Friday, April 9, 2010

फ़ुलोरा झुकझुक झुकझुक...

या गाण्यामागे प्रत्येकाच्या काही ना काही आठवणी असतील..आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवताना त्यांच्याही..तशाच माझ्याही कारण पळती झाडे पाहात मामाकडे जायचे दिवाळी आणि मे असे दोन सुट्ट्यांचे माझे लाडके महिने होते...या वर्षी त्याची मजा माझा लेकही चाखील...तसंही घोडा मैदान फ़ार दूर नाहीये...पण आम्ही तयारी कधीची केलीय..फ़क्त काळ बदलला तसं आमचं बछडं झुकझुक गाडीच्या ऐवजी घुंघुं विमानाने (निदान मला तरी चार + पंधरा तास हाच आवाज येणारे असं वाटतं..) जाणार...काश मुझे कविताए आती...नाहीतर "घरघर विमान करी, बेल्ट बांधा म्हणे सुंदरी, ढगात गिरकी घेऊया मामाच्या गावाला जाऊ या"...(हम्म्म कळतंय जुळलंय...) असं या गाण्याचंही काही वेगळं करुन मांडता आलं असतं..
पण तसं नकोच..कारण तसंही सुट्टीकी याद में हे गाणं मी आजकाल त्याला (कदाचित स्वतःसाठी) म्हणते...आणि हा चक्क या गाण्यावर झोपीही जातो..म्हणजे इतकं मी छान आळवू शकते असला काहीही गैरसमज व्हायच्या आधी मी मायाजालावर चेक केलंय..हे गाणं भैरवीतलं आहे..(म्हणजे नॉर्मल आहे तर ..माझं गाणं आणि काय???) आणखी एक ग.दि.माडगुळकरांचं माझं आवडतं आणि गायिका अर्थातच आशा भोसले आणि संगीत आहे वसंत पवार यांचं हे गाणं यावेळच्या फ़ुलोरात..आणि सुट्टीमध्ये गाणी म्हणायची का हे ठरवलं नाही म्हणून पुढच्या महिन्यात एकंदरितच विराम असू शकेल....झुकझुक झुकझुक अगीन गाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया


मामाचा गाव मोठा
सोन्या चांदीच्या पेठा
शोभा पाहु्नी घेऊया मामाच्या गावाला जाऊया


मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया मामाच्या गावाला जाऊया


मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया मामाच्या गावाला जाऊया


मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी घेऊया मामाच्या गावाला जाऊया

24 comments:

 1. सहीये मस्त गाणं आहे एकदम.. पण य गाण्यात मामाच्या बायकोला एवढे टोमणे का मारलेत कळलं नाही... तुला माहित्ये का ते??

  ReplyDelete
 2. हा हा हा हेरंब..मलाही माहित नाही पण अरे तिच्या स्वयंपाकाचं कौतुकही आहे नं..(म्हणजे मलातरी ते तसं वाटतंय...)

  ReplyDelete
 3. हमम्म....मस्त गाण आहे. . .लहानपणी आम्ही जेव्हा मामाकडे सट्टीला असायचो तेव्हा मामीला चिडवण्यासाठी सगळे एकासुरात हे गाण म्हणायचो!!

  ReplyDelete
 4. हा हा हा...योगेश मामीला चिडवायची युक्ती छान शोधलीत...मग हेरंबच्या प्रश्नाचं उत्तर थोडफ़ार मिळालं म्हणायचं...

  ReplyDelete
 5. अग कौतुक कुठलं. रोज शिकरण पोळी खायला लागते.. अशी ही सुगरण मामी.. असं म्हटलंय.. :-)

  ReplyDelete
 6. अरे हो रे...बघ मला पोळी(आणि तेही रोज) करणारी म्हणजे सुगरण असं वाटलं तर त्यात नवल नको...काय??

  ReplyDelete
 7. हो अपर्णाताई ,
  माझ्या मुलाला हे गाणे खूप आवडते. पण तो ’मामी मोठी तालेवार’ असेच म्हणतो नेहमी कितीहि वेळा सांगितले तरीहि....कदाचित मामीची चेष्टा त्यालाहि आवडत नसावी.youtube असे बरेच व्हिडिओ पण सापडतात.

  ReplyDelete
 8. शैलजा, मला तरी तुमच्या मुलाचं मामी तालेवार प्रकरण आवडलं बुवा..तसंही आता दोघं कमवण्याच्या युगात हेच खरंही आहे...हे हे..
  आणि हो माझा मुलगा अजून बोलतही नाही तर मला कुठे ताई-बिई उगाच..तसंही मी या ब्लॉगसाठी तरी अपर्णा म्हणूनच बरी...असो..
  प्रतिक्रियेसाठी धन्यवाद..

  ReplyDelete
 9. बरीच वर्षे झाली मामाच्या गावाला जाउन... लहानपणीच्या खूप आठवणी आहेत. लिहेन कधीतरी... शेवटचा गेलो ते आजी गेली तेंव्हा ... तो दिवस विसरु शकत नाही मी कधीच.

  ReplyDelete
 10. रोहन खरं सांगु का अजुनही मामाच्या घरी जाते, पण तरी आजी गेली तेव्हाचा दिवस विसरणं शक्य नाही आणि मग ते आजोळ संपल्याची एक वेगळी भावना...जाऊदे आजचा तो विषय नाही पण मलाही तसंच काहीसं आठवलं...

  ReplyDelete
 11. खूप मिस करतोय मी पण मामाचा गाव..माझ्या गावाची सफर मला आता फक्त स्वप्नातच होतेय
  आजोबा गेले तेव्हा गेलो होतो, ८ वर्ष झाली त्याला...
  :(:(:(

  ReplyDelete
 12. गेल्या चोवीस वर्षात मामाच्या गावापासून लांब जायची वेळ आली नव्हती. आज मात्र गाण्याचा अर्थ नव्यानं शिकतोय !

  ReplyDelete
 13. मामा गाव सोडुन शहरात आलाय आता त्यामुळे जुनी मजा गेली... पण गाण्यामुळे ते लहानपणीचे ते गोड दिवस आठवले.

  ReplyDelete
 14. सुहास, अशी बरीच घरं त्यातली कर्ती/मोठी व्यक्ती गेली की आपल्यासाठी काहीवेळा दुरावतात आणि मग फ़क्त आठवणीच उरतात..माझ्यासाठी तसं एक माझ्या एका मावशीचं सासरचं घर जे ती गेल्यावर कधीच पाहिलं गेलं नाहीये आणि त्याला आता जवळजवळ पंचवीस वर्षे होतील...

  ReplyDelete
 15. नॅकोबा अगदी वर्मावर बोट ठेवलंत...

  ReplyDelete
 16. आनंद, खरंय मामाच गाव सोडून शहरात आल्यामुळे आपल्या मुलांना ती मजा करता येणार नाही...माझ्या भाचीलाही त्याऐवजी माझ्या मामाकडे जायला आवडतं कारण ते अजुन गावात आहेत...

  ReplyDelete
 17. या गाण्यातली ओळ अन ओळ माझ्या मामाच्या संदर्भात लागू व्हायची. (अजूनही होते !)
  त्याचा गाव आता छोटा वाटतो. पण तेव्हा मोठाच होता ...
  मामी मात्र खरी खुरी सुगरण.
  ...
  थेट ८ वर्षांचा करून टाकलंत तुम्ही मला !
  छे ! आता मोठा कसा होऊ ??

  :)

  ReplyDelete
 18. शार्दुल, माझंही वय मी अशा गाण्यांनी आणि आगेमागे गडबड करणार्‍या माझ्या मुलाच्या संगतीने कमीच करुन टाकलंय...:)
  ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल खूप धन्यवाद...

  ReplyDelete
 19. कोई लौटा दे वो प्यारे प्यारे दिन.....

  ReplyDelete
 20. काय दिवस होते गं ते.... आता तीनही मामा देवाघरी गेलेत... उरल्यात आठवणी. हे गाणे जेव्हां जेव्हां ऐकते तेव्हां तेव्हां पोटात तुटते. ह्म्म्म... तरिही गाणे आवडतेच. बालपणीचा रम्य काळ सोबत घेउन येणारे गाणे.

  ReplyDelete
 21. हम्म्म..अगं म्हणूनच या पोस्टच्या सुरूवातीलाच लिहिलं की या गाण्याच्या प्रत्येकाच्या आठवणी असणार...आणि खरंय ते जुने दिवस आठवतात..मामाचा गाव प्रिय म्हणून हे गाण माझंही खूप प्रिय आहे...

  ReplyDelete
 22. माझ्याइतकं लेटकमर कोणी नाही.. होय नं?
  शिकरण आणि सुगरण हे कॉम्बिनेशन बाकी यमक जुळवण्यापुरतंच असावं!

  ReplyDelete
 23. अगं मीनल लेटकमर काय?? इतकं काही फ़ार्फ़ार महत्वाचं इथं नस्तंच..त्यासाठी दुसरे रग्गड ब्लॉग्ज आहेत...
  आणि तुला शिकरण मला फ़क्त ती टमटमीत (आणि रोजची) पोळीच दिसतेय..ही ही ही...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.