना"चा अट्टाहास आहे नं....

  ReplyDelete
 4. अपर्णा,
  एकदम दिल से लिहिलयस. खुप सुंदर झाल्ये ही पोस्ट. माझ पण हे आवडतं गाण, शब्द पण खुप आवडते पण इतकं लक्षपुर्वक अर्थ लावुन कधि नाही ऐकलं. आता प्रत्येक वेळी गाणं ऐकताना तुझी आणि या पोस्टची नक्की आठवण येइल.

  ReplyDelete
 5. सोनाली, अगं लावशील तितक्या प्रसंगांना हे गाणं सामोरं जाऊ शकेल असं वाटतं मला तरी....कविता आणि मी असं फ़ार नातं नाही पण तीच कविता जेव्हा कुणी गाण्याच्या रुपात घेऊन येतं त्यावेळी मग हे अर्थ लक्षात येतात...

  ReplyDelete
 6. अगदी खरं गं अपर्णा, अशी अनेक गाणी मनात घर करून राहीलेली. जीने के लिए सोचा ही न था दर्द भी संभालने होंगे.... आणि मुस्कुराने के भी कर्ज उतारने होंगे... ही दोन्ही गाणी अतिशय भिडणारी. आत कुठेतरी भरून आलेच बघ... पोस्ट भावली.

  ReplyDelete
 7. अपर्णाताई, सुरेख पदधतीने गाण्य़ाच विश्लेषण केल आहेस..खरच कधीही एकल तरी आपल्याला अगदि नॉस्टॅलॉजीक करुन टाकणार अस गाण आहे हे...मी सुदधा बरयाच वेळा हया गाण्य़ाच्या ओळी जोडल्या आहेत काही घटनांशी...माझही वन ऑफ़ दी फ़ेवरीट गाण...

  ReplyDelete
 8. श्रीताई, या गाण्याने भरुनच येतं...खरंय..

  ReplyDelete
 9. देवेंद्र, धन्यवाद...पण तू मला ताई का म्हणतोयस?? अरे मी तसंही प्रतिक्रियेच्या पानावर लिहिलंय...सरळ अपर्णाच म्हण. तेच बरं वाटतं ऐकायला आणि पुढचा संवाद साधायला...
  तू म्हणतोस तसं हे गाणं नॉस्टॅल्जिक करुन सोडतं बघ...

  ReplyDelete
 10. हे गाण...अगदी जीगर्‍या आहे!!!!....सुंदर संध्याकाळ....हळूवार थंड हवा...हातात वाफाळलेली कॉफी....अन् हे गाण.....वाह..स्वर्ग सुख याहून वेगळ ते काय????

  ReplyDelete
 11. I echo your feelings! majh suddha khup aawadat gaan aahe he. he gan aikalyawar aaplya saarkhach ajunsuddha konitari kuthetari jiwanashi ladhatay asa wishwas suddha milato. mi ekatich nahiye as watat! itaki maitri jhaliye ya ganyashi.

  ReplyDelete
 12. हे गाणं ज्याला आवडत नाही तो औरंगजेब. कसलं टची आहे. सगळंच.... शब्द, संगीत, आवाज....मला हे गाणं ऐकताना नेहमी छुटकु जुगल हंसराजचे ते डबडबलेले डोळेच डोळ्यासमोर येतात आणि म्हणून तर हे गाणं आणखी घायाळ करतं.

  ReplyDelete
 13. योगेश, खरंय आणखी एक शक्यतो मी हे गाणं एकटीने ऐकते...म्हणजे डोळ्यांनी रिप्लाय केलं तरी चालतं....

  ReplyDelete
 14. धन्यवाद सोनल...मला वाटतं ब्लॉगवर बर्‍याच दिवसांनी आलीस....अगं तुझं म्हणणंही खरंय आपण दुसरं कुणीतरी तिथं तसंच सहन करतोय असाही विचार करतो..मला तर ते त्या दुसर्‍याचं दुःख आणखी हळवं करुन जातो...

  ReplyDelete
 15. शिनु, "औरंगजब" वाचुन मजा वाटली...बाकी अगं तो राहुल (त्याचं पिक्चरमधलं नाव कसं माहित नाही लक्षात आहे) म्हणतो नं, 'मैं देल्ही क्यौं नहीं आ सकता?' तेव्हा तर जाम पिळवटायला होतं...आणि त्याचं ते चित्रातल्या पप्पाला चष्मा काढणं..मी इथे लिंक दिलीय तो व्हिडिओ पहा...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.